विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Friday, 23 May 2025

उपक्रमशील शिक्षकांना प्रकाशात आणणारे नवनाथ शिंदे गुरुजी

 *उपक्रमशील शिक्षकांना प्रकाशात आणणारे नवनाथ शिंदे गुरुजी*...

               -विरण कुलकर्णी,मोडनिंब

                          दैनिक सकाळ.


     भावी पिढीला सुशिक्षित करण्याचा वसा घेतलेल्या शिक्षकांप्रती 'ते त्यांचे कामच' असा कोडगा सामाजिक दृष्टिकोन बळावत चालला आहे. शासन लादत असलेलं अशैक्षणिक कामाचं ओझं आणि पालकांमधून व्यक्त होत असलेल्या अपेक्षा अशा कात्रीत शिक्षक सापडला आहे. याही परिस्थितीत अनेक जण आपलं वेगळेपण जपत गुरुतत्त्वाचा आनंद लुटत आहेत. नानाविध उपक्रम राबवून आपल्या शाळेप्रती, विद्यार्थ्यांप्रती कमाल मर्यादेपर्यंत झटत आहेत. यातीलच काही उपक्रमशील शिक्षकांना प्रकाशित करणारे *नवनाथ शिंदे गुरुजी*

              सकाळच्या उपक्रमशील शिक्षक या सदरात श्री शिंदे यांनी असे अनेक हिरे प्रकाशात आणले. स्कॉलरशिप, परसबाग, गुणवत्ता अभियान, कला, क्रीडा या सरकारी उपक्रमांखेरीज स्वनिर्मित उपक्रम, संगीत, पर्यावरण, सामाजिकभान, वाचनवेडे अशा शिक्षकांना समाजासमोर आणून सकारात्मक लेखनाचा सकाळचा वसा त्यांनी जपला. 

      दहावी मध्ये केंद्रात प्रथम येऊनही शिंदेंनी शिक्षणाची आवड म्हणून या क्षेत्राची वाट स्वीकारली. सोलापूर येथील नूतन प्रशाले मधून शिक्षण सेवेची झालेली सुरुवात विविध ठिकाणचा अनुभव घेत बैरागवाडी शाळेपर्यंत पोहोचली. राज्यातील काही नामांकित शाळांपैकी अरण येथील जिल्हा परिषदेची शाळा एक मॉडेल शाळा उभारणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. सलग पंधरा वर्षे या ठिकाणी विविध उपक्रम कार्यान्वित करून त्यांनी शाळेचे नाव राज्यात पोहोचविले. 

      विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी म्हणून माढा तालुका प्रज्ञाशोध परीक्षा सुरू होण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. आजी-माजी विद्यार्थी कल्याणकारी विकास योजनेअंतर्गत विद्यार्थी कल्याण निधी योजनेची रक्कम आज लाखो रुपयांपर्यंत पोहीचली आहे. दरवर्षी मिळालेल्या व्याजातून स्वातंत्र्यदिनी विद्यार्थी पारितोषिक योजना सुरू केली. शिक्षणाची वारी पुणे आणि नागपूर येथील शैक्षणिक स्टॉल मधून हा *लोकसभागातून शाळा विकास उपक्रम* संपूर्ण राज्यभर पोहोचविला. त्यांचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात चमकत आहेत. शिंदे यांचा जिल्हा परिषदेने दोन वेळा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला. इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थी दाखल झाल्याबद्दल अधिवेशनामध्ये नागपूर येथे शिक्षण सचिव धीरज कुमार यांच्या हस्ते यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याचबरोबर सोलापूर मिड टाऊन रोटरी क्लब चा गुणवंत शिक्षक पुरस्कार, मुंबई येथील लोकसेवा अकादमी चा प्राइड ऑफ नेशन पुरस्कार, सर फाउंडेशन सोलापूर यांचा प्रयोगशील शिक्षक पुरस्कार, कविवर्य कुसुमाग्रज राज्यस्तरीय काव्य लेखन पुरस्कार या व अशा अनेक पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे. *स्मशानभूमीतील शाळेचे निसर्ग शाळेत रूपांतर*

      तसे पाहिले तर अरण ची 'बरडावरची शाळा'! गावापासून लांब, उजाड, आणि ओसाड ठिकाणाची. लोकसहभागाच्या माध्यमातून येथे पहिली संगणक लॅब त्यांनी सुरू केली. स्वतः शिकून संगणक शिक्षण सुरू केलं. शाळेत विविध प्रकारची वृक्ष लागवड करून स्मशानभूमीतल्या शाळेचं रूपांतर निसर्ग शाळेत केलं. शालेय वस्तू भांडार परिसर साधन केंद्र, इंग्लिश लॅब, सेमी इंग्लिश शिक्षणाची व्यवस्था सुरू केली. इयत्ता सातवीतील एकाच वेळी 15 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड हा त्यांच्या शैक्षणिक कार्यातला संस्मरणीय क्षण. हुशार, चतुर, सामान्य असामान्य विद्यार्थ्यांमुळे सुचत गेलेले अनेक नवनवीन उपक्रम या शाळेत त्यांनी सुरू केले. केवळ 300 विद्यार्थी संख्या असणारी शाळा 680 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली.

                -विरण कुलकर्णी,मोडनिंब

                          दैनिक सकाळ.

 

Thursday, 26 September 2024

आनंददायी अध्यापनासाठी संगीत विषयाचा ध्यास घेतलेले अण्णा सुरवसे गुरुजी

 आनंददायी अध्यापनासाठी संगीत विषयाचा ध्यास घेतलेले 'आण्णा सुरवसे' 

    प्राथमिक शिक्षणामध्ये भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र या विषयांसोबतच संगीत विषयालाही तितकच महत्त्व आहे. शाळाबाह्य, गळती झालेले विद्यार्थी, अभ्यास निरस वाटणारे विद्यार्थी यांच्यासाठी आनंददायी पद्धतीनं शिक्षण दिलं जातं. यासाठी शिक्षकांमध्ये संगीत विषयाची आवड असणं, संगीत विषयाचं ज्ञान असणं खूप गरजेचं असतं. प्राथमिक शिक्षकांपैकी संगीत विषयात उच्च शिक्षण घेऊन ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असणारे अण्णा सुरवसे हे पदवीधर प्राथमिक शिक्षक अथक परिश्रम घेत आहेत.

       संगीत विषयात 'संगीत अलंकार' 'एम. ए. संगीत' या उच्च पदव्या घेतलेले आण्णा सुरवसे यांनी

 संगीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी इ. १ ली ते ७ वी मराठी विषयाच्या सर्व कविता स्वतः संगीतबद्ध करून त्यांनी युटुबवर अपलोड केल्या असून राज्यातील हजारो विद्यार्थी कविता पाठांतरासाठी त्यांच्या यूट्यूब चैनल चा उपयोग करतात.

  दैनंदिन परीपाठामध्ये हार्मोनियमच्या साथीसह परिपाठ घेतात. मराठी, इंग्रजी व हिंदी या विषयाच्या कविता संगीत वाद्यासह शिकवणं हा त्यांचा छंदच. यामुळं शाळेचा पट वाढला. विद्यार्थी शाळेत टिकू लागले. आणि आपोआपच ते आनंददायी पद्धतीनं शिकू सुद्धा लागले. 

      भोयरे येथील शाळेत सुद्धा त्यांनी १० वर्षे सेवा केली. लोकवर्गणीतून शाळेला संगणक, वृक्षारोपण, साक्षरता अभियान, ग्रामस्वच्छता अभियान इ. उपक्रम राबवले. इंग्रजी विषयासाठी सलग ५ वर्षे जिल्हा स्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहिलं. आपल्या कडील संगीत विषयातील ज्ञानाचा उपयोग करुन इ. १ ली ते ४ थी इंग्रजी विषयाच्या कविता जिल्ह्य़ातील सर्व शिक्षकांना सुंदर चालीसह ऐकवल्या व त्या शिकवल्या.

           प्राथमिक शिक्षकाची नोकरी करत असताना शास्त्रीय संगीत शिक्षण सुरु केलं. यामध्ये सांप्रदायिक मृदंग, गायन, तबलावादन चे शिक्षण घेत गायन अलंकार, तबला विशारद, एम. ए. संगीत इ. पदव्या मिळवल्या.

        संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत कलापथकाची निर्मिती करून तालुक्यातील ५० ते ६० गावामध्ये कलापथकाचे प्रयोग केले. कलापथकात गायन, हार्मोनियम वादन इ. साथ केली. शंभर टक्के गावं हागणदारी मुक्त झाली.

              जिल्ह्य़ातील सर्व शिक्षकांना शालेय गीतमंच प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे. तत्कालीन सी. ई. ओ. मा. दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून गीतमंचातील गीतांचं प्रशिक्षण झालं. आणि तद्नंतर जिल्ह्यातील अनेक संगीत शिक्षकांना सोबत घेत तीस गीतांचे स्टुडिओ रेकॉर्डिंग केलं. राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासाठी ते उपयोगी ठरलं.

      गीतमंचातील १०५ गीतांचं नोटेशन स्वतः तयार केलं व ते स्वरांजली गीतमंच नोटेशन' या पुस्तक रुपानं विद्यार्थ्यांपर्यंत व संगीतप्रेमींपर्यंत पोहोचवलं. 

    त्यांनी स्वरताल संगीतालयाची स्थापना केली. अनेक विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल मुंबई यांचं परीक्षा केंद्र सुरु केलं. या केंद्रातून दरवर्षी शेकडो विद्यार्थी गायन, हार्मोनियम, तबला, मृदंग, बासरी व सतार यासारख्या परीक्षेला बसत आहेत. दरवर्षी अनेक विद्यार्थी विशारद पदवी घेऊन बाहेर पडत आहेत. संगीत शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना आपली कला लोकांसमोर सादर करता यावी उद्देशानं दरवर्षी दिपावलीला, 'दिपावली संध्या' तर आषाढी एकादशीच्या दिवशी 'अभंगवाणी' इ. कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये संगीत विद्यालयात शिकणारे अनेक विद्यार्थी आपली कला सादर करतात.

          त्यांनी सलग १० वर्षे वेगवेगळ्या शाळेतील मुलं जिल्हा स्तरावर विविध स्पर्धेसाठी नेली आहेत. व पाच वेळा जिल्हा स्तरावर प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. 

          अशा प्रकारे संगीत विषयात आवड असणारे आण्णा सुरवसे यांना आपल्या शैक्षणिक कारकीर्दित अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसह शाळा ही घडवणारे सुनील अडगळे गुरुजी

 शाळेच्या चार भिंती मधील शिक्षण विद्यार्थ्यांना पुरेसं नसतं. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत म्हणून तर शिक्षकांनी सतत भविष्याचा वेध घेणारं सोबतच स्वतःच्या पायावर उभं रहायला शिकवणारं शिक्षण द्यायला हवं. शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणं हे तर आपलं पहिलं कर्तव्य आहेच पण सद्यस्थिती पाहता विद्यार्थ्यांना सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देणाऱ्या शिक्षणाची ही तितकीच गरज आहे.अशाच प्रकारे विविध सामाजिक विषय घेत वक्तृत्वाच्या माध्यमातून

  झोकून देऊन कष्ट करणारेआणि सर्वच क्षेत्रात अष्टपैलू कामगिरी करणारे पंढरपूर तालुक्यातल्या जाधववाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुरुजी सुनिल अडगळे. 

    गुरुजींनी अगोदर याच तालुक्यातील 

रानमळा-भोसे सारख्या छोट्या वस्तीवरील शाळेमध्ये सेवेची सुरुवात केली. पालकांच्या विश्वासावरती, विद्यार्थ्यांच्या अत्युच्च गुणवत्तेमुळे लाखो रुपयांच्या लोकसहभागातून शाळेचा विकास केला. सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण गुणवत्ता विकास अभियानामध्ये जिल्ह्यात "उत्कृष्ट शाळा" या पुरस्कारानं शाळेचा गौरव ही झाला. या छोट्या शाळेत स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थी चमकले.

मुख्याध्यापक बळीराम माळी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा प्रचंड कायापालट झाला.हे सर्वांच्या लोकसहभाग सहकार्यामुळेच...!!

पांढरेवस्ती करकंब या शाळेत बदली झाल्यानंतर विद्यार्थी आणि शाळा घडवण्याचं एक व्यसनच गुरुजींना लागलं आणि शाळेला 'एकही दिवस सुट्टी न घेता' दिवाळी-उन्हाळी सुट्टीत देखील विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करुन अखंडपणे ३६५ दिवस शाळा सुरू ठेवण्याचा विक्रम केला. लाखो रुपयांच्या लोकसहभागातून शाळेचा कायापालट केला.याची दखल विविध वर्तमानपत्रे आणि ए बी पी माझा या टीव्ही चॅनेलनं घेतली.शाळा आणि गावाचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड नावलौकीक झाला.

पांढरेवस्ती शाळेतच एका वर्षी "स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थी चमकल्याशिवाय... पायात चप्पलच घालणार नाही..!" अशी प्रतिज्ञा केली.वर्षभर उन्हाळ्या-पावसाळ्यात अनवाणी पायानं फिरत गुरुजी काम करत राहिले.परंतु शेवटी जिद्दीला यश आलं.तीन विद्यार्थी स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीत चमकले,दोन विद्यार्थी नवोदयला आणि एक विद्यार्थी शासकीय विद्यानिकेतनला पात्र झाला. यावेळी मुख्याध्यापक मोहन रसाळ , आणि सुनिल बारेकर आणि पालकांचेही प्रचंड सहकार्य लाभलं.

भोसे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतही गुरुजींनी लोकसहभागातून मोठं काम केलं.

 आज जि.प.शाळा जाधववाडी सारख्या आदर्श शाळेमध्ये दोघेही पतीपत्नी शिक्षक म्हणून सेवा करतात.

वक्तृत्व स्पर्धा , व्याख्याने,कवी संमेलन, पथनाट्य, शिक्षकांना मार्गदर्शन, सामाजिक कार्यशाळा, असे सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मोलाच्या योगदानामुळं त्यांना शेकडो पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 

महापुरात ज्यांचं दप्तर वाहून गेलं त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप, महामारीच्या काळात ज्यांची घर उध्वस्त झाली त्यांना आर्थिक सहाय्य, जीवनावश्यक वस्तूं, औषधे कपडे-पांघरुन यांचे वाटप केलं 

स्वच्छता, वृक्ष लागवड या सारखे सामाजिक कार्य ही त्यांनी केलं आहे.


चौकट: सलग तीनशे पासष्ट दिवस शाळा भरवली. विविध संस्थांचे असंख्य पुरस्कार गुरुजींनी मिळवले. शिष्यवृत्ती आणि लोकसहभाग खूप मोठ्या प्रमाणात जमा केला.राज्यभर वक्तृत्वाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचं महत्त्वाचं काम गुरुजींनी केलं.वेदनेतून सुखाकडे, मुक्त विचार,चला वक्तृत्व स्पर्धा जिंकूया या तीन पुस्तकांचे लेखन ही केले आहे.

Wednesday, 4 September 2024

42.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच आपल्या शिक्षणाची उंची वाढवणारे चंद्रमौळीचे खंदारे गुरुजी

 

        प्राथमिक शिक्षकांच्या अंगावर अध्यापनासोबतच शेकडो अशैक्षणिक कामं, शासनाचे दररोज नवनवीन उपक्रम, सुरू असलेली विविध अभियानं, जिल्हा परिषदेच्या शाळेलगतच खाजगी आणि इंग्रजी माध्यमांच्या उभ्या असलेल्या गाड्या, अशा सगळ्या अडचणीवर मात करत विद्यार्थ्यांच्या प्रगती सोबतच स्वतःचा शैक्षणिक आलेख एम.ए.एम.एड. सेट नेट, पीएचडी, पर्यंत वाढवत सलग तीन वर्षे शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांच्या प्रवेश बंद चा हाउसफुल बोर्ड लावणारे शिक्षक सत्यवान खंदारे गुरुजी.मोहोळ तालुक्यातल्या चंद्रमौळीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत काम करतात.

       शर्यत पाढे पाठांतराची या स्पर्धेतून इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचे 30 पर्यंत पाढे पाठ आहेत.

  सुंदर हस्ताक्षर, चित्र रेखाटण, बाल सभा वक्तृत्व स्पर्धां इत्यादींचे आयोजन केले जाते व त्यांचा गुण गौरव केला जातो शिस्त, संस्कार आणि विद्यार्थी घडवणारी शाळा असा पालकांचा दृढ विश्वास झाला आहे .यामुळे शाळेचा पट वाढत आहे.

         खंदारे गुरुजींची हसत खेळत परंतु शिस्तबध्द अध्यापनाची वेगळी पद्धत मुलांना गोडी लावते .कला, क्रीडा, संगीत व स्पर्धा परीक्षा या सर्वच क्षेत्रात शाळेचे विद्यार्थी चमकत राहावेत यासाठी खंदारे यांचे प्रयत्न सतत सुरू असतात. तसेच त्यांचा सर्व पालकांशी स्नेहाचा व आपुलकीचा संबंध असल्यामुळं विविध शालेय उपक्रमात पालकांचा सक्रिय सहभाग वाढत आहे .त्याबरोबरच शाळेची पटसंख्या ही वाढत आहे. शिक्षण विभागाकडून राबविली जाणारी विविध अभियानं, विविध उपक्रम अतिशय तळमळीनं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते . वृक्षारोपण सारख्या सामाजिक उपक्रमात सहभाग घेवून जनजागृती करतात. आणि मतदार जागृती रॅली,तंबाखुमुक्त शाळा व परिसर, नवभारत साक्षरता अभियान यासारख्या राष्ट्रीय उपक्रमात भाग घेवून प्रबोधन ही करतात. लोकवर्गणीतून आणि स्वखर्चातून शाळा रंगकाम ,वृक्षारोपण,यासारखी कामे त्यांनी केली आहेत.

           नोकरीच्या आरंभीच्या काळात सलग अकरा वर्ष पोखरापूर सारख्या ग्रामीण भागात इयत्ता 5वी ते 7वी साठी सेमी इंग्रजी चे वर्ग सुरू केल्यामुळे त्यावेळचे अनेक विद्यार्थी आज मेडिकल ,पॅरामेडिकल ,इंजिनिअरिंग क्षेत्रात स्वतःचे करिअर करत आहेत. शिक्षणविभागा मार्फत राबवल्या जाणाऱ्या कथाकथन ,वक्तृत्व,

बालनाट्य, लोकनृत्य व क्रीडा स्पर्धा यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळे केंद्र, तालुका व जिल्हास्तरावर त्यांच्या विद्यार्थ्यांना यश मिळवता आले .शिक्षक स्वतः अपडेट असेल तरच विद्यार्थी अपडेट राहू शकतात यामुळे विविध कोर्स ते स्वतः आवडीने शिकतात आणि नवीन ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात.. विद्यार्थ्याना खाजगी स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शना बरोबर विविध खुल्यास्वरुपाच्या चित्रकला, रंगभरण,वक्तृत्व स्पर्धामध्ये विद्यार्थ्याना भाग घेण्यास प्रेरित करतात . मोहोळ तहसील कार्यालय आयोजित खुल्या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये लेझीम नृत्याचा सलग दोन वर्ष प्रथम क्रमांक त्यांच्या विद्यार्थ्यांनी पटकावला आहे..

       शाळेत विद्यार्थ्यांचे लेझिम पथक, झांज पथक , संचलन पथक ही तयार आहे . शाळास्तरावर योगासने , आनंददायी बालगीते, कृतियुक्त गिते,एरोबिक्स - संगीत व्यायाम प्रकार आदींचे नियोजन त्यांच्याकडून केले जाते . स्वतः विविध विषयांवर व्हिडिओ निर्मिती करून मुलांसाठीचा अवघड घटक सोपा करतात.

       .त्यांना आजपर्यंत मिळालेले पुरस्कार

मोहोळ तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार 2023, ट्रॉफी शोरुम सोलापूर चा कलारंग पुरस्कार, गुणिजन शिक्षक गुरुगौरव राज्यस्तर पुरस्कार, अजंठा आर्ट अकॅडमी चा कलाशिक्षक पुरस्कार.

Wednesday, 28 August 2024

41.आनंददायी शिक्षणासाठी नवे प्रयोग करणाऱ्या कल्पना घाडगे

        

     व्हाट्सअप ,फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील शिक्षकांना 'आयडियाची कल्पना' या नावानं परिचित असणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना छोट्या मोठ्या उपक्रमातून आनंददायी आणि मनोरंजनात्मक पद्धतीनं शिक्षण देत त्यांच्यामध्ये अमुलाग्र बदल घडवणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अरण येथील एक उपक्रमशील विद्यार्थी प्रिय शिक्षिका कल्पना घाडगे.गेले तेवीस वर्षे माढा तालुक्यातील विविध प्राथमिक शाळांमधून शिक्षण क्षेत्रात त्या नवनवीन प्रयोग करीत आहेत.

       अरण ही आयएसओ मानांकन प्राप्त असून जिल्ह्यातील एक नावाजलेली शाळा आहे. ज्या शाळेला बरडावरची शाळा म्हटलं जायचं ती शाळा आज हरित शाळा म्हणून ओळखली जाते.इथल्या प्रत्येक गोष्टीवर, वस्तूवर, झाडावर त्या मनापासून प्रेम करतात. ओसाड माळरानावर असणाऱ्या शाळेचे रूपांतर हरित शाळेत करण्यात, शाळेचा पट वाढविण्यात, शाळेच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यात, शैक्षणिक उठावातून शाळेची भौतिक सुविधा पूर्ण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

     अरण मधील शिक्षण प्रेमी ग्रामस्थांनी सुमारे साडेतीन लाख रुपयांची कायम ठेव ठेवून आजी माजी विद्यार्थी कल्याणकारी विकास संस्था स्थापन केली. त्या संस्थेच्या सचिव म्हणून त्या काम पाहतात. शाळेच्या शतक महोत्सवानिमित्त शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या मदतीनं शाळेमधील सहकारी शिक्षकांच्या मदतीनं किलबिल बालोद्यान निर्माण केलं आहे.

     कोरोना काळात त्यांच्याकडं आलेल्या पहिलीच्या वर्गाची पहिलीची किलबिल खूपच गाजली. या काळात त्यांनी फक्त अरण मधीलच नाहीत तर इतर भागातील विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन मार्गदर्शन केलं यामुळं त्या सर्वदूर परिचित झाल्या. त्यांनी स्वतःचं यूट्यूब चैनल सुरू केलं. या चॅनलच्या माध्यमातूनही अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. ऑनलाईन टेस्ट लेक्चर, संडे ऍक्टिव्हिटी, गुगल मॅप मीटिंग, टेस्ट, अशा अनेक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा छंद लावण्यात घडागे यशस्वी झाल्या.

       सह्याद्री महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक स्त्रियांना लघुउद्योगासाठी त्यांनी प्रवृत्त केलं आहे. मिशन ग्रीन अरण अंतर्गत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं वृक्षांची लागवड केली. 

       विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयी जाणीव जागृती होण्यासाठी जलदिन, वनदिन, चिमणी दिवस, वसुंधरा दिन, पर्यावरण दिन असे अनेक दिन साजरे करून त्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देऊन पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न त्या करतात.

  मुली व महिलांना रांगोळीचे प्रशिक्षण त्यांनी दिलं आहे. वृत्तपत्र लेखन त्यांनी केले आहे.

 पत्रलेखन, शैक्षणिक सहली, वनभोजन, परिसर भेट, व्यावसायिकांच्या मुलाखती, किशोरी मेळावा, कार्यानुभव अंतर्गत विविध वस्तू तयार करणं, पाढे पाठांतर स्पर्धा स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य, रजेच्या काळात पालकांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, आठवडी बाजार, विविध दिन साजरे करणं, लोकशाही पद्धतीनं वर्ग स्तर मंत्रिमंडळांचं प्रात्यक्षिक निवडणूक, वर्ग स्तरावर व शाळा स्तरावर विविध स्पर्धा असे अनेक मुलांच्या हाताला काम व मेंदूला चालना देणारे उपक्रम त्या राबवतात. त्यांच्याकडे असलेल्या वर्गाची प्रश्नपेढी त्या स्वतः तयार करतात. बरेचसे साहित्य हे स्वनिर्मित, विद्यार्थ्यांच्या मदतीनं व पालकांच्या सहकार्यानं तयार केलेलं असतं. त्यांचे आजपर्यंत अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका शांता वाघमोडे आणि शाळेतील इतर सर्व सहशिक्षक यांच्या मदतीनं शाळेत शिष्यवृत्तीचे जादा तास त्या घेतात.

 जिल्हा परिषद सोलापूरचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

      त्यांना प्रवासाची व वाचनाची आवड आहे. प्रवासानंतर पाहिलेल्या ठिकाणांचे प्रवास वर्णन त्या अतिशय चपखल आणि सुंदर शब्दात मांडतात. तसेच त्यांनी स्वतःचे वाचनालय तयार केले आहे.अनेक पुस्तकांचे वाचन त्यांनी केलेले आहे. वाचलेल्या पुस्तकावर त्यांचे 'वाचता वाचताआवडलेलं' हे सदर ते व्हाट्सअप च्या अनेक ग्रुप वर शेअर करतात. त्यांची विद्यार्थिनी आदिती चव्हाण हिचा आदीप्रभा काव्यसंग्रह ही प्रकाशित झाला आहे.

Saturday, 17 August 2024

40.जाईल तिथं उल्लेखनीय कामगिरी करणारे शरद रुपनवर गुरुजी

 शिक्षण आणि शाळेविषयीची असणारी आस्था, पालक आणि समाज यांना शाळेकडं खेचून आणण्याचा शब्दातला गोडवा, विद्यार्थ्यांसाठी सतत नवं काहीतरी करण्याची चाललेली धडपड, शाळा हेच आपलं घर समजणाऱ्या शिक्षकाला शाळेची वेळ सुद्धा अपुरी पडते.ज्या शाळेत बदली होते ती शाळा प्रत्येक अभियानात जिल्ह्यात पहिली असते असं छाती ठोकपणे सांगणारे माळशिरस तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या कारूंडे शाळेतील शिक्षक शरद रुपनवर गुरुजी.

        डोंगरदर्‍यातलं गाव ,सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात ,शिखर शिंगणापूरच्या पायथ्याशी वसलेल्या गावातली ही शाळा अगदी भकास होती. मा. दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान संपूर्ण जिल्हाभर सुरू झालं. गावानं आणि शाळेनं अभियानात उतरायचं ठरवलं आणि जिल्ह्यामध्ये शाळा पहिली आली. गावाचा शाळेकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. स्वतंत्र मुख्याध्यापक कार्यालय, बहुउद्देशीय सभागृह, निसर्ग वर्ग ,रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, परसबाग ,चाइल्ड फ्रेंडली सेक्शन, प्रशस्त व्यासपीठ , सुसज्ज वर्ग खोल्या, विद्यार्थी गुणवत्ता शैक्षणिक साहित्यानं परिपूर्ण वर्ग खोल्या ,ग्रामस्थांच्या सहकार्यानं आतापर्यंत 13 लाख 67 हजार रुपये आणि चालू वर्षी शाळेसाठी जवळजवळ एक कोटी रुपयाची साडेतीन एकर जमीन गावानं शाळेला दिली. अशाप्रकारे संपूर्ण गाव शाळामय झालं वैशिष्ट्य म्हणजे चालू वर्षी शाळेत नववी चा वर्ग सुरु झाला. आणि पुढं नैसर्गिक पद्धतीनं दहावी ,अकरावी आणि बारावी असा शैक्षणिक विकास आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं भव्य दिव्य शैक्षणिक संकुल उभारण्याचा मानस आहे.असं ते सांगतात.

       या अगोदर गुरुजींनी परभणी जिल्ह्यातील चिलगरवाडी येथे खूप मोठं काम केलं. पहिल्याच प्रयत्नात चौथी शिष्यवृत्तीसाठी सहा विद्यार्थ्यांची निवड झाली.गावातील तरुणांना सोबत घेऊन शाळेच्या परिसरातील एक एकर झाडी जंगल तोडून त्याच ठिकाणी त्याच पैशातून सुमारे 200 झाडांचं वृक्षारोपण करून संगोपन केलं. तिथं ही माझी शाळा ,सुंदर शाळा या अभियानात चिलगरवाडी या शाळेनं गंगाखेड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.

         आता गुरुजींची बदली शेरेवाडी माळशिरस तालुक्यात झाली 17 पटाची शाळा 42 पटा पर्यंत पोहोचली. या छोट्याशा वस्तीत दोन लाख 53 हजार वर्गणी करून शाळेचा संपूर्ण कायापालट केला.शंकरराव मोहिते पाटील गुणवत्ता विकास अभियान जिल्ह्यात सुरू झालं. या अभियानामध्ये शेरेवाडी शाळेनं जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. तीन विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेत पात्र झाले. एक विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत पात्र झाला. अनेक विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत चमकले. माळशिरस पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार गुरुजींना मिळाला.

     पुढं

 गुरुजी बदली होऊन गुरसाळे शाळेत आले . पहिल्याच वर्षी सातवी चा वर्ग 22 पैकी 17 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत बसून 100% विद्यार्थी पास झाले. जुन्या खोल्या पाडून त्या ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत, वृक्ष संवर्धक कठडे ,स्वतंत्र मुख्याध्यापक कार्यालय ,स्वतंत्र ई लर्निंग कक्ष व सलग तीन वर्ष अतिशय देखणा सांस्कृतीक कार्यक्रम करून 14 लाख रुपये लोकसहभागातून जमा केले. अनेक विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत जिल्ह्यात पहिले आले. दरम्यान जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार गुरुजींना देण्यात आला... माळशिरस तालुक्यातील पहिली आय एस ओ मानांकन प्राप्त शाळा म्हणून गुरसाळे शाळेची ओळख संपूर्ण जिल्हाभर झाली .पुढं गुरसाळे शाळा सुद्धा 'माझी समृद्ध शाळा' या अभियानामध्ये जिल्ह्यात पहिलीच आली.