विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Sunday, 10 April 2016


सावता महाराजांच्या नगरीत फुलतो शैक्षणिक क्रांतीचा मळा ,
अरणची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा

             सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65च्या कडेला अरण हे छोटसं गावं. प्रत्यक्ष पांडुरंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेलं आणि कर्मालाच देव मानणाऱ्या संत सावता माळी महाराजांचं समाधीस्थळ. पर्जन्य छायेचा प्रदेश असला तरी बोर, डाळिंब, शेवगा यांसारख्या पिकांसाठी राज्यात नावाजलेलं आणि माळरानावती लाखो रुपयांचं उत्पन्न काढून कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित श्री.हनुमंत गाजरे यांसारख्या अनेक शेतकऱ्यांच्या कष्टाच्या घामातून उभारलेलं आमचं अरण.
                 समाजासाठी झटणारे कै.विठ्ठलराव शिंदे (मालक), कै.हरिभाऊ शिंदे (नाना), गोविंदराव पाटील, जोतीराव ताकतोडे, भारतआबा शिंदे, शिवाजीराजे कांबळे यांसारखे जिल्हा परिषद सदस्य, अतुलचंद्र कुलकर्णी, मंदाकिनी शिंद,वैशाली शिंदे यांसारखे आय.पी.एस.,आय.ए.एस.अधिकारी आणि अलीकडच्या काळात धनुर्विद्येत देश पातळीपर्यंत जाऊन सुवर्णपदक मिळविणारे येथील तीन ते साडे तीन हजार विद्यार्थी आणि कित्येक शिक्षक, पोलीस, सैनिक, असंख्य नोकरदार,उद्योजग  यांनी गावाचं नावं जगाच्या कानाकोपऱ्यात कोरलं. याचं सर्व श्रेय जात ते येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अरण आणि रमेश घोलप सारखे आय. ए. एस. निर्माण करणा-या संत सावता माळी विद्यालय अरण यांना.
               अगदी गावाच्या बाहेर बरडावरची शाळा म्हणून नावाजलेली, स्मशानभूमिलगत विद्येचं मंदिर नव्हे तर विद्येचं माहेरघर म्हटलं तरी वावगं ठरू नये अशी ही शाळा इ.स. १९२३ सालची स्थापना .अगदी जुन्या पत्र्याच्या चार खोल्यात भरणारी शाळा आज पूर्णपणे बदललेली दिसते.
वीस वर्गखोल्या, संरक्षण भिंत, संरक्षण भिंतीलगत गुलाब, जास्वंदी, कागदी फुलांच्या रांगोळ्या, मध्यान्हाचं भोजन करण्यासाठी वड, पिंपळ, उंबर, अशोक, बदाम यांसारखी मोठमोठाली झाडं मुलांना बसण्यासाठी कट्टे, समोर दुमजली इमारत, कार्यालयासमोर प्रशस्त व भव्य रंगमंच, त्या रंगमंचाला झालर शोभावी अशी हिरवीगार फुलझाडांची रचना, समोर प्रार्थनेसाठी स्वच्छ मैदान, शहरातील एखाद्या खाजगी शाळेत शोभावा असा भव्य व अद्ययावत संगणक कक्ष, पार्टेक्स फरशी, आणि समोर १८ संगणक संच, सुमारे ७० हजार रुपयांचं फर्निचर, एल.सी.डी. प्रोजेक्टर पाहून डोळे अगदी दिपून जातात.
             वैज्ञानिक दृष्टीकोन विद्यार्थ्यांच्या अंगी निर्माण व्हावा, आपल्या मनातील प्रश्नाची उकल व्हावी यासाठी एखाद्या कॉलेजलाही लाजवेल अशी स्वतंत्र अग्निपंख प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांच्या अवांतर वाचनासाठी आणि शिक्षकांच्या अध्यापन मदतीसाठी दीड ते दोन हजार पुस्तकांनी भरलेले बालवाचनालाय. वेगवेगळ्या संदर्भ ग्रंथासह काय पहावं अन काय नको अशी अवस्था होते या शाळेत आल्यानंतर. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागाव्यात यासाठी इयता सहावीतील विद्यार्थी चालवतात शालेय वस्तू भांडार.नफा बॅंकेत जमा करून त्यातून विद्यार्थ्यांना मिळतात वेगवेगळी बक्षिसे.
                शाळेत इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचे १४ वर्ग भरतात. सेमी इंग्लिशचे वर्ग असणारी सोलापूर जिल्ह्यातील ही पहिलीच शाळा. सर्व शिक्षक एम.एस.सी.आय.टी./सी.सी.सी. आणि बहुतेक शिक्षक पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले. शालेय व्यवस्थापन (डी.एस.एम.) कोर्स पूर्ण केलेले ८ शिक्षक. बहुतेक  शिक्षक गावातलेच, गावाविषयी अभिमान असणारे आणि समाजातील प्रत्येक घटकाशी संबधित असणारे.परगावच्या शिक्षकांचही आता हेच गाव आपलं झाल्यासारखं इथं झटतात. हाच धागा पकडून शिक्षकांनी ‘विद्यार्थी कल्याण निधी’ ही योजना सुरु केली आणि माजी विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी यांचेकडून २,५५,०००/- रु. निधी कायम ठेव म्हणून बँकेत ठेवला.'आजी माजी विद्यार्थी कल्याणकारी संस्था 'निर्माण झाली. दरवर्षी या रकमेच्या व्याजातून मिळालेला पैसा गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वाटण्यासाठी वाटला जातो. लाखो रुपयांचा निधी जमा करून शाळेत विविध उपक्रम आयोजित केले जातात. दरवर्षी देशाच्या प्रजासत्ताक दिनी ‘जल्लोष’ हा पाच तासांचा स्नेहसंमेलानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो.
         इयत्ता पहिलीपासून सेमी इंग्लीश वर्ग असणारी ही पहिलीच शाळा. शाळेच्या गुणवत्तेचा दर्जाही अतिशय उत्कृष्ट. शिष्यवृत्ती परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, नवोदय परीक्षा, STS, ITS Exam या परीक्षेत या शाळेतील विद्यार्थी चमकले.समृद्धी रणदिवे सारखी बालकवयित्री जिचा कविता संग्रह राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल यांनी वाचून प्रतिक्रिया दिली ती याच शाळेची विद्यार्थीनी. या शाळेने मरवडेचा स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार, सानेगुरुजी सुंदर शाळा पुरस्कार असे या शाळेने जि.प.चा आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त केले.
शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षा, प्रज्ञाशोध परीक्षा, क्रीडा स्पर्धा यांमध्ये दरवर्षी विद्यार्थी यश संपादन करतात. शंकरराव मोहिते-पाटील गुणवत्ता विकास अभियानामध्ये सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक मिळविणारी शाळा म्हणून गौरव. शाळेत बालोद्यान यामध्ये घसरगुंडी, सी-स्वा, झोके, डबलबार, सिंगलबार इत्यादीची सोय केलेली आहे. येथील ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ यांच्या सहकार्याने शाळेला पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र बोअर, तीन पाण्याच्या टाक्या देण्यात आलेल्या आहेत.
हे सर्व एक – दोन वर्षात झालं नसून तब्बल दहा वर्षाचा कालावधी यासाठी जावा लागला. इ.स. २००० साली शाळेत ३०० विद्यार्थी होते. २००७ साली शाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करण्यात आले आणि मग आसपासच्या खेड्यातून खाजगी वाहन करून वाड्यावस्त्यावरील विध्यार्थी शाळेत येऊ लागले.हळूहळू  पटसंख्या वाढू लागली ती ६७५ पर्यंत गेली .
             हे सर्व पाहिलं आपले माजी शिक्षणमंत्री मा.वसंत पुरके यांनी शनिवार दि. २७ जुलै २००८ वेळ सकाळी ७.३० ची. शाळेत लाल दिव्याची गाडी.... आणि मागे गाड्यांचा ताफा. मुले गडबडली नाहीत, गोंधळली नाहीत कारण त्यांना रोज कोणीतरी न कारण त्यांना रोज कोणीतरी नवीन पाहुणे शाळा पाहण्यासाठी येतात हे माहित होत. पण आज प्रत्यक्ष शिक्षणमंत्र्यांची भेट! मुलांनी त्यांची मुलाखत घेतली ती चक्क इंग्रजीमधून.  “अरणची शाळा म्हणजे माझ्या स्वप्नातील शाळा”, अशा शब्दात मंत्र्यांनी शाळेचं आणि मुलांचं कॊतुक केलं.जेष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी तर शाळेची तुलना रवीन्द्रनाथांच्या शांतीनिकेतनशी केली. माजी शिक्षण उपसंचालक सुमनताई शिंदे, सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मा.वीरेंद्रसिंह, श्री.मोहन ठोंबरे, जिल्हाधिकारी जगदीश पाटील हेरंब कुलकर्णी सर यांनी शाळेला भेटी दिल्या. येथील नवनवीन उपक्रम पहिले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता पहिली. याचबरोबर राज्यातील आणि जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी शाळेला भेटी दिल्या.
याच गावाचे सुपुत्र आणि सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीच माजीे सभापती मा.शिवाजीराजे कांबळे,अर्थ व बांधकामचे माजी सभापती तथा पं.स.सदस्य भारतआबा शिंदे, अॅड.विजय शिंदे, सरपंच सुनिता गाजरे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सावता रणदिवे यांचं शाळेकडे अगदी बारीक लक्ष असतं. शाळेतील प्रत्येक उपक्रमांत यांचा मोलाचा वाटा आहे. शाळा नुकतीच आय.एस.ओ.झाली गावक-यांनी अशा दुष्काळातही लाखोंची मदत केली.आमचे मार्गदर्शक वैशाली जामदार मॅडम ,गटशिक्षणाधिकारी सोमनाथ वैद्य, विस्तार अधिकारी चांगदेव कांबळे, विकास यादव, सुहास गुरव माजी केंद्रप्रमुख पुष्पा गुळमे, केंद्रप्रमुख दत्तात्रय रेपाळ यांचे मोलाचे मार्गदर्शन ही शाळा निर्माण करण्यासाठी लाभले.आज केंद्र प्रमुख विलास काळे सर या सर्वांना मार्गदर्शन करत आहेत.
           हरिभाऊ नाळे ,बलभिम पाटील,शांता शेंडगे मॅडम, गोरख राऊत,मोहन वसेकर. जयश्री राऊत, मॅडम सविता राऊत मॅडम, कल्पना घाडगे मॅडम, संगीता घाडगे मॅडम,शामसुंदर शिंदे या बदली झालेल्या शिक्षकां समवेत पंधरा वर्षे मला या शाळेत सेवा करता आली . शाळेसाठी खूप मेहनत घेतली.याचा आम्हा सर्वांना अभिमान वाटतो.
         राज्याचे सचिव मा.भापकर साहेब,नंदकुमार साहेब ,जिल्ह्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी  मा.अरुण डोंगरे साहेब ,शिक्षणाधिकारी मा.वैशाली जामदार मॅडम यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शाळेत वर्षभर विविध शालेय ,सहशालेय उपक्रम आयोजित करण्यात आले.एकही विद्यार्थी अप्रगत राहणार नाहीत यासाठी सर्व शिक्षकांनी अतोनात कष्ट घेतले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्व विकासस्पर्धेत आणि क्रिडास्पर्धेत शाळेने जिल्हा स्तरीय पारितोषिके पटकावली.त्यासाठी शाळेतील शिक्षक संजय नाळे, रामकृष्ण केदार,बलभिम  गोरे,विक्रम टरले, जाधव यांनी खुपच परिश्रम घेतले.वर्ग सजावट हस्तकला विविध स्पर्धा यासाठी `रत्नप्रभा जाधव मॅडम, शिंदे मॅडम,माने मॅडम,दिंडोरे मॅडम,मनीषा वसेकर मॅडम ,काझी मॅडम,मुंगुसकर मॅडम ,जाधव सर,बादगुडे मॅडम,बरडे मॅडम परिश्रम घेत आहेत.
दीपक कुंभार नंतर सुरेश कांबळे अगदी तुटपुंज्या मानधनावर संगणकाचे शिक्षण देत आहेत. दत्ता चव्हाण,अनिल ढगे क्रिडा, चित्रकला कार्यानुभवची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत आहेत.आणि यासर्वांकडून आनंदी वातावरणात चांगलं काम करून घेत आहेत.प्रभारि मुख्याध्यापक छगन गवळी सर.
           शाळेत बालसभा,सहली,क्षेत्र भेटी महिन्याला पालक सभा, वाढदिवस,शिक्षक दिन, विज्ञान मेळावा विविध स्पर्धा, ग्राम स्पर्धा यासारखे कितीतरी उपक्रम. वर्षभर चालू असतात.
एकदातरी सदिच्छा भेट द्यावी अशी ही जिल्ह्यातील  एकमेव प्राथमिक शाळा..!
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, श्रीक्षेत्र अरण.
ता.माढा, जिल्हा – सोलापूर. (महाराष्ट्र – ४१३३०१ )
|| शाळेला गावाचा आधार, गावाला शाळेचा आभिमान ||
शब्दांकन – श्री.नवनाथ ह. शिंदे
                    shindenh9@gmail.com


व्हाटसअप, आय.एस.ओ. आणि ज्ञानरचनावाद....
जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक क्रांतीच्या नव्या वाटा....!
--------------------------------------

समाजातील प्रत्येक घटकाच हक्काचं व्यासपीठ म्हणून ओळखली जाणारी गावातील जिल्हा परिषदेची शाळा. ज्यावेळी गावात कोणताच विषय बोलण्यासाठी नसतो त्यावेळी हक्कान कुणी चांगलं तर कुणी वाईट बोलावं ते शाळेविषयी... मग ते शाळेतील शिक्षकांविषयी असेल, पोषण आहाराविषयी असेल अथवा चांगल्या वाईट उपक्रमाबद्दल . शाळेतअनेक विषय. दिवस भर जरी गप्पा मारत बसलं तरी विषय शिल्लक राहतील, आणि का बोलता? म्हणून तुम्हाला कोणीही विचारणार नाही असं हे गावकऱ्यांसाठी गप्पांच मैदान.
परंतु अगदी अलीकडच्या काळात हे सारं बदलत चाललेलं दिसतयं. नवं सरकार, नवी शैक्षणिक धोरणं, नवा अभ्यासक्रम त्याचबरोबर आधुनिकतेची जोड देत केलं जाणारं अध्यापन आणि अध्यापनात होत असलेला ई-लर्निंग चा वापर हे अलीकडच्या जि.प.शाळांचं वॆशिष्ट्य .हे सारं करत असताना शिक्षकांनी सुद्धा आपल्यामध्ये बदल करून घेतलेला दिसून येतोय. त्याच त्याच रटाळ अध्यापन पद्धती, पाठांतरावर दिला जाणारा जोर आणि शिकवलेले कळले नाही म्हणून दिला जाणारा मार कालबाह्य झालेला दिसून येतोय. नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी आणि खाजगी शैक्षणिक संस्थाबरोबर चाललेली स्पर्धा या विषयी शिक्षक आता विचार करू लागल्याचे दिसून येत आहे.
दहा-बारा वर्षाच्या कालावधीत सर्व शिक्षा अभियानातून शाळेच्या भौतिक गरजा भागल्या या कालावधीत विविध अभियानं राबविली गेली. परंतु माणूस जेव्हा आतूनच पेटून उठतो तेव्हा क्रांती घडून येते असा आपला इतिहास सांगतो. असाच कामाच्या ध्यासाने पेटून उठलेला शिक्षक आता ख-या अर्थानं फेसबुक, व्हाटसअप, ई-लर्निंग, डिजिटल क्लासरूम च्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात क्रांती करतोय.
सोलापूर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी मा.वैशाली जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेला ए.टी.एम. ग्रुप. जिल्ह्यातील धडपड करणारे शिक्षक अधिकारी, संगणक तज्ञ या ग्रुपला जोडले गेले, शाळेत केले जाणारे उपक्रम, अडचणी, उल्लेखनीय बाबींची देवाण घेवाण या ग्रुपच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली जावू लागली. प्रत्येक मुद्द्यावरून चर्चा करण्यासाठी मा. शिक्षणाधिकारी वेळ देऊ लागल्या . अधिकारी आणि शिक्षक एकमेकांच्या  जवळ येऊ लागले माहितीची देवाण घेवाण झाली. ध्यास फक्त गुणवत्तेचाच...
ई-लर्निंग म्हणजे काय? डिजिटल स्कूलची संकल्पना काय? मोबाईल वरून अध्यापन कसे करावे? हे आणि यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे देणारा फार मोठा ग्रुप या जिल्ह्यात काम करतोय. यामध्ये अग्रक्रमाने रणजीत डीसले, लक्ष्मण काटेकर, विजागत सर, नदाफ सर हे आणि यांसारखे अनेकजण तंत्रस्नेही या व्हाटसअप ग्रुपद्वारे जिल्ह्यातील इतर शिक्षकांना माहितीची देवाण घेवाण करताहेत. विषय फक्त आणि फक्त ई-लर्निंग. संगणकाचा अध्यापनात कसा वापर करावा?. शैक्षणिक व्हीडीओ निर्मिती कशी करावी?. शैक्षणिक अॅप्स, ब्लॉग, गुगल फॉर्म वर माहिती जमा कशी करावी या बद्दल सखोल ज्ञान या ग्रुपवर मिळू लागलं.
रणजीत डीसले यांनी बालक पालक ग्रुप तयार करून पालकांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण केली. थेट तक्रार न करणारे पालक ग्रुपवर चर्चा करू लागले. समस्या समजल्या कि ईलाज निघतो. शाळा आणि समाज यांच्यामध्ये  जवळीक निर्माण  झाली.
मंगळवेढ्याचे अमित भोरकडे हे उत्तम चित्रकार, सुंदर हस्ताक्षर, रांगोळी, मेहंदी आणि फलकलेखन याविषयी जिल्ह्याला परिचित आहेत. माझी शाळा माझा फळा हा ग्रुप त्यांनी तयार केला. जिल्ह्यातील सर्व कलाकार मंडळी जोडली गेली. शाळामधील फळे रंगू लागले अनेक अक्षरांचे नमुने सर्वांना पहायला मिळू लागले.
माढा तालुक्यातील अरणचे केंद्रप्रमुख विलास काळे  यांनी ज्ञानरचनावाद सुरु केला.. विद्यार्थ्यांनी स्वत: ज्ञानाची रचना करावी. स्वत: शिकावं, स्वत: अनुभव घ्यावेत चुका सुधारण्यात शिक्षकांनी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी अशी हि ज्ञानरचनावादाची संकल्पना अनेक शिक्षक, नामवंत शिक्षणतज्ञ अधिकारी या ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आले. उपक्रमांची देवाणघेवाण झाली. अडचणींवर चर्चा घडू लागली.शाळा रंगू लागल्या आणि विद्यार्थी स्वतः काय तरी करताहेत  हे दिसू लागलं .ग्रुप प्रश्न सुरू झाले .सर्व शाळेच्या वेळे व्यतिरिक्त...
हे सर्व करत असताना आपल्या शाळा आय.एस.ओ. असायला पाहिजेत असा एक विचार पुढे आला. करमाळा तालुक्यातील एक शाळा आय.एस.ओ. झाली आणि संपूर्ण जिल्ह्यानं शाळा आय एस ओ करण्याचा ध्यासच घेतला. शाळा आणि समाज एकत्र आला कि काय घडू शकत ते कळून आलं. लाखोंच्या घरात रोख आणि वस्तूंच्या स्वरूपात  शाळेला देणग्या मिळू लागल्या. शाळा रंगू लागल्या. शाळेच दप्तर यामुळे व्यवस्थित झालं. शाळेकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टीकोन बदलला. जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी शाळा स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे सर्वांना वाटू लागलं आपली शाळा आय.एस.ओ. व्हायला पाहिजे. दहा बारा वर्षाच्या काळात सर्व शिक्षा अभियानातून जेवढं काम झालं नव्हतं  किंबहुना त्याही पेक्षा कितीतरी पटीनं जास्त काम अाय एस ओ मधून झालं.तालुक्यात तालुक्यात स्पर्धा निर्माण झाली यामध्ये माढ्याचे गटशिक्षणाधिकारी सोमनाथ वॆद्यसाहेब, पंढरपूरच्या वठारे मॅडम ,मोहोळचे फडके सर कायमच चर्चेत राहिले.
याचबरोबर शाळेत काहितरी नवीन उपक्रम चालू करावा .त्याचं एका साचेबद्ध पद्धतीत शिक्षकांनी लिखाण करावं आणि इतर शाळांना मार्गदर्शक म्हणून त्याचा वापर व्हावा यासाठी सिद्धाराम माशाळे,बाळासाहेब वाघ ,हेमा शिंदे शरणप्पा फुलारी आणि त्यांची सर्व टीम राज्य स्तरावर काम करतेय .
          आवाज नसणाऱ्यांचा आवाज म्हणून संपूर्ण राज्याला परिचित असणारे शेटफळ ता.मोहोळ चे योगेश भांगे यांचही असच अफलातून कार्य ‘व्हाईस ऑफ द व्हाईसलेस’ च्या माध्यमातून जिल्ह्यातील कर्णबधीर बालकांना बोलकं करणं. ‘कानाने बहिरा मुका परी नाही’ हे ब्रीद घेऊन त्यांचं कार्य संपूर्ण राज्यभर चालू आहे.ताट-वाटी सारखा उपक्रम त्यांनी सुरू केला आणि कर्णबधीर शोध मोहिमेला एक दिशा मिळाली  हे आणि यासारखे कित्येक शिक्षक या शैक्षणिक क्रांतीमध्ये सामील आहेत. हे सर्व पाहून अस वाटतयं  येणारं २०१६-१७ हे शैक्षणिक वर्ष ‘शैक्षणिक क्रांतीच’ वर्ष असणार आहे.

शब्दांकन – श्री.नवनाथ शिंदे
अरण, ता.माढा.
Mob. : 97 66 88 25 98
shindenh9@gmail