होय! कर्णबधिर बालके बोलू शकतात! असे सांगणारे योगेशकुमार भांगे गुरुजी
ऐकू आणि बोलता न येणाऱ्या बालकांच्या पालकांचा आधारस्तंभ. समस्त पालकांमधील सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्व. सतत सहानुभूतीच्या ओझ्याखाली वाकलेल्या, न्यूनगंडतेणं पछाडलेल्या, दैवापुढंही हात टेकलेल्या आणि काही मुलांना तर बिनधास्त वाऱ्यावर सोडून दिलेल्या पालकांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालण्याचं काम करणारे कानाने बहिरा मुका परी नाही हे आपल्या प्रसूंनच्या माध्यमातून समाजाला दाखवत कर्णबधिर बालकांसाठी रात्रंदिवस झटणारे योगेशकुमार भांगे गुरुजी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांडेकर वस्ती तुळशी ता. माढा येथे सध्या ते कार्यरत आहेत.
मोहोळ तालुक्यातील शेटफळ हे त्यांचं मुळगाव. पहिल्यापासूनच स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वांची घडण यासाठी भांगे हे प्रयत्नशील असतात. सतरा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक करणं, सेमी इंग्रजीचा पायलट प्रोजेक्ट अस्तित्वात आणणं, आदर्श पालक सभा आणि बावी शाळेतील 14 लाखांचा शैक्षणिक उठाव, विद्यार्थ्यांचं जनरल रजिस्टर एक्सेल शीट मध्ये यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी साहेबांकडून झालेलं खास कौतुक हे त्यांच्या शैक्षणिक कार्यातील अविस्मरणीय क्षण.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी काम करता करता त्यांना सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. आपला मुलगा जन्मतः कर्णबधिर असल्याचं तपासात निष्पन्न झालं आणि तो बोललाच पाहिजे यासाठी वाटेल ते करण्याची तयारी ठेवत पत्नी जयप्रदा यांना सोबत घेऊन स्पीच थेरपी प्रोजेक्ट सुरू केला. आलेलं संकट हे संकट न मानता संधी मानून समाजातील अशा असंख्य मुक्या मुलांना बोलतं करण्याचं शिवधनुष्य भांगे दाम्पत्यांनी उचललं. हे कार्य खरोखरच बोलत्या माणसांनाही नि:शब्द करतं. प्रसूनसारखीच समाजातील अनेक कर्णबधिर बालकं त्यांना भेटत गेली. जवळपास 160 मुला-मुलींना स्पीच थेरपीचे धडे मिळाले. कर्णबधिर पालकांच्या डोळ्यापुढचं प्रश्नचिन्ह निघून गेलं. आणि त्यांना योग्य ठिकाण सापडलं .बोलवाडी! शेटफळ. पत्नीला सोबत घेऊन सहकारी मित्रांच्या सहाय्यानं व्हॉइस ऑफ व्हॉइसलेस अभियान सुरू झालं. प्रिसिजन कॅमशाफ्ट सोलापूर, बालाजी अमाईन्स, लोकसत्ता , यासारख्या असंख्य देणगीदारांच्या सहकार्यातून शेटफळ मध्ये बोलवाडी प्रोजेक्ट उभा राहिला.कधीच न बोलता येणारी मुलं बोलू लागली.
राज्याच्या 2018 च्या अर्थसंकल्पात प्रत्येक कर्णबधिर बालकांसाठी एक लाख रुपयांची तरतूद करण्यात आली.योगेश भांगे आणि जयप्रदा भांगे यांनी लिहिलेल्या 'होय कर्णबधिर बालके बोलू शकतात!' या पुस्तकाचं नाव या योजनेला देण्यात आलं.
मुकेपणा निर्मूलनासाठी घरातली ताट वाटी तुमच्या बाळाचा मुकेपणा वाचवू शकते. हा मोलाचा संदेश देणारी ताट वाटी चाचणी आधी महाराष्ट्राला आणि नंतर संपूर्ण भारताला माहिती झाली. याच चाचणीतून जिल्ह्यातील चार हजार पाचशे अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी दोन लाख सत्याऐंशी हजार बालकांची ताटवाटी चाचणी घेतली. त्यातून 89 कर्णबधिर बालके आढळली. संस्थेने या बालकांवर सलग तीन वर्षे उपचार केले आज ही सर्व बालके बोलायला शिकली आहेत आणि जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकत आहेत. ... या ताट वाटी चाचणीलाच पुढे राज्यस्तरावर विविध प्रकारचे यश मिळत गेले.आणि याच मोहिमेमुळं कर्णबधीरत्वाबाबत जागृती होण्यास मदत झाली.
मसूरी येथे देशातील आयएएस अधिकाऱ्यांना देण्यात येणाऱ्या प्रशिक्षणामध्ये ताट वाटी चाचणी या विषयावर सादरीकरण करण्याची संधी योगेश भांगे यांना मिळाली. याचाच एक भाग म्हणून अंगणवाडी ताईंना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचे एक मॉडेल तयार करण्याचे काम पुण्यामध्ये सुरू असून त्यांच्या अभ्यासक्रमात ताट वाटी चाचणीचा समावेश करण्यासाठीच्या कार्यशाळेत त्यांचा सहभाग आहे.
शैक्षणिक कार्यासाठी त्यांना वैयक्तिक तालुका, जिल्हा अथवा राज्य कोणत्याही प्रकारचा पुरस्कार मिळाला नाही. परंतु त्यांच्या चाललेल्या या समाजसेवी कार्यासाठी आजपर्यंत त्यांना सोलापूरचा पद्माकर देव स्मृति पुरस्कार, प्रिसीजनचा सुभाष रावजी शहा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, सर फाउंडेशन महाराष्ट्र यांचा पुरस्कार, छाया प्रकाश फाऊंडेशनचा ऊर्जा पुरस्कार , राष्ट्र सेवा दलाचा राज्यस्तरीय सामाजिक शिक्षक पुरस्कार, स्नेहालय - अहमद नगरचा सामाजिक कर्तृत्त्व पुरस्कार अशा अनेक समाजसेवी संस्थांनी गौरविले आहे.बहिरेपणा आणि मुकेपणा माहितीसाठी संस्थेचे संकेतस्थळ www.bolwadi.org
No comments:
Post a Comment