Thanks Teacher.....
(शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनात रंग भरणार व्यक्तिमत्व).....
चारशे ते पाचशे लोकवस्ती असणारं विठ्ठल वाडी हे गाव. मध्येच मारुतीचं मंदिर. मध्यभागी मूर्ती आणि चार कोपऱ्याला आमचे चार वर्ग. आमचे चटे गुरुजी मारुतीकडं पाठ करून बसलेले आणि आम्ही त्यांच्या भोवती अर्धवर्तुळाकार हातात खापरी पाटी - पेन्सिल आणि समोर अंकलिपी घेऊन त्यांच्यासमोर बसलेलो. एवढच काय ते आमचं शालेय साहित्य. त्यावेळी आमचे विश्व म्हणजे चट्टे गुरुजी आणि पवनपुत्र हनुमान. गुरुजींनी हाताला धरून अक्षर गिरवायला शिकवली. अभ्यासाची सुरुवात आणि शिस्तीची सुरुवात सोबतच . ज्यांची जीभ जांभळी दिसली त्यांना दिलेले छड्या.. आजही जांभळे खाताना तशाच आठवतात... कारण मी ही त्याचा एक भाग झालेलो.. जांभळा मध्ये आळ्या असतात आणि ते खाऊन आजारी पडलं उद्या शाळा बुडते, ही त्यांची त्यामागची भावना. शिस्तीत सुरू झालेलं शिक्षण मी कधीच विसरू शकत नाही.Thanks teacher.
पुढं प्रसंगानुसार तिसरी मध्ये अरण शाळेत प्रवेश घेतला परिस्थिती तीच. फक्त देव बदलला आता माझा वर्ग संत सावता महाराजांच्या मंदिरात सुरू झाला. श्रीमती पार्वती साखरे बाई आमच्या वर्गशिक्षिका कडक शिस्त तशीच. अक्षर खूप सुंदर. वळणदार. कविता गायनावर त्यांचा भर. हे सगळे गुण आमच्या मध्ये उतरवण्यासाठी त्यांची चाललेली धडपड आम्हाला पुन्हा आयुष्यभर पुरली Thanks teacher.
पुढे त्याच वेळी पायापासून डोक्यापर्यंत कडक पांढरे शुभ्र इस्त्रीचे कपडे, कपड्याला कुठेही घडी दिसणार नाही. डोक्याला कोच असलेली पांढरीशुभ्र टोपी. दररोज दाढी केलेला रुबाबदार चेहरा सावकाश, स्पष्ट, मोठ्या आवाजात त्यांचं बोलणं सुरु झालं की सगळा वर्ग चिडीचूप. त्यांचा भारदस्त आवाजाचे बब्रुवाहन साळुंखे गुरुजी त्यांची शिकवण्याची ढब गणिताचं ज्ञान, गायन ,फलक लेखन उत्कृष्ट. संध्याकाळी शिष्यवृत्तीचे ज्यादा तास त्यांच्याच घरी असायचे. पेंटरला ही लाजवेल असं त्यांचं फलक लेखन.. त्यावेळे पासून वाटायचं की आपणही फळ्यावर असं लेखन करावं. गुरुजी तुमच्यामुळेच आज मीही छान पैकी फलक लेखन करू शकतो...म्हणून Thanks teacher..
चौथी संपून पाचवीत गेलो पण मंदिर काय आमचा पिच्छा सोडत नव्हतं आता वर्ग भरत होता विठ्ठल मंदिरात. विठ्ठलाची पालखी दर वर्षी जिथे मुक्कामाला असायची त्याच मंदिरात आम्ही शिकण्यासाठी बसलो होतो आणि समोर होते आमचे हरिभाऊ नाळे गुरुजी. आज पर्यंत आमच्या वरच्या वर्गातील मुलांकडून त्यांचे फक्त नाव ऐकलेलं. गावात आणि संपूर्ण परिसरात त्यांच्या नावाचा शिकवण्याचा प्रचंड दबदबा. गणितामध्ये त्यांचा खूप हातखंडा होता. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खूप झटायचे ते. गाव, शाळा, ग्रामस्थ, नेतेमंडळी या सर्वांचाच त्यांचा अभ्यास होता. शिस्त, अभ्यास ,अध्यापन ,आणि शिक्षा इथं कुठंच तडजोड नसायची. घरी सांगावं तर डबल मार मिळायचा. त्यांच्यामुळेच मला गणिताची आवड लागली. त्यांच्या जोडीला असायचे रमण तांबोळी गुरुजी शिस्तीला थोडी विश्रांती मिळावी म्हणून.... या दोघांची जोडगोळी कायम असायची .विनोदीं स्वभाव, कवितांना चाली लावणं, गाणी गोष्टी शिकवणं इतिहास भूगोल हिंदीचं अध्यापन हसत-खेळत आनंददायी शिक्षण कसं करावं हे त्यांच्याकडूनच आम्हाला शिकायला मिळालं. दिलखुलास व्यक्तिमत्व. त्यांच्या जोडीला इंग्रजी शिकवायला असायचे काटे गुरुजी. इथं मात्र इंग्रजी शिकण्यात कसलीच तडजोड नसायची प्रचंड शिस्त कडक स्वभाव गुरुजींचा तास म्हटलं की निमा वर्ग गायब असायचा. काहींच्या पोटात दुखायचं. इंग्रजीवर त्यांचं खूपच प्रभुत्व होतं. पण प्रत्येकाला इंग्रजी आलं पाहिजे हा त्यांचा अट्टहास असायचा आणि मुलांना मात्र वाटायचं इंग्रजी हा आपला कट्टर शत्रू आहे... त्यांची बदली झाली आणि पुष्पाताई गुळमे
यांनी आनंददायी पद्धतीने इंग्रजी शिकवायला सुरुवात केली. गीत गायन, सांस्कृतिक कार्यक्रम ,शालेय सहशालेय कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं. विविध गुणदर्शन कार्यक्रम कसे बसवावेत. हे सगळं त्यांनी आम्हाला शिकवलं. डान्स करायला शिकवायचे. पण ते कधीच जमलं नाही. त्यांनी मात्र पिच्छा सोडला नाही मी शिक्षक झाल्यावर सुद्धा त्या केंद्रप्रमुख म्हणून मला डान्स शिकवायच्या आणि साक्षरता अभियान विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमात त्यांच्या सोबत एका भिल्ल गीतावर डान्स करायची माझ्यावर पाळी आली.. पुढ हेच गुण शिक्षणक्षेत्रात मला खूप उपयोगी पडले. हे प्रसंग कधी विसरू शकत नाही म्हणून Thanks teacher...
माझं आणि माझ्या वर्गाचं खरंच नशीब होतं. आत्ता आम्ही होतो खंडोबा मंदिर परिसरात. पहिलीपासून प्रत्येक वर्षी आम्हाला शिक्षकच असे भेटत गेले की मागं वळून पाहण्याची कधी गरजच पडली नाही. एवढं पुढं वाढून ठेवलेलं असायचं. आठवी मध्ये संत सावतामाळी विद्यालयात प्रवेश घेतला प्रचंड उत्साह, कडक स्वभाव, हसत खेळत शिक्षण, पूर्णवेळ शिक्षणासाठी वाहून घेतलेले खणखणीत आवाजाचे हरिदास रणदिवे सर आमचे क्लास टीचर... त्यांच्याकडून बरंच काही शिकता आलं. नेमकेपणा, हजरजबाबीपणा ,एकदा हातात घेतलेलं काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण कसं करावं, कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं , आपलं वक्तृत्व कसं असावं, प्राथमिक शाळेतून काही राहिलेले गुण इथं आल्यावर मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले...Thanks teacher.
विनोदाचा बादशहा सर्व विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत म्हणा हवं तर! असं एव्हरग्रीन व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचे वाय. जी. शिंदे सर कित्तेक बॅच शाळेतून शिकून गेल्या, त्या प्रत्येक बॅच मधील विद्यार्थ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध असणारे हे शिक्षक . दिलखुलास आनंदी जीवनाचा महामंत्र त्यांनी आम्हाला दिला खूप खूप धन्यवाद..Thanks teacher
गणित आणि मोरे सर या एकाच नाण्याच्या दोन बाजू असणारे शाळेचे मुख्याध्यापक.इंग्रजीवर अतोनात प्रेम असणारे अस्खलित इंग्रजी शिकवणारे लक्ष्मण शेळके सर भूमिती गणित शिकवणारे भांगे सर, घाडगे मॅडम, खंडागळे सर एस पी मोरे सर यांनीही प्रामाणिकपणे आम्हाला गणित आणि सायन्स ची गोडी लावली...कबड्डीच्या मैदानावर घड्याळ घालून गेल्यामुळे डोरले सरांची मिळालेले छडी तेवढीच कडक शिस्तीची वाटायची ..Thanks teacher.
कथाकथन कसं करावं! कविता कशा लिहाव्यात ,रामायण महाभारत यांचा आपल्या जीवनाशी कसा संबंध जोडावा! त्यातून काय शिकावं, हे सतत सांगणारे मराठीचे गाढे अभ्यासक आमचे गुरु सावता घाडगे सर.. यांनी सांगितलेली गुलबकावलीची गोष्ट आजही तशीच आठवते. त्यांच्यासोबतच मराठी शिकवणारे दरवर्षी आठवीतील विद्यार्थ्यांना आल्याबरोबर "भांणाचं भूत" ही गोष्ट सांगणारे पाटील सर आजही आठवता Thanks Teacher..
जादा तास घेऊन रात्रंदिवस हिंदी आणि भूगोलात साठी कष्ट घेणारे दहावीच्या बोर्ड परीक्षेत सतत हिंदी भूगोलाचा 100% निकाल देणारे सरळ मार्गी कोरडे सर.. मित्रांच्या गप्पा निघाल्या की तुमचा विषय असतोच. प्रत्येक शिक्षकांकडून काहीतरी नवं शिकायला मिळालं! आमच्यासाठी ही शिदोरीच होती भविष्यासाठीची! आम्ही आज ती इतरांना वाटत आहोत!!!
माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात अशा सर्व गुरुचरणी मी नतमस्तक होतो. त्यांचे आभार मानतो माझ्या जीवनात अनेक रंग भरण्याचे काम आपण केलंत. धन्यवाद
आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांची आठवण झाली तुम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा Thanks Teacher...
नवनाथ शिंदे
जिल्हा समन्वयक
सर फाउंडेशन सोलापूर.