विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Wednesday, 20 December 2023

12.विद्यार्थ्यांना करोडपती करणारे ध्येयवेडे शिक्षक हनुमंत राऊत..

 विद्यार्थ्यांना करोडपती करणारे ध्येयवेडे शिक्षक हनुमंत राऊत..


तीन वर्षात 139 विद्यार्थ्यांना सत्तर लाखापेक्षा जास्त शिष्यवृत्ती



राज्यातली पहिली गणित प्रयोगशाळा


               स्वावलंबन हेच आमचे ब्रीद असा मूलमंत्र देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंकोली येथील शाळेत अहोरात्र मेहनत करणारा ध्येयवेडा शिक्षक म्हणजे हनुमंत पांडुरंग राऊत. वक्तृत्व,कर्तृत्व आणि नेतृत्वाचं अंग असणाऱ्या राऊत सरांनी इयत्ता आठवी अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी त्यांच्याकडून करून घेणं आणि त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं. हे वेड डोक्यात घेतलं. अहोरात्र मेहनत करून कित्येक विद्यार्थ्यांना यशाचं नवं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. गुणवत्तेचा ध्यास घेतलेले प्रज्ञावंत गणित शिक्षक राऊत यांनी मागील तीन वर्षात भारत सरकार कडून घेतलेल्या एन एम एम एस परीक्षा , सारथी शिष्यवृत्ती परीक्षा , उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या स्पर्धा परीक्षेतून 139 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीधारक करून सत्तर लाखांपेक्षा जास्त शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळवून दिली. यावर्षी ही रक्कम एक कोटीच्या आसपास जाईल असा त्यांना विश्वास आहे. राऊत हे हाडाचे गणित शिक्षक सर्वत्र परिचित. गणित दृश्यमान पद्धतीनं शिकवून गणिताची भीती घालवणं व गणिती संकल्पना स्पष्ट करणं यासाठी त्यांनी राज्यातली पहिली गणित प्रयोगशाळा अंकोली इथं उभारली. यामध्ये दर्जेदार गणित साहित्य व वर्गवार कृतीपत्रिका यांचा समावेश आहे. आजवर अनेक शाळांनी व शिक्षकांनी या गणित प्रयोग शाळेस भेट देऊन अशा प्रकारच्या प्रयोगशाळा आपापल्या शाळांमध्ये उभ्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर गणित कट्टा, गणित जत्रा, गणिती बाजार अशा अनेक संकल्पनातून विद्यार्थ्यांना गणित सोपं करण्याचा प्रयत्न केला आहे.

 तत्कालीन मा शिक्षण सचिव नंदकुमार साहेब यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या मूलभूत गणिती प्रशिक्षणासाठी त्यांनी राज्य गणित प्रशिक्षक म्हणून काम केले आहे . महाराष्ट्रातील साधारण पाच हजार शिक्षकांना त्यांनी गणित सोपं करण्यासाठी प्रशिक्षण दिलं. ग्रामीण भागातील त्यांचे अनेक विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेत गणित विषयात राज्यात प्रथम आले. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून अधिकारी पदावर विराजमान झाले. श्री राऊत यांना आतापर्यंत सोलापूर मुख्याध्यापक संघाचा कृतीशी शिक्षक पुरस्कार, दयानंद डॉक्टर मार्डीकर शिक्षक सक्षमता पुरस्कार, रयत शिक्षण संस्थेचा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार, यासारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत सलग तीन वेळा त्यांना पारितोषिक मिळाले आहे. शेकडो वक्तृत्व स्पर्धा, निबंध व काव्य वाचन स्पर्धांमध्ये त्यांना यश मिळाले आहे. अनेक मासिकातून त्यांचे गणित विषयाचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ अनिल पाटील, विभागीय चेअरमन संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा विभाग उंचीवर नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भविष्यातील शिक्षणाच्या संधी ओळखून आय आय टी - नीट फाउंडेशन अभ्यासक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा त्यांचा मानस आहे.

11.कल्पकतेसह नवनवीन प्रयोग करणाऱ्या करुणा गुरव

 बदलती शिक्षण पद्धती, प्रत्येक पिढीनुसार वाढणारी विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, कल्पकता, शिक्षण पद्धतीत होणारा तंत्रज्ञानाचा वापर, सतर्क पालक, शिक्षक आणि समाज सुद्धा शिक्षणाची नवनवीन दारं शोधतो आहे. आज शिक्षकांनी शिकवायच्या अगोदरच विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिकवायचं तर आहेच पण त्याहीपेक्षा ते स्वतः कसे शिकतील याकडं शिक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षक कल्पक आणि अध्यापनात नवनवीन प्रयोग करणारा असायला हवा. असेच शिक्षणामध्ये नवनवीन प्रयोग करत नवोपक्रम स्पर्धेत दरवर्षी भाग घेऊन यश मिळवणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करजगी येथील करुणा गुरव मॅडम.

           एस सी ई आर टी मार्फत दरवर्षी नवोपक्रम स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेत राज्यातील कल्पक शिक्षक भाग घेत असतात. श्रीमती गुरव यांनी सलग सात वर्षे जिल्हास्तरावर व दोन वर्षे राज्यस्तरावर क्रमांक मिळवला. त्यांनी आजपर्यंत केलेले सर्व उपक्रम  नवोपक्रम लेखन एक तंत्र या पुस्तकात मांडले आहेत. शिक्षकी पेशात सर्जनशीलता फार महत्वाची असते.ती त्यांच्याकडं आहे . शैक्षणिक लेख-कविता लेखन, सूत्रसंचलन,तंत्रज्ञान याची आवड असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये ती रुजवणं  त्यांना फार अवघड गेलं नाही. 

      येणाऱ्या प्रत्येक पिढीला संगणकाचं  ज्ञान असायलाच हवं. आणि इंजीनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते ती कॉम्प्युटर . विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेपासूनच या गोष्टीचं ज्ञान मिळावं यासाठी त्यांनी शाळेत स्क्रॅच कोडींग व्हिडिओ निर्मिती सुरू केली . इयत्ता पाचवी चे पन्नास टक्के विद्यार्थी अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करतात. शाळा कन्नड भागात असून लोकांची बोलीभाषा कन्नड आहे. त्यामुळं मराठीतून शिकवणं ही तर येथील शिक्षकांची खरी कसोटी असते.  ग्रामीण भागात स्क्रॅचकोडींगचं शिक्षण देणं ही खरंच कौतुकाची बाब आहे.

        मॅडमनी विद्यार्थ्यांसाठी यूट्यूब चैनल सुरू केलं. अभ्यासक्रमातले छोटे छोटे घटक विद्यार्थ्यांना त्या ऑनलाईन शिकवू लागल्या. आणि जवळजवळ सतराशे व्हिडिओ त्यांनी निर्माण केले. राज्यातील वीस हजार पेक्षा जास्त विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. आपल्या विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत त्या पोहोचल्या.विद्यार्थी  स्वतः शिकू लागले .

इयत्ता पहिलीचा स्मार्ट क्लास या त्यांच्या नवोपक्रमास जिल्ह्यात प्रथम तर राज्यात सातवा क्रमांक मिळाला. इंग्रजी वाचन कौशल्य हा त्यांचा आवडीचा घटक. यूट्यूब च्या माध्यमातून त्यांनी राज्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला .

       स्वतःसोबत आपले सहकारीही तंत्रस्नेही व्हावेत यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत एक महिनाभर राज्यातील शिक्षकांसाठी व्हिडिओ निर्मितीचे कौशल्य या विषयावर त्यांनी कार्यशाळा घेतल्या. याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, कथाकथन, टॅलेंट हंट यासारख्या स्पर्धांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असतो.

 आयसीटीसी प्रशिक्षणात यश मिळाल्यामुळं पाच लाखापर्यंतचे आठ संगणक संच व एक लॅपटॉप त्यांच्या शाळेला मिळाला . शिक्षणात त्यांनी आजही  खंड पडू दिला नाही. बीए दोन विषयात, एमए दोन विषयात, डी.एस.एम , जर्नालिझम,बी.एड,एम.ए.एज्युकेशन अशी शैक्षणिक उंची वाढवत विद्यार्थ्यांसोबत त्यांचंही शिकणं सुरूच आहे.








     .

Wednesday, 6 December 2023

10.किलबिल ग्रुप च्या माध्यमातून सबंध राज्यभर परिचित असणाऱ्या सुवर्णा बोरगावकर ..

 किलबिल ग्रुप च्या माध्यमातून सबंध राज्यभर परिचित असणाऱ्या सुवर्णा बोरगावकर .. 


                    विद्यार्थ्यांना सतत काहीतरी नवनवीन देत त्यांना अभ्यासामध्ये गुंतवून ठेवणं ही शिक्षकांची एक कला असते.दररोज विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी यासाठी शाळेत काहीतरी नवीन दाखवलं जाणार आहे, मला त्यामध्ये भाग घ्यायचा आहे, असं विद्यार्थ्यांना वाटायला हवं.

         अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ च्या शाळेत सुवर्णा बोरगावकर या अशाच नवनवीन उपक्रमांसाठी सबंध जिल्ह्याला परिचित आहेत. सतत विद्यार्थ्यांमध्ये बसणं, त्यांच्यासोबतच खेळणं हे त्यांचं दररोजचच. मुलांसोबत शिक्षकापेक्षा मैत्रीची भूमिका त्या चांगल्या पद्धतीनं पार पाडतात. गळाभेट सारखा उपक्रम घेत त्यांना आईच्या मायेची उब देतात. थँक्स टीचर उपक्रमासोबत विद्यार्थी शिक्षक सहसंबंध त्या जोपासतात. वाचनाची गोडी लागावी यासाठी मी आहे वाचन वीर, पाणी पिण्याची आठवण रहावी म्हणून वॉटर बेल, कलेची आवड असणाऱ्यांसाठी अभिनय दालन, यासह आजी आजोबांचा दिवस, आम्ही सारे खवैय्ये, साने गुरूजी कथामाला, कडक भाकरी- कडक मुलाखत, तारे जमी पर -असे कित्येक उपक्रम त्या दररोज राबवीत असतात . प्रत्येक मुलगा हा असामान्य आहे असं समजून त्यांच्या मधला गुण शोधून तो विकसित करणं हेच आपलं काम आहे असं समजत त्या विद्यार्थ्यांमध्ये रममान होतात,.

    लेखनाचा ही व्यासंग बोरगांवकर यांना आहे. विविध वर्तमान पत्र, मासिकं, जीवनशिक्षण, किशोर यांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्यापैकी आणि घर बोलू लागलं, जगण्याचा साक्षात्कार, ह्यदयास ह्रदय जोडोनी या लेखांचं खूप कौतुक झालं होतं.

      तालुका ते राष्ट्रीय स्तरावर बोरगांवकर यांना आजपर्यंत ४४ आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ऑनलाईन शिक्षण,गौरी आरास या उपक्रमाची दखल शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेऊन दूरध्वनीवरून त्यांचं कौतुक केलं होतं. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण होता. .विद्यार्थ्यांच्या यशामध्ये आपलं स्वप्न शोधणारा शिक्षकच खरा आदर्श असतो. असंच विद्यार्थ्यांचं यश शोधत प्रत्येक घटक उपघटक कृतीतून घेत मुलांना अभ्यासाची गोडी लावणं हेच मुळात शिक्षकाचं खरं काम असतं. ते बोरगावकर मोठ्या इमानेइतबारे करतात.

       शाळेतील विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धा, राज्यस्तरीय पाढे पाठांतर, अंकनाद स्पर्धा, नृत्य व नाटक यासारख्या विविध स्पर्धेत सहभाग नोंदवून त्यांच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.वर्गसजावट,साहित्य मांडणी व सोशल मिडीयाचा सक्रिय वापर करून वर्गात घेतलेला अभ्यास " किलबिल ग्रुप " च्या माध्यमातून पालकांपर्यंत व समाजापर्यंत पोहचवून शैक्षणिक वातावरण निर्मिती करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी विद्यार्थ्यांसोबत पालकांनाही तंत्रस्नेही बनवले आहे .

9. परिसस्पर्श लाभलेले जिल्हा परिषदेचे गुरुजी...विजयकुमार वसंतपुरे

 परिसस्पर्श लाभलेले  जिल्हा परिषदेचे  गुरुजी...विजयकुमार वसंतपुरे

                      उपक्रमशील शिक्षकांना त्यांच्या सेवाकालात अनेक सन्मान,पुरस्कार,वेतनवाढी आणि पारितोषिके मिळत असतात.परंतु भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांना आपला उपक्रम सादर करून, आपल्या मुलांना प्रेरणा मिळावी, यासाठी डॉ कलाम यांना ऑटोग्राफ ची विनंती करत असता, "यु आर डुइंग गुड वर्क" असे म्हणत शाळेच्या पोस्टरवर डॉ. कलाम यांनी दिलेला ऑटोग्राफ  हा विजय सरांच्या जीवनातील  आनंदाचा सर्वोच्च क्षण. त्याचबरोबर संगणक साक्षरता अभियान राबविल्याबद्दल परम संगणकाचे निर्माते थोर संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी तासभर वैयक्तिक दिलेलं ज्ञानामृत  हा जीवनातील अतिशय चैतन्यदायी अनुभव होता.अशा दोन व्यक्तींचा परीसस्पर्श लाभलेले अक्कलकोट तालुक्यातील 

जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा,आंदेवाडी ( बु.) या शाळेतील उपक्रमशील शिक्षक विजय वसंतपुरे.

      कौठाळी शाळेतली गुरुजींची पहिली नेमणूक . या शाळेत तेव्हा स्पर्धा परीक्षेचा सुवर्णकाळ होता.तालुक्यात सर्वोत्कृष्ट निकाल दिल्याबद्दल त्यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. त्यांचं हस्ताक्षर सुंदर  व देवनागरी कॅलीग्राफी लेखनकला अवगत असल्यामुळं जिल्हा परिषदेची सर्व प्रमाणपत्रे व कार्यक्रमपत्रिका लिहून देण्याचं काम गुरुजींकडं असायचं. स्वतःचं प्रमाणपत्र स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिणारा शिक्षक म्हणून कौतुक केलं जायचं. हीच अक्षरकला विद्यार्थ्यांमध्येही त्यांनी रुजवली. त्यांच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची अक्षरं सारखीच असायची. 

   पुढं  गुरुजी सर फाउंडेशनशी  जोडले गेले . उपक्रमशील शिक्षकांच्या सानिध्यात आले.  आय आय एम अहमदाबाद येथे शाळेच्या १२ उपक्रमांची निवड झाली. डॉ कलाम साहेब यांच्या हस्ते त्यांना टीचर्स अँड ट्रान्सफॉर्मर्स हा पुरस्कार देवून गौरविण्यात आलं.या उपक्रमात आधार विद्यार्थी वित्तबँक, राणी लक्ष्मीबाई डिफेन्स क्लब, जीवनशाळा ,दैनिक तापमान नोंद,जी तारीख-तो पाढा,जीवनशाळा व सर्वत्र गौरविण्यात आलेला डॉ विजय भटकर संगणक साक्षरता अभियान यांचा समावेश होता.

         गुरुजींना बालभारती मध्ये आय सी टी विषय समितीत तीन वर्षे काम करण्याची संधी मिळाली. जेऊर शाळेत काम करताना अक्कलकोट तालुक्यातील पहिली आय एस ओ शाळेचा सन्मान मिळाला.पुढं प्रिसिजन कंपनीशी नातं जोडलं गेलं. पहिल्या टप्प्यातील ई लर्निंग कीट शाळेला मिळाला.राज्यस्तरीय शैक्षणिक वारीसाठी निवड झाली.सोलापूर विज्ञान केंद्र येथे व्हर्चूअल फिल्ड ट्रीप च्या माध्यमातून १० हजार  पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विज्ञान केंद्रातील उपक्रम वसंतपुरे यांनी दाखविले.

       कोविड काळात सव्वा लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना  दैनिक अभ्यासमालेची पी डी एफ पुरवली. आपल्याबरोबर जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवलं .चालू शैक्षणिक वर्षात डिजिटल डिस्ट्रीक्ट रिपोजीटरी या उपक्रमाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या क्रांतीकारकांची व क्रांतीस्थळांची माहिती संकलित करून केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवर प्रसारित करत एका वेगळ्या उपक्रमाची नोंद त्यांनी त्याही ठिकाणी ठेवली.

             विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत असताना त्यांना अनेक थोर व्यक्तीचा परीसस्पर्श झाला. मुलांसोबत त्यांचंही जीवन आनंददायी आणि सुवर्णमय झाल्याची भावना ते व्यक्त करतात.

Wednesday, 22 November 2023

8.शेती आणि शिक्षणाचं चालतं बोलतं विद्यापीठ .....

 डिजिटल क्लासरूमच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांना आजही अभिमान आहे तो आपण घेतलेल्या आनंददायी शिक्षणाचा, शिक्षकांनी मारलेल्या छडीचा.... आजही त्यांना त्या आठवणी ताज्या वाटतात. शेणानं सारवलेल्या वर्गाची आणि गुरुजींकडून खाल्लेल्या माराची आठवण कित्येकदा ते आपल्या मुलांना सांगतात.

असा सुखद अनुभव देणारे एक अविस्मरणीय शिक्षक आजही कार्यरत आहेत. ते म्हणजे प्रेमानं, मायेनं, प्रत्यक्ष निरीक्षणातून, प्रयोगातून आणि परिसर भेटीतून शिक्षण सोपे करून सांगणारे अरण ( ता. माढा) येथील संत सावतामाळी विद्यालयाचे तानाजी इंगळे सर ! 

             विज्ञानातील पाठ असो अथवा भूगोलातील घटक. प्रत्यक्ष शेतात जाऊन झाडं, झुडपं, फळं, फुलं, माती, खडक या सर्वांची माहिती देणं अथवा वर्गात तसा प्रसंग उभा करून अध्यापनात जिवंतपणा आणणं हा इंगळे सरांचा हातखंडा ! 

      निसर्गाची आवड आणि त्यावर इतके प्रेम की, संत तुकोबाच्या "वृक्षवल्ली, आम्हा सोयरे वनचरे..." 

हे स्वतः जगणारा अवलिया ही इंगळे सरांची पंचक्रोशीतील खरी ओळख!  


रान - शिवारातील हजारो झाडं, वेली, पशुपक्षी कीटक यांचा जीवनप्रवास आणि जीवनशैली अगदी मुखोदगत ! प्राणी, पक्षांचे आजार, झाडां- फळांवर होणारे रोग, त्यांवरील उपचार याची माहिती ते विद्यार्थ्यांना तर सांगतात मात्र अनेक शेतकरी सल्ला विचारत असतात... 

        वृक्ष लागवडीची भाषणं देणं सोपं. पण प्रत्यक्ष कार्यवाही शिकावी ती इंगळे सरांकडून. मित्रांचा अथवा पंचक्रोशीतील सामाजिक नेतृत्वांचा वाढदिवस इंगळे सरांनी स्वतः खड्डा खणून त्यामध्ये रोपण केलेल्या झाडाशिवाय साजरा होत नाही. स्वतः पिशवी तयार केलेली रोपे देऊन कसे चालेल? तर संबंधित लोक या रोपांची देखभाल करतात का याचा सातत्याने पाठपुरावा ही सरांची कार्यशैली! "पुढच्या वर्षी मी वाढदिवस साजरा करायला येणार आहे अशी हक्काची प्रेमाची धमकीही ते देवून जातात.." 


 असे सुमारे पाचशेच्यावर वडाचे महावृक्ष आसपासच्या दहा गावांत दिमाखात उभे आहेत. वडाच्या झाडाला गुट्टया बांधून रोपे तयार करण्याची पद्धत त्यांनी विकसित केली. आणि ही रोपे महिलांनी एकमेकींना दान करावित असा उपक्रम त्यांनी सुरू केला. प्रतिनिधिक स्वरूपात वृक्षाचा वाढदिवस ,दरवर्षी पर्यावरणदिनादिवशी मोडनिंबचे सुभाष वेदपाठक यांच्या शेतातील वडाच्या झाडाभोवती जमलेली मित्रमंडळी आणि त्यांच्या गराड्यात वृक्षप्रेमी इंगळे सर हा सोहळा बघण्यासारखा असतो...


    

     गेल्या दहा वर्षापासून परिसरातील सर्व शाळांमधून "फटाके मुक्त दिवाळी" , "प्रदूषण मुक्त भारत" द्वारे ते शाळांमध्ये जाऊन फटाक्यांचे दुष्परिणाम, कृत्रिम रंगातील विष, सिमोलंघणात हाकनाक बळी जाणारा आपटा आदी विषयी विद्यार्थ्यांशी हितगुज करतात. 

भारावलेले विद्यार्थी देखील फटाके न फोडण्याची,नैसर्गिक रंग खेळण्याची, आपटा वृक्ष जतनाची प्रतिज्ञा करतात. त्यांच्या सर्व कौटुंबिक परिस्थितीचा अभ्यास करून त्यांना जे हवं ते देणं अथवा सामाजिक घटकांकडून त्यांची गरज भागवणं हे त्यांचं नेहमीच कार्य .


   'शेतीचं चालतं बोलतं विद्यापीठ' म्हणून तानाजी इंगळे यांची सर्वत्र ओळख आहे. प्रत्यक्ष भेटीतून, गाव भेटीतून अथवा फोनवर विना मोबदला ते शेतकऱ्यांच्या पीक पाण्यावरील प्रश्नांच्या अडचणी सोडवतात. हा त्यांचा जणू छंदच !! 


इंगळे सरांच्या अफलातून शिक्षण पद्धती आणि समाजकार्याची दखल घेत सोलापूरच्या प्रिसिजन कंपनीने त्यांच्या शाळेला , पासवर्ड सारखे भन्नाट किशोरवयीन मासिक देऊ केले आहे." प्रिसिजन " च्या वतीने सोलंकरवाडी गावामध्ये सुरू असलेल्या 'चुलमुक्त गाव' योजनेतील गोबर गॅस निर्माण मध्ये प्रकल्प समन्वयक आहेत. 

 व्हॉईस ऑफ व्हॉईसलेस अभियान, पर्यावरण संरक्षण, माजी विद्यार्थी संस्था अशा अनेक संस्थांमार्फत चाललेल्या समाजकार्यात त्यांचा खूप मोठा सहभाग असतो.

Wednesday, 25 October 2023

7.साता समुद्रापार पोहोचलेल्या अक्षरमित्र गुरुजींची कहाणी


         शब्दांचं सौंदर्य आपल्या लेखणीतून साकारणारे ,मनाचे सौंदर्य शब्दातून कागदावर उतरवणारे ,अक्षरमित्र, अक्षरांचे जादूगार, अक्षरांचा बादशाह म्हणून सबंध जगभरात परिचित असणारे मंगळवेढा तालुक्यातील आसबेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अमित भोरकडे गुरुजी . 

       अगदी बालवयातच प्राथमिक शाळेतील गुरुजींनी  अक्षरलेखनाचे धडे द्यायला सुरुवात केली. सुंदर अक्षरांचे धडे गिरवता गिरवता त्यांनी आज भारतातच नव्हे तर जगभरात आपली कला पोहोचवली. लहानपणापासून गुरुजी फळ्यावर सुविचार लिहायचे सुंदर अक्षर हाच खरा दागिना. व्यक्तीच्या हस्तलेखनात त्यांचा स्वभाव दडलेला असतो. अक्षराला वळण लावत लावत स्वभावाला वळण लागलं. अतिशय नम्र ,शांत , सर्वांना मदतीचा हात देण्याची भावना. त्यांच्या या स्वभावाला कलेची जोड मिळाली जगभरातील अनेक माणसांशी त्यांची नाती जोडली गेली .  "कलेची गोडी अन् माणसं  जोडी " याप्रमाणं अगदी ग्रामीण भागातील लहान मुलांपासून ते वयोवृद्ध आजोबांपर्यंत सर्वांशीच अगदी तितक्याच निर्मळपणानं बोलणार हे व्यक्तिमत्व.  त्यांचे विद्यार्थी पाहतात. त्यांचं अनुकरण करतात. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की गुरुजींसारखं अक्षर मला कधी काढायला जमेल. दरवर्षी शाळेच्या सुरुवातीलाच गुरुजी तीस दिवसाचा अक्षर सुधारणा प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी घेतात. अक्षरांच्या उभ्या, आडव्या, तिरप्या रेषा, गोल, अर्धगोल इथपासून संपूर्ण बाराखडी कशा पद्धतीनं लिहायची याचा सराव ते घेतात. गुरुजींकडून अक्षराची वळणं  शिकायला मिळाल्यावर तासंतास अशीच अक्षरं गिरवावीत असं मुलांना वाटतं. हस्ताक्षर, रांगोळी, चित्रकला, कॅलिग्राफी ,फोटोग्राफी, क्राफ्ट ,गायन, वादन यासारख्या अनेक कलाकृती नि:स्वार्थपणे ते विद्यार्थ्यांना शिकवतात . विद्यार्थ्यांसोबतच राज्यातील हजारो शिक्षकांना वरील सर्व कलाकृतींचं प्रशिक्षण त्यांनी यूट्यूब च्या माध्यमातून दिलं आहे. दीडशे हून अधिक व्हिडिओची निर्मिती त्यांनी केली असून  जगभरात हस्ताक्षर लेखन ही कला त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली आहे. व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अनेक अक्षर प्रेमींना एकत्र करून ते मार्गदर्शन करतात. माझी शाळा माझा फळा या माध्यमातून राज्यातील शिक्षकांना फलक लेखन करण्याची दिशा त्यांनीच दिलेली आहे असं अनेक शिक्षक आवर्जून सांगतात.

       शिक्षण परिषद, बाल मेळावे, चर्चासत्रे, परिसंवाद अशा प्रत्येक ठिकाणी रांगोळी आणि हस्ताक्षर प्रशिक्षणासाठी त्यांना बोलावलं जातं. त्यांची समजून सांगण्याची पद्धत, हातचं न राखता भरभरून देणं  हे त्यांचे गुण अनेकांना भावतात.

 अक्षरांच्या दुनियेतील मितभाषी तपस्वी म्हणून गुरुजी सर्वांना परिचित आहेत.

      गुरुजींची आत्तापर्यंत तीन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. अक्षरलेखन या हस्तलिखित पुस्तकाच्या आजवर दहा हजाराहून अधिक प्रति विकल्या गेलेल्या आहेत .याशिवाय शिक्षकांसाठी फलकलेखन व बालकांसाठी हस्तलिखित गीतसंग्रह ही पुस्तके अतिशय दर्जेदार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी अक्षरांचा प्रचार व प्रसार करण्याचं ध्येय उराशी बाळगलं आहे. 

      असेन मी ....नसेन मी.... माझ्या अक्षरातून दिसेन मी ...हे त्यांच्या जीवनाचं जणू ब्रीदवाक्यच बनलं आहे. 

     मंगळवेढा ही जशी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते तशी ती आता कलाकारांची भूमी म्हणून देखील ओळखली जाऊ लागली आहे. मंगळवेढात स्वच्छंद आर्ट अकॅडमी ची स्थापना करून गणेश मंदिरातील रांगोळी पासून ते प्रत्येक शासकीय कार्यक्रम, लग्न समारंभ अशा प्रसंगी सुंदर राखोळी रेखाटनं हे त्यांचं आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचं आवडीचं काम. तंत्रज्ञानाच्या आणि संगणकावरील विविध प्रकारच्या लेखन शैलीच्या युगात सुद्धा विद्यार्थ्यांचं हस्ताक्षरावरचं प्रेम कमी झालेलं दिसून येत नाही याचं सर्व श्रेय  गुरुजींनाच जातं.

     ज्ञानदानाबरोबरच आनंदी जीवन जगण्यासाठी एखादी तरी कला आपल्याजवळ असावी या उद्देशानं त्यांनी मुलांसाठी अनेक  कलाकौशल्य शिकवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे .त्यांच्या शाळेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले सुंदर कलाकृतींचे कलादालन तयार केले आहे .  त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आलेले आहे . याशिवाय पंचायत समिती मंगळवेढा, सर फाउंडेशन महाराष्ट्र, अजंठा आर्ट अकॅडमी, नक्षत्रांचं देणं अशा विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं आहे.अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आम्हा सर्व शिक्षकांना अभिमान वाटतो .पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.


Sunday, 24 September 2023

6.पारंपारिक अध्यापन पद्धतीला तंत्रज्ञानाची जोड देणारे राहुल सुरवसे

  

             व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत माणसाचं जसं शिक्षण,समाज,आणि कुटुंब महत्त्वाचं ठरतं तसंच परिस्थिती सुद्धा तितकीच महत्त्वाची ठरते . राहुल सुरवसे यांच्या जीवनात सुद्धा त्यांची आर्थिक परिस्थितीच शिक्षक होण्याच्या प्रेरणेचं उगम स्थान ठरली. घरची शिक्षण पूर्ण करण्याइतकीही ऐपत नसल्यानं मोठया काका काकूंनी त्यांच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी स्वीकारली .

उपशिक्षक म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळे हिप्परगे येथे त्यांनी 15 वर्षे सेवा केली. के यान प्रोजेक्टर ते मोबाईल संगणक बस असा त्यांचा अद्वितीय प्रवास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी पोषक ठरला. याच काळातील शैक्षणिक कार्यानिमित्त त्यांना शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग असा डॉ. मार्डीकर शिक्षक सक्षमता पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोकुतांडा, तालुका उत्तर सोलापूर येथे त्यांनी 7 वर्षे सेवा केली. प्रिसिजन फाउंडेशन आणि सर फाउंडेशन यांच्या सहकार्यानं शाळा डिजिटल स्मार्ट झाली. सोलर पॅनलयुक्त, टॅब स्कूल अशी उल्लेखनीय शाळेची ओळख सोलापूर जिल्ह्यात झाली. त्यामुळे गुजरात आणि राजस्थान येथून संचालक साहेब आणि अधिकारी यांच्या शाळेस भेटी झाल्या. विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाला. डिजिटल शैक्षणिक क्रांती ज्यांच्यामुळे झाली असेल संदीप गुंड सर यांनी शाळेस भेट दिली.लोकुतांडा शाळेतील पाचवीतील दोन विदयार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आले. त्या काळात जि.प. सोलापूर यांचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला. सहा वर्षात तीन वेळा वार्षिक स्नेह संमेलन घेवून द्विशिक्षकी शाळेत सुद्धा रु.एक्कावन्न हजाररुपये लोकसहभाग जमा केला.. कोरोना काळात राबविलेले उपक्रम पाहून राज्यस्तरावर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत वेबिनार द्वारे सादरीकरण करण्याची संधी त्यांना मिळाली.त्यातील समाजमंदिरातील भोंग्याद्वारे शिक्षण हा अभिनव प्रयोग यशस्वी ठरला.शाळेत विविध उपक्रम, डिजिटल शिक्षणावर अधिक भर देत अध्ययन अध्यापन प्रक्रिया अधिक रंजक करण्यात त्यांचा हातखंडा आहे. याही शाळेत त्यांनी जवळजवळ सत्तर हजार रुपये पर्यंत लोकसहभाग जमवून शाळेच्या भौतिक गरजा व आधुनिक तंत्रज्ञानासाठी निधी गोळा करण्याचा प्रयत्न केला.

           सतत नवीन अध्यापन पद्धती आणि जुनी अध्यापन पद्धती यांचा मेळ घालत अध्यापनात नवनवीन प्रयोग करत राहणं हे त्यांना लागलेलं शिक्षणाचं वेडच! प्राथमिक शिक्षकाच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा म्हणजे त्यांची बदली . आता गुरुजींची बदली जि.प.शाळा गुळवंची येथे झाली. नवीन शाळेत नावीन्यपूर्ण असं काय करता येईल ? हा विचार मनात येत असतानाच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे राज्यस्तरीय व्हर्चुअल क्लास ई-बालभारती मध्ये त्यांची निवड झाली. इयत्ता पहिली इंग्रजी आणि इयत्ता चौथी परिसर अभ्यास विषयाचे पाठ घेण्यासाठी त्यांना संधी मिळाली. कोरोना काळात जिल्हा परिषद सोलापूर युट्युब चॅनल साठी पूर्वी केलेल्या कामाचा अनुभव याठिकाणी त्यांना उपयोगी पडला . वर्गातलं अध्यापन अधिक आनंददायी होण्यासाठी साहित्याचा वापर, तंत्रज्ञानाचा अवलंब, कृती, उपक्रम, स्वाध्याय, स्वयं अध्ययन यांचा देखील येथे विचार करावा लागला. राज्यातील सॅटेलाईट वरून जोडल्या गेलेल्या ७६१ शाळांना यूट्यूब लाईव्ह पाहण्याची संधी ई बालभारतीने त्यांना उपलब्ध करून दिली. राज्यातील शिक्षकांसोबत आणि विद्यार्थ्यांसोबत चर्चा करता आली. 

      इयत्ता पहिली ते दहावी च्या विद्यार्थ्याना सर्व विषय व्हर्चुअल क्लास रूपानं या एकाच मंचावरून शिकण्याची सुवर्ण संधी विद्या परिषदेनं उपलब्ध करून दिली. आजपर्यंत 26 वर्षाच्या सेवेत त्यांनी वस्तुरूपानं आणि रोख स्वरुपात मिळून जवळ जवळ 14 लाख रुपयांचा लोकसहभाग मिळवला. याशिवाय प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम इंग्रजी अभ्यास मंडळा मध्ये ते सदस्य आहेत .

बालभारती च्या इयत्ता १ली, २ री व ३ री इंग्रजी पाठ्यपुस्तक निर्मिती मध्ये सहभाग घेण्याची संधी त्यांना मिळाली.

कॉन्व्हर्सेशन स्किल,माझे शैक्षणिक साहित्य लॅंग्वेज गेम्स, अशा पुस्तकांचं लेखन सुद्धा त्यांनी केलं आहे..ई लर्निंग , स्वयंअध्ययन साहित्य , डिजिटल शाळा, भाषिक खेळ, उपक्रम यातून रंजक अध्ययन अध्यापन.

.शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तर विविध पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

राज्य अभ्यासक्रम आराखडा २०२३ उपसमिती सदस्य म्हणून राज्यस्तरावर त्यांची निवड झाली आहे.

Saturday, 16 September 2023

5.नाविन्यपूर्ण उपक्रमातून प्रतापसिंह मोहिते साधतात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास

 ...


               ग्रामीण भागात वाडी वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या शाळेत मन लावून काम करणारे, विद्यार्थ्यासोबतच समाजात मिसळून शाळेच्या भौतिक गरजा त्यांच्याकडून पूर्ण करून घेणारे अनेक शिक्षक आपल्याला दिसतात. मुख्य रस्त्यापासून आणि शहरापासून थोडंसं दूर असल्यानं त्यांचं काम त्यांच्या शाळेपुरतच मर्यादित राहतं कधीकधी. खरंतर शिक्षकांनी केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम,गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न हे त्यांच्या पुरते मर्यादित न राहता ते सर्वदूर पोहोचले पाहिजेत जेणेकरून त्यांच्या एखाद्या उपक्रमातून इतरांनाही काहीतरी नवीन मार्ग सापडतो.

               प्रतापसिंह नाशिकराव मोहिते हे त्यातीलच एक.सतत काहीतरी नवीन करण्याचा ध्यास घेतलेला अवलिया शिक्षक.अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमातून विद्यार्थ्यांचा विकास घडविणारे.त्यांनी शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय काम तर केले आहेच शिवाय सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यातही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.बालभारती, एससीइआरटी मध्ये राज्य व जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमात तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम करताना आपल्या उपक्रमातून तालुक्यातील इतर शिक्षकांना प्रेरित करण्याचं काम त्यांनी केलं आहे.राष्ट्रीय स्तरावरील एज्युकेशनल कॉन्फरन्स मध्ये विविध राज्यांच्या प्रतिनिधींसोबत सहभागी होऊन विचारांची देवाणघेवाण करून विद्यार्थ्यांना प्रयोगशील बनवण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं आहे.त्यांनी मार्गदर्शन केलेल्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेमध्ये,तालुका जिल्हास्तरावर सन्मान मिळवला आहे.

               विविध आंतरराष्ट्रीय दिन उपक्रमात सहभाग व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांना संधी मिळण्यासाठी शाळेत युनिस्को स्कूल क्लबची स्थापना जिल्ह्यात सर्वप्रथम त्यांनी केली.विद्यार्थ्यांना ज्ञानरचनात्मक अध्यापन पद्धतीनं अभ्यासाची गोडी लावली.शाळेत विविध उपक्रम विद्यार्थी आणि सहकारी शिक्षकाच्या सहाय्याने सुरू केले.तंत्रज्ञान वापरून ई लर्निंग द्वारे अध्यापनात नावीन्यता आणली.त्यांनी राबविलेल्या ज्ञानरचनावादी उपक्रमाचं कौतुक तत्कालीन सीईओ अरुण डोंगरे व राजेंद्र भारुड साहेब यांनी स्वतः त्यांच्या शाळेत येऊन केलं होतं.

                100% विद्यार्थी उपस्थित रहावे म्हणून शाळेत परिपाठापासून नवनवीन उपक्रम राबवण्यात आले.राज्य शासनानं सुरु केलेल्या शिकू आनंदे कार्यक्रमात त्यांनी उत्कृष्टरित्या सादरीकरण केलं,अवांतर वाचनात गोडी लागावी म्हणून शनिवार माझ्या गोष्टीचा या संकल्पनेची मुहूर्तमेढ रोवली.शाळेत अनेक गोष्टीची पुस्तके आणून विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावली. शिक्षक पालक यांच्यात योग्य समन्वय रहावा यासाठी विद्यार्थी वाढदिवस ते स्वतः स्वखर्चानं शाळेत पालकासमवेत साजरा करतात. त्यातून भेट वस्तूच्या रूपात शालेय भौतिक सुविधांची पूर्तता करतात .पालक-महिला मिळावे, माता पालकांच्या विविध स्पर्धा , व्यावहारिक ज्ञान मिळावे म्हणून शाळेत बाल आनंद बाजार, सांस्कृतिक कार्यक्रम,विद्यार्थी दिन, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचा वापर,विविध कलाकृती बनवण्यासाठी कला,शिक्षणाची वारी,शाळेत सहलीच्या माध्यमातून मंदिर, किल्ला व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, मुलांच्या प्रवेशासाठी गुढीपाडवा अन पट वाढवा उपक्रम यासारख्या अनेक उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी श्री मोहिते यांनी केली आहे.

                 आपत्कालीन स्थितीत मदतीची भावना वाढीस लागण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पुरग्रस्त भागात विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने बिस्किट पुड्यांचे वाटप त्यांनी विद्यार्थी खाऊच्या रकमेतून केले, ग्रीन स्कूल ग्रीन व्हिलेज अंतर्गत वृक्ष लागवड,रक्षाबंधन दिवशी शाळेतील मुलींनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस दादांना राखी बांधण्याचा कार्यक्रम, सैनिकांना राखी पाठवण्याचा उपक्रम, होळी सणा निमित्त गावातील कचऱ्याची व अविचारांची होळी असे विविध उपक्रम मोहिते यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येतात.विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी म्हणून विद्यार्थ्यांचे बचत खाते उघडण्यात आले,त्यातूनच पोस्टामार्फत बचत शाळा म्हणून शाळेचा गौरव झाला.

                     आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून फक्त आपल्या शाळेपुरतं  मर्यादित न राहता महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पनेतून विकास व्हावा यातून पत्नी माधुरी (प्राथमिक शिक्षिका) यांच्या संकल्पनेतून शाळा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेची निर्मिती केली.या माध्यमातून विद्यार्थी हिताच्या अनेक संकल्पना प्रत्यक्षात उतरवल्या. कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद असताना ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण देणं  असो वा शोध गुणवंताचा ही पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबविणं  असो यातून विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र होण्यास खारीचा वाटा उचलण्याची संधी त्यांना मिळाली.त्याचबरोबर ऑनलाइन वुईथ माय चित्रकला स्पर्धा,कोण होणार फास्टर फिंगर मास्टर प्रश्न मंजुषा स्पर्धा, महाराष्ट्राचा शिववक्ता ही वक्तृत्व स्पर्धा, डॉ अब्दुल कलाम वाचन अभिवादन स्पर्धा,टॉपर सामान्यज्ञान परीक्षा,फास्टर गणित स्पर्धा असे विविध उपक्रम राज्यस्तरावर राबवून विद्यार्थ्यांचे कौशल्य विकसित करण्याचा प्रयत्न सातत्यानं त्यांनी केला आहे. शहीद जवानांच्या स्मारकांना भेटीतून मानवंदना देणं हे वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम त्यांनी हाती घेतले. त्याचबरोबर गावातील सैनिकांना शाळेत बोलून त्यांचा सन्मानही केला .मोहिते यांना कुटुंबीयांची साथ नेहमीच मिळत असते.स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छता अभियान,निवडणूक कार्य,मतदार जागृती ,राष्ट्रीय सेवा योजनेत जनजागृती,भारत स्काऊट गाईड अंतर्गत कब बुलबुल युनिटची स्थापना,गोवर लसीकरण मोहिमेत सहभाग,केंद्रस्तर स्वच्छता मॉनिटर म्हणून निवड,त्याचबरोबर भारत सरकारच्या विविध मंत्रालयाच्या वतीनं आयोजित ऑनलाइन प्रतिज्ञा उपक्रमामध्ये सहभाग घेऊन राष्ट्रीय स्तरावरील प्रमाणपत्र प्राप्त केलं आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन ,स्वच्छता शपथ, मृदा संवर्धन, नमामी गंगे ,संविधान दिन ,एकता दिन ,इंधन बचत, हुंडाबंदी ,महिला हक्क, टीबी फ्री इंडिया यासारख्या उपगक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे.शाळा सिद्धी राज्यनिर्धारक म्हणून ही काम पाहिलं आहे.मूल्यवर्धन कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी केल्याने राज्य स्तरावरील पुस्तकात त्यांची दखल घेण्यात आली आहे.ई बालभारती च्या माध्यमातून सध्या सुरु असलेल्या व्हर्चुअल क्लाससाठी त्यांची निवड झाली आहे.

                 प्रतापसिंह मोहिते यांनी केलेल्या कार्याचा आलेख पाहून अनेक संस्थांनी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं आहे. नुकतंच त्यांना आयसीटीसी पुरस्कारानं मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आलं आहे.त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय शिक्षक संमेलना मध्ये शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान झाला आहे,राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव पुरस्कार,शिक्षकरत्न पुरस्कार,मनोरमा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार ,शांतीलाल मुथा फाउंडेशनचा मूल्यवर्धन पुरस्कार ,रोटरी क्लबचा राष्ट्र शिल्पकार पुरस्कार ,राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार, लोकमत एक्सलंट टीचर अवॉर्ड,आविष्कार फाऊंडेशन शिक्षक सन्मान, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शिक्षक सन्मान, लायन्स शिक्षकरत्न पुरस्कार, सर फाऊंडेशनचा जिल्हास्तरीय प्रयोगशील शिक्षक सन्मान,शिक्षक व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमांमध्ये पारितोषिक, पंचायत समिती गुणवत्तापूर्ण विद्यार्थी शिक्षक म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे.सध्या ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यानगर वसाहत साकत ता-बार्शी येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.

             सतत नवनवीन उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करताना सहकारी शिक्षकांचं, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख,विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांचं खूप योगदान मिळतं असं ते आवर्जून सांगतात.

Sunday, 3 September 2023

4. करकंब परिसरात लेकीचं झाड या उपक्रमामुळे वृक्षारोपण अभियानाला मिळतेय गती..



        प्रत्येक व्यक्ती काहीतरी वेगळी कला घेऊन जन्माला येत असते. आपल्या मधली ही सुप्त कला एकदा का आपल्याला गवसली की, मग तो अनेक संकटातून मार्ग काढत ती कला जोपासण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. शिक्षणाची अडथळ्याची शर्यत पार करत आलेले असेच एक पखवाज , तबला वादक आणि समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेले करकंब तालुका पंढरपूर येथील समाजशील शिक्षक ज्ञानेश्वर दुधाने! 

          भजनगायक आजोबा पंढरीनाथ दुधाणे यांच्या मुळे घरात लहानपणापासूनच त्यांना भजनाची आवड निर्माण झाली. आणि त्यांनी तबला शिकायला सुरुवात केली.ते दहावी दोन वेळा नापास झाले. आता पुढं काय करावं? असा प्रश्न पडला.१९९२ साली ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात ते सामील झाले,त्यावेळी त्यांचे अनेक नातेवाईक वारीत सहभागी झाले होते.इथच काकांनी त्यांना पुढं शिकण्याचा सल्ला दिला. आणि परत फॉर्म भरुन तिसऱ्या वेळेस ते दहावी पास झाले.

        त्यांना हॉटेल मॅनेजमेंट ची आवड होती मात्र घरातील सर्व सांप्रदायिक कुटुंब असल्यानं प्रवेश घेतला. पण लगेचच घरातून नकार आला. मग घेतला डी. एड.ला प्रवेश आणि शिक्षक व्हायचं पक्क ठरवलं. पखवाज शिक्षणही चालूच होतं.पं.दुर्गाप्रसाद मुजूमदार,पं.गोविंद भिलारे यांच्याकडे त्यांनी काही वर्ष शिक्षण घेतलं. २००६ साली आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम गायक पं.शौनक अभिषेकी यांचा परिसस्पर्श लाभला.आणि त्यांना त्यांच्या मुळे महाराष्ट्रातील सर्व ख्यातनाम कलाकारांना आज पर्यंत पखवाज साथ करण्याचं भाग्य लाभलं.महाराष्ट्रा बरोबर जम्मू काश्मीर, हरियाणा, दिल्ली, छत्तीसगड,गुजरात, कर्नाटक अशा राज्यातही मोठमोठे कार्यक्रमात ते सहभागी झाले,आणि जगातील सर्वात मोठ्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवातही त्यांनी साथ दिली.अभिजात शास्त्रीय संगीत प्रचार आणि प्रसारासाठी गेली अनेक वर्ष संगीत महोत्सवाचे यशस्वी आयोजन ते करत असतात.

          हे सर्व करत असताना शाळेकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं नाही.अनेक मुलं स्कॉलरशिप परिक्षेत उत्तीर्ण झाली . व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत चमकली.शाळा हेच दैवत मानून आजपर्यत २३ वर्षात ज्या ज्या शाळा मिळाल्या त्या त्या शाळेचं नंदनवन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा बरोबर प्रत्येक शाळा हिरवीगार करण्याचा प्रयत्न केला.सध्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकर वस्ती शाळेत २५००० रुपये खर्च करून शाळा हिरवीगार केली आहे. येथील पालकांनी जवळपास ५लाखाचा निधी जमवून शाळेच्या सर्वं भौतिक गरजा पूर्ण केल्या आहेत. आई-वडिलांचं पूजन मुलींसाठी सायकल बँक यासारखे उपक्रम त्यांनी शाळेत सुरू केले.

      स्वरपंढरी पंचायत समितीच्या गीतमंचातून अनेक शाळांमधून कार्यक्रम सादर केले. सोलापूर जिल्हा परिषद,पंचायत समिती पंढरपूर यांचे आदर्श शिक्षक पुरस्कार ,संगीत क्षेत्रातील सोलापूरचा शिवरंजनी कला गौरव पुरस्कार ,पंढरी कला गौरव पुरस्कार पंढरपूर,असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले.

      अचानक वडिलांचा मृत्यू झाला १३ दिवसाचा कालावधी १३ दिवस स्मशानभूमी स्वच्छ करुन पाळला.आणि सामाजिक पर्यावरण आणि स्वच्छता या कार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतलं . सर्व तरुण युवकांच्या आणि महिलांच्या सहकार्यानं करकंब मध्ये 'करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम',जागर स्वच्छता अभियान टीमची स्थापना केली. आणि करकंब गावच्या प्रवेशद्वाराजवळच ४०० ते ५०० झाडं लावून ती जोपासण्याचं काम त्यांनी सुरू केलं.खर म्हणजे झाडं लावणं खूप सोपं! पण जोपासनं तसं कठीणच. या कामात परिसरातील हजारो हात त्यांच्या मदतीला धावले.ही झाडं आता डौलानं डोलत आहेत. माहेरला गेलेल्या प्रत्येक मुलीच्या नावानं आणि आलेल्या प्रत्येक मुलीच्या नावानं ही झाडं आपली लेक म्हणून वाढवली जातात. करकंब परिसरातील अनेक लेकी या उपक्रमासाठी पुढं आल्या.

        झाडांबरोबरच जागर स्वच्छता अभियान टीम चं कामही सुरू झालं. प्रत्येक रविवारी सकाळी दोन तास एक विभाग गेली दोनवर्ष अखंडपणे स्वच्छ करीत असताना माणसांची मनं आणि त्यांची मानसिकता बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला.

     महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही दखल घेऊन अभिनंदनपर पत्र दिलं.हे काम करीत असतानाच सहकारी मित्रांच्या सल्यानं एकलव्य अभ्यासिकेचा संकल्प केला. यामधून विविध स्पर्धापरीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल असा दुधाने यांना विश्वास वाटतो.

     नादब्रह्म कला फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम ते राबवितात. ११मुलांना शिक्षणासाठी त्यांनी दत्तक घेतले असून त्यांच्या शिक्षणाचा खर्च ते त्यांच्या सर्व टीम मार्फत करणार आहेत. अशा या अष्टपैलू शिक्षकास प्रोत्साहित करत हातात हात घालून सर्व युवक वर्ग कामाला लागला आहे.

3.मोडनिंब च्या अशोक ढोबळे यांचा मिशन स्कॉलरशिप पॅटर्न

 


    पुणे सोलापूर रस्त्याच्या कडेला मोडनिंब हे एक शहरवजा गाव! मिरच्यांची बाजारपेठ म्हणून पूर्वीच्या काळी प्रसिद्ध असलेल्या या गावानं अलीकडच्या काळात राजकीय, सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रासोबतच शैक्षणिक क्षेत्रात खूपच क्रांती केलेली दिसून येते. सहा सात खाजगी शैक्षणिक संस्था असतानासुद्धा मुलांमुलींसाठी 900 च्या आसपास पट असणाऱ्या दोन शाळा इथल्या विविध उपक्रमामुळे आणि स्पर्धा परीक्षेच्या यशामुळे आजही टिकून आहेत. याचं सर्व श्रेय गुणवत्तेसाठी कष्ट घेणारे इथले शिक्षक, त्यांना सहकार्य करणारे पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थ यांचेच.

        इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती आणि नवोदय परीक्षेसाठी सतत ज्यादा तास घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना सलग यश मिळवून देणारे इथले अशोक ढोबळे सर..

          जून 2018 साली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं.1 मोडनिंब येथे बदलीने उपशिक्षक म्हणून ते रुजू झाले. पालक व ग्रामस्थांकडून मोडनिंब सारख्या पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या गावातील जिल्हा परिषद शाळेमधून शिष्यवृत्ती,नवोदय, सैनिक स्कूल यांसारख्या परीक्षांमध्ये विद्यार्थी यशस्वी का होत नाहीत? याबाबत पालकांमध्ये सतत होणारी चर्चा आणि त्यावर उपाययोजना यासाठी ... सर्व शिक्षकांनी अंतर्मुख होऊन विचार केला.आपल्या शाळेचं नाव चांगल्या गोष्टींसाठी चर्चेत यावं आणि गावाच्या शाळेकडून शालेय स्पर्धापरीक्षा संदर्भानं ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात या उद्देशानं तत्कालीन केंद्रप्रमुख रामकृष्ण केदार यांच्या मार्गदर्शनाखाली 'मिशन स्कॉलरशिप' हा उपक्रम त्यांनी सुरू केला.

         या उपक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी रात्र अभ्यासिका, मॉर्निंग स्टडी,गेस्ट लेक्चर, प्रॅक्टीस टेस्ट,मॉक टेस्ट, ऑनलाईन वर्ग इत्यादी उपक्रम त्यांनी विद्यार्थ्यांसाठी राबवले . शाळेच्या वेळेव्यतिरिक्त जादा तास घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं . अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचे सराव प्रश्नसंच त्यांच्याकडून सोडवून घेतले. त्यांच्यामध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण केली. सहशिक्षिका जयश्री शिंदे यांच्या सोबत श्री ढोबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि तब्बल आठ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. पैकी एक विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत आला, एका विद्यार्थ्याची नवोदय विद्यालय पोखरापूरसाठी निवड झाली तर एका विद्यार्थ्याची सैनिक स्कूल चंद्रपूरसाठी निवड झाली.

          हे दैदिप्यमान यश त्यांना केवळ एका वर्षात मिळालेले नाही तर इयत्ता पहिलीपासूनच त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यास सुरुवात केली होती. कोरोना महामारीच्या संकटकाळामध्ये सुद्धा मुलांचं शिक्षण थांबू नये म्हणून त्यांनी 'शाळा बंद पण शिक्षण चालू' या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास व टेस्ट घेत त्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू दिला नाही.

           एक मार्चपासूनच इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमाला त्यांनी सुरुवात केली.एकही दिवस सुट्टी न घेता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये देखील ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं शिक्षण चालूच ठेवलं.

     शाळा सुरू झाल्यावर स्कॉलरशिपचा स्वतंत्र वर्ग करून विद्यार्थ्यांना आठवड्यातून चार दिवस स्कॉलरशिपचा अभ्यासक्रम तर दोन दिवस नवोदयचा अभ्यासक्रम सुरू केला.शनिवारी आणि रविवारी देखील सुट्टी न घेता अतिरिक्त पूरक मार्गदर्शन आणि सराव चाचण्या घेतल्या.शाळा सुटल्यानंतर रात्र अभ्यासिका व शाळा भरण्यापूर्वी मॉर्निंग स्टडी घेन्याचा विद्यार्थ्यांना फायदा झाला. या काळात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक शिक्षणाबरोबरच त्यांनी दिवसभर कोणता आहार घ्यावा,आरोग्य कसं सांभाळावं, भावनिक संतुलन कसं ठेवावं, यासंदर्भानंही मुलांची काळजी घेतली. मुख्य परीक्षेपूर्वी शाळेमध्येच परीक्षेसारखे कृत्रिम वातावरण निर्माण करत विद्यार्थ्यांच्या मॉक टेस्ट घेतल्या.


त्यांनी विद्यार्थ्यांकडून स्कॉलरशिपच्या 200 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका मुख्य परीक्षेपर्यंत सोडवून घेतल्या.प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर आव्हानात्मक प्रश्नांविषयी वर्गामध्येच चर्चा केली.मुलांच्या शंकांचे निरसन केले . यामुळेच शिष्यवृत्ती , नवोदय परीक्षा आणि सैनिकी स्कूल परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना एवढे मोठे यश मिळाले. नुकत्याच झालेल्या तालुकास्तरीय शिष्यवृत्ती कार्यशाळेमध्ये विविध स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन केले.


        शिष्यवृत्ती सोबतच दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, स्वच्छ शाळा सुंदर शाळा,ध्यास गुणवत्तेचा,दशसूत्री कार्यक्रम, एक मूल एक झाड,ऑनलाईन वर्ग आदी अनेक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन ते यशस्वी केले आहेत.इंग्रजी आणि मराठी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे. सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची हातोटी ज्या शिक्षकांमध्ये आहे ते शिक्षक शाळा विद्यार्थी आणि गावामध्ये कायापालट करू शकतात हे याचं उत्तम उदाहरण आहेअशा या गुणी शिक्षकांमुळे शाळेचा पट वाढण्यास नक्कीच मदत होते यात शंकाच नाही..


Monday, 21 August 2023

1.शिष्यवृत्तीचा पापरी पॅटर्न

         


दत्तात्रय बहिरू डोके

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पापरी तालुका मोहोळ


     दहावी परिक्षेत चांगले गुण मिळाले.मेडिकल, इंजिनिअरिंग या क्षेत्राकडं जावं असा सल्ला अनेकांनी दिला; पण आपल्या गुरुजींच्या सल्ल्या- नुसार श्री. दत्तात्रेय बहिरू डोके यांनी डी. एड ला प्रवेश घेतला. डीएड पूर्ण करून माळशिरस तालुक्यातील 'जांबुड' येथे ते रूजू झाले. तिथं त्यांनी आपला अध्यापनाचा ठसा उमटवत शिष्यवृत्ती आणि इतर शैक्षणिक उपक्रमात मोलाची कामगिरी केली.बदलीने मोहोळ तालुक्यातील पापरी येथे रुजू झाले. तेथे गावकरी व शिक्षक यांच्या मध्ये गैरसमजुतीतून मोठी तक्रार होऊन पटसंख्या बरीच कमी झालेली होती. तात्पुरता आदेश घेऊन पापरी या शाळेत ते रुजू झाले. नंतर त्यांच्या पाठोपाठ आणखी काही शिक्षक रुजू झाले, सर्वांनी मिळून शाळेचा कायापालट करण्याचा निश्चय केला. त्यासाठी त्यांनी शाळेच्या वेळे व्यतिरिक्त चा वेळ देऊन ज्यादा तास घेण्यास सुरुवात केली.  

      शिष्यवृत्ती परीक्षेपूर्वी महिनाभर रात्र अभ्यासिका सुरू करून मार्गदर्शन केले.

शिष्यवृत्ती परीक्षेत सुरुवातीला एक-दोन वर्ष यश मिळाले नाही; पण 1999 ला एक 7वीचा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाला तेव्हापासून चालू वर्षापर्यंत खंड न पडता प्रत्येक वर्षी सरासरी 8 ते 10 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक होत गेले. चालू वर्षी तर 8 वी चे तब्बल 31 विद्यार्थी N.M.M.S.परीक्षेत तर 10 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आले .यासाठी डोके गुरुजींनी अवघड वाटणारा गणित विषय सोपा केला. स्वतःच्या काही अध्यापन पद्धती निर्माण केल्या . गणित या विषयाचे अखंडपणे सलग 25 वर्षे मार्गदर्शन करत शक्ती परीक्षेसाठी स्वतःला वाहून घेतले.यासाठी ते व त्यांचे सहकारी शाळा सुरू होण्यापूर्वी 1 तास आणि सुटल्यानंतर 1 तास असे मार्गदर्शन करतात. एवढेच नाही तर रविवार व इतर सुट्टी दिवशी ही मार्गदर्शन तासिका सुरू असतात. याला दीपावली सुट्टी सुद्धा अपवाद नाही. याचा परिणाम म्हणूनच वर्ग शाळेतले जवळ जवळ 150 पेक्षा अधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झालेले आहेत. प्रत्येक वर्षी वर्गशिक्षक कोणीही असो डोके गुरुजी व त्यांचे सहकारी मार्गदर्शनाचं काम अखंडपणे करत असतात.

         मुलींची पट नोंदणी, उपस्थिती, सावित्रीबाई फुले दत्तक मुलींसाठी दत्तक निधी गोळा करणं यात भरीव काम केल्यानं त्यांना जि.प.सोलापूर ने सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्या नंतर अनेक वेळा संधी मिळूनही डोके गुरुजींनी इतर कोणता ही पुरस्कार घेतले नाही. उलट आपल्या सहकाऱ्यांना अधिक प्रेरणा मिळावी म्हणून त्यांना पुरस्काराची संधी दिली.

         त्यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षकांना गणित विषयाचं मार्गदर्शन केलं. जि.प.सोलापूर ,पंचायत समिती मोहोळ,पंढरपूर ,माढा येथे गणित शिष्यवृत्ती अध्यापन कसं करावं याबाबत मार्गदर्शन केलं. 

            आतापर्यंत जि. प. सोलापूर चे प्रदीपजी मोरे ,सुमनताई शिंदे , संजय राठोड यांनी डोके गुरुजींच्या वर्गास अचानक भेट दिली होती. त्यात त्यांना जे वेगळे पण जाणवलं त्याचा उल्लेख शिक्षक मार्गदर्शन कार्यशाळेत अनेकदा त्यांच्याकडून झाला. डोके सरांना हा एक बहुमानच वाटतो. आपल्या सेवाकाळात आजपर्यंत

डोके गुरुजींनी सहकार्याच्या मदतीनं अनेक उपक्रम राबविले त्यामध्ये प्रामुख्यानं

हरवले सापडले विभाग ,वर्षभर एकही दिवस गैरहजर नसणाऱ्या विद्यार्थ्यांचा 1 मे ला गौरव करणं,शाळेच्या सुट्टीच्या वेळेत रोज स्पीकरवर गीतं बालगीतं, ऐकवणं, वर्ग बचत बँक ,पाढे पाठांतर स्पर्धा ,गीत गायन स्पर्धा ,अंधश्रध्दा निर्मूलन कार्यक्रम,प्रश्नमंजुषा स्पर्धा ,स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन ,क्रीडा स्पर्धा मार्गदर्शन इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे.उत्कृष्ट कामाबद्दल डोके गुरुजींना दोन आगाऊ वेतनवाढी देऊन जिल्हा परिषदेने त्यांचा गौरव केला आहे.

       डोके गुरुजी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कामामुळे पापरी शाळेस वेगवेगळे आतापर्यंत 10 पुरस्कार मिळाले आहेत .पापरी शाळा टीम वर्क मुळे सर्वच स्पर्धांमध्ये सतत आघाडीवर असते. यात स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धा, व्यक्तिमत्व विकास स्पर्धा,नवोदय प्रवेश परीक्षा , क्रीडा स्पर्धा इ. शालेय उपक्रमांचा समावेश आहे.

     यामुळेच परिसरातील आठ ते दहा गावातील मुले पापरी शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे पापरी शाळेचा पट सध्या तब्बल 750 होऊन सर्वाधिक पटाची जिल्ह्यातील ही एकमेव शाळा आहे, जागेअभावी प्रवेश बंद करण्याची वेळ आलेली आहे,याची दखल घेऊन जि. प. सोलापूर चे C.E.O. दिलीप स्वामी यांनी शाळेत आठवीच्या वर्गाला खास बाब म्हणून परवानगी दिलेली आहे.

     अध्यापनात नाविन्य म्हणून डोके सर व त्यांचे सहकारी ओव्हरहेड प्रोजेक्टर, L.E.D. चा वर्ग अध्यापनात उपयोग करताना दिसतात.डोके गुरुजींनी मुलांमधे गणित विषयाची आवड निर्माण केल्यानं बरेच विद्यार्थी सध्या मोठे पॅकेज घेऊन नामांकित कंपनी मधे इंजिनिअर आहेत. एक विद्यार्थी तर 1.25 कोटी पॅकेज घेऊन जपान मध्ये नोकरी करत आहे. यामुळेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेबांनी शाळेस सदिच्छा भेट दिली होती. या सर्व शाळेच्या यशात डोके गुरुजी सतत आपल्या शाळेच्या टीम वर्क ला महत्त्व देताना दिसतात....



2.विद्यार्थ्यांसाठी नवनवीन उपक्रम राबविणाऱ्या शिक्षिका..

 


         प्रिया राहुल सुरवसे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेला





     आज आपण एका अशा शिक्षिकेबद्दल वाचणार आहोत ज्यांना खरंतर शिक्षिका व्हायचच नव्हतं. पण लहानपणीच वडिलांचं छत्र हरवलं. त्यांची प्रिय मुलगी आईला परिस्थितिशी झगडताना पाहत होती निर्माण झालेल्या परिस्थितीमुळं  तिनं कॉम्प्युटर इंजिनीयरला झालेल्या निवडीला डावलून आईचं शिक्षिका होण्याचं स्वप्न पूर्ण 

                    आज त्या केवळ शाळेतच नव्हे तर जिल्ह्यात व राज्यातही त्यांच्या विविध उपक्रमांमुळे नावारूपाला आल्या आहेत.जिल्हा परिषद शाळा बेलाटी येथे सध्या कार्यरत असलेल्या प्रिया राहुल सुरवसे त्यांच्या विविध शैक्षणिक उपक्रमामुळे सबंध राज्याला परिचित आहेत

    त्यांनी  अक्कलकोट तालुक्यातील दोड्याळ येथे नोकरीचा शुभारंभ केला तेथून त्यांची बदली झालेली कळताच गावकऱ्यांनी त्यांची बदली रद्द करण्यासाठी दाखवलेली एकजूट त्यांच्या कामाची पोचपावती देऊन जाते


उत्तर सोलापूर येथील तळे हिप्परगा येथे इंग्लिश भाषा विकासाकरिता व तंत्रज्ञान वाढीकरिता 'saturday is english day. तसेच किशोरवयीन मुलींमध्ये होणाऱ्या शारिरीक बदलाची व मानसिक बदल बद्दल जागरूक करण्याकरिता 'खास माझा तास तुझा 'हा नाविन्यपूर्ण उपक्रम त्यांनी राबविला. ज्यामुळे IL@FS कंपनीनं अभ्यासक्रम असलेला प्रोजेक्टर ,कॉम्प्यूटर लॅब त्यांच्या शाळेला दिली

              उत्तर सोलापूर मधील तरटगाव अतिशय खराब रस्ता आणि खडतर परिस्थिती परंतु आपल्या लाघवी स्वभावामुळे व हार न मानण्याच्या वृत्तीमुळे प्रिसीजन फौंडेशन, सर फौंडेशन व गावकरी यांच्या मदतीने 3 लाखाचा अविश्वसनिय लोकसहभाग गोळा करून शाळा डिजिटल बनवून शाळेचा पट वाढविला

ज्याची दखल राज्यस्तरावर घेतली गेली 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या मार्फत विविध विभागात शाळेची यशोगाथा करिता निवड झाली


त्यांनी शिक्षण क्षेत्रात राबविलेल्या अनेक उपक्रमांच्या योगदानामुळे आत्ता पर्यंत त्यांना विविध संस्था व जिल्हा शिक्षण विभागाने अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.केवळ शिक्षण क्षेत्रातच न्हवे तर सामाजिक व साहित्य क्षेत्रातही उल्लेखनीय सहभाग नोंदवला .महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे याकरिता गावातील महिलांना रुखवतीचे सामान बनवण्याचे प्रशिक्षण आयोजित केले.केंद्रातील महिलांसाठी कार्यानुभव साहित्य बनवणे कार्यशाळा त्यांनी घेतल्या आहेत .प्रत्येक शाळेत त्या मुलींचे लेझीम पथक तयार करतात तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे विद्यार्थी लोकनृत्य स्पर्धा व टॅलेंट हंट स्पर्धा यात जिल्हास्तरावर निवडल्या गेल्या आहेत. जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेत त्यांचे उपक्रम बक्षीस प्राप्त ठरले आहे

  लग्नानंतर पती ,दोन मुली ,सासू सासरे संसाराची कर्तव्य बजावत त्यांनी आपल्या शिक्षणातही वाढ केली , त्या BA(english)B.ed .MA (eduacation) पदवीधारक आहेत. आपली वाचनाची आवड जोपासत त्या विविध विषयांवर मार्मिक लेखनही करतात.   दैनिक सकाळ ,तरुण भारत, पुण्यनगरी, सारथी मासिक,काव्यप्रेमी दिवाळी अंकात त्यांचे लेख व कविता छापून आलेल्या आहेत.त्यांची स्वलिखित ५पुस्तके , प्रातिनिधीक 3 पुस्तके व एक मनस्विनी काव्यसंग्रह प्रकाशित आहे.  तसेच विविध शैक्षणिक ,कौटुंबिक,सामाजिक कार्यक्रमाचे सूत्रसंचलन त्या करतात

           कोरोना काळात 'शाळा बंद पण शिक्षण चालू ' यात त्यांनी पारावरची शाळा,स्वाध्याय पुस्तिका वाटप,ऑनलाइन तास उपक्रम हाती घेऊन शैक्षणिक नुकसान होऊ दिले नाही.जिल्हा परिषद सोलापूर मार्फत कोरोना काळात जिल्हास्तरीय व्हिडिओ निर्मित मध्ये सक्रिय सहभाग त्यांचा होता

         शाळा पूर्व तयारी उपक्रम सेल्फी पॉईंट यामुळे विक्रम दादा अडसूळ व ज्योतीताई बेलवले यांच्या मार्गदर्शनाखाली  राज्यस्तरीय 'शिकू आनंदे' या उपक्रमात त्यांनी आपला ठसा उमटवला.तसेच सध्या राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व बालभारती यांच्या संयुक्त विद्यमानाने राबविला जात असलेला 'virtual classroom'  लाईव्ह शिकवणे यात त्या इयत्ता पहिली engilsh व इयत्ता दुसरी मराठी भाषेकरिता निवडल्या जाऊन महाराष्ट्र राज्यातील अनेक शाळांमधील मुलांशी संवाद साधून ज्ञानाची देवाण घेवाण सौ. सुरवसे करत आहेत