प्रत्येक व्यक्ती काहीतरी वेगळी कला घेऊन जन्माला येत असते. आपल्या मधली ही सुप्त कला एकदा का आपल्याला गवसली की, मग तो अनेक संकटातून मार्ग काढत ती कला जोपासण्याचा आणि वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. शिक्षणाची अडथळ्याची शर्यत पार करत आलेले असेच एक पखवाज , तबला वादक आणि समाजकार्यासाठी स्वतःला वाहून घेतलेले करकंब तालुका पंढरपूर येथील समाजशील शिक्षक ज्ञानेश्वर दुधाने!
भजनगायक आजोबा पंढरीनाथ दुधाणे यांच्या मुळे घरात लहानपणापासूनच त्यांना भजनाची आवड निर्माण झाली. आणि त्यांनी तबला शिकायला सुरुवात केली.ते दहावी दोन वेळा नापास झाले. आता पुढं काय करावं? असा प्रश्न पडला.१९९२ साली ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात ते सामील झाले,त्यावेळी त्यांचे अनेक नातेवाईक वारीत सहभागी झाले होते.इथच काकांनी त्यांना पुढं शिकण्याचा सल्ला दिला. आणि परत फॉर्म भरुन तिसऱ्या वेळेस ते दहावी पास झाले.
त्यांना हॉटेल मॅनेजमेंट ची आवड होती मात्र घरातील सर्व सांप्रदायिक कुटुंब असल्यानं प्रवेश घेतला. पण लगेचच घरातून नकार आला. मग घेतला डी. एड.ला प्रवेश आणि शिक्षक व्हायचं पक्क ठरवलं. पखवाज शिक्षणही चालूच होतं.पं.दुर्गाप्रसाद मुजूमदार,पं.गोविंद भिलारे यांच्याकडे त्यांनी काही वर्ष शिक्षण घेतलं. २००६ साली आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ख्यातनाम गायक पं.शौनक अभिषेकी यांचा परिसस्पर्श लाभला.आणि त्यांना त्यांच्या मुळे महाराष्ट्रातील सर्व ख्यातनाम कलाकारांना आज पर्यंत पखवाज साथ करण्याचं भाग्य लाभलं.महाराष्ट्रा बरोबर जम्मू काश्मीर, हरियाणा, दिल्ली, छत्तीसगड,गुजरात, कर्नाटक अशा राज्यातही मोठमोठे कार्यक्रमात ते सहभागी झाले,आणि जगातील सर्वात मोठ्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवातही त्यांनी साथ दिली.अभिजात शास्त्रीय संगीत प्रचार आणि प्रसारासाठी गेली अनेक वर्ष संगीत महोत्सवाचे यशस्वी आयोजन ते करत असतात.
हे सर्व करत असताना शाळेकडेही त्यांनी दुर्लक्ष केलं नाही.अनेक मुलं स्कॉलरशिप परिक्षेत उत्तीर्ण झाली . व्यक्तिमत्त्व विकास स्पर्धेत चमकली.शाळा हेच दैवत मानून आजपर्यत २३ वर्षात ज्या ज्या शाळा मिळाल्या त्या त्या शाळेचं नंदनवन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासा बरोबर प्रत्येक शाळा हिरवीगार करण्याचा प्रयत्न केला.सध्याच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाफळकर वस्ती शाळेत २५००० रुपये खर्च करून शाळा हिरवीगार केली आहे. येथील पालकांनी जवळपास ५लाखाचा निधी जमवून शाळेच्या सर्वं भौतिक गरजा पूर्ण केल्या आहेत. आई-वडिलांचं पूजन मुलींसाठी सायकल बँक यासारखे उपक्रम त्यांनी शाळेत सुरू केले.
स्वरपंढरी पंचायत समितीच्या गीतमंचातून अनेक शाळांमधून कार्यक्रम सादर केले. सोलापूर जिल्हा परिषद,पंचायत समिती पंढरपूर यांचे आदर्श शिक्षक पुरस्कार ,संगीत क्षेत्रातील सोलापूरचा शिवरंजनी कला गौरव पुरस्कार ,पंढरी कला गौरव पुरस्कार पंढरपूर,असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले.
अचानक वडिलांचा मृत्यू झाला १३ दिवसाचा कालावधी १३ दिवस स्मशानभूमी स्वच्छ करुन पाळला.आणि सामाजिक पर्यावरण आणि स्वच्छता या कार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतलं . सर्व तरुण युवकांच्या आणि महिलांच्या सहकार्यानं करकंब मध्ये 'करकंब गावच्या लेकीचं झाड अभियान टीम',जागर स्वच्छता अभियान टीमची स्थापना केली. आणि करकंब गावच्या प्रवेशद्वाराजवळच ४०० ते ५०० झाडं लावून ती जोपासण्याचं काम त्यांनी सुरू केलं.खर म्हणजे झाडं लावणं खूप सोपं! पण जोपासनं तसं कठीणच. या कामात परिसरातील हजारो हात त्यांच्या मदतीला धावले.ही झाडं आता डौलानं डोलत आहेत. माहेरला गेलेल्या प्रत्येक मुलीच्या नावानं आणि आलेल्या प्रत्येक मुलीच्या नावानं ही झाडं आपली लेक म्हणून वाढवली जातात. करकंब परिसरातील अनेक लेकी या उपक्रमासाठी पुढं आल्या.
झाडांबरोबरच जागर स्वच्छता अभियान टीम चं कामही सुरू झालं. प्रत्येक रविवारी सकाळी दोन तास एक विभाग गेली दोनवर्ष अखंडपणे स्वच्छ करीत असताना माणसांची मनं आणि त्यांची मानसिकता बदलण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही दखल घेऊन अभिनंदनपर पत्र दिलं.हे काम करीत असतानाच सहकारी मित्रांच्या सल्यानं एकलव्य अभ्यासिकेचा संकल्प केला. यामधून विविध स्पर्धापरीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फायदा होईल असा दुधाने यांना विश्वास वाटतो.
नादब्रह्म कला फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम ते राबवितात. ११मुलांना शिक्षणासाठी त्यांनी दत्तक घेतले असून त्यांच्या शिक्षणाचा खर्च ते त्यांच्या सर्व टीम मार्फत करणार आहेत. अशा या अष्टपैलू शिक्षकास प्रोत्साहित करत हातात हात घालून सर्व युवक वर्ग कामाला लागला आहे.
No comments:
Post a Comment