विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Wednesday, 20 December 2023

12.विद्यार्थ्यांना करोडपती करणारे ध्येयवेडे शिक्षक हनुमंत राऊत..

 विद्यार्थ्यांना करोडपती करणारे ध्येयवेडे शिक्षक हनुमंत राऊत..


तीन वर्षात 139 विद्यार्थ्यांना सत्तर लाखापेक्षा जास्त शिष्यवृत्ती



राज्यातली पहिली गणित प्रयोगशाळा


               स्वावलंबन हेच आमचे ब्रीद असा मूलमंत्र देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अंकोली येथील शाळेत अहोरात्र मेहनत करणारा ध्येयवेडा शिक्षक म्हणजे हनुमंत पांडुरंग राऊत. वक्तृत्व,कर्तृत्व आणि नेतृत्वाचं अंग असणाऱ्या राऊत सरांनी इयत्ता आठवी अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी त्यांच्याकडून करून घेणं आणि त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं. हे वेड डोक्यात घेतलं. अहोरात्र मेहनत करून कित्येक विद्यार्थ्यांना यशाचं नवं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. गुणवत्तेचा ध्यास घेतलेले प्रज्ञावंत गणित शिक्षक राऊत यांनी मागील तीन वर्षात भारत सरकार कडून घेतलेल्या एन एम एम एस परीक्षा , सारथी शिष्यवृत्ती परीक्षा , उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या स्पर्धा परीक्षेतून 139 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीधारक करून सत्तर लाखांपेक्षा जास्त शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळवून दिली. यावर्षी ही रक्कम एक कोटीच्या आसपास जाईल असा त्यांना विश्वास आहे. राऊत हे हाडाचे गणित शिक्षक सर्वत्र परिचित. गणित दृश्यमान पद्धतीनं शिकवून गणिताची भीती घालवणं व गणिती संकल्पना स्पष्ट करणं यासाठी त्यांनी राज्यातली पहिली गणित प्रयोगशाळा अंकोली इथं उभारली. यामध्ये दर्जेदार गणित साहित्य व वर्गवार कृतीपत्रिका यांचा समावेश आहे. आजवर अनेक शाळांनी व शिक्षकांनी या गणित प्रयोग शाळेस भेट देऊन अशा प्रकारच्या प्रयोगशाळा आपापल्या शाळांमध्ये उभ्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर गणित कट्टा, गणित जत्रा, गणिती बाजार अशा अनेक संकल्पनातून विद्यार्थ्यांना गणित सोपं करण्याचा प्रयत्न केला आहे.

 तत्कालीन मा शिक्षण सचिव नंदकुमार साहेब यांच्या संकल्पनेतून तयार केलेल्या मूलभूत गणिती प्रशिक्षणासाठी त्यांनी राज्य गणित प्रशिक्षक म्हणून काम केले आहे . महाराष्ट्रातील साधारण पाच हजार शिक्षकांना त्यांनी गणित सोपं करण्यासाठी प्रशिक्षण दिलं. ग्रामीण भागातील त्यांचे अनेक विद्यार्थी दहावी बोर्ड परीक्षेत गणित विषयात राज्यात प्रथम आले. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतून अधिकारी पदावर विराजमान झाले. श्री राऊत यांना आतापर्यंत सोलापूर मुख्याध्यापक संघाचा कृतीशी शिक्षक पुरस्कार, दयानंद डॉक्टर मार्डीकर शिक्षक सक्षमता पुरस्कार, रयत शिक्षण संस्थेचा उपक्रमशील शिक्षक पुरस्कार, यासारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत सलग तीन वेळा त्यांना पारितोषिक मिळाले आहे. शेकडो वक्तृत्व स्पर्धा, निबंध व काव्य वाचन स्पर्धांमध्ये त्यांना यश मिळाले आहे. अनेक मासिकातून त्यांचे गणित विषयाचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉ अनिल पाटील, विभागीय चेअरमन संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा परीक्षा विभाग उंचीवर नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. भविष्यातील शिक्षणाच्या संधी ओळखून आय आय टी - नीट फाउंडेशन अभ्यासक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिकवण्याचा त्यांचा मानस आहे.

No comments:

Post a Comment