सावता माळी विद्यालयाचे अष्टपैलू कलाशिक्षक सावता घाडगे
धन्य ते अरण रत्नाची खाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अरण मध्ये एका वरचढ एक अशी व्यक्तिमत्वं आपल्याला विविध क्षेत्रात पहावयास मिळतील. त्यामध्ये शिक्षणक्षेत्र तर अव्वलच! उत्तम क्रिकेटपटू, यशस्वी कलाशिक्षक, देशपातळीपर्यंत धनुर्विद्या पोहोचवणारे सामाजिक, शैक्षणिक आणि कला क्षेत्रात आपल्या नावाचा ठसा उमटवणारे संत सावतामाळी विद्यालयाचे कला, क्रीडा शिक्षक सावता घाडगे सर.
खरं तर कलाशिक्षक म्हणून नेमणूक असतानाही अंगामधला खेळाडू जिवंत ठेवत गेल्या बारा वर्षात धनुर्विद्या खेळात 34 राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत.150 पेक्षा जास्त खेळाडूंनी धनुर्विद्या क्रीडा प्रकारात उज्वल कामगिरी केलेली आहे. कला व क्रीडा क्षेत्रात विद्यार्थ्यांना घडवून त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्याचं काम त्यांच्याकडून सतत घडतं आहे.विद्यालयातील अध्यापनाचं काम पूर्ण करून शाळेच्या वेळेच्या व्यतिरिक्त विद्यालयाच्या मैदानावर वर्षभर धनुर्विद्या खेळाचा सराव नियमितपणे ते घेतात. सर्व खेळाडूंना धनुर्विद्या खेळाचं प्रशिक्षण मोफत दिलं जातं.
महाराष्ट्र राज्य कला संचलनालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या ग्रेड परीक्षेमध्ये अ श्रेणी व ब श्रेणी मध्ये आज पर्यंत शेकडो विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यालयात रांगोळी,सुंदर हस्ताक्षर, चित्रकला व विविध प्रदर्शने यासारख्या उपक्रमांचे यशस्वी आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य ते करत असतात. सकाळ बालमित्र चित्रकला स्पर्धेचे विद्यालयामध्ये ते केंद्र चालवितात . शासनाच्या चित्रकला ग्रेड परीक्षेचे परीक्षक म्हणून पुणे येथेही त्यांनी काम केले आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण देण्यासाठी विद्यालयात सुसज्ज अशी कॉम्प्युटर लॅब तयार केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यार्थ्यांची संवाद साधण्यासाठी विचारांची देवाण-घेवाण करण्यासाठी ते प्रयत्नशील असतात.राज्यस्तरीय सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास प्रशिक्षण घेऊन संधी,क्षमता, आवड यातून विद्यार्थ्यांनी आपलं करिअर कसं घडवावं याविषयी ते मार्गदर्शन करतात. किशोरवयीन विद्यार्थ्यांना समुपदेशन करून व्यक्तिमत्व विकास घडवतात. एन. एम.एम. एस व एन. टी. एस परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ते करतात.
विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक दृष्ट्या कणखर बनवण्यासाठी विशेष प्रयत्न ते करतात. आज पर्यंत त्यांच्या चारशे विद्यार्थ्यांना चित्रकला व क्रीडा प्रकारात सवलतीच्या गुणांचा फायदा मिळाला आहे. खेळाडू आरक्षणातून अनेक विद्यार्थ्यांना शासकीय सेवेचा लाभ मिळाला आहे.
घाडगे सर यांची महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघाचे प्रशिक्षक म्हणून पाच वेळा नियुक्ती झालीआहे. धनुर्विद्या मार्गदर्शक(NSNIS), कोच लेवल १ पंच परीक्षा लेवल१, ऍडव्हान्स लेवल कोचिंग अशी प्रशिक्षणे पूर्ण करून विद्यार्थ्यांना तंत्रशुद्ध प्रशिक्षण ते देतात.
अतिशय प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेत धनुर्विद्या खेळातील सोलापूर जिल्ह्याला पहिले पदक घाडगे सरांच्या मार्गदर्शनाखाली मिळाले आहे. ट्रेन द ट्रेनर प्रशिक्षणामध्ये सहभाग.
राज्य व जिल्हा स्तरावरील वक्तृत्व,नाटक, लोकनृत्य एकांकिका व चित्रकला स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम केले आहे. रोटरी क्लब,अंधश्रद्धा निर्मूलन समिती, हरिभाऊ नाना शिंदे फाउंडेशन, संत सावता माळी अन्नछत्र मंडळ, सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघ, क्रीडा कार्यालय सोलापूर यांच्या विविध उपक्रमात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे कार्य सातत्यानं ते करत आहेत.तीस वेळा रक्तदानाचं बहुमोल कार्य त्यांनी केलं आहे.
प्राप्त पुरस्कार
सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ,
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती,
सोलापूर जिल्हा कलाध्यापक संघ,
सृजन फाउंडेशन फलटण, पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचा, जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ,
महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार,
लोकमंगल फाउंडेशन सोलापूर,
राज्यातील विविध कला संस्था कडून 27 विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.