विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Thursday, 26 September 2024

आनंददायी अध्यापनासाठी संगीत विषयाचा ध्यास घेतलेले अण्णा सुरवसे गुरुजी

 आनंददायी अध्यापनासाठी संगीत विषयाचा ध्यास घेतलेले 'आण्णा सुरवसे' 

    प्राथमिक शिक्षणामध्ये भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र या विषयांसोबतच संगीत विषयालाही तितकच महत्त्व आहे. शाळाबाह्य, गळती झालेले विद्यार्थी, अभ्यास निरस वाटणारे विद्यार्थी यांच्यासाठी आनंददायी पद्धतीनं शिक्षण दिलं जातं. यासाठी शिक्षकांमध्ये संगीत विषयाची आवड असणं, संगीत विषयाचं ज्ञान असणं खूप गरजेचं असतं. प्राथमिक शिक्षकांपैकी संगीत विषयात उच्च शिक्षण घेऊन ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोहोळ तालुक्यातील कोन्हेरी जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असणारे अण्णा सुरवसे हे पदवीधर प्राथमिक शिक्षक अथक परिश्रम घेत आहेत.

       संगीत विषयात 'संगीत अलंकार' 'एम. ए. संगीत' या उच्च पदव्या घेतलेले आण्णा सुरवसे यांनी

 संगीताच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी इ. १ ली ते ७ वी मराठी विषयाच्या सर्व कविता स्वतः संगीतबद्ध करून त्यांनी युटुबवर अपलोड केल्या असून राज्यातील हजारो विद्यार्थी कविता पाठांतरासाठी त्यांच्या यूट्यूब चैनल चा उपयोग करतात.

  दैनंदिन परीपाठामध्ये हार्मोनियमच्या साथीसह परिपाठ घेतात. मराठी, इंग्रजी व हिंदी या विषयाच्या कविता संगीत वाद्यासह शिकवणं हा त्यांचा छंदच. यामुळं शाळेचा पट वाढला. विद्यार्थी शाळेत टिकू लागले. आणि आपोआपच ते आनंददायी पद्धतीनं शिकू सुद्धा लागले. 

      भोयरे येथील शाळेत सुद्धा त्यांनी १० वर्षे सेवा केली. लोकवर्गणीतून शाळेला संगणक, वृक्षारोपण, साक्षरता अभियान, ग्रामस्वच्छता अभियान इ. उपक्रम राबवले. इंग्रजी विषयासाठी सलग ५ वर्षे जिल्हा स्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहिलं. आपल्या कडील संगीत विषयातील ज्ञानाचा उपयोग करुन इ. १ ली ते ४ थी इंग्रजी विषयाच्या कविता जिल्ह्य़ातील सर्व शिक्षकांना सुंदर चालीसह ऐकवल्या व त्या शिकवल्या.

           प्राथमिक शिक्षकाची नोकरी करत असताना शास्त्रीय संगीत शिक्षण सुरु केलं. यामध्ये सांप्रदायिक मृदंग, गायन, तबलावादन चे शिक्षण घेत गायन अलंकार, तबला विशारद, एम. ए. संगीत इ. पदव्या मिळवल्या.

        संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत कलापथकाची निर्मिती करून तालुक्यातील ५० ते ६० गावामध्ये कलापथकाचे प्रयोग केले. कलापथकात गायन, हार्मोनियम वादन इ. साथ केली. शंभर टक्के गावं हागणदारी मुक्त झाली.

              जिल्ह्य़ातील सर्व शिक्षकांना शालेय गीतमंच प्रशिक्षण देण्याचं काम सुरू आहे. तत्कालीन सी. ई. ओ. मा. दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून गीतमंचातील गीतांचं प्रशिक्षण झालं. आणि तद्नंतर जिल्ह्यातील अनेक संगीत शिक्षकांना सोबत घेत तीस गीतांचे स्टुडिओ रेकॉर्डिंग केलं. राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासाठी ते उपयोगी ठरलं.

      गीतमंचातील १०५ गीतांचं नोटेशन स्वतः तयार केलं व ते स्वरांजली गीतमंच नोटेशन' या पुस्तक रुपानं विद्यार्थ्यांपर्यंत व संगीतप्रेमींपर्यंत पोहोचवलं. 

    त्यांनी स्वरताल संगीतालयाची स्थापना केली. अनेक विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडल मुंबई यांचं परीक्षा केंद्र सुरु केलं. या केंद्रातून दरवर्षी शेकडो विद्यार्थी गायन, हार्मोनियम, तबला, मृदंग, बासरी व सतार यासारख्या परीक्षेला बसत आहेत. दरवर्षी अनेक विद्यार्थी विशारद पदवी घेऊन बाहेर पडत आहेत. संगीत शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना आपली कला लोकांसमोर सादर करता यावी उद्देशानं दरवर्षी दिपावलीला, 'दिपावली संध्या' तर आषाढी एकादशीच्या दिवशी 'अभंगवाणी' इ. कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये संगीत विद्यालयात शिकणारे अनेक विद्यार्थी आपली कला सादर करतात.

          त्यांनी सलग १० वर्षे वेगवेगळ्या शाळेतील मुलं जिल्हा स्तरावर विविध स्पर्धेसाठी नेली आहेत. व पाच वेळा जिल्हा स्तरावर प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. 

          अशा प्रकारे संगीत विषयात आवड असणारे आण्णा सुरवसे यांना आपल्या शैक्षणिक कारकीर्दित अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसह शाळा ही घडवणारे सुनील अडगळे गुरुजी

 शाळेच्या चार भिंती मधील शिक्षण विद्यार्थ्यांना पुरेसं नसतं. विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या आहेत म्हणून तर शिक्षकांनी सतत भविष्याचा वेध घेणारं सोबतच स्वतःच्या पायावर उभं रहायला शिकवणारं शिक्षण द्यायला हवं. शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणं हे तर आपलं पहिलं कर्तव्य आहेच पण सद्यस्थिती पाहता विद्यार्थ्यांना सामाजिक परिस्थितीची जाणीव करून देणाऱ्या शिक्षणाची ही तितकीच गरज आहे.अशाच प्रकारे विविध सामाजिक विषय घेत वक्तृत्वाच्या माध्यमातून

  झोकून देऊन कष्ट करणारेआणि सर्वच क्षेत्रात अष्टपैलू कामगिरी करणारे पंढरपूर तालुक्यातल्या जाधववाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील गुरुजी सुनिल अडगळे. 

    गुरुजींनी अगोदर याच तालुक्यातील 

रानमळा-भोसे सारख्या छोट्या वस्तीवरील शाळेमध्ये सेवेची सुरुवात केली. पालकांच्या विश्वासावरती, विद्यार्थ्यांच्या अत्युच्च गुणवत्तेमुळे लाखो रुपयांच्या लोकसहभागातून शाळेचा विकास केला. सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण गुणवत्ता विकास अभियानामध्ये जिल्ह्यात "उत्कृष्ट शाळा" या पुरस्कारानं शाळेचा गौरव ही झाला. या छोट्या शाळेत स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थी चमकले.

मुख्याध्यापक बळीराम माळी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा प्रचंड कायापालट झाला.हे सर्वांच्या लोकसहभाग सहकार्यामुळेच...!!

पांढरेवस्ती करकंब या शाळेत बदली झाल्यानंतर विद्यार्थी आणि शाळा घडवण्याचं एक व्यसनच गुरुजींना लागलं आणि शाळेला 'एकही दिवस सुट्टी न घेता' दिवाळी-उन्हाळी सुट्टीत देखील विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करुन अखंडपणे ३६५ दिवस शाळा सुरू ठेवण्याचा विक्रम केला. लाखो रुपयांच्या लोकसहभागातून शाळेचा कायापालट केला.याची दखल विविध वर्तमानपत्रे आणि ए बी पी माझा या टीव्ही चॅनेलनं घेतली.शाळा आणि गावाचा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रचंड नावलौकीक झाला.

पांढरेवस्ती शाळेतच एका वर्षी "स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थी चमकल्याशिवाय... पायात चप्पलच घालणार नाही..!" अशी प्रतिज्ञा केली.वर्षभर उन्हाळ्या-पावसाळ्यात अनवाणी पायानं फिरत गुरुजी काम करत राहिले.परंतु शेवटी जिद्दीला यश आलं.तीन विद्यार्थी स्कॉलरशिपच्या गुणवत्ता यादीत चमकले,दोन विद्यार्थी नवोदयला आणि एक विद्यार्थी शासकीय विद्यानिकेतनला पात्र झाला. यावेळी मुख्याध्यापक मोहन रसाळ , आणि सुनिल बारेकर आणि पालकांचेही प्रचंड सहकार्य लाभलं.

भोसे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतही गुरुजींनी लोकसहभागातून मोठं काम केलं.

 आज जि.प.शाळा जाधववाडी सारख्या आदर्श शाळेमध्ये दोघेही पतीपत्नी शिक्षक म्हणून सेवा करतात.

वक्तृत्व स्पर्धा , व्याख्याने,कवी संमेलन, पथनाट्य, शिक्षकांना मार्गदर्शन, सामाजिक कार्यशाळा, असे सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मोलाच्या योगदानामुळं त्यांना शेकडो पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. 

महापुरात ज्यांचं दप्तर वाहून गेलं त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप, महामारीच्या काळात ज्यांची घर उध्वस्त झाली त्यांना आर्थिक सहाय्य, जीवनावश्यक वस्तूं, औषधे कपडे-पांघरुन यांचे वाटप केलं 

स्वच्छता, वृक्ष लागवड या सारखे सामाजिक कार्य ही त्यांनी केलं आहे.


चौकट: सलग तीनशे पासष्ट दिवस शाळा भरवली. विविध संस्थांचे असंख्य पुरस्कार गुरुजींनी मिळवले. शिष्यवृत्ती आणि लोकसहभाग खूप मोठ्या प्रमाणात जमा केला.राज्यभर वक्तृत्वाच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचं महत्त्वाचं काम गुरुजींनी केलं.वेदनेतून सुखाकडे, मुक्त विचार,चला वक्तृत्व स्पर्धा जिंकूया या तीन पुस्तकांचे लेखन ही केले आहे.

Wednesday, 4 September 2024

42.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसोबतच आपल्या शिक्षणाची उंची वाढवणारे चंद्रमौळीचे खंदारे गुरुजी

 

        प्राथमिक शिक्षकांच्या अंगावर अध्यापनासोबतच शेकडो अशैक्षणिक कामं, शासनाचे दररोज नवनवीन उपक्रम, सुरू असलेली विविध अभियानं, जिल्हा परिषदेच्या शाळेलगतच खाजगी आणि इंग्रजी माध्यमांच्या उभ्या असलेल्या गाड्या, अशा सगळ्या अडचणीवर मात करत विद्यार्थ्यांच्या प्रगती सोबतच स्वतःचा शैक्षणिक आलेख एम.ए.एम.एड. सेट नेट, पीएचडी, पर्यंत वाढवत सलग तीन वर्षे शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांच्या प्रवेश बंद चा हाउसफुल बोर्ड लावणारे शिक्षक सत्यवान खंदारे गुरुजी.मोहोळ तालुक्यातल्या चंद्रमौळीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत काम करतात.

       शर्यत पाढे पाठांतराची या स्पर्धेतून इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांचे 30 पर्यंत पाढे पाठ आहेत.

  सुंदर हस्ताक्षर, चित्र रेखाटण, बाल सभा वक्तृत्व स्पर्धां इत्यादींचे आयोजन केले जाते व त्यांचा गुण गौरव केला जातो शिस्त, संस्कार आणि विद्यार्थी घडवणारी शाळा असा पालकांचा दृढ विश्वास झाला आहे .यामुळे शाळेचा पट वाढत आहे.

         खंदारे गुरुजींची हसत खेळत परंतु शिस्तबध्द अध्यापनाची वेगळी पद्धत मुलांना गोडी लावते .कला, क्रीडा, संगीत व स्पर्धा परीक्षा या सर्वच क्षेत्रात शाळेचे विद्यार्थी चमकत राहावेत यासाठी खंदारे यांचे प्रयत्न सतत सुरू असतात. तसेच त्यांचा सर्व पालकांशी स्नेहाचा व आपुलकीचा संबंध असल्यामुळं विविध शालेय उपक्रमात पालकांचा सक्रिय सहभाग वाढत आहे .त्याबरोबरच शाळेची पटसंख्या ही वाढत आहे. शिक्षण विभागाकडून राबविली जाणारी विविध अभियानं, विविध उपक्रम अतिशय तळमळीनं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते . वृक्षारोपण सारख्या सामाजिक उपक्रमात सहभाग घेवून जनजागृती करतात. आणि मतदार जागृती रॅली,तंबाखुमुक्त शाळा व परिसर, नवभारत साक्षरता अभियान यासारख्या राष्ट्रीय उपक्रमात भाग घेवून प्रबोधन ही करतात. लोकवर्गणीतून आणि स्वखर्चातून शाळा रंगकाम ,वृक्षारोपण,यासारखी कामे त्यांनी केली आहेत.

           नोकरीच्या आरंभीच्या काळात सलग अकरा वर्ष पोखरापूर सारख्या ग्रामीण भागात इयत्ता 5वी ते 7वी साठी सेमी इंग्रजी चे वर्ग सुरू केल्यामुळे त्यावेळचे अनेक विद्यार्थी आज मेडिकल ,पॅरामेडिकल ,इंजिनिअरिंग क्षेत्रात स्वतःचे करिअर करत आहेत. शिक्षणविभागा मार्फत राबवल्या जाणाऱ्या कथाकथन ,वक्तृत्व,

बालनाट्य, लोकनृत्य व क्रीडा स्पर्धा यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळे केंद्र, तालुका व जिल्हास्तरावर त्यांच्या विद्यार्थ्यांना यश मिळवता आले .शिक्षक स्वतः अपडेट असेल तरच विद्यार्थी अपडेट राहू शकतात यामुळे विविध कोर्स ते स्वतः आवडीने शिकतात आणि नवीन ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात.. विद्यार्थ्याना खाजगी स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शना बरोबर विविध खुल्यास्वरुपाच्या चित्रकला, रंगभरण,वक्तृत्व स्पर्धामध्ये विद्यार्थ्याना भाग घेण्यास प्रेरित करतात . मोहोळ तहसील कार्यालय आयोजित खुल्या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये लेझीम नृत्याचा सलग दोन वर्ष प्रथम क्रमांक त्यांच्या विद्यार्थ्यांनी पटकावला आहे..

       शाळेत विद्यार्थ्यांचे लेझिम पथक, झांज पथक , संचलन पथक ही तयार आहे . शाळास्तरावर योगासने , आनंददायी बालगीते, कृतियुक्त गिते,एरोबिक्स - संगीत व्यायाम प्रकार आदींचे नियोजन त्यांच्याकडून केले जाते . स्वतः विविध विषयांवर व्हिडिओ निर्मिती करून मुलांसाठीचा अवघड घटक सोपा करतात.

       .त्यांना आजपर्यंत मिळालेले पुरस्कार

मोहोळ तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार 2023, ट्रॉफी शोरुम सोलापूर चा कलारंग पुरस्कार, गुणिजन शिक्षक गुरुगौरव राज्यस्तर पुरस्कार, अजंठा आर्ट अकॅडमी चा कलाशिक्षक पुरस्कार.

Wednesday, 28 August 2024

41.आनंददायी शिक्षणासाठी नवे प्रयोग करणाऱ्या कल्पना घाडगे

        

     व्हाट्सअप ,फेसबुक आणि इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील शिक्षकांना 'आयडियाची कल्पना' या नावानं परिचित असणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना छोट्या मोठ्या उपक्रमातून आनंददायी आणि मनोरंजनात्मक पद्धतीनं शिक्षण देत त्यांच्यामध्ये अमुलाग्र बदल घडवणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अरण येथील एक उपक्रमशील विद्यार्थी प्रिय शिक्षिका कल्पना घाडगे.गेले तेवीस वर्षे माढा तालुक्यातील विविध प्राथमिक शाळांमधून शिक्षण क्षेत्रात त्या नवनवीन प्रयोग करीत आहेत.

       अरण ही आयएसओ मानांकन प्राप्त असून जिल्ह्यातील एक नावाजलेली शाळा आहे. ज्या शाळेला बरडावरची शाळा म्हटलं जायचं ती शाळा आज हरित शाळा म्हणून ओळखली जाते.इथल्या प्रत्येक गोष्टीवर, वस्तूवर, झाडावर त्या मनापासून प्रेम करतात. ओसाड माळरानावर असणाऱ्या शाळेचे रूपांतर हरित शाळेत करण्यात, शाळेचा पट वाढविण्यात, शाळेच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यात, शैक्षणिक उठावातून शाळेची भौतिक सुविधा पूर्ण करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.

     अरण मधील शिक्षण प्रेमी ग्रामस्थांनी सुमारे साडेतीन लाख रुपयांची कायम ठेव ठेवून आजी माजी विद्यार्थी कल्याणकारी विकास संस्था स्थापन केली. त्या संस्थेच्या सचिव म्हणून त्या काम पाहतात. शाळेच्या शतक महोत्सवानिमित्त शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या मदतीनं शाळेमधील सहकारी शिक्षकांच्या मदतीनं किलबिल बालोद्यान निर्माण केलं आहे.

     कोरोना काळात त्यांच्याकडं आलेल्या पहिलीच्या वर्गाची पहिलीची किलबिल खूपच गाजली. या काळात त्यांनी फक्त अरण मधीलच नाहीत तर इतर भागातील विद्यार्थ्यांनाही ऑनलाईन मार्गदर्शन केलं यामुळं त्या सर्वदूर परिचित झाल्या. त्यांनी स्वतःचं यूट्यूब चैनल सुरू केलं. या चॅनलच्या माध्यमातूनही अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. ऑनलाईन टेस्ट लेक्चर, संडे ऍक्टिव्हिटी, गुगल मॅप मीटिंग, टेस्ट, अशा अनेक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा छंद लावण्यात घडागे यशस्वी झाल्या.

       सह्याद्री महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक स्त्रियांना लघुउद्योगासाठी त्यांनी प्रवृत्त केलं आहे. मिशन ग्रीन अरण अंतर्गत त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं वृक्षांची लागवड केली. 

       विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयी जाणीव जागृती होण्यासाठी जलदिन, वनदिन, चिमणी दिवस, वसुंधरा दिन, पर्यावरण दिन असे अनेक दिन साजरे करून त्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देऊन पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न त्या करतात.

  मुली व महिलांना रांगोळीचे प्रशिक्षण त्यांनी दिलं आहे. वृत्तपत्र लेखन त्यांनी केले आहे.

 पत्रलेखन, शैक्षणिक सहली, वनभोजन, परिसर भेट, व्यावसायिकांच्या मुलाखती, किशोरी मेळावा, कार्यानुभव अंतर्गत विविध वस्तू तयार करणं, पाढे पाठांतर स्पर्धा स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य, रजेच्या काळात पालकांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, आठवडी बाजार, विविध दिन साजरे करणं, लोकशाही पद्धतीनं वर्ग स्तर मंत्रिमंडळांचं प्रात्यक्षिक निवडणूक, वर्ग स्तरावर व शाळा स्तरावर विविध स्पर्धा असे अनेक मुलांच्या हाताला काम व मेंदूला चालना देणारे उपक्रम त्या राबवतात. त्यांच्याकडे असलेल्या वर्गाची प्रश्नपेढी त्या स्वतः तयार करतात. बरेचसे साहित्य हे स्वनिर्मित, विद्यार्थ्यांच्या मदतीनं व पालकांच्या सहकार्यानं तयार केलेलं असतं. त्यांचे आजपर्यंत अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी झाले आहेत. शाळेच्या मुख्याध्यापिका शांता वाघमोडे आणि शाळेतील इतर सर्व सहशिक्षक यांच्या मदतीनं शाळेत शिष्यवृत्तीचे जादा तास त्या घेतात.

 जिल्हा परिषद सोलापूरचा आदर्श शिक्षक पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

      त्यांना प्रवासाची व वाचनाची आवड आहे. प्रवासानंतर पाहिलेल्या ठिकाणांचे प्रवास वर्णन त्या अतिशय चपखल आणि सुंदर शब्दात मांडतात. तसेच त्यांनी स्वतःचे वाचनालय तयार केले आहे.अनेक पुस्तकांचे वाचन त्यांनी केलेले आहे. वाचलेल्या पुस्तकावर त्यांचे 'वाचता वाचताआवडलेलं' हे सदर ते व्हाट्सअप च्या अनेक ग्रुप वर शेअर करतात. त्यांची विद्यार्थिनी आदिती चव्हाण हिचा आदीप्रभा काव्यसंग्रह ही प्रकाशित झाला आहे.

Saturday, 17 August 2024

40.जाईल तिथं उल्लेखनीय कामगिरी करणारे शरद रुपनवर गुरुजी

 शिक्षण आणि शाळेविषयीची असणारी आस्था, पालक आणि समाज यांना शाळेकडं खेचून आणण्याचा शब्दातला गोडवा, विद्यार्थ्यांसाठी सतत नवं काहीतरी करण्याची चाललेली धडपड, शाळा हेच आपलं घर समजणाऱ्या शिक्षकाला शाळेची वेळ सुद्धा अपुरी पडते.ज्या शाळेत बदली होते ती शाळा प्रत्येक अभियानात जिल्ह्यात पहिली असते असं छाती ठोकपणे सांगणारे माळशिरस तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या कारूंडे शाळेतील शिक्षक शरद रुपनवर गुरुजी.

        डोंगरदर्‍यातलं गाव ,सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात ,शिखर शिंगणापूरच्या पायथ्याशी वसलेल्या गावातली ही शाळा अगदी भकास होती. मा. दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान संपूर्ण जिल्हाभर सुरू झालं. गावानं आणि शाळेनं अभियानात उतरायचं ठरवलं आणि जिल्ह्यामध्ये शाळा पहिली आली. गावाचा शाळेकडं पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. स्वतंत्र मुख्याध्यापक कार्यालय, बहुउद्देशीय सभागृह, निसर्ग वर्ग ,रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण, परसबाग ,चाइल्ड फ्रेंडली सेक्शन, प्रशस्त व्यासपीठ , सुसज्ज वर्ग खोल्या, विद्यार्थी गुणवत्ता शैक्षणिक साहित्यानं परिपूर्ण वर्ग खोल्या ,ग्रामस्थांच्या सहकार्यानं आतापर्यंत 13 लाख 67 हजार रुपये आणि चालू वर्षी शाळेसाठी जवळजवळ एक कोटी रुपयाची साडेतीन एकर जमीन गावानं शाळेला दिली. अशाप्रकारे संपूर्ण गाव शाळामय झालं वैशिष्ट्य म्हणजे चालू वर्षी शाळेत नववी चा वर्ग सुरु झाला. आणि पुढं नैसर्गिक पद्धतीनं दहावी ,अकरावी आणि बारावी असा शैक्षणिक विकास आणि ग्रामस्थांच्या सहकार्यानं भव्य दिव्य शैक्षणिक संकुल उभारण्याचा मानस आहे.असं ते सांगतात.

       या अगोदर गुरुजींनी परभणी जिल्ह्यातील चिलगरवाडी येथे खूप मोठं काम केलं. पहिल्याच प्रयत्नात चौथी शिष्यवृत्तीसाठी सहा विद्यार्थ्यांची निवड झाली.गावातील तरुणांना सोबत घेऊन शाळेच्या परिसरातील एक एकर झाडी जंगल तोडून त्याच ठिकाणी त्याच पैशातून सुमारे 200 झाडांचं वृक्षारोपण करून संगोपन केलं. तिथं ही माझी शाळा ,सुंदर शाळा या अभियानात चिलगरवाडी या शाळेनं गंगाखेड तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविला.

         आता गुरुजींची बदली शेरेवाडी माळशिरस तालुक्यात झाली 17 पटाची शाळा 42 पटा पर्यंत पोहोचली. या छोट्याशा वस्तीत दोन लाख 53 हजार वर्गणी करून शाळेचा संपूर्ण कायापालट केला.शंकरराव मोहिते पाटील गुणवत्ता विकास अभियान जिल्ह्यात सुरू झालं. या अभियानामध्ये शेरेवाडी शाळेनं जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला. तीन विद्यार्थी प्रज्ञाशोध परीक्षेत पात्र झाले. एक विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत पात्र झाला. अनेक विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत चमकले. माळशिरस पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार गुरुजींना मिळाला.

     पुढं

 गुरुजी बदली होऊन गुरसाळे शाळेत आले . पहिल्याच वर्षी सातवी चा वर्ग 22 पैकी 17 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत बसून 100% विद्यार्थी पास झाले. जुन्या खोल्या पाडून त्या ठिकाणी नवीन सुसज्ज इमारत, वृक्ष संवर्धक कठडे ,स्वतंत्र मुख्याध्यापक कार्यालय ,स्वतंत्र ई लर्निंग कक्ष व सलग तीन वर्ष अतिशय देखणा सांस्कृतीक कार्यक्रम करून 14 लाख रुपये लोकसहभागातून जमा केले. अनेक विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत जिल्ह्यात पहिले आले. दरम्यान जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार गुरुजींना देण्यात आला... माळशिरस तालुक्यातील पहिली आय एस ओ मानांकन प्राप्त शाळा म्हणून गुरसाळे शाळेची ओळख संपूर्ण जिल्हाभर झाली .पुढं गुरसाळे शाळा सुद्धा 'माझी समृद्ध शाळा' या अभियानामध्ये जिल्ह्यात पहिलीच आली.

Wednesday, 7 August 2024

39.ननवरे गुरुजींचा विज्ञान आणि इंग्रजी विषयात लौकिक



लहानपणापासून कुस्तीची आवड जोपासणारे मच्छिंद्र ननवरे गुरुजी हे आखाड्यात उतरून मुलांना कुस्तीचं प्रशिक्षण देण्याचं स्वप्न पहात होते. मात्र ते शक्य न झाल्यानं कबड्डीमध्ये क्रीडा शिक्षक म्हणून त्यांनी आपला चांगला ठसा उमटविला. स्वतः जुदो- कराटेचं प्रशिक्षण घेऊन ते मुलांना शिकवीत आहेत. त्यांचे विद्यार्थी योगासनामध्ये पारंगत आहेत. सध्या माळशिरस तालुक्यातील तिरवंडी येथील जिल्हा परिषदेचे शाळेत ते विज्ञान विषयाचे शिक्षक म्हणून काम पाहतात. विज्ञान आणि इंग्रजी विषयाचे उत्तम शिक्षक म्हणून माळशिरस तालुक्यात त्यांचा नावलौकिक आहे. माळशिरस तालुक्यातील शिक्षकांना इंग्रजी विषयाचं प्रशिक्षण देण्याचं काम ते करतात. तुपे वस्ती या शाळेत शिक्षकी पेशाची सुरुवात केल्यानंतर मेडद व येळीव या शाळांमध्ये त्यांनी सेवा केली.

        तुपे वस्ती शाळेत पैगंबर तांबोळी या शिक्षकांच्या सोबतीने सोलापूर जिल्हा परिषदेच्या शंकराव मोहिते पाटील गुणवत्ता विकास कार्यक्रमात. महाराष्ट्र शासनाच्या सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमात दोन वेळा शाळेला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून दिला. तसेच ग्रामीण गुणवत्ता विकास कार्यक्रमातही शाळेनं तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला. गेल्यावर्षी मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धेत त्यांच्या सध्याच्या तिरवंडी शाळेना तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला. जिल्हा परिषदेच्या व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरावर यश मिळविले. स्पर्धा परीक्षांचा मुलांचा पाया पक्का व्हावा याकरिता पहिलीच्या वर्गापासूनच ते मुलांची तयारी करून घेतात. मुलांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्यही ते करतात. मुलांचा हस्ताक्षर सुंदर असावं यासाठी ते जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. आत्तापर्यंतच्या सर्व शाळांमध्ये चांगले वृक्षारोपण व्हावे यासाठी उपक्रम राबवले. तुपे वस्ती शाळेतील कठीण खडकावर वृक्षारोपण करताना माती उपलब्ध नसल्यानं त्यांनी राबविलेल्या एक मुलगा एक ढेकूळ या उपक्रमाचं शाळेला भेट देणाऱ्या शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी यांनी खूप कौतुक केलं.

      विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ते सतत प्रयत्न करतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत माळशिरस तालुक्यातील चाकोरे या गावातील परिस्थिती अतिशय बिकट होती. गावातील अनेक व्यक्तींचा मृत्यू झालेला होता. अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह होते. पूर्ण चाकोरे गाव मानसिक दबावात होतं. अशा काळात जि प शाळेतील शिक्षक ननवरे यांनी स्वतःच्या जीवाला धोका पत्करून रुग्णांच्या सेवेसाठी वाहून घेण्याचं ठरवलं. सरांचे अनेक वर्गमित्र अकलूज मधील नामांकित डॉक्टर आहेत या संबंधाचा फायदा चाकोरेच्या रुग्णांना करून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केला. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या जवळ कोणत्याही नातेवाईकांची जाण्याची हिंमत होत नसताना ते रुग्णाजवळ जाऊन त्यांना मानसिक आधार देत होते. त्यांची वाणी गोड असल्यानं रुग्णांवर त्याचा सकारात्मक प्रभाव पडत होता. डॉक्टर मित्रांच्या सहकार्यानं त्यांनी समुपदेशन करण्याचं काम सुरू केलं होतं. जवळपास 14 रुग्णांना त्यांनी मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलं. कोरोना नंतर ही त्यांचं सामाजिक कार्य सुरूच आहे.

      ननवरे गुरुजी 2008 पासून सेमी इंग्रजी माध्यमातून मुलांना शिकवितात. त्यामुळं ते ज्या शाळेत कार्यरत असतात त्या शाळेची पटसंख्या वाढते. मच्छिंद्र ननवरे गुरुजींना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. माळशिरस पंचायत समितीचा आदर्श शिक्षक पुरस्कार, नवोपक्रमासाठी गुजरातच्या रेडिओ पालनपुर आणि ऋचारी इनोवेशन यांचा पुरस्कार, माने पतसंस्थेचा आचार्य दोंदे पुरस्कार, पत्रकार संघाचा राज्यस्तरीय पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं आहे.

Thursday, 25 July 2024

38.विठ्ठल भालेराव यांचं धनुर्विद्या खेळातलं योगदान

 प्राथमिक शाळेपासूनच खेळाची आवड. संपूर्ण राज्याला परिचित असणारं आर्चरी खेळाचं ऊर्जा स्रोत असणाऱ्या संत सावतामाळी विद्यालयात माध्यमिक शिक्षण आणि तिथूनच क्रीडा क्षेत्रात प्राविण्य दाखवून पुढं  स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असं स्वप्न मनी बाळगत अपार कष्ट करणारा विद्यार्थी विठ्ठल भालेराव. धनुर्विद्या खेळातला सराव चालू ठेवत, पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करत बीए बी पी एड पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं आणि शांतिनिकेतन माध्यमिक विद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून भालेराव यांनी नोकरी स्वीकारली. आता स्पर्धा परीक्षेतलं स्वप्न विद्यार्थ्यांच्या रूपानं पूर्ण करायचं ठरलं आणि धनुर्विद्या याच खेळावर लक्ष केंद्रित करत अरण मध्ये पहिल्यांदा ज्यांनी धनुर्विद्या हा खेळ आणला ते हरिदास रणदिवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायला भालेराव यांनी सुरुवात केली.

        

          भालेराव राज्यस्तरीय स्पर्धेत  चार वेळा खेळले , राष्ट्रीय स्पर्धेत खेळले पण यश प्राप्त करता आले नाही.  महाराष्ट्र संघाचा ब्लेजर मिळावा हे स्वप्न अपूरं राहिलं मग 2011 पासून विद्यार्थ्यांना धनुर्विद्या प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.  एका विद्यार्थ्यावर सुरू केलेलं प्रशिक्षण पुढं शंभर विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन पोहोचलं.

       त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी नव नवीन रेकॉर्ड तयार केलं.  2018 साली त्यांनी निवासी गुरुकुल सुरू केलं.फक्त आपल्याच विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलं नाही तर राज्यातील अनेक  विद्यार्थी त्यांच्या धनुर्विद्या प्रशिक्षण गुरुकुलात सामील झाले.

त्यांचा मुलगा विश्व रत्नने तर दहा वर्षाखालील गटात महाराष्ट्रात पाच गोल्ड मेडल प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला . नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट पतीयाला आर्चरी कोलकत्ता येथून त्यांनी प्रशिक्षण कोर्स पूर्ण केला आणि भालेराव यांची महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाली.  खेळाडू म्हणून महाराष्ट्र संघाचा ट्रॅक सूट मिळावा अशी त्यांची इच्छा होती पण धनुर्विद्या प्रशिक्षण प्रशिक्षक म्हणून  आंध्र प्रदेशात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांना  ट्रॅक सूट मिळाला हा त्यांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण .

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विकास मोरे या खेळाडूने सुवर्णपदक प्राप्त केले. एक खेळाडू खेलो इंडीयासाठी पात्र झाला ,एक खेळाडू दोन वेळा राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाला, 17 खेळाडू  राष्ट्रीय स्पर्धेत विजेते आहेत तर  25 खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत पदक प्राप्त केलं आहे. त्यांचे दोन खेळाडू सध्या  खेळामधूनच प्रशासकीय सेवेमध्ये  कार्यरत आहेत. 

       एक चांगला खेळाडू एक चांगला प्रशिक्षक होऊ शकत नाही आणि चांगला प्रशिक्षित एक चांगला खेळाडू होऊ शकत नाही हे एका पुस्तकात वाचलं होतं. ते इथं तंतोतंत जुळलेलं दिसून येत होतं. गरीब कुटुंबातून निर्माण झालेला खेळाडू, पुढं तुटपुंज्या पगारावर नोकरी करत असलेला शिक्षक आणि त्यांची धनुर्विद्या प्रशिक्षणासाठी चाललेली  धडपड पाहून अनेक मित्रांनी त्यांना मदत केली. डॉ. प्रवीण पाटील , सुदीपची शहा आणि आकाश  माने  

यांनी आर्थिक रुपानं तर कायमस्वरूपी खिलाडूवृत्ती जागृत रहावी यासाठी संजय शिंदे सर, रणजीत चामले सर हे भालेराव सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

      धनुर्विद्या हा खेळ खरंतर खूप खर्चिक आहे. ज्या विद्यार्थ्यांना खेळाची आवड आहे आणि बौद्धिक क्षमता ही चांगली आहे. अशा विद्यार्थ्यांचा  स्पर्धा परीक्षेकडे बऱ्यापैकी कल दिसून येतो. भविष्यात अशा विद्यार्थ्यांसाठी आपण मार्गदर्शन करणार आहोत असे त्यांनी सांगितले.

Friday, 12 July 2024

37. माने गुरुजी नव्हे... कौठाळीचे साने गुरुजी



      सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात अगदी कडक निर्णय घेणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही आपला निर्णय बदलून गुरुजींची बदली थांबवायला भाग पाडणारे कौठाळी गावचे श्रद्धास्थान म्हणजे राजेंद्र माने गुरुजी !

1997 मध्ये माने गुरुजींना कौठाळी गावात नेमणूक मिळाली. राजकारणाच्या बाबतीत गाव बरच गाजलेलं. रेशन दुकानाची केस हाय कोर्टात तर गोबरगॅस टाकीचा विषय विधानसभेत गाजविणारं गाव ! पण मराठी शाळेच्या बाबतीत राजकारण गेटच्या बाहेर सोडून एकदिलानं सहकार्य करणारे ग्रामस्थ अशी आगळी वेगळी ओळख असणाऱ्या गावात रविंद्र देशमुख व राजेंद्र भाईकट्टी यांनी या गावात शैक्षणिक वातावरण निर्माण केलं होतं .

         त्या काळात चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत , सैनिक स्कुल व नवोदय प्रवेश परीक्षा या स्पर्धा परीक्षेत विद्यार्थी चमकले होते.माने गुरुजींना काम करण्याची चांगली संधी मिळाली. त्या काळात शिष्यवृत्ती परीक्षा फक्त तालुकास्तरावर एकाच केंद्रावर व्हायची.अगदी पारदर्शक ! एखादा विद्यार्थी जरी गुणवत्ता यादीत चमकला तरी ग्रामस्थ त्या शिक्षकाचं खूप कौतुक करायचे .पदवीधर शिक्षक माणिक घोडके गुरुजी यांनी माने गुरुजींना खूप प्रोत्साहन दिलं. आणि कौठाळी शाळेचा एक नवा शिष्यवृत्ती पॅटर्न उदयास आला. 

  सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल 17 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले.राज्य गुणवत्ता यादीत मुले झळकली. 

           केवळ स्पर्धा परीक्षाच नव्हे तर शैक्षणिक ताक धीना धीन , विचारा तुम्ही सांगतो आम्ही , शैक्षणिक सहली , विविध गुणदर्शन कार्यक्रम , बालनाट्य , क्रीडास्पर्धा या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गुरुजी अगदी तन मन धनानं झटत होते.गुरुजींनी शाळेची सहल मुंबईला नेली, स्वतः हार्मोनिअम शिकून विद्यार्थ्यांचा संगीत वादक संच तयार केला, सांस्कृतिक कार्यक्रमात दरवर्षी विनोदी बातम्या सादर करून लोकांना खळखळून हसविले . हे सारे करत असताना कधी निम्मी पगार तर कधी आख्खी पगार गुरुजींनी विद्यार्थ्यांसाठी खर्च करून टाकली. त्या काळात गुरुजी व विद्यार्थी शाळेतच राहत. मुले फक्त अंघोळीला घरी जायचे. पहाटे साडे पाच ते रात्री अकरा पर्यंत शाळा व तास चालायचे. 

    दिवाळीला फक्त तीन दिवस सुट्टी ! बाकी वर्षभर शाळा सुरु ! त्या दहा- बारा वर्षात गुरुजींनी एकही रजा घेतली नाही. अशा शैक्षणिक वातावरणामुळं कौठाळी शाळेनं सलग दहा वर्षे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार पटकविला. 

माने गुरुजींनी गावाला जितकं दिलं त्यापेक्षा जास्त गावानं गुरुजींना दिलं.त्या काळात हॉटेल,फोन,वाहतूक यांची सुविधा नव्हती. परंतु अचानक आठ दहा शिक्षक मुक्कामी राहिले तरी एकदाही शिक्षकांना उपाशी झोपावं लागत नसायचं. दररोज संध्याकाळी एक दोन पालक शाळेत चक्कर टाकायचे व आवर्जून जेवण पाठवायचे.बऱ्याच पालकांची आर्थिक ओढाताण असली तरी स्टेज कट्टा , फरशीकरण , सर्व वर्गात डेस्क, वॉल कंपाउंड , स्पीकर सेट, वादन संच अशा सर्व सुविधा लोकांनी उपलब्ध करून दिल्या.

अचानक माने गुरुजींची प्रशासकीय बदली झाली. गावातील लोकांनी निर्णय घेतला.बदली होऊ द्यायची नाही. लोकांनी मुलांना शाळेत पाठवीणंच बंद केलं. 300 पटाची शाळा ओस पडली. सर्व अधिकारी भेट देऊन विनंती करू लागले.शेवटी मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी स्पेशल केस म्हणून गुरुजींची बदली रद्द केली !

        उत्तर सोलापूर तालुक्यातील एक चारित्र्यसंपन्न आजातशत्रू आदर्श शिक्षक म्हणून माने गुरुजींची ओळख आहे.     

          गुळवंची येथे काही दिवस काम करण्याची संधी गुरुजींना मिळाली. त्यानंतर आता सध्या बीबीदारफळ येथे शाळेचे मुख्याध्यापक म्हणून ते काम पाहतात. मॉडेल स्कुल म्हणून शासनानं या शाळेची निवड केले आहे.त्यादृष्टीनं तालुक्यासाठी एक संपन्न शाळेची निर्मिती करण्याची संधी माने गुरुजीला मिळाली आहे. ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजीतसिंह डिसले यांची सहा महिन्यांची इंटर्नशीप माने गुरुजींच्या हाताखालीच कौठाळी येथे झाली होती. डिसले सरांना न्यूज चॅनलवाल्यांनी विचारल्यानंतर त्यांनी त्यांचे आदर्श म्हणून माने गुरुजींचच नाव घेतलं होतं. शाळेसाठी संपूर्ण समर्पण करणाऱ्या अशा काही आदर्श गुरुजींमुळेचं जिल्हा परिषदेच्या शाळा आज भयानक स्पर्धेतही टिकून आहेत.

Wednesday, 3 July 2024

36.बार्शी चे पांडुरंग कांबळे

 शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गावामध्ये जिल्हा परिषदेच्या दोन उच्च प्राथमिक शाळा आणि एक हायस्कूल असून हे गाव बार्शीच्या जवळच असल्यानं खाजगी शाळांचं सुद्धा इथल्या काही पालकांना आकर्षण आहे. एवढ्या सगळ्या शैक्षणिक पसाऱ्यामध्ये जिल्हा परिषद शाळेचं अस्तित्व, पटसंख्या आणि शाळेचं नावलौकिक वाढवण्यात मुख्याध्यापक पांडुरंग कांबळे गुरुजी यांचं काम कौतुकास्पद आहे.

        गुरुजी शाळेत येण्याअगोदर शाळेची फार दुरावस्था झाली होती .सर्वप्रथम शाळेला पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था त्यांनी करून घेतली. 

सर्व स्वच्छतागृहे अद्यावत करून घेतली .

 ग्रामपंचायत , शाळा व्यवस्थापन समिती, आणि सर्व वर्गाच्या पालक सभा घेऊन तीन वर्षाचा कृती आराखडा गुरुजींनी तयार केला. सर्व पालकांनी शब्द दिला "तन-मन-धनानं आम्ही शाळेत तुमच्या सोबत आहोत".शाळेचं रूपडं बदलण्यासाठी दुसरं काय लागतं! सर्व पालक, विद्यार्थी, शिक्षक कामाला लागले. परसबाग स्पर्धेत पहिल्याच प्रयत्नात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळाला . पुढे मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धा आली . शाळेतील शिक्षक हरिश्चंद्र थोरात , गोरोबा यावलकर , सुनिता उकिरडे, वंदना कुलकर्णी , स्मिता तेलकर , आशा व्हनकळस, राजकन्या वलसे यांनी

कांबळे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली एक नियोजन तयार केलं. कामाला सुरुवात झाली आणि बघता बघता भकास दिसणारी शाळा अतिशय सुंदर, स्वच्छ, आनंददायी दिसू लागली आणि या स्पर्धेत सुद्धा जिल्ह्यात पाच लाख रुपयाचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं .इंग्रजी सारख्या विषयात विद्यार्थी मागं राहू नयेत म्हणून स्वतः गुरुजींनी इंग्लिश डे सारखा उपक्रम चालू केला ,तो अतिशय फलदायी ठरला. दर शनिवारी इंग्लिश डे हा उपक्रम शाळेत घेतला जातो.

  विद्यार्थ्यांना खेळांची गोडी लागावी म्हणून सर्व मैदानं जूनमध्येच तयार केली जातात. मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहेत . त्यामुळेचं क्रीडा स्पर्धेत शाळा तीन क्रीडा प्रकारात तालुक्यात उपविजेती ठरली. व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेचे सुद्धा शाळा पहिल्या तीन क्रमांकामध्ये आली . गुरुजींनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली, नवोदय विद्यालयासाठी एक विद्यार्थी शाळेतून पात्र झाला. स्थानिक कारागिरांच्या मदतीनं इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याचा गुरुजींनी प्रयत्न केला.शिक्षकांनी स्वखर्चातून शाळेची रंगरंगोटी केली. मुख्याध्यापक आणि सहकारी शिक्षक यांच्या मधला सुसंवाद हेच शाळेच्या प्रगतीतलं पहिलं पाऊल असतं.म्हणूनच तर सकाळी नऊ पासून सुरू झालेली शाळा संध्याकाळी सात वाजेपर्यंत भरलेली असते .

     अतिशय शांत ,संयमी ,उच्च विद्या विभूषित अभ्यासू , कामसू ,शिक्षक वर्ग शाळेस लाभलेला आहे. जसा मुख्याध्यापक तशी शाळा असं नेहमी म्हटलं जातं हे या शाळेला तंतोतंत लागू पडतं.गावातील लहानांपासून वृद्धांपर्यंत शाळेविषयी भरभरून बोलतात. आणि हीच खरी पावती शाळेसाठी ऊर्जा देणारी ठरते असं येथील शिक्षकांना वाटतं.अप्रगत विद्यार्थ्यां ना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पूरक उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी गुरुजींनी केली आहे. त्यांच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक कामाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे त्यामध्ये

जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, 

मराठा सेवा संघ बार्शी यांच्या वतीने दिला जाणारा आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार , यांचा समावेश आहे.

35.रझिया इस्माईल जमादार.....

 शिक्षणाचा नवीन विचार प्रवाह ,डॉक्टर, इंजिनीयर, आयटी याच क्षेत्राची विद्यार्थ्यांची असलेली पहिली पसंती, यामुळं आपली मुलं बालवाडी अंगणवाडी पासूनच इंग्रजी शाळेत शिकलीच पाहिजेत असा असलेला पालकांचा अट्टाहास यामुळं गावोगावी जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळांकडं  सर्वांचाच बघण्याचा दृष्टिकोन बदललेला असतानाच जिल्ह्यातील असंख्य उपक्रमशील आणि विद्यार्थ्यांसाठी रात्रंदिवस झटणाऱ्या शिक्षकांमुळं   या शाळा आजही खाजगी आणि इंग्रजी शाळांसोबत स्पर्धेत टिकून आहेत.

      अक्कलकोट तालुक्यातील     न.प.प्रा.मराठी मुलींची शाळा नंबर१ येथील

रझिया इस्माईल जमादार या नगरपालिकेच्या शाळांमध्ये त्यांच्या नवनवीन  उपक्रमांमुळं सर्वांना परिचित आहेत. वाचन ,लेखन ,चित्रकला ,गाणी ऐकणं, कविता लेखन, वेगवेगळे सर्जनशील शैक्षणिक उपक्रम, शैक्षणिक साहित्य निर्मिती अशा अनेक गोष्टींचा त्यांना छंद आहे.

दै.संचार,दै.सकाळ,दै.तरूणभारत,दै.दिव्यमराठी,दै.अक्कलकोट समर्थ इ.वर्तमानपत्रां मधून कविता,वाचकांचा पत्रव्यवहार,साद -प्रतिसाद, चारोळ्या,उखाणे, चित्र काव्य लेखन,सखीसाठी लेखन,दै.सकाळ 'सप्तरंग' पुरवणीमध्ये लेखन केले आहे . त्यांचे 'प्राणी आपले मित्र ' हे बालकाव्य प्रसिद्ध आहे.

 वाचन विकासासाठी विविध कृतींची,उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी त्यांनी केली.सकाळ एन आय ई व एमटेक इंजिनिअर्स आयोजित  "शालेय  शिक्षकांनी असा साधला संवाद " या राज्यस्तरीय लेखन स्पर्धेत त्यांनी प्रथम पारितोषिक मिळवलं.

 छात्र प्रबोधन,ज्ञानप्रबोधिनी पुणे यांच्या प्रबोधन दूत योजनेत त्यांचा  सहभाग आहे. विविध स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी वाचनालयासाठी पुस्तके मिळवली आहेत.

स्वच्छ भारत सुंदर भारत अभियानांतर्गत  वक्तृत्व,निबंध ,प्रकटवाचन ,चित्रकला,गीत गायन सामूहिक तथा वैयक्तिक ,नृत्य, पथनाट्य, नाट्यीकरण यासारख्या विविध उपक्रमात भाग घेऊन विद्यार्थ्यांना यश मिळवून दिले. नगरपरिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या प्रत्येक स्पर्धेमधे विद्यार्थ्यांना पारितोषिके मिळालीआहेत. वर्तमानपत्रांतून विद्यार्थ्यांना चित्रकलेतून मूल्यसंवर्धन या उपक्रमांतर्गत स्वत: चित्रे काढण्यास प्रेरित केले.आजतागायत त्यांच्या विद्यार्थ्यांची दोनशे चित्रे आणि विद्यार्थी लिखित विनोद विविध वर्तमानपत्रांमध्ये छापून आले आहेत. वाचन कोपरा,वर्गग्रंथालय ,शाळाग्रंथालय ,श्री.शहाजी वाचनालय येथे दररोज एक तास वाचनासाठी,अभिवाचन स्पर्धा, प्रकटवाचन स्पर्धा ऑनलाईन बडबडगीत स्पर्धा, यामध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो. 

 नागपूर आकाशवाणी वर शाळाबाहेरची शाळा  कार्यक्रमांतर्गत  १ते१० संख्यांची ताबडतोब बेरीज यासाठी त्यांचा विद्यार्थी योगेश बन्ने याची आकाशवाणी वर १५ मिनिटांची  यशस्वी मुलाखत झाली. विद्यार्थी सर्वच क्षेत्रात पारंगत व्हायला हवा हा त्यांचा अट्टाहास असतो. लेखक कृषीभूषण विश्वासराव कचरे,चित्रकार,लेखक,शिक्षक मयूर दंतकाळे सर यांच्याशी  विद्यार्थ्यांची पत्रमैत्री, रेडिओ पुणेरी आवाज,मुली रंगल्या काव्यात ,काव्य तुमचे तरंग आमचे यामध्ये त्यांच्या विद्यार्थिनींचे स्वलिखित कवितांचे सादरीकरण RJ माधवी पवार यांनी केले आहे.बालकुमार दिवाळी अंक, कोल्हापूर यामध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांच्या कविता व चित्रे प्रसिद्ध आहेत. त्यांच्या स्वतःच्या आणि विद्यार्थ्यांच्या कविता आणि विविध लेखन कौशल्य पाहून तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी व मुंबई महापौर किशोरीताई पेडणेकर यांच्याहस्ते सन्मानपत्र,सन्मानचिन्ह व शालेय साहित्य देऊन त्यांना सन्मानित केले आहे.

अशा या गुणी, साहित्यावर प्रेम करणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना करायला लावणाऱ्या शिक्षिकांचा  आजपर्यंत विविध पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. त्यामध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी गुणवंत शिक्षक पुरस्कार,सर फाऊंडेशन,स्टेट इन्नोवेटीव प्राईज, राज्यस्तरीय प्रयोगशील शिक्षक पुरस्कार सन ,पंचायत समिती अक्कलकोट, आदर्श शिक्षक पुरस्कार.लायन्स क्लब अक्कलकोट आदर्श शिक्षक पुरस्कार सन ,

न.प.शिक्षण मंडळ अक्कलकोट, आदर्श शिक्षक पुरस्कार ,सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार ,विश्वभान प्रतिष्ठान मुंबई ऑनलाईन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ,९ वा राष्ट्रीय अक्कलकोट भूषण आदर्श शिक्षक पुरस्कार यांचा समावेश आहे.

34.विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी झटणाऱ्या सुप्रिया ताकभाते

 मूल जेव्हा शाळेतून शिकून बाहेर पडतं त्यावेळी त्याचा सर्वांगीण विकास झालेला असला पाहिजे. कौशल्यदिष्टीत अभ्यासक्रमाचं हेच तर खरं वैशिष्ट्य आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत सुप्रिया ताकभाते या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माढा मुले नं.१ येथे  दहा वर्षे तर  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विठ्ठलवाडी येथे पाच वर्षांपासून सेवा करत आहेत . नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी त्या सातत्यानं झटत आहे.  वक्तृत्व, कथाकथन, नृत्य, चित्रकला, बुद्धिबळ, एकपात्री नाटक, क्रीडा, पोस्टर इत्यादी स्पर्धेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा स्तरापर्यंत क्रमांक पटकाविले आहेत.

            कोरोना काळात राबविलेले सामान्य ज्ञानावर आधारित 'प्रश्नांचा गुरुवार' आणि सहज, सोपे प्रयोग असणारा 'रविवारचा प्रयोग' हे उपक्रम पूर्ण महाराष्ट्र राज्यासोबत गोवा राज्यातही जाऊन पोहोचले होते.    कोरोना काळात  ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचा  ऑनलाइन अभ्यास घेत शैक्षणिक प्रवाहात त्यांना ठेवण्याचं मोठं काम श्रीमती ताकभाते मॅडम केलं होतं.

     क्षितिज फाउंडेशनच्या मदतीनं त्या मुलांच्या आरोग्य सुधारण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून पोषण आहार सप्ताह शाळेत राबवितात. हात धुवादिनानिमित्त राबवलेल्या उपक्रमाची दखल UNICEF या संस्थेनं घेतली आहे. युनिसेफने जागतिक जल दिना निमित्त  शाळेतील त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या उपक्रमांचे  व्हिडिओही मागवून घेतले.

       किशोरवयीन मुलींना मासिक पाळी विषयी मार्गदर्शक,या वयात आई आणि मुलींचं नातं , दृढ करण्यासाठी विविध स्पर्धा, चर्चासत्र, उद्बोधन वर्ग त्या आयोजित करतात.

      विठ्ठलवाडी हे गाव स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. यासाठी प्राथमिक शाळेपासूनच विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लावली जाते.  'माझा वाढदिवस पुस्तकांसोबत' या उपक्रमाअंतर्गत शाळेसाठी पंचवीस हजाराची पुस्तके   वाचनालयासाठी संग्रहित केली आहेत. तसेच इतर सामाजिक संस्थांकडून कडून पंचवीस हजाराची पुस्तके प्राप्त करून घेतली आहेत. त्यांचे विद्यार्थी सकाळचा एनआयइ हा अंक नियमित वाचतात.

     पर्यावरण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. परंपरा जपूया, पर्यावरण राखूया! माझे पुस्तकाचे वाण, प्लास्टिक मुक्ती इत्यादी अनेक उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी त्या राबवतात.

      सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकण्यासाठी स्पर्धा परीक्षा जोरदार तयारी करून घेतात. त्यामुळेच शिष्यवृत्ती आणि इतर स्पर्धा परीक्षेत त्यांचे विद्यार्थी गुणवत्ता यादीतही दरवर्षी चमकतात. कलागुणांना वाव देण्यासाठी बालसभा, नवरात्रीच्या नवदुर्गा, रांगोळी ,निबंध लेखन अशा स्पर्धा आवर्जून घेतात. इंग्रजी वाचन, लेखन, संभाषण यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमही त्या शाळेमध्ये राबवतात.

    शैक्षणिक आणि इतर विषयावरील त्यांचे लेखन जीवन शिक्षण, जीवन गौरव, सकाळ वर्तमानपत्रात प्रकाशित झाले आहे. सर फाउंडेशन आयोजित नवोपक्रम स्पर्धेतही त्यांच्या उपक्रमाची निवड झाली आहे. 

   मतदान जनजागृती, घर घर तिरंगा, लेट्स चेंज, केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेला विविध विषयावर मार्गदर्शन, तंबाखूमुक्त शाळा, जागर योजनांचा उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग. सेल्फी विथ सक्सेस, गोष्टीचा शनिवार, आनंददायी शनिवार, विद्यार्थी बचत बँक, आरोग्याकडून अभ्यासाकडे, सामान्य ज्ञान प्रश्न आणि परीक्षा, ई लर्निंग , लर्न विथ फन, गप्पांचा तास यासारखे अनेक उपक्रम त्या शाळेत राबवितात. त्यामुळेच त्यांना उपक्रमशील शिक्षिका हा बहुमान मिळत आहे.

पुरस्कार 

जिल्हा परिषद सोलापूर मार्फत शिष्यवृत्ती विभागातून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका  पुरस्कार, सर फाउंडेशन मार्फत जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार, रोटरी क्लब कडून नेशन बिल्डर अवार्ड, क्षितिज फाउंडेशन कडून एस्पायरिंग वुमेन अवार्ड, अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलना मार्फत सावित्रीबाई फुले पुरस्कार, कृतिशील शिक्षिका पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.

Friday, 31 May 2024

33.विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय व संवेदनशील शिक्षिका सुजाता घोळवे मॅडम

 

उत्तर सोलापूर तालुक्यातील दहिटणे जिल्हा परिषदेच्या शाळेत कार्यरत असणाऱ्या श्रीमती सुजाता घोळवे यांनी शैक्षणिक क्षेत्रातल्या अनेक वर्षाच्या सेवेनंतर आजही शिकवण्यासोबतच त्यांचं शिकणं सुरू ठेवलं आहे. या शाळेत विज्ञान शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. अवघ्या दहा विद्यार्थ्यापासून त्यांनी शाळेचा पट साठ पर्यंत वाढवला.

      मुलींचे शिक्षण, माता पालकांचा शिक्षणातील सहभाग, महिला सक्षमीकरण यासाठी त्यांनी खूप काम केलं. यापूर्वी त्यांनी जिल्हा परिषद शाळा उळे,सिंदखेड, हगलूर, अकोले काटी,तामडाग, येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत उल्लेखनीय कामगिरी केली. पहिली वर्गासाठी आनंददायी वाचन, लेखन यासारखे विशेष उपक्रम राबविण्यात मॅडमचा हातखंडा होता .घोळवे मॅडम यांचं शिक्षण आजतागायत अखंडपणे सुरूच आहे. डी.एड. नंतर एम.ए.बी.एड, एलएलबी, बी.एस्सी , योगा सर्टिफिकेट कोर्स त्यांनी पूर्ण केला आणि आज त्या इंग्रजी मधून पी.एच.डी.चे शिक्षण घेत आहेत. सर्व संकटांवर मात करत त्यांचं शिकणं सुरूच आहे.शिक्षक हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो. जो शिकतो, तोच शिकवू शकतो. यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. घरचा प्रपंच,शाळेतले विविध उपक्रम, प्रशासन हे, शिकण्याची जिद्द असणाऱ्या शिक्षकाला कधीच आडवी येत नाहीत असं त्यांना वाटतं.

        विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच इतर व्यक्तीमत्व विकासासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात.सांस्कृतिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, जिल्हा स्तरावरील योग स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धेत सहभाग घेऊन त्यांनी व त्यांच्या विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य प्रमाणपत्र मिळवले आहे.हिंदी राष्ट्रभाषा स्पर्धा परीक्षा, वर्धा मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.इन्सपायर अवॉर्ड चा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून दिला आहे.स्पर्धा परीक्षेमधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांची आणि त्यांची मैत्री इतकी घट्ट जमली आहे की विद्यार्थ्यांना स्वतः आपल्या गाडीमधून दररोज ने आण करतात.पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांचे यश हीच खरी कमाई आणि पुरस्कार असल्याचे मॅडम सांगतात.केंद्रस्तरीय, तालुकास्तरीय,

जिल्हास्तरीय कार्यशाळेत सुलभक म्हणून त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.उत्कृष्ट सुत्रसंचलन, उत्तम वक्ता, उत्तम कवयित्री, गायिका, लेखिका या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे."मुले वाढत असताना", हे पालकांना उपयुक्त व "फ्रेंडशिप विथ लेटर्स "विद्यार्थ्यांना उपयुक्त अशा दोन पुस्तकांचं प्रकाशन केलं आहे.पर्यावरणप्रेमी शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे. हॅपी टू हेल्प फाऊंडेशन तसेच राज्यस्तरीय कविसंमेलन च्या सदस्य म्हणून त्या काम पाहतात.

सीडबाॅल निर्मिती कार्यशाळा,चिमणी घरटे निर्मिती कार्यशाळा,योग विषयक शिबीर यामध्ये त्यांनी विशेष सहभाग नोंदविला आहे.

आजपर्यंत त्यांच्या कार्याची दखल घेऊन शिक्षणविभागातर्फे विशेष शिक्षक पुरस्कार, मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे राज्यस्तरीय गुणीजण गुणवंत शिक्षक रत्न पुरस्कार, उत्तर सोलापूर तालुका,प्रा.शिक्षक सहकारी पतसंस्था, मार्डी तर्फे गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.अकोलेकाटी शाळेत घोळवे मॅडम यांनी स्वखर्चातून महिला शिक्षिकांसाठी बाथरूम सुविधा उपलब्ध केली , दहिटणे इथं स्वखर्चातून शालेय रंगरंगोटी,मैदान दुरुस्ती केली, वृक्षारोपण मोहिमेत त्यांनी सहभाग घेतला.

जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत (शासकीय कर्मचारी स्पर्धा)थाळी फेक स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.

इंग्रजी, विज्ञान विषयात विशेष अग्रेसर असणाऱ्या घोळवे मॅडम सहजतेनं, हसतखेळत इंग्रजी वाचायला शिकवतात. इंग्रजी आवडता विषय बनवतात.वैज्ञानिक संकल्पना दैनंदिन जीवनात वापरून सहजतेनं मुलांच्या मनात रुजवतात. सर्व शिक्षक शिक्षकांमध्ये

विद्यार्थीप्रिय, शिस्तप्रिय व संवेदनशील शिक्षिका ही त्यांची वेगळी ओळख आहे.

Thursday, 23 May 2024

32.शैक्षणिक क्षेत्रातलं अष्टपैलू व्यक्तिमत्व काटेगावचे रवींद्र देशमुख गुरुजी

 



    नि:स्वार्थ सेवा, लाघवी आणि मृदू भाषा शैली, कला आणि मातृभाषेवरचं प्रेम, शिक्षक, विद्यार्थी ,पालक ,अधिकारी, पदाधिकारी या सर्वांचा समन्वय घडवण्याची अंगी असणारी कला, प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याकडं  प्रेमानं खेचून घेणारं अष्टपैलू व्यक्तिमत्व, म्हणजे काटेगावचे रवींद्र देशमुख गुरुजी! सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाळगी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ते कार्यरत आहेत.

       गुरुजींना नाटक,संगीताची विलक्षण आवड. कौठाळी शाळा आणि गुरुजींचं नातं शब्दांत नाही सांगता येणार.विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक हालअपेष्ठांना तोंड देत सहका-यां च्या मदतीनं केवळ एक वर्षाचा अपवाद वगळता अखंड वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम, कथा कथन, वक्तृत्व, समूहगायन, लोकनृत्य, बालनाट्य अशा विविध व्यक्तिमत्त्वविकास स्पर्धांमधून शाळेनं  तालुका ,जिल्हा स्तरावरील पारितोषिकं पटकावली. गुरुजीलिखित "गुरूदक्षिणा" या बालनाट्यानं तर जिल्ह्य़ात प्रथम क्रमांक पटकावला. 

     त्यांनी हौशी रंगमंच गाजवलं, कथा कविता बालनाट्य, वृत्तपत्रीय लेखन तसेच नाट्य लेखन ते करत आहेत. त्यांच्या " काटेरी सासर " या नाटकास मराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ मुंबईकडून प्रमाणित केले आहे.या सर्व कला विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला .त्यांच्या विद्यार्थ्यांचे  लेखन संकलन वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले. त्यांच्या विद्यार्थ्यांचा मराठी इंग्रजी सुंदर हस्ताक्षर प्रकल्प संपूर्ण जिल्ह्य़ासाठी मार्गदर्शक ठरला. सर्व मुलांची अक्षरे सुंदर आणि एक सारखी असू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं.  लोक सहभागातून शाळाविकासाची अनेक भरीव कामं त्यांनी केली आहेत.सोलापूर आकाशवाणीवर शालेय कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात आलं.

     कवठे ता. उत्तर सोलापूर  या शाळेत असताना तत्कालीन सीईओ साहेब राजेंद्र भारूड सरांच्या  फेसबुक लाईव्ह कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषद सोलापूर येथे भारूड साहेबांच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचा योग आला. विद्यार्थ्यांची गायन कला आणि प्रश्न विचारण्याचं धाडस पाहून गुरुजींचा त्यांनी गौरव केला. या शाळेत लोकवर्गणीतून सुमारे साडेतीन लाख रुपये जमवून ग्रामस्थांच्या मदतीनं कवठे शाळा आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाली. 

     गुरुजींची बदली बाळगी.ता दक्षिण सोलापूर इथं झाली. गाव संपूर्ण कन्नड भाषिक, विद्यार्थ्यांवर कन्नड भाषेचा प्रभाव व गुरुजीना कन्नड बोलता येत नाही व कळतही नाही अशी आव्हानात्मक स्थिती होती. पण शिक्षण मराठीतून असल्यानं त्यांनी मराठीचा वापर आग्रहपूर्वक केला.  अशाही परिस्थितीत अविरत प्रयत्न करत गुणवत्ता वाढीचा प्रयत्न करत शिष्यवृत्ती परिक्षेस बहुसंख्य मुलांना बसवले.

   गुरुजी समर्पित भावनेनं सर्व अधिकारी वर्ग, मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकासोबत सेवा कार्य  करत आहेत .

        गुणवंत शिक्षक, प्रेरणा पुरस्कार, जिजाऊ सावित्री पुरस्कार, अक्षरग्रंथ पुरस्कार,आदर्श शिक्षक पुरस्कार,गाव, तालुका,जिल्हा पातळीवरचे अनेक पुरस्कार मिळाले. कथाकथन, वक्तृत्व, नृत्य, लेखना बद्दलही अनेक पुरस्कार मिळाले  प्रत्येक पुरस्कार विद्यार्थ्याना अर्पण करित आपली सेवा अत्यंत नम्रपणे सुरु ठेवली.

त्यांनी अनेक प्रशिक्षण वर्गासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रभावीपणे काम केले.तसेच सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळेतील मुला-मुलींना मुंबई दर्शन सहल ,तसेच  कर्नाटक राज्यात सुद्धा   शिक्षणाधिकारी मा. कादर शेख साहेब व उपशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या जबाबदारीनं त्यांनी सहल यशस्वी केली.

      गुरुजींनी फेसबुकच्या माध्यमातून " देशमुख गुरुजींचा धडा " हे सदर दिसामाजी काहितरी लिहावे या उक्तीप्रमाणं सलग 365 दिवस दररोज तीन साडेतीनशे शब्दांचं विविध विषयांवर लेखन करुन मराठी साहित्यात एक वेगळा विक्रम स्थापित केला. त्यांचे देशमुख गुरुजींचा धडा भाग :1 आणि वक्ता महाराष्ट्राचा ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. 

     

Thursday, 16 May 2024

31.समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहोचवणारे सुरवसे गुरुजी

 कोणतंही शिक्षण केवळ शाळा आणि विद्यार्थी एवढ्या पुरतच मर्यादित न राहता आपण राष्ट्राचा आणि समाजाचा एक घटक आहोत हे समजून घेत ते समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम काही शिक्षक करत असतात.

      आयुष मंत्रालय भारत सरकार यांची योगशिक्षक लेवल पाच ही परीक्षा उत्तीर्ण , आर्ट ऑफ लिव्हिंगचे उत्तम प्रशिक्षक, चेस इन स्कूलच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलांना बुद्धिबळाचे धडे देत स्वतः बुद्धिबळ खेळाडू व राज्य पंच असणारे, मुलांना करिअर मार्गदर्शन  मायक्रोसॉफ्टकडून इनोव्हेटिव्ह एज्युकेटर एक्स्पर्ट आदी पुरस्कार मिळवणारे असेच एक शिक्षक  परमेश्वर सुरवसे हे माढा तालुक्यातील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोलंकरवाडी येथे कार्यरत आहेत.


     कोरोना काळामध्ये मुलांना ऑनलाइन शिक्षण, पारावरची शाळा इत्यादी उपक्रम तसेच गावात शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी सामाजिक संस्था, ग्रामपंचायत व आपल्या शिक्षक सहकार्याच्या सहाय्यानं  सोलंकरवाडी हे गाव ‘अभ्यासाचं गाव  ‘ म्हणून पुढं आणलं.  मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे शिकता यावं यासाठी रोटरी क्लब, विक्रमसिंह शिंदे बहुउद्देशीय संस्था यांच्या सहकार्यानं मुलांसाठी टॅबलेट स्कूल सुरू केली. मोडनिंब शाळेत असताना लोकवर्गणीतून व पालकांच्या सहाय्यानं शाळेस एक अँड्रॉइड टीव्ही व  15 मुलांना स्वतःचे टॅब्लेट घेण्यास प्रवृत्त केलं.  स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा व नवोदय परीक्षेसाठी पात्र बनविले शिष्यवृत्ती मार्गदर्शनपर ‘गुरुकिल्ली’ हे पुस्तक देखील त्यांनी लिहिले आहे.


     टाटा ट्रस्ट व ब्रिटिश काउन्सिल यांचे  समन्वयक म्हणून त्यांनी अरण, मोडनिंब व लऊळ केंद्रातील पंचाहत्तर शिक्षकांना सलग तीन वर्षे इंग्रजीचे अध्ययन व अध्यापन सुधारण्यासाठी मार्गदर्शन केलं.

 याशिवाय मतदान जागृती फेरी, अर

ण, पंढरपूर, मोडनिंब येथे स्वच्छता दिंडी, बाल आनंदबाजार, विद्यार्थी बचत बॅंक,शालेय वस्तू भांडार, ‘लेक वाचवा लेक वाढवा अभियान’ कब पथक,  पालक प्रगती पुस्तक , पहिलीपासून सेमी इंग्रजी वर्ग, विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, टॅलेंट हंट स्पर्धा, रक्तदान शिबिर इत्यादी उपक्रमात सक्रिय सहभाग. न्यूज इन एज्युकेशन या अंतर्गत मुलांना सकाळचे एनआई हे पाक्षिक वाचण्यास उपलब्ध करून दिले. 


आर्ट ऑफ लिव्हिंगचे योग प्रशिक्षक म्हणून त्यांनी विवीध  गावांमध्ये जाऊन सुदर्शनक्रिया, योगासने, प्राणायाम व ध्यानाच्या माध्यमातून तणावमुक्त आनंदी जीवन जगण्याचे धडे दिले आहेत.

20 जणांना योग शिक्षक बनण्यासाठी मार्गदर्शन केल्यानं ते योग शिक्षक म्हणून सेवा करीत आहेत. सोलंकरवाडी येथे दैनंदिन योग वर्ग भरविला जातो. तर मोडनिंब  येथे साप्ताहिक सुदर्शन क्रिया मोफत घेतली जाते.


 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने तालुक्यातील 1000 शिक्षकांना योगविषयी मार्गदर्शन केले आहे. मुलांसाठी  सूर्यनमस्कार स्पर्धा, फिट इंडिया अंतर्गत तीन गावामध्ये सायकल रॅली काढून योग व आरोग्याविषयी जनजागृती केली . सातारा जिल्ह्यातील ‘सुदृढ रविवार’ या उपक्रमांतर्गत कोरोना कालावधीत मुलांना ऑनलाइन योग प्राणायाम व ध्यान शिकविले. तसेच रायगड जिल्ह्यातील मुलांनाही बालचेतना शिबिराद्वारे ऑनलाइन मार्गदर्शन केले आहे. तणावमुक्त शिक्षण, आपल्या मुलांना ओळखा, युवक नेतृत्व प्रशिक्षण, स्वास्थ्य शिबीर, आनंद अनुभूती शिबीर इत्यादि शिबिरांद्वारे नियमित मार्गदर्शन लोकांना करत आहेत. 


    चेस इन स्कूल व  तनिष्का चेस अकादमीच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील मुलांना बुद्धिबळ शिकवण्याचं कामही सातत्यानं ते करीत आहेत. 

      आज पर्यंत त्यांना मिळालेले पुरस्कार                  तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार पंचायत समिती कुर्डूवाडी, महात्मा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार ,लोकमंगल शिक्षक रत्न पुरस्कार, रोटरी क्लब आणि आयुर्वेद व्यासपीठाचा योग सेवा पुरस्कार. विविध पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले आहे.

Friday, 10 May 2024

30.कविता हिंगमिरे च्या चतु:सूत्रीने खंडाळी शाळेचा लौकिक

 शाळेतील सर्व शिक्षकांची शाळेबद्दल असणारी एकीची भावना , पालकांनी दिलेला मदतीचा प्रतिसाद, विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली शाळेविषयीची आवड , आणि आनंददायी पद्धतीनं सुरू असलेली गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार शिक्षणाकडची वाटचाल ही माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडाळी इथली शिक्षणाची चतु:सूत्री. विविध शैक्षणिक उपक्रमाच्या विश्वासावर, सहकारी शिक्षकांच्या मदतीनं शाळेचा पट 79 वरून 152 पर्यंत नेणाऱ्या इथल्या कविता धन्यकुमार हिंगमिरे मॅडम.

         शिक्षणसेवक म्हणून जि प शाळा चाहूरवस्ती ता.माळशिरस इथं त्यांच्या सेवेची सुरुवात झाली. जनसंपर्क वाढवून त्यांनी चौथीपर्यंतची शाळा सातवी पर्यंत नेली.पुढं कोरोना काळात जि प शाळा खंडाळी इथं चारही महिला शिक्षिकांनी शाळा आतून बाहेरून रंगवून चित्र, सुविचार, घोषवाक्य लिहून बोलक्या भिंती तयार केल्या .

 सुरुवातीचे सलग दहा वर्षे त्यांच्या सातवी स्कॉलरशिपचा निकाल शंभर टक्के असायचा. आजही शासकीय आणि खाजगी विविध संस्थांमार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धात्मक परीक्षेमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. विविध शैक्षणिक, सहशालेय , व सामाजिक उपक्रमाद्वारे त्या नवनवीन शैक्षणिक प्रयोग करतात. अध्ययन अध्यापनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांमध्ये नाविन्यता आणण्याचा प्रयत्न त्या करतात.शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करत त्यांचे स्वतःचे यूट्यूब चैनल देखील आहे. 

       विविध सामाजिक विषयांवर तसेच विविध सण व उत्सवाच्या निमित्तानं त्यांचे अनेक शैक्षणिक लेख व सांस्कृतिक लेख विविध वर्तमानपत्रांमधून, शैक्षणिक मासिकांमधून तसेच जीवन शिक्षणअंकामध्येही प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांच्या शब्दांची गोष्ट या उपक्रमाची बालभारतीच्या शिक्षण गाथा या विभागानं दखल घेतली आहे. मैत्री करू वाचनाशी या नवोपक्रमासाठी सर फाउंडेशनचा सर फाउंडेशन एज्युकेशनल इनोव्हेशन नॅशनल अवॉर्ड 2024 साठी त्यांची निवड झाली आहे.

        त्यांनी वर्ग स्तरावर कार्य करताना वेळोवेळी विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले आहे.विद्यार्थ्यांमध्ये ई लर्निंग ची गोडी वाढवली आहे. मी इंग्रजी वाचणारच,मैत्री करू वाचनाशी, शब्दांची गोष्ट, प्लास्टिक मुक्त गाव हे उपक्रम यशस्वीरीत्या सुरू आहेत. जलशक्ती अभियान, माझी वसुंधरा अभियान, घरघर तिरंगा अभियान, तंबाखू मुक्त शाळा अभियान, जागर योजनांचा अभियान, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष सक्रिय सहभाग ,लेट्स चेंज मध्ये स्वच्छता मॉनिटर म्हणून सक्रिय सहभाग, तालुक्यातील संपूर्ण विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अध्यापनाची कार्यशाळा या मध्येही त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यासाठी संवेदनशील शिक्षक या पुरस्कारानं त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. आर्ट ऑफ लिविंग कडून विद्यार्थ्यांसाठी बाल चेतना शिबिराचं आयोजन केलं , विद्यार्थ्यांना योगा, ध्यान प्राणायाम चे महत्त्व पटवून दिलं. प्रत्येक शनिवार हा गोष्टीचा शनिवार, आनंददायी शनिवार , मोबाईल स्मार्ट टीव्ही, संगणक, प्रोजेक्टर इत्यादी द्वारे अभ्यासक्रमातील संकल्पना स्पष्ट केल्या जातात.राज्यस्तरीय शिक्षक ध्येय डिजिटल साप्ताहिक मध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले असून संपादकीय मंडळामध्येही कविता मॅडम कार्यरत आहेत.

          त्यांच्या या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना आजपर्यंत विविध पुरस्कार मिळाले आहेत. राज्य प्राथमिक शिक्षक संघ यांचा सन्मान कर्तृत्वाचा सन्मान ,तंत्रस्नेहींचा संवेदनशील शिक्षक पुरस्कार , ओन्ली समाजसेवा बहुउद्देशीय संस्था बार्शी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार,अग्निपंख शैक्षणिक समूह महाराष्ट्र राज्यस्तरीय नवोपक्रमशील शिक्षक पुरस्कार , शिक्षक संघ शाखा माळशिरसचा संवेदनशील शिक्षिका पुरस्कार , पोलीस जाणीव सेवा संघ महाराष्ट्र राज्यस्तरीय कार्य गौरव पुरस्कार,पंचायत समिती माळशिरस तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार अशा विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे.

29.प्रतिभा नवले यांनी दिली गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संस्काराची जोड.......

 

       वाडी वस्तीवरील शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळेल का? याबाबत पालकांच्या मनामध्ये असणारी साशंकता दूर करत, शाळेविषयी त्यांच्यामध्ये निर्माण केलेली आपलेपणाची भावना! विविध स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी! त्यातून विद्यार्थ्यांना निर्माण झालेली शाळेविषयीची आवड!आणि तदनंतर सुरू झालेली गुणवत्ता पूर्ण आणि संस्कारक्षम शिक्षणाकडं वाटचाल! 'आजी -आजोबा' हा उपक्रम राज्याला माहिती करून देणाऱ्या माढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केदार वस्ती (उ. खु.) येथील शिक्षिका प्रतिभा सुभाष नवले .   


         रायगड जिल्ह्यातील सुधागड (पाली- बल्लाळेश्वर )येथून २००३ मध्ये शिक्षणसेवक म्हणून शिक्षण सेवेची त्यांची सुरुवात. बदली नंतर माढा नंबर १ आणि केदार वस्ती उपळाई खुर्द इथं आधुनिक काळाची गरज ओळखून त्यांनी सर्वप्रथम सेमी वर्गाची सुरुवात केली. त्यामुळं शाळेच्या पटसंख्येत लक्षणीय वाढ झाली. विविध स्पर्धा परीक्षा मंथन, टॅलेंट हंट, एटीएस ,आयटीएस, एमटीएस या सारख्या स्पर्धा परीक्षेला विद्यार्थी बसवून त्यांना राज्यस्तर गुणवत्ताधारक बनवले. चित्रकला स्पर्धा, कला साहित्य निर्मिती याची आवड असल्यानं नेहमी उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य निर्मिती,पोस्टर्स स्पर्धा, महिला दिनाच्या निमित्तानं अनेक वेळा त्या मार्गदर्शन करतात, आय एस ओ शाळा ,शाळासिद्धि 'अ' दर्जाची शाळा , लोकसहभाग याकरिता सक्रिय सहभाग .

           लोकसहभागातून इमारत दुरुस्ती, रंगरंगोटी, डिजिटल शाळा, मैदान सपाटीकरण इत्यादी कामं केली. एकही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही यासाठी विविध उपक्रम त्या आयोजित करतात. समृद्ध परिपाठ, दररोज सामान्य ज्ञान व त्यावर आधारित- स्पर्धा परीक्षा, सुंदर हस्ताक्षर उपक्रम, मी इंग्रजी वाचणार, प्लास्टिक मुक्त शाळा, करूया स्मरण लेखन, गोष्ट चार शब्दांची, प्रसंगानुरूप वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, आजचा दिनांक आजचा पाढा, डोळ्यांचे व्यायाम प्रकार, गोष्टींचा शनिवार, उपवास मोबाईलचा, तंबाखू मुक्त शाळा , केंद्रस्तरीय संमेलनात विविध शैक्षणिक विषयावर वेळोवेळी मार्गदर्शन, जागर योजनांचा, सेल्फी विथ सक्सेस, मी आणि माझे आजी -आजोबा हे उपक्रम यशस्वीरित्या राबवत आहेत. 

             विविध सामाजिक व शैक्षणिक विषयावर त्यांचे लेखन वर्तमानपत्रातून,तसेच शैक्षणिक मासिकातून प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांच्या उपक्रमाची सर फाउंडेशन एज्युकेशनल इनोवेशन नॅशनल अवॉर्ड 2023 साठी निवड झाली आहे.

         तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी मा. दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतील संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याकरता राबविलेला 'दशसूत्री उपक्रम'- अंतर्गत उत्कृष्ट कार्य त्यांनी केले आहे. त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये राबविलेला 'आजी -आजोबा' उपक्रम याची जिल्हास्तरावर प्रसिद्धी होऊन ,राज्य शासनाने या विषयावर स्वतंत्र परिपत्रक निर्गमित करून महाराष्ट्रभर 'आजी- आजोबा दिन' हा उपक्रम साजरा करण्याविषयी मार्गदर्शनपर सूचना दिल्या. सर्वांगीण गुणवत्तापूर्ण , संस्कारक्षम , आरोग्यसंपन्न विद्यार्थी घडविणं हा ध्यास मनाशी बाळगून त्या कार्यरत आहेत.

त्यांच्या या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना

विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

जिल्हा परिषद सोलापूर आदर्श शिक्षक पुरस्कार 

तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार पंचायत समिती कुर्डूवाडी

सर फाउंडेशन एज्युकेशनल इनोवेशन नॅशनल अवॉर्ड

मनोहर भाऊ डोंगरे शिक्षक पतसंस्था मोहोळ यांचेकडून जिल्हास्तरीय 'कर्तव्यदक्ष शिक्षक पुरस्कार'

छत्रपती परिवार मरवडे यांचे कडून जिल्हास्तरीय 'कृतीनिष्ठ शिक्षक' पुरस्कार

रोटरी क्लब माढा यांचेकडून 'नेशन बिल्डर अवॉर्ड' या सारख्या विविध पुरस्कारांचा समावेश आहे.

Saturday, 27 April 2024

28.गुणवत्तेचा ध्यास घेतलेले ध्येयवेढे शिक्षक नागनाथ घाटोळे

 ग्रामीण भागात वाडीवस्तीवरील बालकांना शाळेची गोडी लागावी आणि कोणतंही मुल शाळाबाह्य राहू नये यासाठी तत्कालीन सरकारनं वस्ती तिथं शाळा ही संकल्पना अंमलात आणली . आणि राज्यातील वस्त्या वस्त्यांवर अनेक सुशिक्षित तरुण यासाठी स्वयंसेवक म्हणून पुढं सरसावले. करकंब ता. पंढरपूर येथील लोकरेवस्तीवरील नागनाथ घाटुळे या ध्येयवेढ्या तरुणांनं ही अशीच एका झाडाखाली २००५ साली एक वस्तीशाळा सुरू केली. आसपासच्या वस्त्यांवरून मुलं जमवली.बघता बघता शाळेचा पट वाढला. झाडाखालून छपरामध्ये आणि छपरातून इमारतीत शाळेचा चढता आलेख सुरू झाला. आता एका प्रशस्त इमारतीत शाळेचं रूपांतर झालं. गुरुजींच्या आणि पालकांच्या मदतीनं इथं एक देखणी इमारत उभी राहिली. शाळा लांब म्हणून शाळा सोडणाऱ्या मुला मुलींना गुरुजी शाळेत आणलं . गावातून ही काही मुलं या शाळेत शिकायला येऊ लागली.पुढं वस्ती शाळेचं रूपांतर नियमित शाळेत झालं. 

          गुरुजींनी विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबवले. विद्यार्थ्यांना शाळेविषयी गोडी लागावी यासाठी शब्दाच्या बागेत ,शब्दाची फुले ,शब्दाचा डोंगर चढती मुले, दिनांक तो पाढा, जाणून घेऊ गणिताची भाषा ,अंक भाषा, बोटांची भाषा, कृतींची भाषा ,वस्तूची भाषा ,चित्र भाषा, ध्वनीची भाषा, शब्द तयार करू, वाचू आणि लिहू, बेरजेचा डोंगर यासारखे वाचन पूरक उपक्रम राबविले. शिवाय मातकाम, हस्ताक्षर स्पर्धा, रांगोळी , विद्यार्थी बचत बँक, उपस्थिती ध्वज, डान्सिंग कृतीयुक्त पाढे ,डॉ.अब्दुल कलाम वाचन कट्टा ,ज्ञानरचनावाद शैक्षणिक साहित्य, वृक्षारोपण, बागबगीचा यासारख्या उपक्रमामुळं विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत आणि गुणवत्तेत वाढ झाली.

        विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते सोबतच गुरुजींना लेखनाची ही आवड आहे. आज पर्यंत विविध विषयांवर जीवन शिक्षण, शिक्षण यात्री , जीवन गौरव,धडपड टिचर्स, यासारख्या विविध मासिकांसाठी त्यांनी लेखन केले आहे. सहकारी शिक्षक विनोद सावंत आणि घाटुळे गुरुजी यांचे बहुवर्ग अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांचे गटकार्य हे उपक्रम पाहण्यासाठी तत्कालीन विभागीय आयुक्त चौकलींगम साहेब, तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे साहेब अशा अनेक मान्यवरांनी शाळा भेटी दिल्या असून त्यांचे उपक्रम पाहून शाळेचं आणि शिक्षकांचही कौतुक केलं .

     महाराष्ट्रातील वाचन चळवळ या मुखपृष्ठावर लोकरे वस्ती शाळेचे विद्यार्थी चमकले. कबुलबुल स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्या मधील शेकोटी उपक्रमांमध्ये जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक व संचलन स्पर्धेत द्वितीय क्रमांक त्यांच्या विद्यार्थ्यांनी मिळवला.

   सर फाउंडेशन महाराष्ट्र यांच्यामार्फत घेत असलेल्या नवोपक्रम स्पर्धेत सलग तीन वर्ष त्यांना यश मिळाले आहे. तालुका आदर्श पुरस्कार, स्वच्छ शाळा सुंदर शाळा पुरस्कार, व राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार, शिक्षक रत्न पुरस्कार, साई समर्थ फाउंडेशन कोल्हापूर यासारख्या विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

Wednesday, 17 April 2024

27.विद्यार्थी हेच दैवत आणि काम हीच पूजा मानणाऱ्या शगुप्ता शेख

 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चंदननगर लांबोटी येथील शाळेत इ. १लीचा वर्ग स्वखर्चानं डिजिटल करत साहित्य निर्मितीतून विद्यार्थ्यांना लेखन वाचनाची आवड निर्माण करणाऱ्या आणि शासनामार्फत सुरू असलेल्या निपुण भारत अभियानांतर्गत निपुणोत्सव शैक्षणिक साहित्य निर्मितीत तालुक्यात उल्लेखनीय काम करणाऱ्या शगुप्ता लाल साहेब शेख.

       विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं विविध उपक्रम राबवणं आणि त्यांच्यामध्ये गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणणं यासाठीच सर्व शिक्षक धडपडत असतात आणि हेच त्यांचं ध्येय असतं. शेख मॅडम यांनी आजपर्यंत अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भिमनगर, प्राथमिक शाळा मोहळ नंबर चार

या ठिकाणी उल्लेखनीय काम केले आहे . मोहोळ शहरांतील खाजगी शाळा आणि इंग्रजी शाळा यांच्याशी स्पर्धा करत त्यांनी काळाची गरज ओळखून सर्वप्रथम पहिलीपासून सेमी इंग्रजीचा वर्ग सुरू केला. आणि शाळेचा पट वाढण्यास सुरुवात झाली.नुसता पट वाढवून चालणार नाही तर विद्यार्थी शाळेत यावेत रमावेत आणि टिकावेत यासाठी विविध उपक्रम घेत हसत खेळत आनंददायी पद्धतीनं आपलं अध्यापनाचे कार्य सुरू ठेवलं.

      "माझे विद्यार्थी सुदृढ विद्यार्थी " हा उपक्रम वर्गात व शाळेत राबवला. डायट वेळापूर कडून या उपक्रमाला जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक प्राप्त झाला . "जागतिक एड्स " दिनानिमित्त जागृती पर पथनाट्याद्वारे जनजागृती केली .प्लास्टिक मुक्ती अभियानात पर्यावरण वाचवू प्लास्टिक टाळू यावर पथनाट्या द्वारे जनजागृती केली. 'उपक्रमाचे 365 दिवस' या पुस्तकांमध्ये या पर्यावरणपूरक उपक्रमाची दखल घेण्यात आली .तसेच मतदान जनजागृती रॅलीमध्ये सक्रिय सहभाग घेतला . 

     माझी वसुंधरा अभियानात सक्रिय सहभाग घेतला. व्यक्तिमत्व विकास स्पर्धेत विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय निवड झाली आहे.दरवर्षी 26 जानेवारीला तहसील कार्यालय मोहोळ तर्फे घेण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थी सलग पाच वर्ष पहिल्या तीन मधील बक्षिसांचे मानकरी ठरले आहेत .विद्यार्थी हेच " माझे दैवत आणि काम हिच पूजा " या तत्त्वावर काम करत शिक्षकी पेशावर सदैव अभिमान बाळगत असल्याचे ते सांगतात .

     कोरोना काळात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या पारावरची शाळा , झाडाखालील शाळा , ऑनलाईन शाळा भरवत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही .तसेच कोरोनाविषयक जनजागृती व्हावी म्हणून " माझे कुटुंब माझी जबाबदारी " या विषयावर शॉर्ट फिल्म निर्मिती केली .'कृतीतून आनंद पद्धतीने शिक्षण' या उपक्रमाला सर फाउंडेशनचा राष्ट्रीय इनोवेशन अवॉर्ड मिळाला आहे .

          आयसीटीसी इंट्रोडक्शन टू कॉम्पिटिशनल थिंकिंग या उपक्रमांतर्गत त्यांनी आपले प्रकल्प उत्कृष्टरित्या सादर केले बद्दल शाळेला स्मार्ट टीव्ही बक्षीस मिळाला आहे.स्वतःचे यूट्यूब चैनल वरती शैक्षणिक व्हिडिओ, उपक्रमांचे व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी प्रसारित करत असतात. विविध वर्तमानपत्रात प्रासंगिक सामाजिक व शैक्षणिक लेख लिहिण्याची त्यांना आवड आहे . बी एड . एम ए एज्युकेशन पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे.

त्यांच्या या शैक्षणिक कार्याबद्दल आजपर्यंत त्यांना

मोहोळ तालुका पंचायत समितीतर्फे आदर्श शिक्षिका पुरस्कार

सर फाउंडेशन राष्ट्रीय इनोवेशन अवॉर्ड .

जिल्हा परिषद अल्पसंख्यांक अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र यांच्यातर्फे अल्पसंख्यांक गुणवंत कर्मचारी पुरस्कार 

मोहोळ नगरपरिषद मोहोळ 'माझी वसुंधरा 'अभियान व्हिडिओ ग्राफी अवॉर्ड

महाराष्ट्र सिने कला गौरव तर्फे उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

Wednesday, 3 April 2024

26.दिव्यांग विद्यार्थ्याला सुपरस्टार सिंगर बनवणारे शरणप्पा फुलारी गुरुजी

 दिव्यांग विद्यार्थ्याला सुपरस्टार सिंगर बनवणारे शरणप्पा फुलारी गुरुजी


        विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी दर वर्षी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या वतीने विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा घेतल्या जातात. कन्नड भाषेत वक्तृत्व,कथाकथन,बालनाट्य ,

समूहगीत गायन, लोकनृत्य आदी स्पर्धेत दर वर्षी शरणाप्पा फुलारी गुरुजी यांच्या मार्गदर्शना खाली केंद्र, बीट,तालुका आणि जिल्हा स्तरावर त्यांचे विद्यार्थी यश संपादन करतात . एवढचं नाही तर विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत खो खो ,कबड्डी,धावणे, रीले इत्यादी मध्ये जिल्हा स्तरावर त्यांच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. याशिवाय कर्मचारी क्रीडा स्पर्धेत खो,खो,क्रिकेट,व्हॉलीबॉल यासारख्या स्पर्धेत ही जिल्हास्तरीय अजिंक्य पद त्यांनी पटकावले असून यात फुलारी गुरुजी यांचा मोठा वाटा आहे. सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा नागणसूर ता. अक्कलकोट येथे कार्यरत आहेत

         सोलापूर जिल्ह्याचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारुड साहेब यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी गुणवत्ता शोध (टॅलेंट हंट स्पर्धा ) सुरू झाल्या.या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत असलेला एक दिव्यांग विद्यार्थी चमकला.कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्याच्या सीमावर्ती वसलेल्या तोळणूर सारख्या एका छोट्याशा गावातून डोळ्यानं जन्मजात अंध असलेला दिव्यांग विद्यार्थी रेवणसिद्ध फुलारी .. हाताला मिळालेलं प्लास्टिक, घागर,बकेट,टोपली वाजवत संगीत वाद्य प्रकारात आपली कला दाखवत गेला. तबला वादन,हार्मोनियम वादन,कशियो, ड्रम,वाजवत संगीत क्षेत्रात त्यानं पाऊल ठेवत गायनाची प्रॅक्टिस सुरू केली . प्रत्येक वर्षी विविध स्पर्धेत गुरुजींच्या सहकार्यान तो यश मिळवत गेला. कर्नाटक राज्यातील नंबर वन सिंगिंग रियालिटी शो असलेल्या झी कन्नड वाहिनीवरील सारेगमप लिट्ल चॅम्प्स सीजन 19 च्या शो मध्ये सहभाग घेवून मेगा ऑडिशन मध्ये यश संपादन करून सहा महिने चाललेल्या या स्पर्धेत फायनल पर्यंत मजल मारून थर्ड रनर अप झालेला महाराष्ट्र राज्यातील पहिला दिव्यांग विद्यार्थी ठरला. असून त्याला संपूर्ण मार्गदर्शन शरणप्पा गुरुजी यांनी केलं आहे . 

      प्राथमिक शाळेत मुलं शिकत असताना त्यांच्यामध्ये असलेले वेगवेगळे गुण हेरून त्यांच्या गुणांना चालना देणं हे खरंतर शिक्षकांचं काम असतं. ते काम अगदी प्रामाणिकपणे फुलारी गुरुजींनी केलेलं इथं दिसून येतं.

 

यासोबतच आजपर्यंत त्यांनी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये खूप उत्कृष्टपणे काम केलेलं आहे. यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुली शाळा नागणसुर,तोळणुर,जकापुर, बबलाद आणि नागणसुर कन्नड मुली शाळा लोकसहभागातून शाळा समृद्ध करून डिजिटल स्मार्ट शाळा, ई लर्निंग टॅब शाळा सुरू करणारे जिल्ह्यातील एकमेव कन्नड शिक्षक. शिष्यवृत्तीसाठी त्यांचा खूप मोठं योगदान आहे.आतापर्यंत त्यांच्या 55 विद्यार्थ्यांची पूर्वमाध्यमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती गुणवत्ता धारक विद्यार्थी म्हणून निवड झाली आहे . तर एका विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे.

शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आला आहे त्यामध्ये

तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुरस्कार

राज्यस्तरीय नवोपक्रमशिल शिक्षक पुरस्कार

राष्ट्रीय नवोपक्रमशिल शिक्षक पुरस्कार

 सर फाउंडेशन राष्ट्रीय नवोपक्रम शिल शिक्षक पुरस्कार

7 स्किल राष्ट्रीय पुरस्कार गुजरात

आतापर्यंत 24 वर्षाच्या शैक्षणिक कार्यात महत्वाचे जिल्हा,राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील 65 पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

Wednesday, 27 March 2024

25.जाईल तिथं खेळाडू घडवणारे भारती गुरुजी

 उजनी धरण पट्ट्यातील करमाळा तालुक्यापासून 35 किलोमीटर अंतरावरची छोटीशी नरसोबाची वाडी. सर्वत्र बागायत, ऊसाची शेती रस्त्याची उणीव. शिक्षणाची मात्र सर्वांनाच गोडी.कमीच पटसंख्या असणारी पण क्रीडा स्पर्धेसाठी जिद्दीला पेटलेली इथली शाळा ,विद्यार्थी, पालक आणि शिक्षक महदेव भारती गुरुजी .ध्येय समोर ठेऊन कार्य करण्याची पहिल्यापासूनच आवड. संधी असणाऱ्या क्षेत्रात आणि संधी मिळालेल्या ठिकाणी काम करण्याची मजा वेगळीच असते असं त्यांना वाटतं.

     सुरवातीला जेमतेम वीस पट असणाऱ्या शाळेतील गुरुजींनी पालक संपर्क वाढवत गाव आणि शाळा एकत्र आणली. गावामध्ये शाळेविषयी गोडी निर्माण केली. खूप मोठ्या प्रमाणात लोकसहभाग गोळा केला. शाळा आयएसओ मानांकन दर्जाची झाली. हळूहळू पालकांचा शिक्षकांवर आणि शाळेवर विश्वास बसला. सोबतीला पाटील गुरुजी होतेच. खूप मोलाची साथ त्यांनी दिली. वेगवेगळे शैक्षणिक उपक्रम, स्पर्धात्मक तयारी,शिक्षणाला खेळाची नाविन्यपूर्ण जोड,विद्यार्थी सर्वांगीण विकास पूरक कार्यक्रम राबवित शाळेने ५२ पटापर्यंत मजल मारली.

         आपला ग्रामीण भागातील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागं राहू नये ही ओढ कायम मनात ठेवत जिल्हा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या खेळांच्या स्पर्धेत शाळेनं भाग घेतला.अपुरं मैदान,मैदानावर आवश्यक असणाऱ्या सोयींची कमतरता .पट संख्या कमी मुलींचा पट तर अवघा १३ अशाही परिस्थितीत शिक्षक अन मुलांच्या जिद्द व चिकाटीनं खो खो क्रीडा प्रकारात शाळेच्या संघांन जिल्हा उपविजयी अन सलग दोन वेळा जिल्हास्तरीय विजेतेपद पटकावित छोट्या शाळेचं नाव जिल्ह्यात चमकवलं . छोटसं मैदान एक पोल गेटच्या बाहेर, माफक जागा पण विद्यार्थ्यांनी दाखवलेलं खेळातलं कसब. दिवस रात्र सराव घेण्याची शिक्षकांची धडपड.. जेष्ठ कवी गुरु ठाकूर एके ठिकाणी म्हणतात, 'असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर' अगदी तसच आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात करायची सवय गुरुजींनाही लागलेली . शाळेला भरपूर पटसंख्या आणि भल्या मोठ्या मैदानाची गरज नसते तर तिथे असते अशा जिद्द आणि चिकाटी धारण केलेल्या महादेव भारती सारख्या शिक्षकाची.

       आपली खेळातली आवड जोपासत श्री भारती गुरुजी यांनी गुरू स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मुलांच्या खेळांच्या कौशल्यास चालना दिली.धावणे,भालाफेक,गोळाफेक, लांब उडी,खो खो,कबड्डी या खेळांचं मोफत मार्गदर्शन सुरू केलं.मुलांमध्ये शून्यातून विश्व निर्माण करण्याची धडपड जोमानं सुरू झाली.यातूनच नुकत्याच १४ वर्षे वयोगटातून डेरवण,सिंधुदुर्ग येथे झालेल्या सब ज्युनिअर खेळात साक्षी आरकिले हिनं राज्यात तिसरा क्रमांक ,तर १२ वर्षे वयोगटातून सोलापूर येथे झालेल्या स्पर्धेत अंतरा आरकिले व जान्हवी पाबळे हिने प्रथम व तृतीय क्रमांक पटकावला. १० वर्षे वयोगटातून सांगली येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय गोळाफेक स्पर्धेत चैतन्य मोरे याने प्रथम क्रमांक पटकावला.

        यासोबतच बदली होऊन नव्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. मंगवडेवस्ती शाळेतील मुलांनी सुद्धा कबड्डी स्पर्धेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला.जाईल तिथं खेळात मुलं घडवनं गे गुरुजींचं कामचं   

           तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

सर फौंडेशनचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षण परिषेदेचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

विविध पतसंस्थानी तालुकास्तरीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला आहे .

Friday, 22 March 2024

24.इंग्रजीच्या प्रभुत्व संपादनाचा अध्यापनात वापर करणारी विद्यार्थी प्रिय शिक्षिका माधुरी भोसले

 

      

केवळ घेतलेल्या शिक्षणावरच आणि मिळालेल्या नोकरीवरच समाधान न मानता चूल ,मूल ,सासर आणि माहेर यासोबतच सर्व नातेसंबंध जपत शाळेतील विद्यार्थ्यांकडं दुर्लक्ष न होऊ देता आपलं पीएचडी पर्यंतचं शिक्षण पूर्ण करणं हे नक्कीच महिलांसाठी तरी सोपं नाही.

         इंग्रजी सारख्या विषयात डॉक्टरेट व सिनियर कॉलेजला लेक्चरर होण्या साठी लागणारी सेट परीक्षा क्वालिफाय असणाऱ्या उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथील श्रीमती माधुरी भोसले या विज्ञान विषय शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत.

               भोसले मॅडम या उत्तम कवयित्री, लेखिका, अनुवादक व सूत्रसंचालक म्हणूनही सुपरिचित आहेत. कला, साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांना आवड आहे, नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमात नियोजन समिती मधील त्यांचं सक्रिय योगदान सर्वपरिचित आहे.  

        ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून शिक्षक म्हणून सामाजिक बांधिलकी जपत सातत्यानं त्या नवनवीन उपक्रम राबवित असतात. नवोदय ,शिष्यवृत्ती यासारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांचे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक व नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरले आहेत. 

          व्हर्चुअल फील्ड ट्रिप, ई लर्निंग चा अध्यापनात वापर, शैक्षणिक साहित्य निर्मिती, वृक्षारोपण, स्नेहसंमेलने, शालेय क्रीडा स्पर्धा यासारखे उपक्रम शालेय स्तरावर राबवून विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास त्या साधत असतात. 

    त्यांनी शाळेला बालाजी अमाईन्स, प्रीसिजन यासारख्या कंपन्यांच्या सी एस आर फंडातून, अथवा लोकसहभागातून निधी उपलब्ध करून शाळेला भौतिक सुविधा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे. मार्डी शाळेत त्यांनी जवळपास चार ते पाच लाखाचा निधी लोकसहभागातून प्राप्त करून गावकऱ्यांच्या व शिक्षकांच्या मदतीनं शालेय परिसरात बदल घडवून आणला आहे. आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेसाठी त्यांनी मान्यवर परीक्षकांसोबत परीक्षणाचं काम केलं आहे. मासिक पाळी सारख्या विषयावरही त्या किशोरवयीन मुलींना प्रबोधन करतात. विद्यार्थी संगणक साक्षर व्हावेतयासाठी त्या प्रयत्नशील असतात. कोविड-19 च्या काळात सोलापूर जिल्हा परिषद ने सुरु केलेल्या युट्युब चॅनल साठी व्हिडिओ निर्मितीमध्ये त्यांचं मोठं योगदान होतं. त्यासाठी त्यांना जिल्हा परिषदनं कोविडवाॅरीयर म्हणून सन्मानित केलं होतं.      

            विद्यार्थ्यांमध्ये सॉफ्ट स्किल्स वाढवण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. क्रिएटिव्ह थिंकिंग साठी त्यांनी विद्यार्थ्यांकरता काव्यलेखन शिबीर आयोजित केलं .यामधूनच विद्यार्थ्यांमध्ये काव्य लेखनाची आवड निर्माण झाली. लेट्स स्पीक इंग्लिश उपक्रमामुळं विद्यार्थ्यांची इंग्रजी भाषेबद्दलची भीती दूर होऊन त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. त्यांचे अनेक विद्यार्थी देशातील नामांकित संस्थांमध्ये व परदेशातही उच्च शिक्षण घेऊन उच्चविद्याविभूषित झाले आहेत. जेव्हा हे विद्यार्थी 

 मॅडम यु आर द बेस्ट टीचर असं त्यांच्या तोंडून जेव्हा ऐकायला मिळतं. तो क्षण त्यांच्या आयुष्यातील परमोच्च आनंदाचा क्षण असतो. कुठल्याही पुरस्कारापेक्षा श्रेष्ठ पुरस्कार मिळाला असं त्यावेळी त्यांना वाटतं.    

     विद्यार्थ्यांना अध्ययनाला प्रवृत्त करत करत राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर त्यां रिसोर्स पर्सन म्हणून उत्तम कामगिरी करतात. जिल्हास्तरावर शिष्यवृत्ती मार्गदर्शक म्हणून ही त्यांचं योगदान आहे. 

इंग्लिश लँग्वेज इन्हान्समेंट प्रोग्रॅम साठी महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट आणि ब्रिटिश कौन्सिल कडून राबवल्या गेलेल्या तेजस प्रोजेक्ट साठी सतत तीन वर्ष कोऑर्डीनेटर म्हणून काम केलं. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनाही प्रशिक्षण देऊन इंग्रजी भाषेबद्दल असणारी भीती दूर करून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण केला.      

        या प्रोजेक्टच्या एंड अप प्रोग्रॅम करिता तत्कालीन शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड मॅडम यांच्यासमोर प्रेझेंटेशन साठी महाराष्ट्रातून निवडलेल्या पाच कोऑर्डिनेटर मध्ये त्यांचाही समावेश होता. रिजनल अकॅडमी औरंगाबाद(RAA) यांनी राबवलेल्या स्पोकन इंग्लिश प्रोग्रॅम करिता ट्रेनर म्हणूनही त्यांनी जवळपास शंभरहून अधिक शिक्षकांना प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या इंग्रजी विषयातील योगदानाबद्दल त्या राज्यस्तरावर द बेस्ट इंग्लिश टीचर म्हणून परिचित आहेत. इंग्लिश लँग्वेज ऑनलाइन वेबिनारसाठीही त्यांनी होस्ट म्हणून उत्कृष्ट अँकरिंग केलं आहे .

 त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये इंग्रजी विषयातील अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. नॅशनल व इंटरनॅशनल कॉन्फरन्सस मध्येही पेपर प्रेझेंटेशन साठी त्यांची निवड झाली आहे. त्यांचे कल्चर व आयडेंटिटी हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.

 विविध वर्तमानपत्रातून त्यांच्या कथा, कविता तसेच मोटिवेशनल लेख विशेष करून युवा वर्गासाठी प्रकाशित होत असतात.

          इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनाही व्याख्यानातून त्या इंग्रजी विषयाबाबत मार्गदर्शन करतात. त्या महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा जुळे सोलापूरच्या कार्यकारणी सदस्य ही आहेत

 ज्या ज्या ठिकाणी मॅडमची सेवा झाली त्या त्या गावातील त्यांचा विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात त्यांच्याशी जोडला जातो. एक विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. 

         राज्यातील उच्चविद्याविभूषित शिक्षकांना प्रशासनात सहभागी करून घ्यावं असं त्यांना वाटलं . त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना विविध राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. यामध्ये


डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचा राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार

 अपूर्वा अभिमीत ज्ञानपीठ राज्यस्तरीय पुरस्कार

सोलापूर जिल्हा परिषदेचा शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुरस्कार

सर फाउंडेशन चा जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार

छत्रपती परिवार मरवडेंचा कृतीनिष्ठ शिक्षक पुरस्कार

पंचायत समिती उत्तर सोलापूरचा आदर्श शिक्षक पुरस्कार. अशा विविध पुरस्कारांचा समावेश आहे.

Wednesday, 13 March 2024

23.गावाला शाळेचा अभिमान आणि शाळेला गावाचा आधार असं म्हणत ललिता मोरे मॅडम यांची शाळा राज्यात तिसरी

 गावाला शाळेचा अभिमान आणि शाळेला गावाचा आधार असं म्हणत ललिता मोरे मॅडम यांची शाळा राज्यात तिसरी

        प्रति महाबळेश्वर म्हणून ज्या गावाचा उल्लेख केला जातो असे निसर्गाच्या कुशीत वसलेले , अध्यात्माच्या वाटेवरील कृषी पर्यटन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर तालुक्यात असणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचणी. सातारा जिल्ह्यातून विस्थापित होऊन पुनर्वसन झालेल्या चिंचणी या छोट्याशा गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आज राज्याच्या नकाशावर मोठया दिमाखानं झळकत आहे. ही शाळा पाहण्यासाठी राज्यभरातून लोक इथं येतात. तेव्हा त्याच्या तोंडी रविंद्रनाथ टागोर यांच्या "शांतीनिकेतन" शाळेची आठवण झाल्याचे सहज उद्गार बाहेर पडतात. गावच्या विकासाबरोबरच शाळेचा विकासही व्हावा या ध्येयानं झपाटून गावकर्‍यांच्या मदतीनं शाळेमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ललिता सौदागर मोरे.

            शाळेची पटसंख्या वाढवणं आणि ती टिकवून ठेवणं हे पहिलं काम त्यांनी हाती घेतलं. आसपास पसरलेलं खाजगी शाळांचं जाळं पालकांचा इंग्रजी शाळेकडं असणारा ओढा ही मोठी संकट पार करत त्यांनी आपल्या सहकारी शिक्षकांच्या मदतीनं काम सुरू केलं. यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन केलं . शाळा प्रवेशोत्सव, आषाढी वारी उपक्रम, विविध सण थोर व्यक्तींची जयंती, विविध स्पर्धा स्नेहसंमेलन इत्यादी कार्यक्रमाचं आयोजन करून पालकांना शाळेत आणलं. विद्यार्थ्यांसोबतच पालकांना आपल्याच मराठी शाळेची गोडी लावली. व्यवहार ज्ञान वाढवण्यासाठी बाजार डे, बँक भेट, परिसर भेट हे उपक्रम दरवर्षी सुरु केले. तसेच विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी म्हणून गेल्या चार वर्षापासून विद्यार्थी' बचत बँक' हा उपक्रम हाती घेतला. बचत बँकेचं कामकाज शाळेतील विद्यार्थ्याकडेच दिलं जातं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी व त्यांच्यावर संस्कार व्हावे यासाठी दर 'वर्षी स्मार्ट गर्ल व स्मार्ट बॉय' निवडून त्याला योग्य ते बक्षीस दिलं जातं. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी घेतली जाते. शाळा जरी द्विशिक्षकी असली तरी सर्व भौतिक सुविधांनी परिपूर्ण आहे. शाळेतील शिक्षकांनी शैक्षणिक उठावातून दोन संगणकसंच, दोन एलईडी संच, प्रोजेक्टर मिळवले आहेत. लोकसहभागातून जवळपास पाच लाखांचं काम शाळेमध्ये केलं आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी टॅब उपलब्ध असून पहिलीची मुले सुद्धा टॅबवर अभ्यास करतात. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आव्हाळे मॅडम यांनी सुद्धा या गोष्टीची दखल घेतली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा कौशल्याधिष्ठित अभ्यास पूरक असणाऱ्या विविध प्रकारच्या लघु उद्योगांना भेटी देण्याचं आयोजन केलं जातं. 

      शाळेला भेट देणाऱ्या मोठमोठ्या पाहुण्यांना सुद्धा अगदी पहिलीतील मुलं सुद्धा बिनधास्तपणे संवाद साधतात. राष्ट्रीय सणांच्या दिवशी शाळेतील सर्वच मुले धीटपणे भाषण करतात. शाळेतील विद्यार्थी चित्रकला, कथाकथन, व वक्तृत्व स्पर्धेत चमकत आहेत. विद्यार्थ्यांचा वाढदिवस शाळेतच साजरा केला जातो. व याप्रसंगी शाळेला लागणारं साहित्य विद्यार्थ्यांच्या पालकाकडून विद्यार्थ्यांना वाटप केलं जातं. अशा प्रकारे लोकसहभागातून शैक्षणिक उठावातून शाळेमध्ये , भौतिक सुविधात वाढ करून एखाद्या खाजगी शाळेप्रमाणं ही जिल्हा परिषदेची शाळा उभी केली. कोरोना काळा सुद्धा "पारावरची शाळा" या उपक्रमाद्वारे मॅडम सह इतर शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना अध्यापन केलं. गावकऱ्यांच्या सहकार्यानं शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीनं शाळेसमोर लाल मातीचं मैदान तयार करणं, पेवर ब्लॉक टाकणं, डिजिटल वर्ग खोल्या तयार करणं, ही सर्व कामं शाळेतील शिक्षक श्री जालिंदर गोरख गायकवाड गुरुजी व गावातील शिक्षण प्रेमी श्री. मोहन दादा अनपट,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सावंत व त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थांनी मोलाची मदत केली.

      शाळेमध्ये आकर्षक रंगरंगोटी केली. शाळेनं दोन वर्षापूर्वी घेतलेल्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानात द्विशिक्षकी गटात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. असून राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व तत्कालीन पालकमंत्री मा. दत्तात्रय भरणेमामा यांच्या हस्ते शाळेचा मंत्रालयात सत्कार झाला. 

         तसेच वर्षी राज्यस्तरावर आयोजित करण्यात आलेल्या *"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" स्पर्धेत पुणे विभागात तृतीय क्रमांक प्राप्त झालेला असून अकरा लाखाचे बक्षीस प्राप्त झाले आहे*. 'गाव करी ते राव काय करी' या उक्तीप्रमाणं शिक्षक व गावकरी यांनी एकत्र येऊन काम केलं तर शाळेची व गावाची प्रगती कशी होऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचणी . जसा मुख्याध्यापक तशी शाळा हे श्रीमती लता मोरे मॅडम यांनी सर्व गावकरी आणि शिक्षकांच्या मदतीनं सिद्ध करून दाखवलं.

Wednesday, 6 March 2024

22. दोनशेहून अधिक व्यक्तिमत्त्वांचा ऑटोग्राफ घेणारा छंदवेडा शिक्षक रवींद्र देबडवार

 दोनशेहून अधिक व्यक्तिमत्त्वांचा ऑटोग्राफ घेणारा छंदवेडा शिक्षक रवींद्र देबडवार


       'हा छंद जीवाला लावी पिसे' प्रसिद्ध गीतकार वंदना विटणकर यांचं हे सुंदर गीत! ऐकलं की वाटतं, खरंच माणसाला छंद वेड लावतो. आपलं वय विसरायला लावतो आणि अशा विविध छंदातच माणसाला आनंदी जगण्याचा मार्ग गवसतो. काव्य लेखन, काव्यवाचन, योगाभ्यास, कला आणि नाट्याभिनय यासोबतच नामवंत व्यक्तिमत्त्वाचा ऑटोग्राफ घेणं हा छंद जडलाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटफळ येथील रवींद्र देबडवार गुरुजी यांना!

          हेमा मालिनी,जॅकी श्रॉफ, मोहन जोशी, जब्बार पटेल, वर्षा उसगावकर, जयश्री गडकर, मच्छिंद्र कांबळी, विक्रम गोखले, द.मा मिरासदार, गणपतराव देशमुख, प्रशांत दामले, मकरंद अनासपुरे, गजेंद्र अहिरे, चंद्रकांत कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, आसावरी देशपांडे, सुशांत शेलार, मयूर वैद्य, अशोक शिंदे, अशोक सराफ, राहुल देशपांडे, अशी भली मोठी यादी दोनशेच्या पार जाते. यामध्ये मराठी व हिंदी,चित्रपट कलावंत,गायक,वादक,

किर्तनकार,नाटक कलावंत,लेखक कवी,राजकीय,सामाजिक व्यक्तीमत्वांचा समावेश आहे.अशी प्रत्येक व्यक्तिमत्वं जाणून घ्यावीत, यातून प्रत्येकाकडूनच काहीतरी शिकत जावं हा संदेश ते आपल्या विद्यार्थ्यांना देत असतात. याशिवाय जाणता राजा या महानाट्यात,संत नामदेव या मालिकेत तसेच अनेक पथनाट्यांमधून त्यांनी आपली कला जोपासली आहे.

             ते उत्तम योग शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच योग आणि प्राणायाम यांचं महत्त्व कळावं यासाठी दर शनिवारी योगाचा तास घेतात. व्यायाम,ध्यानधारणा,प्राणायाम,बैठे,खडे,दंड स्थितीतील योगप्रकार,झुम्बा, अँरोबिक्स,हास्य योग,टाळीयोग, सूर्यनमस्कार असे पन्नास पेक्षा जास्त योगासने त्यांचे विद्यार्थी करतात.अशा विविध कौशल्यपूर्ण व मनोरंजक पद्धतीमुळं मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास साधण्याचा ते प्रयत्न करतात.

           याशिवाय लेखक आपल्या भेटीला,शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरे,शैक्षणिक साहित्य निर्मिती,ओरीगामी कला,स्पर्धा परीक्षा,ऐतिहासिक कथाकथन,कथावाचन,कविता वाचन,संस्कृत पठन - वाचन,पत्रलेखन,विरांना सलाम अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना वाचते,बोलते,लिहिते करत कृतीशील बनवत आहेत.उत्कृष्ट सुत्रसंचलन,फलकलेखन,चित्रकला ,हिरव्या पालेभाज्या खाणे,प्लास्टीक डबामुक्ती,पैसे बचत,हरवले-सापडले,माझा वाढदिवस,तथास्तु,अशा छोट्या छोट्या उपक्रमांतुन जीवन कौशल्य ,संस्कार,नितीमुल्ये देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. इंग्रजी माध्यमाकडचा विद्यार्थ्यांचा ओढा कमी होऊन जि.प.शाळेत मुले दाखल झाली पाहिजेत यासाठी ते सतत प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.यासाठी शाळेतील सर्व शिक्षक सहकार्यांची मदत मिळत आसल्याचेही ते सांगतात.

        

त्यांच्या या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना

कोळेगावचा आदर्श शिक्षक पुरस्कार,दिपकआबा साळुंखे शिक्षक सहकारी पतसंस्थेचा उपक्रमशिल शिक्षक पुरस्कार,शिक्षक ध्येयचा कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार इ. पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

Sunday, 3 March 2024

21.शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यामध्ये सामाजिक जाणीवा निर्माण करणारे अनगरचे पी.बी. शिंदे सर.

  



विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बौद्धिक, शारीरिक, मानसिक विकासाची जशी गरज असते तशाच सामाजिक जाणीव त्याच्यामध्ये विकसित व्हायला हव्यात यासाठी स्काऊट गाईड, कब बुलबुल, यासारखे शाळा शाळांमध्ये उपक्रम आयोजित केले जातात. श्री शिंदे सरांनी

कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अनगर येथे राष्ट्रीय सेवा योजना मध्ये खूप मोठे काम केले आहे. गेले पंचवीस वर्षे उच्च माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर श्रमाचे संस्कार करण्याचे काम अखंडपणे सुरू ठेवले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना जागृत करुन त्या भावनेतून विद्यार्थी मनोभावे सामाजिक कार्य करताना दिसून येतात. 

       या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, पाणी आडवा पाणी जिरवा, स्वच्छ भारत अभियान, मुली वाचवा अभियान, प्लास्टिक मुक्त गाव योजना, व्यसनमुक्ती चळवळ, हागणदारीमुक्त गाव योजना, मतदार जागृती अभियान, एक पद एक वृक्ष इत्यादी सामाजिक जनजागृतीचे कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत आयोजित केले जातात.

         विद्यार्थी मनोभावे यामध्ये सहभागी होतात. विद्यार्थ्याच्या मनावर श्रमाचे संस्कार व्हावेत यासाठी दरवर्षी एक गाव दत्तक घेऊन तेथे सात दिवसाचे श्रमसंस्कार शिबीर आयोजित केले जाते. या काळात गावामध्ये वरील सर्व सामाजिक उपक्रम राबविले जातात. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत. नुकताच सुनील लोंढे नावाच्या विद्यार्थ्यांला पुणे विभाग स्तरावरील उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून पुरस्कार मिळाला आहे हेच राष्ट्रीय सेवा योजनेचे यश म्हणावे लागेल.

        आजपर्यंत शालेय परिसरात दोन हजार पेक्षा जास्त झाडाचे रोपण करून संपूर्ण झाडे जगवली. त्यामुळे शाळेला "हरित शाळा" पुरस्कार मिळाला. दत्तक गावामध्ये संपूर्ण वृक्षारोपण करून तेथील लोकांमध्ये झाडाबद्दल प्रेम निर्माण केले. अंजनगाव (खे.) ता. माढा या ठिकाणी शिबीर कालावधीत चाळीस लाख लिटर क्षमतेचा वनराई बंधारा बांधून गावाची उन्हाळ्यातील पाण्याची समस्या दूर केली. गेल्या वर्षी कुंभेज ता. माढा या ठिकाणी शिबीर काळात "चला जाणून घेऊया नदीला" या मोहिमेअंतर्गत नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले व सीना नदीपात्र स्वच्छ करण्यात आले. कोरोना काळात मास्क, सानीटायझर वाटप, संपूर्ण लसीकरण मोहीम राबविण्यात आली. कालच्या दिवाळी सुट्टीला जाण्याअगोदर तीन हजार विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथपत्र भरून दिली. नुकत्याच संपलेल्या नव मतदार नोंदणी अभियानामध्ये उच्च माध्यमिक स्तरावर अठरा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नवमतदार म्हणून नोंद केली. केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल मोहोळचे तहसीलदार मा. श्री. सचिन मुळीक यांनी सन्मानपत्र देऊन गौरव केला. मुख्यमंत्री-माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान संपूर्ण राज्यांमध्ये सुरू आहे. या अभियानात शाळा तालुक्यात पहिल्या क्रमांकाने यशस्वी झाली व तालुकास्तरावरचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस जिंकले. या सर्व कामांमध्ये शाळेतील प्रत्येक मानवी घटकाचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे सहभाग असतो तेव्हाच हे शक्य होते. हे सर्व काम विद्यार्थी मनोभावे करतात व कामाचा आनंद लुटतात. मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. त्या ऊर्जेला योग्य वळण दिले म्हणजे विद्यार्थ्याच्या व्यक्तीत्त्वाचा विकास होण्यास मदत होते. हे सर्व शक्य झाले ते केवळ येथील मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. चंद्रकांत ढोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामामुळेच. शासन स्तरावर केलेल्या कार्याची दखल घेऊन नुकताच शिंदे यांना शिक्षण संचालनालय, पुणे विभाग पुणे यांचे कडून "उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी" हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू इन्स्टिटय़ूट ऑफ बिझनेस अ‍ॅडमिनीस्ट्रेशन या संस्थेने "दिनकर मास्तर सर्जनशील शिक्षक पुरस्कार" देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच संस्थेनेही "प्रज्ञावान वर्गशिक्षक" पुरस्कार देऊन गौरव केला. हे सर्व करत असताना विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आमूलाग्र बदल होत आहे,आणि हाच माझ्यासाठी सर्वोत्तम पुरस्कार मी मानतो.असे श्री. शिंदे म्हणतात.

Wednesday, 21 February 2024

20.सावता माळी विद्यालयाचे अष्टपैलू कलाशिक्षक सावता घाडगे

 सावता माळी विद्यालयाचे अष्टपैलू कलाशिक्षक सावता घाडगे


       धन्य ते अरण रत्नाची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरण मध्ये एका वरचढ एक अशी व्यक्तिमत्वं  आपल्याला विविध क्षेत्रात पहावयास मिळतील. त्यामध्ये शिक्षणक्षेत्र तर अव्वलच! उत्तम क्रिकेटपटू, यशस्वी कलाशिक्षक, देशपातळीपर्यंत धनुर्विद्या पोहोचवणारे सामाजिक, शैक्षणिक आणि कला  क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणारे संत सावतामाळी विद्यालयाचे कला, क्रीडा शिक्षक सावता घाडगे सर.

         खरं तर कलाशिक्षक म्हणून नेमणूक असतानाही अंगामधला खेळाडू जिवंत ठेवत  गेल्या बारा वर्षात धनुर्विद्या खेळात 34 राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत.150 पेक्षा जास्त खेळाडूंनी धनुर्विद्या क्रीडा प्रकारात उज्वल कामगिरी केलेली आहे. कला व क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना घडवून  त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचं काम त्यांच्याकडून सतत घडतं आहे.विद्यालयातील अध्यापनाचं काम पूर्ण करून शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त विद्यालयाच्या मैदानावर वर्षभर धनुर्विद्या खेळाचा सराव नियमितपणे ते घेतात. सर्व खेळाडूंना धनुर्विद्या खेळाचं प्रशिक्षण मोफत दिलं जातं. 

       महाराष्ट्र राज्य कला संचलनालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या ग्रेड परीक्षेमध्ये  अ श्रेणी व ब श्रेणी मध्ये आज पर्यंत शेकडो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

 विद्यालयात रांगोळी,सुंदर हस्ताक्षर, चित्रकला व विविध प्रदर्शने यासारख्या उपक्रमांचे यशस्वी आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य ते करत असतात.  सकाळ बालमित्र चित्रकला स्पर्धेचे विद्यालयामध्ये ते केंद्र चालवितात . शासनाच्या चित्रकला ग्रेड परीक्षेचे परीक्षक म्हणून पुणे येथेही त्यांनी काम केले आहे.

 ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्यासाठी विद्यालयात  सुसज्ज अशी कॉम्प्युटर लॅब तयार केली आहे.  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यार्थ्यांची संवाद साधण्यासाठी विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.राज्यस्तरीय सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण घेऊन संधी,क्षमता, आवड यातून विद्यार्थ्यांनी आपलं करिअर कसं घडवावं याविषयी ते मार्गदर्शन करतात. किशोरवयीन विद्यार्थ्यांना समुपदेशन करून व्यक्तिमत्व विकास घडवतात. एन. एम.एम. एस व एन. टी. एस परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ते करतात.

         विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक दृष्ट्या कणखर बनवण्यासाठी विशेष प्रयत्न ते करतात. आज पर्यंत त्यांच्या चारशे विद्यार्थ्यांना चित्रकला व क्रीडा प्रकारात सवलतीच्या गुणांचा फायदा मिळाला आहे.  खेळाडू आरक्षणातून अनेक विद्यार्थ्यांना शासकीय सेवेचा लाभ मिळाला आहे.


      घाडगे सर यांची महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघाचे प्रशिक्षक म्हणून पाच वेळा नियुक्ती झालीआहे. धनुर्विद्या मार्गदर्शक(NSNIS), कोच लेवल १ पंच परीक्षा लेवल१, ऍडव्हान्स लेवल कोचिंग अशी प्रशिक्षणे पूर्ण करून विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण ते देतात.

          अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या  खेलो इंडिया स्पर्धेत धनुर्विद्या खेळातील सोलापूर जिल्ह्याला पहिले पदक घाडगे सरांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले आहे. ट्रेन द ट्रेनर प्रशिक्षणामध्ये सहभाग.

 राज्य व जिल्हा स्तरावरील वक्तृत्व,नाटक, लोकनृत्य एकांकिका व चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम केले आहे. रोटरी क्लब,अंधश्रद्धा निर्मूलन समिती, हरिभाऊ नाना शिंदे फाउंडेशन, संत सावता माळी अन्नछत्र मंडळ, सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघ, क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्या विविध उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य सातत्यानं ते करत आहेत.तीस वेळा रक्तदानाचं बहुमोल कार्य त्यांनी केलं आहे.


       प्राप्त पुरस्कार

 सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ,

महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती,

सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघ,

सृजन फाउंडेशन फलटण, पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचा, जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ,

महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार,

लोकमंगल फाउंडेशन सोलापूर,

राज्यातील विविध कला संस्था कडून 27 विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.

Sunday, 18 February 2024

19. शशिकांत घाडगे यांचे शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातही भरीव कार्य



      शिक्षक म्हणून सेवेचा रौप्यमहोत्सव साजरा करतानाही शैक्षणिक कार्यातील उत्साह तसूभरही कमी न करता उलट मिळालेल्या प्रदीर्घ अनुभवाच्या जोरावर आढीव (ता.पंढरपूर) शाळेतील पदवीधर शिक्षक शशिकांत अशोक घाडगे हे विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांनी शिक्षकी पेशा नोकरी न मानता एक व्रत म्हणून स्वीकारले आहे. आपल्या वर्गातील मुला-मुलींमधील गुणवत्ता हेरुन त्या-त्या क्षेत्रात त्यांना पुढे नेण्यासाठी जे काही करता येईल ते सर्वस्व झोकून देत घाडगे गुरुजी साठी कार्य करत आहेत . सर्वात महत्वाचे म्हणजे गण्या, बाब्या, राज्या, पक्या, अशा उद्धट नावांनी विद्यार्थी पात्रे रेखाटणाऱ्या जमान्यात आज पंचवीस वर्षाच्या सेवेनंतरही आपल्या विद्यार्थ्यांना एकेरी नावाने न बोलता आदरार्थी बोलणारे घाडगे गुरुजी एकमेव असावेत. पंढरपूर, मंगळवेढा आणि माढा अशा तीन तालुक्यातील आठ शाळांवर काम करताना त्यांनी आपल्या परीसस्पर्शानं प्रत्येक शाळेत आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. शैक्षणिक गुणवत्ता, शिष्यवृत्ती परीक्षा, स्पर्धात्मक परिक्षा, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, क्रिडा स्पर्धा, गुणवत्ता शोध चाचणी, प्रज्ञाशोध परीक्षा, अशा अनेक क्षेत्रांत त्यांच्या विद्यार्थ्यांनी यशाची शिखरे काबीज केली आहेत. लोकवर्गणीतून शाळांच्या भौतिक सुविधा पूर्ण करणे, पटनोंदणी, रात्र अभ्यासिका, असे विविध उपक्रम आजपर्यंतच्या सेवेत त्यांनी राबवले आहेत. 

          छत्रपती परिवाराच्या माध्यमातून सामाजिक व सांस्कृतिक कार्यातही त्यांचा मोठा वाटा आहे. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात राज्यभरात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या मरवडे (ता.मंगळवेढा) येथील छत्रपती परिवाराचे संस्थापक अध्यक्ष म्हणून १९९५ ते २००० या कालावधीत त्यांनी काम पाहिले आहे. या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातील अनेक शाळा शिक्षक यांच्याशी संपर्क साधत सुंदर शाळा उपक्रमशील शिक्षक निवडण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. जिल्ह्यातील कृतिशील शिक्षकांच्या कार्याचा ठसा संपूर्ण जिल्ह्याला माहित व्हावा आणि त्यांनी केलेल्या कामाचं अनुकरण इतरांनी करावं यासाठी त्यांची गेल्या वीस वर्षापासून अखंड सेवा चालू असून सध्या खजिनदार म्हणून ते काम पाहत आहेत. छत्रपती परिवाराच्या व्यासपीठावरून सामुदायिक विवाह सोहळे, शाळा व शिक्षकांना जिल्हास्तरीय पूरस्कार, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा, मरवडे फेस्टिव्हल, मान्यवर तज्ज्ञांच्या व्याख्यानमाला, रक्तदान शिबिरे, क्रिडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, असे राज्यस्तरीय विविध उपक्रम राबविले आहेत. 

         दैनिक सकाळ च्या माध्यमातून राबविलेल्या जलसंधारण चळवळी मध्येही त्यांनी सहभाग नोंदवला. यामधून पाणीप्रश्नाची तीव्रता कमी होण्यास मदत तर झालीच पण राज्यात या कामाचा एक वेगळा ठसा निर्माण झाला. लेकीचं झाड या आगळ्यावेगळ्या उपक्रमानं तर संपूर्ण मरवडे गाव हरितछायेमध्ये विसावले आहे. 

   याशिवाय शिष्यवृत्ती परीक्षेसाठी सलग पंचवीस वर्षे मार्गदर्शन व यश . प्रज्ञाशोध परीक्षेसाठी मार्गदर्शन , आज पर्यंत विविध शाळांमधून लोकवर्गणीतून विद्युत सुविधा , बेंचेस व शाळांचे रंगकाम , लोकवर्गणीतून संरक्षक भिंतीचे काम, प्रश्नमंजुषा व इंग्रजी शब्दभंडार वृद्धीचा उपक्रम, इंग्रजी वाचन सुधार प्रकल्प , पंचायत समिती मंगळवेढा येथे स्वच्छतादूत म्हणून काम करताना अनेक गावे हगणदारीमुक्त करण्यात मोलाचे कार्य.

Wednesday, 7 February 2024

18.शिक्षणक्षेत्रात सतत नव्या वाटा शोधाणारा हरहुन्नरी शिक्षक... !

 शिक्षणक्षेत्रात सतत नव्या वाटा शोधाणारा हरहुन्नरी शिक्षक... !


      प्रयोगशीलतेला अमाप संधी असलेल्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमांची मालिका निर्माण करणारे, उत्तम वक्तृत्व शैली, निवेदनाची आवड, हस्ताक्षराची देणगी, आणि सुमधुर आवाज, उत्तम शिस्त, कार्यक्रमातला काटेकोरपना, प्रशासनावरची भिस्त अशा सर्व अंगांनी काम करणारं अष्टपैलू व्यक्तिमत्व, माढा तालुक्यातील सोलंकरवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेतील सृजनशील शिक्षक रामकृष्ण केदार गुरुजी

         स्पर्धा परीक्षांमध्ये हातखंडा असलेल्या केदार यांचे अद्यापपर्यंत विविध शाळांमध्ये नवोदय मध्ये 4 विद्यार्थी तर शिष्यवृत्ती मध्ये 15 विद्यार्थी गुणवत्ताधारक ठरले आहेत. विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास स्पर्धांमध्ये जिल्हास्तरापर्यंत सातत्यानं यश मिळवले आहे.

         जिल्हा परिषद शाळांकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा या उद्देशानं अरण व मोडनिंब सारख्या सर्वात जास्त पटाच्या शाळा आय एस ओ करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.

 मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे मुक्त शिक्षण घेता यावं म्हणून यांनी मोडनिंबच्या शाळेमध्ये 'मुक्तांगण' हा प्रकल्प राबवला.शिक्षक म्हणून नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू असतानाच त्यांच्याकडे मोडनिंब केंद्राच्या केंद्रप्रमुख पदाची जबाबदारी आली . या कालावधीत त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमांनी राबविले. शाळेच्या भौतिक व इतर अडीअडचणी दूर करून शाळेचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शिक्षक,मुख्याध्यापक,शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत यांचा समन्वय घडवत शाळेचे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी 'महसूल गावसभे' सारखा उल्लेखनीय उपक्रम हाती घेतला. त्या माध्यमातून केंद्रातील सर्व शाळांमध्ये लाख रुपयाचा निधी संकलनासह भौतिक सुविधांनी शाळा संपन्न झाल्या.

    बौद्धिक विकासाबरोबर सर्वांगीण विकासासाठी विविध कृती कार्यक्रमाची रेलचेल असणारा मुक्तांगण यांसारख्या नावीन्यपूर्ण उपक्रमाची दखल घेत 'सर फाउंडेशन सोलापूर'ने त्यांना राज्यस्तरीय नवोपक्रमशील अधिकारी व नवोपक्रमशील शिक्षक पुरस्कार देऊन त्यांच्या सन्मानित केले.

लॉकडाऊननंतर विद्यार्थी मूलभूत क्षमतेमध्ये मागे पडत आहेत असे लक्षात आल्यानंतर त्यांनी समूह साधन गटाच्या माध्यमातून ध्यास गुणवत्ते सारखा उपक्रम प्रभावीपणे राबवला...या उपक्रमाला स्पर्धात्मक स्वरूप देऊन शिक्षकांमध्ये स्पर्धा निर्माण केली. 

त्यांनी केंद्र स्तरावर सुरू केलेल्या 'मिशन स्कॉलरशिप' या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला आणि शिष्यवृत्तीला केंद्रातील अनेक विद्यार्थी यशस्वी झाले.

  आमच्यासाठी आम्हीच या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षक संख्या कमी असलेल्या शाळेवर पालक सहभाग व शिक्षक सहभागाच्या माध्यमातून स्वयंसेवक नेमून विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची दक्षता घेतली.या विविध उपक्रमांबरोबरच शाळा स्तरावरील एक मूल एक झाड, अभ्यासाचं गाव सोलंकरवाडी,प्रभावी गुणवत्ता कक्ष,आदर्श समूह साधन केंद्राची निर्मिती असे अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग त्यांनी त्यांच्या कार्यकाळात यशस्वीपणे पूर्ण केले. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेबांनी सुद्धा त्यांच्या कामाविषयी गौरवोद्गार काढले होते.

         जिल्हा परिषद शाळा सोलंकरवाडी येथे शाळेचा अमृत महोत्सव सुरू आहे. त्यानिमित्त अमृत महोत्सव शुभारंभ,निपुण भारत अंतर्गत माता पालक मेळावा,विद्यार्थी विकास निधी संकलन योजना,अभिनव अमृत कलश योजना मेळावा,माता-पिता पाद्यपूजन, माजी विद्यार्थी मेळावा, लेकीचं घर,असे विविध उपक्रम शाळेत सुरू असून त्यांनी ग्रामस्थ व शिक्षक यांच्या सहकार्यानं विविध संस्था व विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करत शाळा डिजिटल केली आहे. रोख व वस्तूरूपाने जवळजवळ 4.5 लाख रुपयाचा शैक्षणिक उठाव यावर्षी त्यांनी जमा केला आहे. गड किल्ले ट्रेकिंगची त्यांना आवड आहे. 125 पेक्षा जास्त किल्ले ट्रेकिंग पूर्ण झाले आहे. पूर्णगायन,वादन, कविता करणं इत्यादी स्वतःचे छंद देखील जोपासले आहेत.

 त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना विविध पुरस्कार मिळाले आहेत. जिल्हास्तरीय शिष्यवृत्तीआदर्श शिक्षक पुरस्कार ,

कृतिनिष्ठ शिक्षक पुरस्कार छत्रपती परिवार मरवडे, आदर्श शिक्षक पुरस्कार पंचायत समिती कुर्डवाडी,

राज्यस्तरीय नवोपक्रमशील शिक्षक पुरस्कार, मुक्तांगण प्रकल्प सर फाउंडेशन सोलापूर यांचा पुरस्कार.

17.बाल स्नेही शिक्षणाचे पुरस्कर्ते शिवाजी वडते गुरुजी

 बाल स्नेही शिक्षणाचे पुरस्कर्ते शिवाजी वडते गुरुजी


      शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणासाठी पूरक वातावरण निर्माण करत बालस्नेही शिक्षणासाठी धडपडणारे शिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंबिका नगर (बाळे) तालुका उत्तर सोलापूर येथील शिवाजी राम वडते हे सर्वत्र परिचित आहेत. त्यांनी विद्यार्थी विकासासाठी राबविलेल्या प्रत्येक उपक्रमात बालकेंद्री शिक्षणाचा पुरस्कार केला आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रिय शिक्षक अशी त्यांची पालक , विद्यार्थी व शिक्षकांमध्ये ओळख आहे. 

        हद्दवाढ भागातील जिल्हा परिषद शाळा व त्यांच्या समोरील आव्हानं, यांना सक्षमपणे तोंड देत या शाळेला नावलौकिक मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 

विशेष म्हणजे आपल्या वर्गातील विद्यार्थी व पालकासोबतच इतर वर्गातील विद्यार्थी व पालक यांच्याशीही त्यांचा सुसंवाद आहे. शाळेत आयोजित होणारा प्रत्येक उपक्रम विद्यार्थी केंद्रित असावा, इतर शाळांपेक्षा वेगळ्या गोष्टी आपल्या विद्यार्थ्यांना मिळाव्या असा त्यांचा प्रयत्न असतो. उत्तर सोलापूर तालुक्यातील एक तंत्रस्नेही शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यासोबतच वर्गस्तरावर विद्यार्थ्यांसाठी त्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, डिजिटल क्लासरूम, माझे विद्यार्थी माझा अभिमान, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, प्रश्नमंजुषा, एका संख्येपासून अनेक गणिते क्रिया, तंत्रस्नेही विद्यार्थी, असे विविध उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांना हटके विचार करून त्यांना शिकण्यासाठी आनंदी वातावरण निर्माण हे त्यांचे ध्येय आहे. त्यामुळे शाळेतील प्रत्येक कोपरा बाल स्नेही बनवला आहे. 

       शाळेतील साहित्य, परिसर, बाग, रंगरंगोटी या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांचे आकर्षण बनले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची अडचण येऊ नये म्हणून ते उपलब्ध करून देण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. स्वतःचे हस्ताक्षर अतिशय सुंदर असल्याने आपल्या विद्यार्थ्यांचेही हस्ताक्षर सुंदर असावे, यासाठी ते उपक्रम घेत आहेत. वर्गाबरोबरच शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवीत असताना, शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक यांना सोबत घेऊन नियोजन व त्यांची अंमलबजावणीत मोठा सहभाग हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. सहकार्यासोबत शाळेचा कायापालट करण्यासाठी त्यांनी विविध प्रयत्न केले ,त्यामुळे शाळेत अमुलाग्र बदल होऊन शाळा स्वच्छ सुंदर शाळा म्हणून नावारूपाला आली. 

     शाळेतील विद्यार्थ्यांचा पट वाढण्यासाठी परिसरातील अनेक मोठ्या शाळांशी स्पर्धा आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना सर्व उत्तम प्रकारच्या सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांचा आग्रह असतो .त्यातूनच सर्व सोयींनी युक्त अशी स्वच्छ सुंदर शाळा म्हणून अंबिकानगर जिल्हा परिषद शाळेची ओळख निर्माण झाली आहे. 

     स्वच्छ सुंदर व हरित शाळा, उपक्रमशील शाळा याबरोबरच प्रिसिजन फाउंडेशनच्या मदतीने शाळेत बैठक अँट स्कूल, पासवर्ड वाचन अभियान, प्रिसिजन ई लर्निंग प्रोजेक्ट, गीलो ऑन गो असे उपक्रम यशस्वीपणे राबविले जात आहेत, बैठक अँट स्कूल या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अभिजात भारतीय संगीत व नृत्यकला त्यांची ओळख करून दिली जाते. पासवर्ड वाचन अभियानातून विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची आवड व स्पर्धात्मक वातावरण तयार होते. प्रिसिजन ई लर्निंग प्रोजेक्टच्या माध्यमातून अत्याधुनिक ई लर्निंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. गिल्लो उपक्रमातून नाट्य अभिनयाची पायाभरणी केली जाते. विविध क्रीडा स्पर्धा, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा याचेही आयोजन ते करतात. विद्यार्थ्यांसाठी त्यांनी इनोवेशन क्लब ची स्थापना केली असून शाळा स्तरावर विविध नाविन्यपूर्ण पद्धतीने विचार करण्याची सवय त्यांनी विद्यार्थ्यांना लावली आहे. त्यामुळे विविध समस्येवर उत्तर शोधण्यासाठी वेगळ्या पद्धतीने विचार करणारे विद्यार्थी निर्माण झाले आहेत. बाल सभा व सांस्कृतिक कार्यक्रम यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सभाधीट पणा निर्माण होतो. 

    

विद्यार्थी हिताचे कार्य करत असताना त्यांना अनेक पुरस्काराने विविध संस्थेने सन्मानीत केला आहे. आजादी बचाव संस्थेने आदर्श शिक्षक पुरस्कार, सर फाउंडेशनच्या राष्ट्रीय स्तरावरील इनोव्हेटिव्ह टीचर अवार्ड तसेच गुजरातच्या संस्थेच्या वतीने डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम विंग्स ऑफ फायर नॅशनल एज्युकेशन व सोशल इनोवेशन अवॉर्डने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आपल्याला आनंदाचे क्षण आपल्याला विद्यार्थ्यांमुळेच मिळतात असे नेहमी त्यांना वाटतं . त्यांचे कार्य सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी आहे.

16.विद्यार्थ्यांमध्ये सतत काहीतरी नवं शोधणाऱ्या शिक्षिका गिरीजा नाईकनवरे

 विद्यार्थ्यांमध्ये सतत काहीतरी नवं शोधणाऱ्या शिक्षिका गिरीजा नाईकनवरे.


                    विद्यार्थ्यांसाठी सतत धडपडत राहणं. नवीन आव्हानं स्वीकारण्यासाठी विद्यार्थ्यांना तयार करणं.शालेय, सहशालेय उपक्रमातून आनंददायी शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, आणि प्रत्येक समस्येवर उपाय असतोच हे लहानपणापासूनच विद्यार्थ्यांच्या अंगी बिंबवनं हे खरंतर शिक्षकाचं आणि शिक्षणाचं काम असतं. असेच नवनवीन प्रयोग आणि नवनवीन उपक्रमातून सतत विद्यार्थ्यांसमवेत कार्यमग्न असणाऱ्या माळशिरस तालुक्यातील बोंडले जि.प.शाळेतील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्यार्थ्याच्या लाडक्या गिरीजा नाईकनवरे मँडम त्यांच्या विविध शैक्षणिक उपक्रमांमुळे आज त्या तालुक्यातच नव्हे तर राज्यभर परिचित झाल्या आहेत.

          शाळा आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणं आवश्यक असतं,ही बाब लक्षात आल्यानंतर मैत्री अक्षरांशी, मी ही काढणार सुंदर हस्ताक्षर, शाळेची परसबाग, कला कार्यानुभव कक्ष, माझा वर्ग स्वच्छ व सुंदर वर्ग,माझी शाळा सुंदर शाळा,मी कसा दिसतो ?, शिक्षणासाठी दत्तक मुले, चला तयारी करुया वक्तृत्वाची...,हे बंध रेशमी मैत्रीचे, माझे विद्यार्थी - माझा अभिमान,जोडू नाते माणुसकीचे, स्पर्धा परीक्षांची तयारी, पर्यावरणाचं रक्षण- आमची जबाबदारी यांसारखे उपक्रम त्यांनी राबवायला सुरुवात केली.पालकांशी सुसंवाद साधत त्यांनाही शाळेच्या विकासात सहभागी करुन घेतलं.शिष्यवृत्ती परीक्षेतही त्यांच्या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. यांसारख्या उपक्रमांमुळे शाळेचा पट वाढण्यासाठी मदत झाली.

        आधुनिक तंत्रज्ञानाचं ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी शाळेतील सर्व शिक्षकांच्या सहकार्यानं यशवंत नगर येथील शाळेत असताना १५ संगणक ग्रामपंचायतीकडून उपलब्ध करुन घेत सुसज्ज अशा संगणक कक्षाची निर्मिती केली.लाखो रुपयांचा शैक्षणिक उठाव करत शाळेतील प्रत्येक वर्ग स्मार्ट क्लासरुम करण्यासाठी त्यांनी विशेष परिश्रम घेतलं.

            विद्यार्थी व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धा तसेच विद्यार्थी गुणवत्ता शोध स्पर्धांतर्गत वक्तृत्व, कथाकथन,निबंध, वैयक्तिक तसेच समूहगीतगायन,समूह नृत्य व क्रीडा स्पर्धांमध्ये तालुका व जिल्हास्तरावर अनेक विद्यार्थांनी यश मिळवलं.

       कोरोना काळात "शाळा बंद पण शिक्षण चालू " हा उपक्रम गिरीजा मँडमसह सुमारे १५० शिक्षकांनी सलग २०० दिवस चालवला. इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांना आँनलाईन प्रत्यक्ष अध्यापन केलं.प्रत्येक वर्गाचे आँनलाईन स्नेहसंमेलन, संडे फन डे,मैत्री अक्षरांशी,चला रांगोळी काढूया...,विविध सण व उत्सव आँनलाईन साजरे केले.. 

           बोंडले जि.प.शाळेत स्वतः ५०,००० रुपये खर्चून ग्रामपंचायतीने तात्पुरत्या स्वरूपात दिलेल्या वर्गखोलीची रंगरंगोटी करुन शैक्षणिक वातावरणनिर्मिती केली.शाळेतील सर्व शिक्षक बांधव व ग्रामस्थांच्या सहकार्यानं आमदार निधीतून शाळेत स्मार्ट क्लासरुम तयार झाला. 

         कोणत्याही कार्यक्रमाचं स्वागत त्यांनी रेखाटलेल्या अप्रतिम अशा रांगोळीनचं होतं.. ही कला स्वतःपुरती मर्यादित न ठेवता त्यांनी अनेक शिक्षक बंधू - भगिनींनाही या कलेचं प्रशिक्षण दिलं.या कलेतील त्यांचं प्रभुत्व पाहून "रांगोळी सम्राज्ञी" ही उपाधीच माळशिरसकरांनी त्यांना बहाल केली .सूत्रसंचालनाची जबाबदारीही त्या लीलया पेलतात. .विविध प्रशिक्षणासाठी सुलभक म्हणून त्यांनी काम केलं आहे.कलासमेठीत अध्ययन- अध्यापन या पायलट प्रोजेक्टवर देखील त्यांनी काम केलं आहे.तालुक्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी मोफत सुंदर हस्ताक्षर व रांगोळी कार्यशाळा घेतल्या आहेत.मुलींना मासिक पाळीसंदर्भानं मार्गदर्शन केलं आहे. शिवरत्न फाऊंडेशन व डॉटर माँम्स फाउंडेशन सोबत "बेटी बचाओ, बेटी पढा़ओ " यासाठी सामाजिक कार्य केलं आहे. महिला सक्षमीकरणासाठी मोफत रांगोळी, मेहंदी,शिवणकाम कार्यशाळा घेतल्या आहेत.सायकल बँकेसाठी योगदान दिले आहे. Virtual Classroom या उपक्रमात इयत्ता पहिली व दुसरी - मराठी व गणित विषयासाठी त्या राज्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत.

माळशिरस तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, जिल्हा परिषद, सोलापूरचा आदर्श शिक्षक पुरस्कार,राज्यस्तरीय आचार्य दोंदे आदर्श शिक्षक पुरस्कार, त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अशा अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.