ज्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळालं अशा सर्व गुरूं साठी....
आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा. आजच्याच दिवशी भरत वंशाचे गुरु महर्षी व्यास यांचा जन्मदिन. प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला आदराचं स्थान दिलं जातं. रामायण महाभारतामध्ये तर अशा गुरू शिष्यांच्या अनेक जोड्या आपल्याला परिचित आहेतच. गुरु हेच आपलं सर्वस्व मानून शिष्यानं आपलं सारं जीवनच आपल्या गुरूंच्या चरणी वाहिलेलं असतं अशी कितीतरी उदाहरणं आपण ऐकली आहेत. वाचली आहेत.
त्या वेळची शिक्षणपद्धती, गुरुशिष्यांची परंपरा, गुरूगृही जाऊन ज्ञानार्जन करण्याची पद्धती, सर्वांना परिचित आहे. कालानुरूप शिक्षणपद्धती मध्ये बदल झाला. गुरु केंद्रित असलेलं शिक्षण विद्यार्थी केंद्रित झालं .आणि गरजेनुसार शिक्षणाचं आणि शिक्षकांचं स्वरूप बदललं. गुरु-शिष्यांच्या अध्ययन अध्यापन पद्धती मध्ये, कालानुरूप अभ्यासक्रमांमध्ये गरजेनुसार आज जरी बदल झाला असला तरी त्यांचं महत्त्व अजूनही कमी झालेलं दिसत नाही. दुर्दैवानं गेल्या वर्षीपासून संपूर्ण जगावर कोरोणाचं महासंकट आलं. सर्व व्यवहार ठप्प झाले. यंत्र जाग्यावरच थांबली. शिक्षणव्यवस्था कोलमडली. एकूणच संपूर्ण जीवन चक्र बदललं .मग शिक्षणासाठी शिकण्यामध्ये आणि शिकवण्यामध्ये हळूहळू वेगवेगळे प्रयोग सुरू झाले. ऑनलाइन शिक्षण पद्धती आली. डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं शिक्षण सुरू झालं. काही प्रमाणात ही पद्धती यशस्वी झाली. मग आता शिक्षकांची गरजच काय? अशी चर्चा सुरू झाली. परंतु लवकरच यालाही विद्यार्थी कंटाळले . यातील दोष पालकांच्या लक्षात आले. नुसतं पुस्तकी ज्ञान काही उपयोगाचं नाही त्याला संस्कारक्षम जीवनाची आणि व्यवहारज्ञानाची जोड ही असायलाच हवी. हे पालकांच्या लक्षात आलं. अध्यापनातील अध्ययनातील अडचणी त्यांच्या ध्यानात आल्या आणि पुन्हा एकदा शिक्षणामध्ये गुरुचे स्थान आढळ आहे यावर शिक्कामोर्तब झालं
गुरु फक्त लिहायला वाचायला शिकवतात, एवढंच त्यांचं काम नसतं तर आपल्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण जीवनाला आकार देण्याचे काम गुरु करत असतात. गुरूंच्या प्रत्येक कृतीतून, त्यांच्या बोलण्यातून चालण्यातून, त्यांच्या वागण्यातून विद्यार्थी संस्कार घेत असतात हे अनौपचारिक शिक्षण नकळतपणे सतत सुरू असतं .ते आपल्या शिष्याला सतत चांगला मार्ग दाखवत असतात. आपल्या जवळील सारं सारं आपल्या शिष्याला देण्याचा प्रयत्न ते करत असतात. आपल्यापेक्षाही आपला शिष्य सरस व्हावा ही त्याची मनोमन इच्छा असते. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, आत्मविश्वास, धैर्य वाढवण्याचे कार्य गुरु करत असतात. लिहायला-वाचायला शिकवणारे गुरुजीच फक्त आपले गुरु असतात असं नाही तर पदोपदी आपल्याला असे गुरु भेटत असतात आपण फक्त त्यांना शोधायचं असतं. कुणाकडून काय शिकावं हे चाणाक्ष विद्यार्थ्याला कळायलाच हवं!गुरूंना वयाचं बंधन नसतं. स्त्री-पुरुष जात-पात असा त्यांच्यामध्ये भेदभाव नसतो. प्रत्येकाचे असे वेगवेगळे अनेक गुरु असतात. शैक्षणिक गुरु ,व्यावसायिक गुरु, सामाजिक गुरु, अध्यात्मिक गुरु ,कौटुंबिक गुरु प्रत्येकाकडून आपल्याला काहीतरी वेगळं शिकायला मिळतं आणि तेच आपले आदर्श असतात. त्यांचा आपल्याला सतत अभिमान असतो. आदर असतो. आपण प्रत्येकाकडून काहीतरी शिकत असतो . पण आपन असे गुरु शोधायला हवेत ....ज्यांना ते सापडले ते नशीबवानच!
आपली शिकण्याची तीव्र इच्छा असली की असे गुरु आपल्याला पदोपदी भेटतीलही पण त्यांना गुरु मानण्याचं धाडस आपल्यामध्ये असायला हवं. आपल्याला जे माहित नाही ते माहीत करुन घेण्यामध्ये कमी पणा नसावा,आणि जे माहित आहे ते इतरांना सांगणे मध्ये मोठे पणा नसावा. हे तत्व सर्वांनी अंगीकारायला हवं .समोरच्या व्यक्तीमध्ये काही तरी वेगळे गुण दिसले तर मोठ्या मनानं त्यांचं जाहीर कौतुक करायला आणि त्यातील काही गुणांचं आपण अनुकरण करायला आपलं मन कचरलं नाही पाहिजे.असं जिथं घडतं तिथं आपल्याला असे गुरु भेटतच असतात. गुरूकडून ज्ञान घेता घेता आपण ही कुणाचं तरी गुरु व्हायला हवं. आपण ही आपल्याकडील काही चांगल्या गुणांचं दान कराव. इतरांच्या जीवनात आनंदाचा एखादा क्षण निर्माण करावा .चुकीच्या वाटेला लागलेल्यांना योग्य दिशा देण्याचं काम आपण हाती घ्यावं.कुणाकडून काही तरी घ्यावं आणि कुणाला काही तरी द्यावं हे चक्र जोपर्यंत सुरू असेल तोपर्यंत गुरुशिष्यांची ही परंपरा कायम चालतच राहील.आजच्या दिवशी आपल्या जीवनात अमूलाग्र बदल घडविणाऱ्या अशा सर्व गुरुजनांप्रति आपल्यामध्ये आदरभाव निर्माण व्हावा हीच अपेक्षा.
माझ्या जीवनातील प्रत्येक वळणाच्या टप्यावर व्यावसायिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातलं ज्ञान आणि सामाजिकतेचं भान कौटुंबिक सल्ला, देणारे गुरु, ज्ञानार्जन करणारे प्रत्येक प्रसंगाला आधार देणारे अनेक गुरु मला भेटत गेले. त्या सर्वांच्या प्रती मी आज गुरुपौर्णिमेनिमित्त ऋण व्यक्त करतो आणि त्यांना आदरपूर्वक नमस्कार करतो...
नवनाथ शिंदे,
जिल्हा समन्वयक
सर फाउंडेशन सोलापूर