विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Friday, 10 May 2024

29.प्रतिभा नवले यांनी दिली गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संस्काराची जोड.......

 

       वाडी वस्तीवरील शाळेमध्ये दर्जेदार शिक्षण मिळेल का? याबाबत पालकांच्या मनामध्ये असणारी साशंकता दूर करत, शाळेविषयी त्यांच्यामध्ये निर्माण केलेली आपलेपणाची भावना! विविध स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी! त्यातून विद्यार्थ्यांना निर्माण झालेली शाळेविषयीची आवड!आणि तदनंतर सुरू झालेली गुणवत्ता पूर्ण आणि संस्कारक्षम शिक्षणाकडं वाटचाल! 'आजी -आजोबा' हा उपक्रम राज्याला माहिती करून देणाऱ्या माढा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केदार वस्ती (उ. खु.) येथील शिक्षिका प्रतिभा सुभाष नवले .   


         रायगड जिल्ह्यातील सुधागड (पाली- बल्लाळेश्वर )येथून २००३ मध्ये शिक्षणसेवक म्हणून शिक्षण सेवेची त्यांची सुरुवात. बदली नंतर माढा नंबर १ आणि केदार वस्ती उपळाई खुर्द इथं आधुनिक काळाची गरज ओळखून त्यांनी सर्वप्रथम सेमी वर्गाची सुरुवात केली. त्यामुळं शाळेच्या पटसंख्येत लक्षणीय वाढ झाली. विविध स्पर्धा परीक्षा मंथन, टॅलेंट हंट, एटीएस ,आयटीएस, एमटीएस या सारख्या स्पर्धा परीक्षेला विद्यार्थी बसवून त्यांना राज्यस्तर गुणवत्ताधारक बनवले. चित्रकला स्पर्धा, कला साहित्य निर्मिती याची आवड असल्यानं नेहमी उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य निर्मिती,पोस्टर्स स्पर्धा, महिला दिनाच्या निमित्तानं अनेक वेळा त्या मार्गदर्शन करतात, आय एस ओ शाळा ,शाळासिद्धि 'अ' दर्जाची शाळा , लोकसहभाग याकरिता सक्रिय सहभाग .

           लोकसहभागातून इमारत दुरुस्ती, रंगरंगोटी, डिजिटल शाळा, मैदान सपाटीकरण इत्यादी कामं केली. एकही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही यासाठी विविध उपक्रम त्या आयोजित करतात. समृद्ध परिपाठ, दररोज सामान्य ज्ञान व त्यावर आधारित- स्पर्धा परीक्षा, सुंदर हस्ताक्षर उपक्रम, मी इंग्रजी वाचणार, प्लास्टिक मुक्त शाळा, करूया स्मरण लेखन, गोष्ट चार शब्दांची, प्रसंगानुरूप वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, आजचा दिनांक आजचा पाढा, डोळ्यांचे व्यायाम प्रकार, गोष्टींचा शनिवार, उपवास मोबाईलचा, तंबाखू मुक्त शाळा , केंद्रस्तरीय संमेलनात विविध शैक्षणिक विषयावर वेळोवेळी मार्गदर्शन, जागर योजनांचा, सेल्फी विथ सक्सेस, मी आणि माझे आजी -आजोबा हे उपक्रम यशस्वीरित्या राबवत आहेत. 

             विविध सामाजिक व शैक्षणिक विषयावर त्यांचे लेखन वर्तमानपत्रातून,तसेच शैक्षणिक मासिकातून प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांच्या उपक्रमाची सर फाउंडेशन एज्युकेशनल इनोवेशन नॅशनल अवॉर्ड 2023 साठी निवड झाली आहे.

         तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी मा. दिलीप स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतील संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याकरता राबविलेला 'दशसूत्री उपक्रम'- अंतर्गत उत्कृष्ट कार्य त्यांनी केले आहे. त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये राबविलेला 'आजी -आजोबा' उपक्रम याची जिल्हास्तरावर प्रसिद्धी होऊन ,राज्य शासनाने या विषयावर स्वतंत्र परिपत्रक निर्गमित करून महाराष्ट्रभर 'आजी- आजोबा दिन' हा उपक्रम साजरा करण्याविषयी मार्गदर्शनपर सूचना दिल्या. सर्वांगीण गुणवत्तापूर्ण , संस्कारक्षम , आरोग्यसंपन्न विद्यार्थी घडविणं हा ध्यास मनाशी बाळगून त्या कार्यरत आहेत.

त्यांच्या या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना

विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

जिल्हा परिषद सोलापूर आदर्श शिक्षक पुरस्कार 

तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार पंचायत समिती कुर्डूवाडी

सर फाउंडेशन एज्युकेशनल इनोवेशन नॅशनल अवॉर्ड

मनोहर भाऊ डोंगरे शिक्षक पतसंस्था मोहोळ यांचेकडून जिल्हास्तरीय 'कर्तव्यदक्ष शिक्षक पुरस्कार'

छत्रपती परिवार मरवडे यांचे कडून जिल्हास्तरीय 'कृतीनिष्ठ शिक्षक' पुरस्कार

रोटरी क्लब माढा यांचेकडून 'नेशन बिल्डर अवॉर्ड' या सारख्या विविध पुरस्कारांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment