शाळेच्या भौतिक सुविधामध्ये सिंहाचा वाटा उचलणारे गोरख राऊत गुरुजी
बरडा वरची शाळा म्हणून ओळखली जाणारी माळरानावरची जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा अरण. शाळेचा शताब्दी महोत्सव सध्या सुरू आहे. एकही झाड ज्या ठिकाणी रुजत नव्हतं, टिकत नव्हतं, फुलत नव्हतं अशा ठिकाणी आज ही शाळा निसर्ग शाळा म्हणून ओळखली जाते. ज्येष्ठ कवी विठ्ठल वाघ यांनी तर ही शाळा पाहून रवींद्रनाथांच्या शांती वनातील शाळा असा उल्लेख केला होता.
याच शाळेत 2001 पासून तन-मन-धनाने झोकून देऊन काम करणारे गोरख राऊत गुरुजी यांचं या शाळेचं रूप पालटवण्यात खूप मोठा वाटा आहे.
दरवर्षी 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिना दिवशी अरण आणि तुळशी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पट्टी, पेन्सल, पाटी, पॅड, पेन, कंपासपेटी अशा स्वरूपात जवळ जवळ पंधरा हजार रुपया पर्यंतचे शैक्षणिक साहित्याचे वाटप गोरख राऊत गुरुजी आणि त्यांचे सहकारी मित्र पोपट पाटील सर हे करतात. त्यांचे हे कार्य गेले पंधरा वर्षे सतत अविरतपणे सुरू आहे.
स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. इयत्ता पाचवी नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेचे जादा तास दररोज ते घेतात. यामध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना दरवर्षी यशही मोठ्या प्रमाणात मिळालेलं आहे. आतापर्यंत नवोदयसाठी 3 आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये 31 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकास स्पर्धा, गुणवत्ते साठी विविध उपक्रम, स्वखर्चाने आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीनिमित्त वाटप केल्या जाणाऱ्या साहित्याच्या वाटपासोबतच लोकसहभागातून, शैक्षणिक उठावातून, आजी-माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने शाळेतील भौतिक सुविधांमध्ये कशाप्रकारे वाढ होईल यावर सतत काम करून एखाद्या खाजगी नामांकित संस्थेसारखी शाळा उभी केली आहे. शाळेतील सर्व शिक्षकांना सोबत घेऊन त्यांच्या प्रयत्नातून अरण शाळेत कोरोना काळात एक मोठे सभागृह उभे राहिले आहे. सध्या चालू असलेल्या शाळा शताब्दी महोत्सवानिमित्त शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने किलबिल बालोद्यान शाळेत उभे केले आहे .
शाळेचे माजी विद्यार्थी पोपट पाटील यांच्या सहकार्यातून केलेला आर्थिक मदतीतून पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे नूतनीकरण करण्यात आले. शाळेसमोरील मैदानावर पेपर ब्लॉक टाकून घेतले. मुलांच्या मदतीने रंगरंगोटी करून शाळेच्या भिंती बोलक्या करण्यात आल्या. या सर्व कार्यात गोरख राऊत सर गुरुजी अग्रेसर असतात. त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार ,तालुक्याचा गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका शांता वाघमोडे मॅडम यांच्या प्रोत्साहामुळे गोरख राऊत गुरुजी आणि त्यांचे शिक्षक सहकारी यांच्या मदतीने अरण शाळेची इमारत आज डौलात उभी आहे.