परिसस्पर्श लाभलेले जिल्हा परिषदेचे गुरुजी...विजयकुमार वसंतपुरे
उपक्रमशील शिक्षकांना त्यांच्या सेवाकालात अनेक सन्मान,पुरस्कार,वेतनवाढी आणि पारितोषिके मिळत असतात.परंतु भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे.अब्दुल कलाम यांना आपला उपक्रम सादर करून, आपल्या मुलांना प्रेरणा मिळावी, यासाठी डॉ कलाम यांना ऑटोग्राफ ची विनंती करत असता, "यु आर डुइंग गुड वर्क" असे म्हणत शाळेच्या पोस्टरवर डॉ. कलाम यांनी दिलेला ऑटोग्राफ हा विजय सरांच्या जीवनातील आनंदाचा सर्वोच्च क्षण. त्याचबरोबर संगणक साक्षरता अभियान राबविल्याबद्दल परम संगणकाचे निर्माते थोर संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी तासभर वैयक्तिक दिलेलं ज्ञानामृत हा जीवनातील अतिशय चैतन्यदायी अनुभव होता.अशा दोन व्यक्तींचा परीसस्पर्श लाभलेले अक्कलकोट तालुक्यातील
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा,आंदेवाडी ( बु.) या शाळेतील उपक्रमशील शिक्षक विजय वसंतपुरे.
कौठाळी शाळेतली गुरुजींची पहिली नेमणूक . या शाळेत तेव्हा स्पर्धा परीक्षेचा सुवर्णकाळ होता.तालुक्यात सर्वोत्कृष्ट निकाल दिल्याबद्दल त्यांना जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. त्यांचं हस्ताक्षर सुंदर व देवनागरी कॅलीग्राफी लेखनकला अवगत असल्यामुळं जिल्हा परिषदेची सर्व प्रमाणपत्रे व कार्यक्रमपत्रिका लिहून देण्याचं काम गुरुजींकडं असायचं. स्वतःचं प्रमाणपत्र स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिणारा शिक्षक म्हणून कौतुक केलं जायचं. हीच अक्षरकला विद्यार्थ्यांमध्येही त्यांनी रुजवली. त्यांच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची अक्षरं सारखीच असायची.
पुढं गुरुजी सर फाउंडेशनशी जोडले गेले . उपक्रमशील शिक्षकांच्या सानिध्यात आले. आय आय एम अहमदाबाद येथे शाळेच्या १२ उपक्रमांची निवड झाली. डॉ कलाम साहेब यांच्या हस्ते त्यांना टीचर्स अँड ट्रान्सफॉर्मर्स हा पुरस्कार देवून गौरविण्यात आलं.या उपक्रमात आधार विद्यार्थी वित्तबँक, राणी लक्ष्मीबाई डिफेन्स क्लब, जीवनशाळा ,दैनिक तापमान नोंद,जी तारीख-तो पाढा,जीवनशाळा व सर्वत्र गौरविण्यात आलेला डॉ विजय भटकर संगणक साक्षरता अभियान यांचा समावेश होता.
गुरुजींना बालभारती मध्ये आय सी टी विषय समितीत तीन वर्षे काम करण्याची संधी मिळाली. जेऊर शाळेत काम करताना अक्कलकोट तालुक्यातील पहिली आय एस ओ शाळेचा सन्मान मिळाला.पुढं प्रिसिजन कंपनीशी नातं जोडलं गेलं. पहिल्या टप्प्यातील ई लर्निंग कीट शाळेला मिळाला.राज्यस्तरीय शैक्षणिक वारीसाठी निवड झाली.सोलापूर विज्ञान केंद्र येथे व्हर्चूअल फिल्ड ट्रीप च्या माध्यमातून १० हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विज्ञान केंद्रातील उपक्रम वसंतपुरे यांनी दाखविले.
कोविड काळात सव्वा लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दैनिक अभ्यासमालेची पी डी एफ पुरवली. आपल्याबरोबर जिल्ह्यातील असंख्य विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू ठेवलं .चालू शैक्षणिक वर्षात डिजिटल डिस्ट्रीक्ट रिपोजीटरी या उपक्रमाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याच्या क्रांतीकारकांची व क्रांतीस्थळांची माहिती संकलित करून केंद्र शासनाच्या वेब पोर्टलवर प्रसारित करत एका वेगळ्या उपक्रमाची नोंद त्यांनी त्याही ठिकाणी ठेवली.
विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करत असताना त्यांना अनेक थोर व्यक्तीचा परीसस्पर्श झाला. मुलांसोबत त्यांचंही जीवन आनंददायी आणि सुवर्णमय झाल्याची भावना ते व्यक्त करतात.
No comments:
Post a Comment