माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी माझी जबाबदारी
प्रस्तावना:
अचानक स्वप्नातून जागं व्हावं! वॉश बेसिन मध्ये जाऊन फ्रेश व्हावं! घरात कुणाला तरी सांगावं की मी आज खूप भयानक स्वप्न पाहिलं.. अशीच सारी परिस्थिती घडलेली....
पण खरं तर ते स्वप्न नव्हतच. एखादा चित्रपट काही क्षणात डोळ्यासमोरून तरळून जावा तशी गेल्या दोन वर्षातली जगातली सारी परिस्थिती मी स्वप्न रूपात पाहत होतो."I will embrace of freedom in thousand bond of delights I will never shut the door of my sense."रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली या महाकाव्यात सांगितल्याप्रमाणं ज्ञानेंद्रियांची कवाडं बंद करून अंधारमय जीवन जगणं क्षम्य नाही.वरील प्रमाणं मलाही शिक्षक म्हणून शिक्षण बंद होणं मान्य नाही. म्हणून माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मी माझी जबाबदारी निश्चित केली आहे.
सद्य परिस्थितीचं अवलोकन:
स्वप्नात असल्यासारख्याच बऱ्याच गोष्टी घडत होत्या. अचानक कोरोना सारखा महाभयानक रोग येतो काय! एका क्षणात जगाची स्पर्धा थांबवतो काय! स्टॅच्यू सारखी घरघरणारी यंत्र अचानक बंद काय पडतात! सारंच अनपेक्षित होतं. साऱ्या देशाची आर्थिक घडी ढासळत असताना, सारं जग चिंतेत होतं. अगोदर कशावर लक्ष केंद्रित करावं ?शेतकरी, आरोग्य, उद्योग धंदे, शिक्षण की जीवन मरण? हा प्रश्न साऱ्या मानवजातीला पडलेला असताना माझ्या माझ्या सारख्या सामान्य शिक्षकाच्या डोक्यात मात्र एकच विचार चालू होता, हे सारं खरं झालं! पण माझ्या वर्गाचं काय? माझ्या विद्यार्थ्यांचं काय आहे भविष्य? त्यांच्या बाबतीतली काय आहे माझी जबाबदारी? हजारो गोरगरीब सामान्य कुटुंबातील व्यक्तीं साठी ज्ञानाची कवाडं उघडणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्याप्रमाणे ज्ञानदेव घोलप या दुर्लक्षित विद्यार्थ्याला खांद्यावर घेऊन ज्ञानानं पारखा झालेल्या ज्ञानेश्वराला ज्ञान देऊन पंडित बनवलं .त्याच प्रमाणं वीटभट्ट्यांवर, रस्त्याच्या कडेला, कोणाच्यातरी बांधावर काम करणाऱ्या ज्ञानदेवाला शोधून शाळेत आणून ज्ञान देण्याची जबाबदारी माझी आहे.
शिक्षण क्षेत्रातलं हे नुकसान मात्र कधीच भरून न निघणारं . या क्षेत्रातून प्रत्यक्ष आर्थिक रुपानं उत्पादन नसल्यामुळं तसं हे क्षेत्र खूपच दुर्लक्षित राहिलेलं.
शिक्षक म्हणून माझी जबाबदारी:
आता लवकरच शाळा सुरू होईल. सारं काही पूर्वीसारखं सुरळीत चालू होईल अशी अपेक्षा आपण ठेवूयात. या दोन वर्षात खूप काही घडून गेलंय. दोन वर्षांपूर्वीची माझी अध्यापन पद्धती, माझ्या विद्यार्थ्यांची शिकण्याची गती, त्यावेळचं माझं अध्ययन अध्यापन साहित्य आणि आजचा विद्यार्थी, यामध्ये झालेला अमुलाग्र बदल, मी जाणून घेईन .आणि त्यानुसार मी सुद्धा माझ्या अध्ययन अध्यापनपद्धतीमध्ये बदल करून घेईन.
दरम्यानच्या काळात मुलं बराच वेळ घरी राहिल्यानं चिडचिडी झालेली आहेत. एकलकोंडी बनलेली आहेत. टीव्ही आणि मोबाईलचा छंद लागलेला आहे. अभ्यासाची बैठक कमी झालेली आहे. शारीरिक वाढीबरोबर बौद्धिक वाढीला कुठंतरी बाधा आलेली आहे. हे सारं मी शोधून काढेन. वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांना संपर्क करून त्यांना शाळेत आणण्याची जबाबदारी माझी असेल. विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही. त्याला शाळेची गोडी लागेल.पहिल्या सारखाच तो आनंदी वातावरणात शिकेल. शिक्षणाची गोडी लावण्याचे काम मी करणार आहे. या दोन वर्षाच्या काळात ग्रामीण भागातील मुलं शेतातील कामं करायला शिकली, शेळ्या-मेंढ्या पाळायला शिकली, आई वडिलांच्या कामात मुलं-मुली मदत करायला शिकली, आता मात्र आई वडिलांना विश्वासात घेऊन या कामातून त्यांना शाळेकडं वळवण्याची माझी पहिली जबाबदारी आहे.
पहिली मध्ये आल्यानंतर रांगोळी काढून हातामध्ये पुष्पगुच्छ देऊन मुलांच जसं आपण स्वागत करतो. अगदी तसंच आताही विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत केलं जाईल. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर टाकलेला विश्वासाचा हात, त्या हाताचा स्पर्श हाच विद्यार्थ्यांसाठी जगातला सर्वात मोठा पुरस्कार असतो. हा दृष्टिकोन समोर ठेवून माझ्या विद्यार्थ्याला अगोदर मी पूर्णपणे जाणून घेईन . ज्याच्या घरात शेणाचा वास आहे त्याच्या घरात सरस्वतीची वीणा झंकारायला लावणं ही माझी जबाबदारी आहे .ज्याप्रमाणं सावित्रीबाईंनी शेण झेलून मुलींना शिक्षण दिलं ,त्याचप्रमाणं पालकाला कोरोना फोबियातून समजूत घालून त्यातून त्याला बाहेर काढणं व त्याची नाळ शिक्षणाशी जोडणं ही माझी जबाबदारी आहे. शिक्षक हा समाजाचा थोरला भाऊ असतो. त्याच्या बोटाला धरून समाज पुढं जात असतो. म्हणून शिक्षकाचं मनगट हा समाजाचा माथाअसतो. माझ्या हाताच्या पाचही बोटाला शेकडो विद्यार्थी धरून शाळेत आणणं त्यांच्या अभ्यासातले अडथळे दूर करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे. माझ्या विद्यार्थ्याचं घर,त्याच्या आसपासचा परिसर, कोणत्या परिस्थितीतून तो शाळेत येतो याचा मी अभ्यास करेन. . प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक पातळी वेगळी असल्यानं, कुणाला काय शिकवावं याचं माझं नियोजन असणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलानं आणि त्यांच्या गतीनं शिक्षण देण्याची माझी जबाबदारी आहे. सब घोडे बारा टक्के या न्यायानं विद्यार्थी कधीच शिकणार नाही या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे.
म्हणून मी माझ्या वर्गाचे तीन टप्पे करेन. पहिल्या टप्प्याला फक्त मार्गदर्शनाची गरज असेल. ती मुलं अंगभूतच खूप हुशार चाणाक्ष आणि गतिशील असतात दुसऱ्या टप्प्याला मात्र शिकवण्याची गरज आहे त्यांना सतत पुढे चला पुढे चला असं म्हणत शिकवावं लागेल. आणि माझी खरी गरज आहे ती तिसऱ्या टप्प्यातील विद्यार्थ्यांना. इथं त्यांच्यासोबत बसून, त्यांच्या पाठीवर हात ठेवून, श्रवण भाषण वाचन लेखन गणिती क्रिया अशा प्रत्येक पायरीनं ,हळूहळू, न रागवता मला त्यांच्यातलच एक होऊन शिकवावं लागेल. त्यांचा सतत सराव घ्यावा लागेल. त्यांना काहीतरी येतंय ,ही भावना त्यांच्यामध्ये रुजवावी लागेल.आणि ते करण्यात मला अत्यानंद होईल यात तिळमात्र शंका नाही.
मी केलेलं अध्यापन ,त्यांना दिलेले शैक्षणिक अनुभव ,काही विद्यार्थी त्यांची सत्यता मोबाईलवर पडताळून पाहतील. यासाठी माझं अध्यापन बिनचूक स्पष्ट आणि निसंदिग्ध असेल.माझं बोलणं ,माझं चालणं, माझा पोशाख, माझं चारित्र्य हीच माझ्या विद्यार्थ्यांची भविष्यातली मोठी शिदोरी असेल. भविष्यात कधी चुकीचं पाऊल टाकताना, त्याला माझी आठवण होईल असंच मी त्याच्या समोर वागलं पाहिजे .या वयाततरी मीच त्यांचा आदर्श असलं पाहिजे.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी अगोदर त्यांना लिहिता-वाचता आलं पाहिजे. गणिती क्रिया आल्या पाहिजेत. मग मात्र आपण हवं तसं त्यांना घडवू शकतो .प्रत्येक विद्यार्थी एक वेगळी कला आणि वेगळा गुण घेऊन जन्माला आलेला असतो. या गोष्टीवर आपला विश्वास असायला हवा. प्रत्येक विद्यार्थ्याकडं नेमकं काय आहे. हे शोधणं, त्याची जाणीव त्याला करून देणंआणि त्या दिशेणं आपण त्याला घेऊन जाणं ही माझी सर्वात मोठी जबाबदारी असेल.
समजा मला त्याचा भाषिक विकास करायचा आहे. तर एखादा विषय त्यातील मुद्दे देऊन त्यावर कुणाला लेखन करायला लावणं, कुणाला भाषण करायला शिकवणं, कुणाला चित्र रेखाटायला सांगणं तर कुणाला कविता करायला शिकवणं अशी माझी शिकवण्याची पद्धती असेल.हे करण्यासाठी मग म्हणी, वाक्प्रचार, अलंकार समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, यासारख्या भाषिक कौशल्यांचा विकास करून लिखाणामध्ये याचा कसा वापर करतात हे शिकवावं लागेल. याचा सराव करायला लावायचा तो याचसाठी. घोकंपट्टी करून त्यांना परीक्षार्थी बनण्यापेक्षा व्यवहार कुशल आणि भाषा समृद्ध विद्यार्थी बनवणं केव्हाही चांगलंच. यासाठी गोष्टीची पुस्तकं वाचणं, वर्तमानपत्र वाचणं, हिंदी,इंग्रजी, मराठी रेडिओ, दूरदर्शन वरील बातम्या ऐकवणं यासारखे उपक्रम मी हाती घेईन. प्राथमिक स्तरावर गुणवत्ता गुणवत्ता म्हणजे यापेक्षा वेगळी काय असू शकते! आता मोबाईल वरून पुस्तकाकडं त्यांना वळवणं, हे माझ्यासाठी एक मोठं आव्हान असेल. मोबाईल हा जसा ज्ञानाचा खजिना आहे, तसाच तो विध्वंसक बॉम्ब सुद्धा आहे याची जाणीव त्यांना योग्यवेळी करून देणं ही माझी शिक्षक म्हणून नक्कीच जबाबदारी आहे.गुणवत्तावाढीसाठी मोबाईलचा कसा वापर करावा हे विद्यार्थ्याला सांगणं गरजेचं ठरेल.
मुलं ऐकतच नाहीत ही आईवडिलांची सततची तक्रार असते. मग त्यांना वर्गात बोलावून त्यांच्याही काही चुका होतात हे त्यांना पटवून देणं.. जसे की मुलांना बेडरूममध्ये अभ्यासाला बसून हॉलमध्ये टीव्ही बघत बसणं ,सतत त्यांच्या समोर मोबाइलवर बोलत बसणं, त्यांच्या देखत शेजाऱ्यांना नातेवाईकांना दूषणं देणं,
अभ्यासाला बसल्यानंतर सतत घरातली छोटी-मोठी कामं सांगणं इत्यादी इत्यादी.. या गोष्टींची पालकांना जाणीव करून देणंआणि गुणवत्ता वाढीमध्ये पालकांना सामावून घेणं ही माझी जबाबदारीआहे.
कथाकथन पद्धतीपेक्षा प्रयोग, प्रात्यक्षिक, शैक्षणिक साहित्याद्वारे, प्रत्यक्ष अनुभव ,प्रत्यक्ष भेटी, सहली यासारख्या उपक्रमांद्वारे माझं अध्यापन कसं प्रभावित होईल आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कसं पूरक होईल यासाठी सततचा माझा प्रयत्न राहील.
फलनिष्पत्ती:
अचानक उद्भवलेल्या कोरोणा सारख्या परिस्थितीमुळं समाजातील जनमाणूस खचला असताना संपूर्ण समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं काम माझं आहे. यामुळे पालक जागृत होतील शाळेचं गेलेलं वैभव पुन्हा प्राप्त होईल. विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण होईल. त्यांच्यामध्ये शिकण्याची आवड निर्माण होईल. कोरोना सारख्या रोगापासून बचाव करत शिक्षण कसं घ्यावं हे मुलं शिकतील. बिघडलेली घडी पुन्हा एकदा सावरली जाईल मी एक प्रामाणिक शिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली तर! आणि ती मी स्वीकारेन.