विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Wednesday, 20 December 2023

11.कल्पकतेसह नवनवीन प्रयोग करणाऱ्या करुणा गुरव

 बदलती शिक्षण पद्धती, प्रत्येक पिढीनुसार वाढणारी विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, कल्पकता, शिक्षण पद्धतीत होणारा तंत्रज्ञानाचा वापर, सतर्क पालक, शिक्षक आणि समाज सुद्धा शिक्षणाची नवनवीन दारं शोधतो आहे. आज शिक्षकांनी शिकवायच्या अगोदरच विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना शिकवायचं तर आहेच पण त्याहीपेक्षा ते स्वतः कसे शिकतील याकडं शिक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी शिक्षक कल्पक आणि अध्यापनात नवनवीन प्रयोग करणारा असायला हवा. असेच शिक्षणामध्ये नवनवीन प्रयोग करत नवोपक्रम स्पर्धेत दरवर्षी भाग घेऊन यश मिळवणाऱ्या अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करजगी येथील करुणा गुरव मॅडम.

           एस सी ई आर टी मार्फत दरवर्षी नवोपक्रम स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेत राज्यातील कल्पक शिक्षक भाग घेत असतात. श्रीमती गुरव यांनी सलग सात वर्षे जिल्हास्तरावर व दोन वर्षे राज्यस्तरावर क्रमांक मिळवला. त्यांनी आजपर्यंत केलेले सर्व उपक्रम  नवोपक्रम लेखन एक तंत्र या पुस्तकात मांडले आहेत. शिक्षकी पेशात सर्जनशीलता फार महत्वाची असते.ती त्यांच्याकडं आहे . शैक्षणिक लेख-कविता लेखन, सूत्रसंचलन,तंत्रज्ञान याची आवड असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये ती रुजवणं  त्यांना फार अवघड गेलं नाही. 

      येणाऱ्या प्रत्येक पिढीला संगणकाचं  ज्ञान असायलाच हवं. आणि इंजीनियरिंगचे शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची पहिली पसंती असते ती कॉम्प्युटर . विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेपासूनच या गोष्टीचं ज्ञान मिळावं यासाठी त्यांनी शाळेत स्क्रॅच कोडींग व्हिडिओ निर्मिती सुरू केली . इयत्ता पाचवी चे पन्नास टक्के विद्यार्थी अशा प्रकारचे व्हिडिओ तयार करतात. शाळा कन्नड भागात असून लोकांची बोलीभाषा कन्नड आहे. त्यामुळं मराठीतून शिकवणं ही तर येथील शिक्षकांची खरी कसोटी असते.  ग्रामीण भागात स्क्रॅचकोडींगचं शिक्षण देणं ही खरंच कौतुकाची बाब आहे.

        मॅडमनी विद्यार्थ्यांसाठी यूट्यूब चैनल सुरू केलं. अभ्यासक्रमातले छोटे छोटे घटक विद्यार्थ्यांना त्या ऑनलाईन शिकवू लागल्या. आणि जवळजवळ सतराशे व्हिडिओ त्यांनी निर्माण केले. राज्यातील वीस हजार पेक्षा जास्त विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. आपल्या विद्यार्थ्यांना शिकवता शिकवता राज्यातील असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत त्या पोहोचल्या.विद्यार्थी  स्वतः शिकू लागले .

इयत्ता पहिलीचा स्मार्ट क्लास या त्यांच्या नवोपक्रमास जिल्ह्यात प्रथम तर राज्यात सातवा क्रमांक मिळाला. इंग्रजी वाचन कौशल्य हा त्यांचा आवडीचा घटक. यूट्यूब च्या माध्यमातून त्यांनी राज्यातील शिक्षक व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला .

       स्वतःसोबत आपले सहकारीही तंत्रस्नेही व्हावेत यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत एक महिनाभर राज्यातील शिक्षकांसाठी व्हिडिओ निर्मितीचे कौशल्य या विषयावर त्यांनी कार्यशाळा घेतल्या. याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व, कथाकथन, टॅलेंट हंट यासारख्या स्पर्धांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग असतो.

 आयसीटीसी प्रशिक्षणात यश मिळाल्यामुळं पाच लाखापर्यंतचे आठ संगणक संच व एक लॅपटॉप त्यांच्या शाळेला मिळाला . शिक्षणात त्यांनी आजही  खंड पडू दिला नाही. बीए दोन विषयात, एमए दोन विषयात, डी.एस.एम , जर्नालिझम,बी.एड,एम.ए.एज्युकेशन अशी शैक्षणिक उंची वाढवत विद्यार्थ्यांसोबत त्यांचंही शिकणं सुरूच आहे.








     .

No comments:

Post a Comment