विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Friday, 29 January 2021

खरच आपण नशीबवान आहोत..!

थोडासा आठवणीला उजाळा..


           अचानक पोरगां विचारतो, "बाबा तुम्ही फोरव्हिलर कधी घेणार?तुम्ही ही जुनी गाडी का नाही बदलत?काय बाबा ,कसला फोन वापरताय! त्या आमच्या वर्गातल्या सनीच्या बाबासारखा जरा स्मार्ट फोन घ्या ना!!एक ना दोन असंख्य प्रश्न त्याच्याकडं असतात. मी मात्र हसून !बघूया !!घेऊया !!अशी थोडक्यात उत्तरे देऊन तात्पुरतं त्याला थांबवतो.....थोडं शांत होतो .मग काल, परवा,गेल्या वर्षी असं करत करत बालवयात पोहचतो.मन तिथचं घुटमळतं.या वयात माझे प्रश्न काय होते?मला त्यावेळी किती माहिती होती? आई वडिलांकडं माझ्या काय मागण्या असायच्या?आणि ते काय काय पुरवत होते.याचं  सबंध चित्रणच माझ्या  डोळ्यापुढं उभं राहतं.

           मुला मुलीचं गोड चित्र असलेलं बालभारतीचं पुस्तक, आणि शि.द.फडणीसांची व्यंगचित्र असणारं अंकगणित या दोन पुस्तकांमुळं आमच्या पाठीवरचं ओझं कमी होतं.कारण तेवढंही आई वडिलांना पेलवत नव्हतं.चौकोनी  आकाराची जाड कापडाची पांढरी  पिशवी. त्याला रिबीट मारुन बसवलेलं राॅकेल भरायच्या नळीपासून तयार केलेलं बंद.  निम्म्या भागात  पुस्तकं वह्या आणि निम्मा भागात  खापरी  पाठीचा खापळा म्हणजे लागडी फ्रेम नसलेली पाटी आणि धोतराच्या चिरगुटात भाकरी सोबत तेल चटणी असलेलं भाकरीचं गाठोडं .त्यावर चटणीवरच्या तेलाचे डाग कायम असायचे!  पण काय मज्जा होती राव!!!  मित्रांसोबत एकाच सुट्टीत अख्खा डबा संपायचा. घरी नुसतंच चिरगूट जायचं. आज मुलगा मुलगी शाळेतून  घरी आली की,  डब्बा का शिल्लक राहिला असा प्रश्न आम्ही  विचारतो. असं विचारायला आम्ही कधी घरच्यांना संधी दिलीच नाही.

              एखाद्याकडं सायकल असायची खूप अप्रुप वाटायचं.आम्हाला सायकल नव्हती त्यामुळं आम्ही  शाळेला लवकरच निघायचो. .शनिवार तर आजही आठवतो दप्तर काखेत मारायचं, रात्रीची शिळी भाकरी,  तेल चटणी बरोबर हातावर घ्यायची आणि खात खात शाळेत यायचं. शाळेत आल्यावरच हापश्याचं पाणी प्यायचं . शाळेत लवकर का नाही गेला तर गुरुजी झाडायला लावतात अशी तक्रार आम्ही कधी केलीच नाही. केली तरी ऎकतो कोण?  शाळा सारवायला शेण आणण्यासाठी सर्वात पुढं आम्ही असायचो. आणि आपला आपला वर्ग सारवण्यासाठी गडबड करणाऱ्या मुली सुद्धा पुढं पुढं करायच्या ! हे सारं आठवलं की 

  आजची पिढी सुधारली की बिघडली कळेनासं होतं!!!

        वर्षातून दोनच वेळा  म्हणजे १५ आॅगस्ट आणि २६जानेवारीला शर्ट आणि रफू केलेल्या चड्डीला पितळेच्या तांब्यात इस्तू टाकून केलेली कडक इस्त्री दिवसभर खूप आनंद देऊन जायची.या सगळ्या आनंदी वातावरणात वडिलांकडं काय काय मागावं हे कधी सुचलच नाही.

           असं करु नको, तसं करु नको,गुरूजींना सांगेन असं वाक्य सारखं सारखं ऎकायला लागायचं. हळूहळू ते कालबाह्य होत चाललंय.   रात्री चिमणीच्या उजेडात घरचा अभ्यास करुन सकाळी सर्व नाकात काजळी जमा व्हायची. तरीही कुणाकडं तक्रार नसायची. घरात लाईट घ्यावी असा विचार का नाही मनात आला कुणास ठाऊक?  गुरुजी ,आज मात्र

 मुलांला खूप टेन्शन येतयं.त्याचा अपमान करु नका.एकुलता एकच आहे.त्याचा पहिलाच नंबर आला पाहिजे.असा पालकांचा नेहमीच सूर असतो.  आम्ही मात्र स्वतःला  फारच नशिबवान समजतो कारण त्या काळी  नापास झालं काय!आणि पहिला नंबर आला काय! दोन्हीतला फरक कधी घरच्यांना कळलाच नाही.

          आम्ही पत्र ,तार,अंतर्देशीय पत्र पाहिली.टेलिफोन, मोबाईल,इ.मेल पाहिले.मोट,नाडा, इंजिन, इलेक्ट्रिक मोटार,बोअरवेल हे ही पाहिलं.दिवसभर वेगवेगळे मैदानी खेळ खेळणारा फिजिकल इंडिया ही पाहिला आणि वर्गावर्गातला डिजिटल इंडिया ही पाहिला.पहाटेपासून सुरु असणारी जात्यांची  घरघर ही ऎकली आणि   दिवस उगवल्यावर सुरु झालेली मिक्सरची खरखर ही ऎकली.म्हणून वाटतं आपली पिढी सर्वांचीच साक्षीदार ठरते आहे.।

            पूर्वी पैसे मिळवण्यासाठी साठी किती काम करावं लागतं हे माहीत होतं.आता मला वाटतं पैसे खर्चायचं माहिती आहे परंतु ते कष्टानं कसं मिळवायचं हे जाणून घ्यायची कुणाची इच्छा दिसत नाही...

काही का असेना श्रमशक्ती बरोबर श्रमाची प्रतिष्ठा कमी झाली,कमी श्रमात जास्त पैसे मिळवायची सवय लागली,  रूबाब वाढला, चैन वाढली,गरजा वाढल्या, पैशाचं मोल कमी झालं. म्हणूनच मुलांची मागणीची भूक  वाढली.

         त्यांची स्वप्नं मोठी झाली चांगली गोष्ट आहे,ती साध्य करण्याचे योग्य मार्ग आपण दाखवायला हवेत. आणि स्वतःच्या ईच्छा स्वतः पूर्ण करण्यातला खरा आनंद त्यांना घेऊ द्यावा.थोडक्यात त्यांना आयतं जास्त मिळू नये असं मला वाटतं.

                   नवनाथ शिंदे,अरण.