विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Wednesday, 6 October 2021

माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी माझी जबाबदारी

 माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी माझी जबाबदारी

प्रस्तावना:

           अचानक स्वप्नातून जागं व्हावं! वॉश बेसिन मध्ये जाऊन फ्रेश व्हावं! घरात कुणाला तरी सांगावं की मी आज खूप भयानक स्वप्न पाहिलं.. अशीच सारी परिस्थिती घडलेली....

पण खरं तर ते स्वप्न नव्हतच. एखादा चित्रपट काही क्षणात डोळ्यासमोरून तरळून  जावा तशी गेल्या दोन वर्षातली जगातली सारी  परिस्थिती मी स्वप्न रूपात पाहत होतो."I will embrace of freedom in thousand bond of delights I will never shut the door of my sense."रवींद्रनाथ टागोर यांनी गीतांजली या महाकाव्यात सांगितल्याप्रमाणं ज्ञानेंद्रियांची कवाडं बंद करून अंधारमय जीवन जगणं क्षम्य नाही.वरील प्रमाणं मलाही शिक्षक म्हणून शिक्षण बंद होणं मान्य नाही. म्हणून माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मी माझी जबाबदारी निश्चित केली आहे.

सद्य परिस्थितीचं अवलोकन:

         स्वप्नात असल्यासारख्याच बऱ्याच गोष्टी घडत होत्या. अचानक कोरोना सारखा महाभयानक रोग येतो काय! एका क्षणात   जगाची स्पर्धा थांबवतो काय! स्टॅच्यू सारखी घरघरणारी  यंत्र अचानक बंद काय पडतात! सारंच अनपेक्षित होतं. साऱ्या देशाची आर्थिक घडी ढासळत असताना, सारं जग चिंतेत होतं. अगोदर कशावर लक्ष केंद्रित करावं ?शेतकरी, आरोग्य, उद्योग धंदे, शिक्षण की जीवन मरण? हा प्रश्न साऱ्या मानवजातीला पडलेला असताना माझ्या माझ्या सारख्या सामान्य शिक्षकाच्या डोक्यात मात्र एकच विचार चालू होता, हे सारं खरं झालं! पण माझ्या वर्गाचं काय? माझ्या विद्यार्थ्यांचं काय आहे भविष्य? त्यांच्या बाबतीतली काय आहे माझी जबाबदारी? हजारो गोरगरीब सामान्य कुटुंबातील व्यक्तीं साठी ज्ञानाची कवाडं उघडणारे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ज्याप्रमाणे ज्ञानदेव घोलप या दुर्लक्षित विद्यार्थ्याला खांद्यावर घेऊन ज्ञानानं पारखा झालेल्या ज्ञानेश्वराला  ज्ञान देऊन पंडित बनवलं .त्याच प्रमाणं वीटभट्ट्यांवर, रस्त्याच्या कडेला, कोणाच्यातरी बांधावर काम करणाऱ्या ज्ञानदेवाला शोधून शाळेत आणून ज्ञान देण्याची जबाबदारी माझी आहे.

    शिक्षण क्षेत्रातलं हे नुकसान मात्र कधीच भरून न निघणारं . या क्षेत्रातून प्रत्यक्ष आर्थिक रुपानं उत्पादन नसल्यामुळं तसं हे क्षेत्र खूपच दुर्लक्षित राहिलेलं.

शिक्षक म्हणून माझी जबाबदारी:

          आता लवकरच शाळा सुरू होईल. सारं काही पूर्वीसारखं सुरळीत चालू होईल अशी अपेक्षा आपण ठेवूयात. या दोन वर्षात खूप काही घडून गेलंय. दोन वर्षांपूर्वीची माझी अध्यापन पद्धती, माझ्या विद्यार्थ्यांची शिकण्याची गती, त्यावेळचं माझं अध्ययन अध्यापन साहित्य आणि आजचा विद्यार्थी, यामध्ये झालेला  अमुलाग्र बदल, मी जाणून घेईन .आणि त्यानुसार मी सुद्धा माझ्या अध्ययन अध्यापनपद्धतीमध्ये बदल करून घेईन.

        दरम्यानच्या काळात मुलं बराच वेळ घरी राहिल्यानं चिडचिडी झालेली आहेत. एकलकोंडी बनलेली आहेत. टीव्ही आणि मोबाईलचा छंद लागलेला आहे. अभ्यासाची बैठक कमी झालेली आहे. शारीरिक वाढीबरोबर बौद्धिक वाढीला कुठंतरी बाधा आलेली आहे. हे  सारं मी शोधून काढेन.  वाडी वस्तीवरील विद्यार्थ्यांना संपर्क करून त्यांना शाळेत आणण्याची जबाबदारी माझी असेल. विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही. त्याला शाळेची गोडी लागेल.पहिल्या सारखाच तो आनंदी वातावरणात शिकेल. शिक्षणाची गोडी लावण्याचे काम मी करणार आहे.  या दोन वर्षाच्या काळात ग्रामीण भागातील मुलं शेतातील कामं करायला शिकली, शेळ्या-मेंढ्या पाळायला शिकली, आई वडिलांच्या कामात मुलं-मुली मदत करायला शिकली, आता मात्र आई वडिलांना विश्वासात घेऊन या कामातून त्यांना शाळेकडं वळवण्याची माझी पहिली जबाबदारी आहे.

    पहिली मध्ये आल्यानंतर रांगोळी काढून हातामध्ये पुष्पगुच्छ देऊन मुलांच जसं आपण स्वागत करतो. अगदी तसंच आताही विद्यार्थ्यांचं शाळेत स्वागत केलं जाईल.  शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या खांद्यावर टाकलेला विश्वासाचा हात, त्या हाताचा स्पर्श हाच विद्यार्थ्यांसाठी जगातला सर्वात मोठा पुरस्कार असतो. हा दृष्टिकोन समोर ठेवून माझ्या विद्यार्थ्याला अगोदर मी पूर्णपणे जाणून घेईन . ज्याच्या घरात शेणाचा वास आहे त्याच्या घरात सरस्वतीची वीणा झंकारायला  लावणं ही माझी जबाबदारी आहे .ज्याप्रमाणं सावित्रीबाईंनी शेण झेलून मुलींना शिक्षण दिलं ,त्याचप्रमाणं पालकाला कोरोना फोबियातून समजूत घालून त्यातून त्याला बाहेर काढणं व त्याची नाळ शिक्षणाशी जोडणं ही माझी जबाबदारी आहे. शिक्षक हा समाजाचा थोरला भाऊ असतो. त्याच्या बोटाला धरून समाज पुढं जात असतो. म्हणून शिक्षकाचं मनगट हा समाजाचा माथाअसतो. माझ्या हाताच्या पाचही बोटाला शेकडो विद्यार्थी धरून शाळेत आणणं त्यांच्या अभ्यासातले अडथळे दूर करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे.  माझ्या विद्यार्थ्याचं घर,त्याच्या आसपासचा परिसर, कोणत्या परिस्थितीतून तो शाळेत येतो  याचा मी अभ्यास करेन. . प्रत्येक विद्यार्थ्याची बौद्धिक पातळी वेगळी असल्यानं, कुणाला काय शिकवावं याचं माझं नियोजन असणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलानं आणि त्यांच्या गतीनं शिक्षण देण्याची माझी जबाबदारी आहे. सब घोडे बारा टक्के या न्यायानं विद्यार्थी कधीच शिकणार नाही या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे.

           म्हणून मी माझ्या वर्गाचे तीन टप्पे करेन. पहिल्या टप्प्याला फक्त मार्गदर्शनाची गरज असेल. ती मुलं अंगभूतच खूप हुशार चाणाक्ष आणि गतिशील असतात दुसऱ्या टप्प्याला मात्र शिकवण्याची गरज आहे त्यांना सतत पुढे चला पुढे चला असं म्हणत शिकवावं लागेल. आणि माझी खरी गरज आहे ती तिसऱ्या टप्प्यातील विद्यार्थ्यांना. इथं त्यांच्यासोबत बसून, त्यांच्या पाठीवर हात ठेवून, श्रवण भाषण वाचन लेखन गणिती क्रिया अशा प्रत्येक पायरीनं ,हळूहळू, न रागवता मला त्यांच्यातलच एक होऊन शिकवावं लागेल. त्यांचा सतत सराव घ्यावा लागेल. त्यांना काहीतरी येतंय ,ही भावना त्यांच्यामध्ये रुजवावी लागेल.आणि ते करण्यात मला अत्यानंद होईल  यात तिळमात्र शंका नाही.

           मी केलेलं अध्यापन ,त्यांना दिलेले शैक्षणिक अनुभव ,काही विद्यार्थी त्यांची सत्यता मोबाईलवर पडताळून पाहतील. यासाठी माझं अध्यापन बिनचूक स्पष्ट आणि निसंदिग्ध असेल.माझं बोलणं ,माझं चालणं, माझा पोशाख, माझं चारित्र्य हीच माझ्या विद्यार्थ्यांची भविष्यातली मोठी शिदोरी असेल. भविष्यात कधी चुकीचं पाऊल टाकताना, त्याला माझी आठवण होईल असंच मी त्याच्या समोर वागलं पाहिजे .या वयाततरी मीच त्यांचा आदर्श असलं पाहिजे.

             विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी अगोदर त्यांना लिहिता-वाचता आलं पाहिजे. गणिती क्रिया आल्या पाहिजेत. मग मात्र आपण हवं तसं त्यांना घडवू शकतो .प्रत्येक विद्यार्थी एक वेगळी कला आणि वेगळा गुण घेऊन जन्माला आलेला असतो. या गोष्टीवर आपला विश्वास असायला हवा. प्रत्येक विद्यार्थ्याकडं नेमकं काय आहे. हे शोधणं, त्याची जाणीव त्याला करून देणंआणि त्या दिशेणं आपण त्याला घेऊन जाणं ही माझी सर्वात मोठी जबाबदारी असेल.

        समजा मला त्याचा भाषिक विकास करायचा आहे. तर एखादा विषय त्यातील मुद्दे देऊन त्यावर कुणाला लेखन करायला लावणं, कुणाला भाषण करायला शिकवणं, कुणाला चित्र रेखाटायला सांगणं तर कुणाला कविता करायला शिकवणं अशी माझी शिकवण्याची पद्धती असेल.हे करण्यासाठी मग म्हणी, वाक्प्रचार, अलंकार समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, यासारख्या भाषिक कौशल्यांचा विकास करून लिखाणामध्ये याचा कसा वापर करतात हे शिकवावं लागेल. याचा सराव करायला लावायचा तो याचसाठी. घोकंपट्टी करून त्यांना परीक्षार्थी बनण्यापेक्षा व्यवहार कुशल आणि भाषा समृद्ध विद्यार्थी बनवणं केव्हाही चांगलंच. यासाठी गोष्टीची पुस्तकं वाचणं, वर्तमानपत्र वाचणं, हिंदी,इंग्रजी, मराठी रेडिओ, दूरदर्शन वरील बातम्या ऐकवणं यासारखे उपक्रम मी हाती घेईन. प्राथमिक स्तरावर गुणवत्ता गुणवत्ता म्हणजे यापेक्षा वेगळी काय असू शकते! आता मोबाईल वरून पुस्तकाकडं त्यांना वळवणं, हे माझ्यासाठी एक मोठं आव्हान असेल. मोबाईल हा जसा ज्ञानाचा खजिना आहे, तसाच तो विध्वंसक बॉम्ब सुद्धा आहे याची जाणीव त्यांना योग्यवेळी करून देणं ही माझी शिक्षक म्हणून नक्कीच जबाबदारी आहे.गुणवत्तावाढीसाठी  मोबाईलचा कसा वापर करावा हे विद्यार्थ्याला सांगणं गरजेचं ठरेल.

        मुलं ऐकतच नाहीत ही आईवडिलांची सततची तक्रार असते. मग त्यांना वर्गात बोलावून त्यांच्याही काही चुका होतात हे त्यांना पटवून देणं.. जसे की मुलांना बेडरूममध्ये अभ्यासाला बसून हॉलमध्ये टीव्ही बघत बसणं ,सतत त्यांच्या समोर मोबाइलवर बोलत बसणं, त्यांच्या देखत शेजाऱ्यांना नातेवाईकांना दूषणं देणं,

 अभ्यासाला बसल्यानंतर सतत घरातली छोटी-मोठी कामं सांगणं इत्यादी इत्यादी.. या गोष्टींची  पालकांना जाणीव करून देणंआणि गुणवत्ता वाढीमध्ये पालकांना सामावून घेणं ही माझी जबाबदारीआहे.

    कथाकथन पद्धतीपेक्षा प्रयोग, प्रात्यक्षिक, शैक्षणिक साहित्याद्वारे, प्रत्यक्ष अनुभव ,प्रत्यक्ष भेटी, सहली यासारख्या उपक्रमांद्वारे माझं अध्यापन कसं प्रभावित होईल आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी कसं पूरक होईल यासाठी सततचा माझा प्रयत्न राहील.

फलनिष्पत्ती:

अचानक उद्भवलेल्या कोरोणा सारख्या परिस्थितीमुळं समाजातील जनमाणूस खचला असताना संपूर्ण समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं काम माझं आहे.  यामुळे पालक जागृत होतील शाळेचं गेलेलं वैभव  पुन्हा प्राप्त होईल. विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळा उत्साह निर्माण होईल. त्यांच्यामध्ये शिकण्याची आवड निर्माण होईल. कोरोना सारख्या रोगापासून बचाव करत शिक्षण कसं घ्यावं हे मुलं शिकतील. बिघडलेली घडी पुन्हा एकदा सावरली जाईल मी एक प्रामाणिक शिक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली तर! आणि ती मी स्वीकारेन.

Friday, 3 September 2021

निगेटिव्ह To पॉझिटिव्ह.....

 निगेटिव्ह To पॉझिटिव्ह.....


        गेल्या दीड वर्षापासून संपूर्ण जगावर कोरोणाच सावट पसरलेले असतानाच आपणही त्यातून वाचलेलो नाही. शेती, उद्योग धंदे,  छोटे-मोठे व्यावसायिक या सर्वांवर समाजाचा, माध्यमांचा, प्रशासनाचा जेवढा विचार होत होता ..... तुलनेनं सर्वात महत्त्वाचं आणि ज्याची हानी पैशात होत नसली तरी भविष्यामध्ये नक्कीच जाणवणार आहे अशा  शिक्षण क्षेत्राकडे म्हणावं तेवढं लक्ष कोणाचं गेलेलं नाही...

        सर्वत्र शाळा ओस पडल्या, गवतानं मैदानं माखली गेली. कुणीच शाळेकडे फिरकेनासं झालं. कधी काळी इथं शाळा भरत होती यावर पाहणाऱ्यांचा विश्वास बसेना अशी सर्वत्र अवस्था असताना... आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. दिलीप स्वामी साहेब यांच्या डोक्यातून "स्वच्छ सुंदर शाळा अभियान"ही संकल्पना पुढ आली. सुरुवातीला सर्वांनाच वाटलं शाळेत मुलं नाहीत शिक्षक संख्या कमी आहे पालकांचं शाळेकडे येणं-जाणं बंद झाला आहे अशा परिस्थितीत हे कसं काय शक्य आहे बुवा! पण एक मिटिंग झाली! आणि संपूर्ण जिल्ह्यात शाळा स्वच्छता रंगरंगोटी ची चळवळ सुरू झाली. हळूहळू याचं रूपांतर स्पर्धेमध्ये झालं.. मग कोणी सांगतोय म्हणून करावं !यापेक्षा शिक्षकांनाच वाटायला लागलं आपली शाळा स्वच्छ सुंदर व्हायला हवी... संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक-पालक ग्रामपंचायत शाळा व्यवस्थापन समिती कामाला लागले. बाग बगीचा वृक्षारोपण शाळा रंगरंगोटी वर्ग स्वच्छता मैदान सपाटीकरण स्वच्छतागृहांची सोय पाण्याची सोय या आणि यासारख्या कितीतरी गोष्टी शाळेत पुन्हा नव्याने दिसू लागल्या.. सर्वांना शाळेत बसू वाटायला लागलं.... दोन वर्षापासून आलेली मरगळ सर्वांची दूर झाली... कोरोनामुळे सर्वांची मनं निगेटिव असताना... एखादे अधिकारी एखादी नवकल्पना पुढे आणून कुणावरही कोणत्याही प्रकारची कारवाई न करता सर्वांना  केवळ शब्दांच्या जोरावर कसं पॉझिटिव्ह करू शकतात हे याचं एक उत्तम उदाहरण.....

             जशा शाळा सुंदर दिसू लागल्या तशीच मुलंही लवकरच शाळेत येतील. पुन्हा शाळेतली गजबज ,लगबग गलका  आणि शाळेची घंटा ऐकायला येईल याच एका आशेवर संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षक आहेत. साहेब मनापासून खूप खूप धन्यवाद.

                      

                     नवनाथ शिंदे

जिल्हा समन्वयक सर फाउंडेशन सोलापूर



Thanks Teacher..... (शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनात रंग भरणार व्यक्तिमत्व).....

  

Thanks Teacher.....

(शिक्षक म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनात रंग भरणार व्यक्तिमत्व).....


        चारशे ते पाचशे लोकवस्ती असणारं विठ्ठल वाडी हे गाव. मध्येच मारुतीचं मंदिर. मध्यभागी मूर्ती आणि चार कोपऱ्याला आमचे चार वर्ग. आमचे चटे गुरुजी मारुतीकडं पाठ करून बसलेले आणि आम्ही त्यांच्या भोवती अर्धवर्तुळाकार हातात खापरी पाटी - पेन्सिल आणि समोर  अंकलिपी घेऊन त्यांच्यासमोर बसलेलो. एवढच काय ते आमचं शालेय साहित्य. त्यावेळी आमचे विश्व म्हणजे चट्टे गुरुजी आणि पवनपुत्र हनुमान.  गुरुजींनी हाताला धरून अक्षर  गिरवायला शिकवली. अभ्यासाची सुरुवात आणि शिस्तीची सुरुवात सोबतच . ज्यांची जीभ जांभळी दिसली त्यांना दिलेले छड्या.. आजही जांभळे खाताना तशाच आठवतात... कारण मी ही त्याचा एक भाग झालेलो..  जांभळा मध्ये आळ्या असतात आणि ते खाऊन आजारी पडलं उद्या शाळा बुडते, ही त्यांची त्यामागची भावना. शिस्तीत सुरू झालेलं शिक्षण मी कधीच विसरू शकत नाही.Thanks teacher.

           पुढं प्रसंगानुसार तिसरी मध्ये अरण शाळेत प्रवेश घेतला परिस्थिती तीच. फक्त देव बदलला आता माझा वर्ग संत सावता महाराजांच्या मंदिरात सुरू झाला. श्रीमती पार्वती साखरे बाई आमच्या वर्गशिक्षिका कडक शिस्त तशीच. अक्षर खूप सुंदर. वळणदार. कविता गायनावर त्यांचा भर. हे सगळे गुण आमच्या मध्ये उतरवण्यासाठी त्यांची चाललेली धडपड आम्हाला पुन्हा आयुष्यभर पुरली Thanks teacher.

        पुढे त्याच वेळी पायापासून डोक्यापर्यंत कडक पांढरे शुभ्र इस्त्रीचे कपडे, कपड्याला कुठेही घडी दिसणार नाही. डोक्याला कोच असलेली पांढरीशुभ्र टोपी. दररोज दाढी केलेला रुबाबदार चेहरा सावकाश, स्पष्ट, मोठ्या आवाजात त्यांचं बोलणं सुरु झालं की सगळा वर्ग चिडीचूप. त्यांचा भारदस्त आवाजाचे बब्रुवाहन साळुंखे गुरुजी त्यांची शिकवण्याची ढब गणिताचं ज्ञान, गायन ,फलक लेखन उत्कृष्ट.  संध्याकाळी शिष्यवृत्तीचे ज्यादा तास त्यांच्याच घरी असायचे. पेंटरला ही लाजवेल असं त्यांचं फलक लेखन.. त्यावेळे पासून वाटायचं की आपणही फळ्यावर असं लेखन करावं. गुरुजी तुमच्यामुळेच आज मीही छान पैकी फलक लेखन करू शकतो...म्हणून Thanks teacher..

        चौथी संपून पाचवीत गेलो पण मंदिर काय आमचा पिच्छा सोडत नव्हतं आता वर्ग भरत होता विठ्ठल मंदिरात. विठ्ठलाची पालखी दर वर्षी जिथे मुक्कामाला असायची त्याच मंदिरात आम्ही शिकण्यासाठी बसलो होतो आणि समोर होते आमचे हरिभाऊ नाळे गुरुजी. आज पर्यंत आमच्या वरच्या वर्गातील मुलांकडून त्यांचे फक्त नाव ऐकलेलं.  गावात आणि संपूर्ण परिसरात त्यांच्या नावाचा शिकवण्याचा प्रचंड दबदबा.  गणितामध्ये त्यांचा खूप हातखंडा होता. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी खूप झटायचे ते. गाव, शाळा, ग्रामस्थ, नेतेमंडळी या सर्वांचाच त्यांचा अभ्यास होता. शिस्त, अभ्यास ,अध्यापन ,आणि शिक्षा इथं कुठंच तडजोड नसायची. घरी सांगावं तर डबल मार मिळायचा. त्यांच्यामुळेच मला गणिताची आवड लागली. त्यांच्या जोडीला असायचे रमण तांबोळी गुरुजी शिस्तीला थोडी विश्रांती मिळावी म्हणून.... या दोघांची जोडगोळी कायम असायची .विनोदीं स्वभाव, कवितांना चाली लावणं, गाणी गोष्टी शिकवणं इतिहास भूगोल हिंदीचं अध्यापन हसत-खेळत आनंददायी शिक्षण कसं करावं हे त्यांच्याकडूनच आम्हाला शिकायला मिळालं. दिलखुलास व्यक्तिमत्व. त्यांच्या जोडीला इंग्रजी शिकवायला असायचे काटे गुरुजी. इथं मात्र इंग्रजी शिकण्यात कसलीच तडजोड नसायची प्रचंड शिस्त कडक स्वभाव गुरुजींचा तास म्हटलं की निमा वर्ग गायब असायचा. काहींच्या पोटात दुखायचं. इंग्रजीवर त्यांचं खूपच प्रभुत्व होतं. पण प्रत्येकाला इंग्रजी आलं पाहिजे हा त्यांचा अट्टहास असायचा आणि मुलांना मात्र वाटायचं इंग्रजी हा आपला कट्टर शत्रू आहे... त्यांची बदली झाली आणि पुष्पाताई गुळमे

 यांनी आनंददायी पद्धतीने इंग्रजी शिकवायला सुरुवात केली. गीत गायन, सांस्कृतिक कार्यक्रम ,शालेय सहशालेय कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं. विविध गुणदर्शन कार्यक्रम कसे बसवावेत. हे सगळं त्यांनी आम्हाला शिकवलं. डान्स करायला शिकवायचे. पण ते कधीच जमलं नाही. त्यांनी मात्र पिच्छा सोडला नाही मी शिक्षक झाल्यावर सुद्धा त्या केंद्रप्रमुख म्हणून मला डान्स शिकवायच्या आणि साक्षरता अभियान विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमात त्यांच्या सोबत एका भिल्ल गीतावर डान्स करायची माझ्यावर पाळी आली.. पुढ हेच गुण शिक्षणक्षेत्रात मला खूप उपयोगी पडले. हे प्रसंग कधी विसरू शकत नाही म्हणून Thanks teacher...

        माझं आणि माझ्या वर्गाचं खरंच नशीब होतं. आत्ता आम्ही होतो खंडोबा मंदिर परिसरात. पहिलीपासून प्रत्येक वर्षी आम्हाला शिक्षकच असे भेटत गेले की मागं वळून पाहण्याची कधी गरजच पडली नाही. एवढं पुढं वाढून ठेवलेलं असायचं. आठवी मध्ये संत सावतामाळी विद्यालयात प्रवेश घेतला प्रचंड उत्साह, कडक स्वभाव, हसत खेळत शिक्षण, पूर्णवेळ शिक्षणासाठी वाहून घेतलेले खणखणीत आवाजाचे हरिदास रणदिवे सर आमचे क्लास टीचर... त्यांच्याकडून बरंच काही शिकता आलं. नेमकेपणा, हजरजबाबीपणा ,एकदा हातात घेतलेलं काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण कसं करावं, कार्यक्रमाचं नियोजन कसं करावं , आपलं वक्तृत्व कसं असावं, प्राथमिक शाळेतून काही राहिलेले गुण इथं आल्यावर मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले...Thanks teacher.

           विनोदाचा बादशहा सर्व विद्यार्थ्यांच्या गळ्यातील ताईत म्हणा हवं तर! असं एव्हरग्रीन व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचे वाय. जी. शिंदे सर कित्तेक बॅच शाळेतून शिकून गेल्या, त्या प्रत्येक बॅच मधील विद्यार्थ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध असणारे हे शिक्षक . दिलखुलास आनंदी जीवनाचा महामंत्र त्यांनी आम्हाला दिला खूप खूप धन्यवाद..Thanks teacher

       गणित आणि मोरे सर या एकाच नाण्याच्या दोन बाजू असणारे शाळेचे मुख्याध्यापक.इंग्रजीवर अतोनात प्रेम असणारे अस्खलित इंग्रजी शिकवणारे लक्ष्मण शेळके सर भूमिती गणित शिकवणारे भांगे सर, घाडगे मॅडम, खंडागळे सर एस पी मोरे सर यांनीही प्रामाणिकपणे आम्हाला गणित आणि सायन्स ची गोडी लावली...कबड्डीच्या मैदानावर घड्याळ घालून गेल्यामुळे डोरले सरांची मिळालेले छडी तेवढीच कडक शिस्तीची वाटायची ..Thanks teacher.

        कथाकथन कसं करावं! कविता कशा लिहाव्यात ,रामायण महाभारत यांचा आपल्या जीवनाशी कसा संबंध जोडावा! त्यातून काय शिकावं, हे सतत सांगणारे मराठीचे गाढे अभ्यासक आमचे गुरु सावता घाडगे सर.. यांनी सांगितलेली गुलबकावलीची गोष्ट आजही तशीच आठवते. त्यांच्यासोबतच मराठी शिकवणारे  दरवर्षी आठवीतील विद्यार्थ्यांना आल्याबरोबर "भांणाचं भूत" ही गोष्ट सांगणारे पाटील सर आजही आठवता Thanks Teacher..

          जादा तास घेऊन रात्रंदिवस हिंदी आणि भूगोलात साठी कष्ट घेणारे दहावीच्या बोर्ड परीक्षेत सतत हिंदी भूगोलाचा 100%  निकाल देणारे सरळ मार्गी कोरडे सर.. मित्रांच्या गप्पा निघाल्या की तुमचा विषय असतोच. प्रत्येक शिक्षकांकडून काहीतरी नवं शिकायला मिळालं! आमच्यासाठी ही शिदोरीच होती भविष्यासाठीची! आम्ही आज ती इतरांना वाटत आहोत!!!

माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात अशा सर्व गुरुचरणी मी नतमस्तक होतो. त्यांचे आभार मानतो माझ्या जीवनात अनेक रंग भरण्याचे काम आपण केलंत. धन्यवाद

      आज शिक्षक दिनाच्या निमित्ताने तुम्हा सर्वांची आठवण झाली तुम्हा सर्वांसाठी पुन्हा एकदा Thanks Teacher...


                      नवनाथ शिंदे

                   जिल्हा समन्वयक

               सर फाउंडेशन सोलापूर.

Friday, 20 August 2021

शिवाजी चहाची टपरी....ते.. हायवेवरचा दुकानदार

 हाय वे च्या कडेला शिवाचं छोटसं चहाचं हाॅटेल. सोबत भेळ,चिवडा,ड्रायव्हरसाठी लागणारं छोटं मोठं  सामान .त्यांच्या अंघोळीसाठी इंजिनसाठी पाणी, ड्रायव्हर म्हणजे आपला पाहुणा ,अशी त्याची धारणा.दिवसभर सर्वाना गोड बोलून स्वतः आणि दुस-यांना आनंदी ठेवणारा हा छोटा दुकानदार.

             पदवी पर्यत शिक्षण घेतलेल्या शिवाला शेतीचा खूप नाद होता .तीन भाऊ आई वडील असं मोठं कुटुंब .मोठ्या भावाचं गावात किराणा दुकान .दोन भाऊ शेतात. वडील बैल, वैरण,कुळव ,नांगर यामध्ये गुंतलेले.डाळींब ,बोरीच्या बागांमध्ये दिवसरात्र काम करणं एवढच सा-या कुटुंबाला माहीत.परंतु बोअर आणि विहिरीच्या पाण्यावरचा त्यांचा विश्वास उडाला आणि मग शिवा व्यवसायाकडे वळला.सुरूवातीला छोटीशी टपरी सुरू करत चांगली सेवा देऊन हळूहळू तो  या धंद्यात चांगलाच रमला . 

गि-हाइकांचा तो आवडता झाला.त्याच्या हाॅटेलसमोर खूप  ट्रक्स इतर वाहनं थांबू लागली . मग त्याने तिथचं किराणा सामानाचं दुकान सुरु केलं.ड्रायव्हरांना तो माल देऊ लागला कर्नाटक ,तामिळनाडू, आंध्र ,उ.प्रदेश येथील  कितीतरी ड्रायव्हरांना तो उदार सामान देऊ लागला.विश्वास संपादक केला त्यांच्या भाषा त्याला समजू लागल्या. तो सांगतो , "ओळख पाळख नसताना पर राज्यातील ड्रायव्हर लोकांना  नोटबदलीच्या काळात जवळ जवळ वीस हजार रुपये मी उसने दिले कोण म्हणायचं उपाशी आहे,कोण म्हणायचं आजारी आहे ,कुणाला गावाकडं आई वडिलांना पाठवावयाचे आहेत तर कुणाच्या गाडीत डिझेल नाही एक ना दोन अशा असंख्य अडचणी सोडवण्याचं काम शिवानं केलं
लोकं मला घरच्या सारखं हक्कानं पैसे मागायचे आणि मी ही माझ्या धंद्यातील पैसे दयायचो.पण ड्रायव्हर लोकं खूप प्रामाणिक माझे सर्व पैसे त्यांनी दोन तीन महिन्यात परत केले.कसलीही लिखापड आणि अोळख नसताना पैसे परत मिळाले यावरून मला माझ्या देशातील या गरीब आणि प्रामाणिक लोकांचा खूप अभिमान वाटतो असं तो सांगतो.
            सुरूवातीला किलो किलोनं माल आणणारा शिवा आता टनावर माल खरेदी करतो.डाळी,तांदूळ,गहू,मैदा,लापशीसाठी गव्हाचा रवा ,ब्रेड,इत्यादी मालाची विक्री तो करतो.स्वतः मालाच्या पिशव्या डोक्यावर घेऊन गि-हाईकाच्या ट्रक मध्ये ठेवतो.कितीतरी ड्रायव्हर त्याचे दोस्त बनले.स्वतःचं दुकान असल्यासारखं माल हातानं घेऊन हिशोब करुन पैसे त्याला देतात.जास्त नफा न मिळवता जास्तीत जास्त लोकांपर्यत आपली सेवा पोहोचल्याचा त्याला आनंद.दिवसासाठी एक ते दीड हजार रु.नफा त्याला मिळतो
              अनेक मित्रकंपनी असलेला शिवा दरवर्षी राष्ट्रीय सणाच्या दिवशी पहाटेच  जवळच्या  शाळेत जातो संपूर्ण परिसर झाडून स्वच्छ करतो.शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो अरे हे कसं स्वच्छ झालं आणि कुणी केलं.ना प्रसिद्धीची हाव ना कामाची लाज!
            रस्त्याच्या कडेला

 वृक्षारोपण असो अथवा रस्त्यावर रांगोळी काढायची असो उत्साह याच्या नसानसांत भरलेला.

        असा हा छोटा दुकानदार सांगतो धंदा करायचा असेल तर डोकं शांत ठेवा ,कशाची लाच वाटू देवू  नका,कुणाला फसवू नका,धंद्याशी आणि गि-हाईकाशी प्रामाणित रहा .क्षणभंगूर जीवनाचा आनंद घ्या आणि इतरांना द्या .

असा हा शिवा , अरणच्या आदर्श शाळेत माझा शेवटच्या बेंचवरचा विद्यार्थी होता आज पहिल्या बेंचवरच्या विद्यार्थ्याच्या  कितीतरी  पुढे पोचलाय !!

छोटे उद्योजक

 

छोटे उद्योजक
.... अविनाश पाटील ची गगन भरारी..

          'कामालाच देव मानणारे'आमच्या अरणचे सर्व गावकरी .सावता महाराजांचीच शिकवण दुसरं काय!गाव नेहमीच दुष्काळाच्या छायेत वाढलेलं.त्यामुळं नोकरी, धंदा,आणि पावसाच्या पाण्यावरची शेती यावरच  लोकांचं जगणं. येथील लोकांना शिक्षणाची मात्र फार आवड. शिक्षणासाठी कुठून पैसा येतो हे मात्र मला न उलगडलेलं कोडं!खूप शिकायचं कुठतरी नोकरी शोधायची नाहीतर आहेच छोटा मोठा धंदा .
       अविनाश पाटील असाच आमच्या गावचा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेला विज्ञानाचा पदवीधर तरूण.वडील रावण पाटील माजी सैनिक धाकटा भाऊ संपत शिक्षकाची नोकरी करतो. अविनाशला मात्र शेतीचा चांगलाच नाद लागला.न लाजता खत घालणं,बाग चाळणं,बाग छाटणं ही काम तो आनंदानं करायचा. आधुनिक पद्धतीनं थोड्याशा पाण्यावर ड्रीपच्या सहाय्याने त्यानं डाळींबाची शेती करायला सुरूवात केली .शेती व्यवसायात चांगला जम बसला .अचानक डाळिंबाच्या बागांवर तेल्या ,कुजव्या यासारख्या रोगानं डाळींबाची शेती धोक्यात आणली.तोपर्यंत अविनाशचं लग्न झालं खर्च वाढला. वडिलांच्या पेन्शनवर आणि भावाच्या पगारीवर आपण किती दिवस अवलंबून रहायचं! काहीतरी धंदा करावा मनात विचार आला.
              इच्छा असली की नक्कीच मार्ग सापडतो.अविनाशला सुद्धा सापडला.या कामी अतुल चौधरी सारखे गुरु त्याला मिळाले.मंगल सिद्धी ग्रुपचे ते संकलन अधिकारी. 'दुधाचा धंदा करतोस का?मी तुला पाहिजे ती मदत करतो.घाई नाही एक दिवस विचार कर आणि मग निर्णय घे'असा सल्ला त्यांनी मला दिला आणि मी कामाला लागलो असं अविनाश अानंदानं सांगतो.
            तो सांगतो, दुध डेअरी सुरु केली वर्ष होतं २०११ .सुरूवातीला ६० ते ७०लिटर दूध संकलन झालं.हळूहळू शेतक-यांना विश्वासात घेत दुधाचा व्यवसाय करणा-यांना एकत्र केलं. त्यांना दुधाच्या योग्यतेनुसार भाव दिला.ना नफा ना तोटा असा माझा व्यवसाय सुरु झाला.रोजच्या रोज भाव कळू लागल्यानं दूध वाढू लागलं.मग मंगलसिद्धीच्या मशिनरी घेऊन दुध साठवायला सुरू झालं.कधी कधी दूध खराब व्हायचं. अख्ख्या टँकरचा तोटा वरचं काही सांगून जायचा.दरम्यानच्या काळात धंद्याची चांगली माहिती धेतली.प्रशिक्षण घेतलं.अनेकांच्या ओळखी झाल्या .धंद्यातली चांगली वाईट माणसं समजली आणि ठरवलं आता मागं वळून पहायचं नाही.
              माझे मेहुणे दत्तात्रय गाजरे, बहीण सुनिता यांनी मानसिक आधार देत माझ्यामधील आत्मविश्वास जागा केला.बँक आॅफ इंडियाने आर्थिक आधार दिला आणि पंचवीस लाखाची दूध संकलनासाठीची मशीन खरेदी केली.व्याप वाढला संगणकीकृत कामकाज सुरू झालं .पत्नी विद्या आणि वडिल यांच्यावर काम सोपवून मी बाहेरची कामं पाहू लागलो.हे सर्व सांगताना त्याच्या चेहऱ्यावर चा उत्साह ओसंडून वाहत होता.
        आज त्याच्याकडं पाच साडे पाच हजार लिटर दूध संकलन होतं.आई विमल,वडील, पत्नी,यांच्या सह चार कामगार दिवसभर हा सर्व कारभार पाहतात. महिन्याला त्याला या मधून सर्व खर्च वजा जाता ८० ते ९०हजार रूपये मिळतात.
            यापुढे दुग्धजन्य पदार्थ स्वतः तयार करुन बाजारात आणण्याचा त्याचा विचार आहे. या कार्यासाठी त्याला शुभेच्छा देऊयात.

°°°°°°°°°°°°°°°°°° नवनाथ शिंदे.

Friday, 23 July 2021

ज्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळालं अशा सर्व गुरूं साठी.

        ज्यांच्याकडून काहीतरी नवीन शिकायला मिळालं अशा सर्व गुरूं साठी....



        आषाढ शुद्ध पौर्णिमा म्हणजेच व्यास पौर्णिमा. आजच्याच दिवशी भरत वंशाचे गुरु महर्षी व्यास यांचा जन्मदिन. प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीमध्ये गुरूला आदराचं स्थान दिलं जातं. रामायण महाभारतामध्ये तर अशा गुरू शिष्यांच्या अनेक जोड्या आपल्याला परिचित आहेतच. गुरु हेच आपलं सर्वस्व मानून शिष्यानं आपलं सारं जीवनच आपल्या गुरूंच्या चरणी वाहिलेलं असतं अशी कितीतरी उदाहरणं आपण ऐकली आहेत. वाचली आहेत.

        त्या वेळची शिक्षणपद्धती, गुरुशिष्यांची परंपरा, गुरूगृही जाऊन ज्ञानार्जन करण्याची पद्धती, सर्वांना परिचित आहे. कालानुरूप शिक्षणपद्धती मध्ये बदल झाला. गुरु केंद्रित असलेलं शिक्षण विद्यार्थी केंद्रित झालं .आणि गरजेनुसार शिक्षणाचं आणि शिक्षकांचं स्वरूप बदललं. गुरु-शिष्यांच्या अध्ययन अध्यापन पद्धती मध्ये, कालानुरूप अभ्यासक्रमांमध्ये गरजेनुसार आज जरी बदल झाला असला तरी त्यांचं महत्त्व अजूनही कमी झालेलं दिसत नाही. दुर्दैवानं गेल्या वर्षीपासून संपूर्ण जगावर कोरोणाचं महासंकट आलं. सर्व व्यवहार ठप्प झाले. यंत्र जाग्यावरच थांबली. शिक्षणव्यवस्था कोलमडली. एकूणच संपूर्ण जीवन चक्र बदललं .मग शिक्षणासाठी शिकण्यामध्ये आणि शिकवण्यामध्ये हळूहळू वेगवेगळे प्रयोग सुरू झाले. ऑनलाइन शिक्षण पद्धती आली. डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं शिक्षण सुरू झालं. काही प्रमाणात ही पद्धती यशस्वी झाली. मग आता शिक्षकांची गरजच काय? अशी चर्चा सुरू झाली. परंतु लवकरच यालाही विद्यार्थी कंटाळले . यातील दोष पालकांच्या लक्षात आले. नुसतं पुस्तकी ज्ञान काही उपयोगाचं नाही त्याला संस्कारक्षम जीवनाची आणि व्यवहारज्ञानाची जोड ही असायलाच हवी. हे पालकांच्या लक्षात आलं. अध्यापनातील अध्ययनातील अडचणी त्यांच्या ध्यानात आल्या आणि पुन्हा एकदा शिक्षणामध्ये गुरुचे स्थान आढळ आहे यावर शिक्कामोर्तब झालं

      गुरु फक्त लिहायला वाचायला शिकवतात, एवढंच त्यांचं काम नसतं तर आपल्या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण जीवनाला आकार देण्याचे काम गुरु करत असतात. गुरूंच्या प्रत्येक कृतीतून, त्यांच्या बोलण्यातून चालण्यातून, त्यांच्या वागण्यातून विद्यार्थी संस्कार घेत असतात हे अनौपचारिक शिक्षण नकळतपणे सतत सुरू असतं .ते आपल्या शिष्याला सतत चांगला मार्ग दाखवत असतात. आपल्या जवळील सारं सारं आपल्या शिष्याला देण्याचा प्रयत्न ते करत असतात. आपल्यापेक्षाही आपला शिष्य सरस व्हावा ही त्याची मनोमन इच्छा असते. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, आत्मविश्वास, धैर्य वाढवण्याचे कार्य गुरु करत असतात. लिहायला-वाचायला शिकवणारे गुरुजीच फक्त आपले गुरु असतात असं नाही तर पदोपदी आपल्याला असे गुरु भेटत असतात आपण फक्त त्यांना शोधायचं असतं. कुणाकडून काय शिकावं हे चाणाक्ष विद्यार्थ्याला कळायलाच हवं!गुरूंना वयाचं बंधन नसतं. स्त्री-पुरुष जात-पात असा त्यांच्यामध्ये भेदभाव नसतो. प्रत्येकाचे असे वेगवेगळे  अनेक गुरु असतात. शैक्षणिक गुरु ,व्यावसायिक गुरु, सामाजिक गुरु, अध्यात्मिक गुरु ,कौटुंबिक गुरु प्रत्येकाकडून आपल्याला काहीतरी वेगळं शिकायला मिळतं आणि तेच आपले आदर्श असतात. त्यांचा आपल्याला सतत अभिमान असतो. आदर असतो. आपण प्रत्येकाकडून काहीतरी शिकत असतो . पण आपन असे गुरु शोधायला हवेत ....ज्यांना ते सापडले ते नशीबवानच!

       आपली शिकण्याची तीव्र इच्छा असली की असे गुरु आपल्याला पदोपदी भेटतीलही पण त्यांना गुरु मानण्याचं धाडस आपल्यामध्ये असायला हवं. आपल्याला जे माहित नाही ते माहीत करुन घेण्यामध्ये कमी पणा नसावा,आणि जे माहित आहे ते इतरांना सांगणे मध्ये मोठे पणा नसावा. हे तत्व सर्वांनी अंगीकारायला हवं .समोरच्या व्यक्तीमध्ये काही तरी वेगळे गुण दिसले तर मोठ्या मनानं त्यांचं जाहीर कौतुक करायला आणि त्यातील काही गुणांचं आपण अनुकरण करायला आपलं मन कचरलं नाही पाहिजे.असं जिथं घडतं तिथं  आपल्याला असे गुरु भेटतच असतात. गुरूकडून ज्ञान घेता घेता आपण ही कुणाचं तरी गुरु व्हायला हवं. आपण ही आपल्याकडील काही चांगल्या गुणांचं दान कराव. इतरांच्या जीवनात आनंदाचा एखादा क्षण निर्माण करावा .चुकीच्या वाटेला लागलेल्यांना योग्य दिशा देण्याचं काम आपण हाती घ्यावं.कुणाकडून काही तरी घ्यावं आणि कुणाला काही तरी द्यावं हे चक्र जोपर्यंत सुरू असेल तोपर्यंत गुरुशिष्यांची ही परंपरा कायम चालतच राहील.आजच्या दिवशी आपल्या जीवनात अमूलाग्र बदल घडविणाऱ्या अशा सर्व गुरुजनांप्रति आपल्यामध्ये आदरभाव निर्माण व्हावा हीच अपेक्षा.

       माझ्या जीवनातील प्रत्येक वळणाच्या टप्यावर  व्यावसायिक तसेच शैक्षणिक क्षेत्रातलं  ज्ञान आणि सामाजिकतेचं भान कौटुंबिक सल्ला, देणारे गुरु, ज्ञानार्जन करणारे प्रत्येक प्रसंगाला आधार देणारे अनेक गुरु  मला भेटत गेले. त्या सर्वांच्या प्रती मी आज गुरुपौर्णिमेनिमित्त ऋण व्यक्त करतो आणि त्यांना आदरपूर्वक नमस्कार करतो...

                       

           नवनाथ शिंदे, 

        जिल्हा समन्वयक 

       सर फाउंडेशन सोलापूर

Wednesday, 10 March 2021

भुकंपानंतरचं गाव ...!! आठवणीतला प्रसंग!

           

 भुकंपानंतरचं गाव ...!! आठवणीतला प्रसंग!!!


          भूकंपाचा विषय काढताच साठे गुरुजींचा हुंदका अनावर झाला! डोळे पाण्याने भरून आले! अश्रूला वाट मोकळी करत कसेबसे ते बोलते झाले ......"३० सप्टेंबर ९३ च्या  रात्रीच्या विषयावर बोलण्याची माझी हिम्मतच होत नाही.त्यावेळचा नुसता प्रसंग जरी डोळ्यापुढं उभा राहिला  तरी अंगाचा थरकाप उडतो! माझ्या गावातली बरीच कुटुंबं उध्वस्त  झाली , त्यांच्यासोबत माझ्या बहिणीचं कुटुंबही या भूकंपानं नजरेआड केलं. 30 सप्टेंबर च्या रात्रीच्या अंधारात आणखी किती जीव मातीआड गेले याची कल्पनाच न केलेली बरी.एरवी शाळेत एखाद्या मुलाच्या हाता पायाला दुखापत झाली तरी शिक्षकाचा जीव खालीवर होतो इथं तर एक तुकडीच भूकंपात मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली होती.तब्बल    ४२ विद्यार्थ्यांची नावे हजेरी पटावरुन कमी केंल्याचे  गुरुजी सांगत होते! काय अवस्था झाली असेल त्या शिक्षकाची आणि शाळेची !!! गुरुजी बोलत होते. आम्ही नि:शब्द झालो होतो.पुढचे काही प्रश्न विचारण्याचं धाडसच आमच्यात उरलं नव्हतं.

             खूप दिवसांपासून महेशराव आम्हाला किल्लारी भागात  त्यांच्या मित्रांकडं घेऊन जाणार होते. आज योग आला होता. खोचक प्रश्न विचारून  समोरच्याची बोलती बंद करणारे 

योगेश कुमार, एकाच शब्दाचे अनेक अर्थ काढून हजरजबाबीपणानं उत्तर देणारे

 विनोद वीर डॉक्टर विनय, जे का रंजले गांजले त्यांशी म्हणे जो आपुले हा विचार घेऊन पशू- पक्षी, प्राणी, झाडं-झुडपं, यांच्या मध्येच आपलं जीवन आनंदात जगणारे तानाजी इंगळे सर,

सर्वांना सोबत घेऊन स्वतःभोवती शुद्ध विचारांच्या मित्र मंडळींचं  कडं निर्माण करणारा

दादा कैलास ......यांच्यासोबत महेश रावांच्या गाडीतून जाताना हसत- हसत, गप्पा मारत  प्रवास करत आम्ही माकणी  गावापर्यंत कसे पोहोचलो  कळलंच नव्हतं.

          सर्वत्र एकसारख्या दिसणाऱ्या घरांमध्ये  साठे गुरुजींनाही  दोन खोल्यांचं घर मिळालं होतं . नंतर त्यांनी स्व:ता दोन खोल्यांचं बांधकाम केलं होतं . त्यांच्या सोबत गप्पा मारता मारता   मागील दोन तासातला प्रवास कुठल्या कुठे गेला होता.

            तेव्हा दुपारचे २ :०० वाजलेहोते.

महेशरावांचे शाळकरी दोस्त वकील मधुकर व्यंकटराव साठे, प्रशांत साठे यांना सोबत घेऊन आम्ही तेरणा धरणाच्या पायथ्याला असणाऱ्या 'माकणी' गावाकडे निघालो. काटेरी चिलारी आणि मातीचे ढिगारे यात अदृश्य झालेलं गाव आम्ही भर उन्हात शोधत  होतो.

               नाही म्हणायला गावच्या वेशीनं तेवढं गावपण जपलं होतं. कंबरंएवढं दत्ताचं, मंदिर, हेमाडपंथी राक्षस मंदिर, उंच गढीवरची अर्धवट भिंत या खुणा स्पष्ट दिसत होत्या. हेमाडपंथी राक्षस मंदिरात धन लोभापायी खोलवर  खणलेलं दिसत होतं. त्याच्याच खाणाखुणा इतरत्र पडलेल्या दिसत होत्या

                      महेश पवार यांचं हेच  जन्मगाव. इथंच पहिली ते दहावीपर्यंत त्यांचं शिक्षण झालेलं. वडिलांच्या नोकरीमुळं इथं राहण्याचा त्यांना योग आला होता. त्या भूकंपाच्या रात्री स्वतः भावासह मातीच्या ढिगार्‍यातून बाहेर आलेले महेशराव जेव्हा त्या जागेवर गेले तेव्हा थोडा वेळ गप्पच झाले... त्या वेळच्या साऱ्या घटना त्यांच्या डोळ्यापुढं उभ्या राहिल्या  असाव्यात. "इथंच दत्ताच्या मंदिरापासून शंभर फुटावर माझं घर होतं" एवढेंच ते बोलले.जवळच  त्यांची दोन मजली शाळा होती. आम्ही त्यांच्या वर्गखोल्यात डोकाऊन पाहिलं......  तोच सातवीचा वर्ग जसच्या तसंच फळं, पंचवीस वर्षापूर्वीचे तेच सुविचार.....आतून खोल्या मात्र दारूच्या बाटल्या, गुटख्याच्या पुड्या, पत्त्यांची पानं, नी कचर्‍यानं भरून गेलेली.....आजकालच्या मौजमजेत जगणाऱ्या दारू आणि पत्त्यांच्या खेळात भरमसाठ पैसे उडवणाऱ्या मुलांना काय कळणार !!! त्यावेळच्या जीवनाची किंमत.. 

           ज्यांचे जीव गेले, ज्यांच्यामुळं

  घर दारं मिळाली ,पैसा मिळाला, मदत मिळाली ,त्यांची पिढी आजही त्याच मदतीवर घरादारावर, मिळालेल्या पैशावर  आनंदात जगते आहे.ज्यांनी या वेदनेच्या कळा सोसल्या त्यांना मात्र आजही भूकंपाची धास्ती आहे.

जवळ जवळ अशीच परिस्थिती या भागातल्या सर्वांचीच.

         किल्लारी आणि सभोवतालच्या 52 गावात हीच अवस्था. सास्तूर आणि किल्लारी या ठिकाणचे स्मृतीस्तंभ त्यावेळच्या भीषणतेची जाणीव करून देतात.

          भरपूर शेती असणारे शेतकरी. पारंपारिक शेती करून गावातच राहणारी कुटुंबं, अजूनही हुंडा पद्धतीमुळं मुलींच्या लग्नासाठी एकर-दोन एकर जमीन विकणारे आई-वडील..... 70 /80 फुटापर्यंत पक्का खडक न लागणाऱ्या जमिनी.. दूध दूभते,  कुकुट पालन या सारख्या व्यवसायाला फाटा देऊन ऐषारामात राजकारणावर तासंतास गप्पा मारत बसणारी तरुण पिढी आज इथं सुद्धा दिसते आहे....


          ......नवनाथ शिंदे,अरण.

ई लर्निंग आणि प्रिसिजन

              



        प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या

कार्यक्रमाला राज्यामध्ये 2015 पासून सुरुवात झाली. या शासन निर्णयास शिक्षणाची  सनद असं म्हटलं जातं. या शासन निर्णयांतर्गत महाराष्ट्र राज्यातील शाळा आय.एस.ओ.करणं, माहिती तंत्रज्ञान साधनांसह शाळा डिजिटल करणं , शाळांच्या भौतिक सुविधा वाढवून शाळेचा विकास करणं आणि प्रत्येक मुल शिकतं  ही संकल्पना घेऊन महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शाळेतील प्रत्येक मुल प्रगत करण्यासाठी शिक्षक, प्रशासन, पालक, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्था आणि  वेगवेगळ्या औद्योगिक कंपन्या पुढे आल्या. त्यांच्या सी. एस. आर. फंडाच्या माध्यमातून शाळा विकास निधी उभा करण्याचं काम  आपल्या सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात  खूप मोठ्या प्रमाणात सुरू झालं. 

           संपूर्ण जगात नावाजलेल्या आणि जवळ जवळ ऐंशी टक्के चार चाकी गाड्यांना कॅमशाफ्ट पुरविणाऱ्या प्रिसिजन कंपनीने प्रिसिजन फाउंडेशनच्या माध्यमातून आपला सर्व सी एस आर फंड शिक्षण प्रक्रियेकडे वळविला. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये कोणत्या ई-लर्निंग साहित्याची गरज आहे. ते कोणत्या शाळेत, कोणत्या उपक्रमशील शिक्षकांना सामावून घेऊन  त्यांच्यासोबत काम करावं, याचा अभ्यास सुरू झाला.राज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या सर फाउंडेशन या संस्थेने प्रिसिजन फाउंडेशनला  या कामी मोलाची मदत केली. शिक्षणातील नव विचार प्रवाह, जागतिक स्तरावरील डिजिटल 

शिक्षणाचं महत्त्व ओळखून  प्रिसिजन उद्योग समूहाचे उद्योगपती डॉ. यतीन शहा , प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सुहासिनी शहा मॅडम ,  संपर्क प्रमुख  माधवजी देशपांडे,  त्यांची सर्व टीम,यांनी सर फाऊंडेशनचे सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे प्राध्यापक बेत सर यांना सोबत घेऊन जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ई लर्निंग शिक्षण देण्यासाठीचा एक आराखडा तयार केला. दीडशे शाळांची निवड केली. प्रत्येक शाळेमध्ये स्मार्ट बोर्ड, लॅपटॉप, प्रत्येक इयत्तेचा अभ्यासक्रम, विज गेल्यानंतर शिक्षण बंद पडू नये म्हणून सोलर सिस्टिमची सोय केली. 

जिल्ह्यातील व  इतर जिल्ह्यांमध्येही डिजिटल शिक्षणाची साधने पुरविली गेली.

     आज सोलापूर जिल्ह्यातील शाळांमध्ये डिजिटल अंतर्गत ई-लर्निंग शिक्षण प्रभावीपणे चालू आहे. ज्या शाळांना  डिजिटल साहित्य मोफत दिलेले आहे या शाळेतील सर्व शिक्षकांना याचे  प्रशिक्षण देऊन त्यांना सजग केल्यामुळे आणि त्याचा वेळोवेळी आढावा घेतल्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही सोलापूर जिल्ह्यासह व इतर जिल्ह्यातील काही शाळांमध्ये ई-लर्निंग अध्ययन- अध्यापनाचे काम काही अंशी का होईना पण सुरू  आहे.

      ई लर्निंग शिक्षणाचा आयडॉल म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो अशा संगणक तज्ञ संदीप गुंड यांच्या मार्फत  शिक्षकांना ई-लर्निंग अध्यापन

 पद्धतीचं प्रशिक्षण देण्याचं महत्त्वाचं काम या संस्थेमार्फत करण्यात आलं. शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, सर्व पालक वर्ग, विद्यार्थ्यांपर्यंत 

ई लर्निंग शिक्षणाचं  महत्व पटत गेलं. शेवटी ई लर्निंग शिक्षण हे अंतिम साध्य नसून  शिक्षणातील न समजणार्‍या क्लिष्ट संकल्पना, विद्यार्थ्यांच्या स्पष्ट होण्यासाठी अध्यापन आनंददायी आणि नाविन्यपूर्ण होण्यासाठी हे एक प्रभावी साधन आहे. त्यामुळे शिक्षकांनी या ई लर्निंग अध्यापन पद्धतीचं मनापासून स्वागत केलं.

             यावर्षी मात्र कोरोना या साथीच्या रोगामुळे शिक्षण व्यवस्थेसह संपूर्ण जगावर संकट कोसळलं शाळा बंद झाल्या आणि डिजिटल शिक्षण सुरू झालं. काहीच न होण्यापेक्षा विद्यार्थी ,शिक्षक, पालक या शिक्षण प्रक्रिया सोबत राहायला हवेत. यासाठी ऑनलाइन अध्यापन वर्ग सुरू झाले. आजच्या या ऑनलाईन शिक्षणासाठीचं श्रेय  काही अंशी या प्रिसिजन फाऊंडेशन आणि सर फाउंडेशन सोलापूर यांना द्यायलाच हवं. 


       

दैनिक लोकमत एक्सलंट टीचर पुरस्कार



             


        विद्यार्थ्यांची प्रगती, त्यांनी मिळविलेले यश, आत्मविश्वासानं प्रत्येक क्षेत्रात त्यांनी टाकलेलं  पाऊल हाच विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचा आरसा असतो. अशा यशस्वी मुलांमध्येच शिक्षकांचं प्रतिबिंब दिसत असतं. रात्रंदिवस विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी झटणारे कित्येक शिक्षक या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत म्हणूनच  शिक्षणाचा हा रथ अविरत चालतो आहे. शैक्षणिक क्षेत्रात नवनाथ  शिंदे या अशाच एका अष्टपैलू प्राथमिक शिक्षकाचं योगदान खरंच कौतुकास्पद आहे. 

           इयत्ता दहावी मध्ये केंद्रात प्रथम येऊन सुद्धा शिक्षण क्षेत्राची आवड म्हणून   त्यांनी डी.एड. ला प्रवेश घेण्याचं ठरवलं. डी.एड.ची पदवी घेऊन शिक्षण क्षेत्राची वाट स्वीकारली. सोलापूरातल्या नूतन प्रशाले मधून शिक्षण सेवेची सुरुवात झाली. मग लमाणतांडा, एक शिक्षकी शाळा, मुलींची शाळा अशा विविध ठिकाणचा अनुभव घेतला. राज्यातील काही नामांकित शाळांपैकी अरण जिल्हा परिषदेची शाळा एक मॉडेल शाळा उभारणीमध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. सलग 15 वर्ष याठिकाणी विविध उपक्रम कार्यान्वित करून त्यांनी शाळेचे आणि गावाचे नाव संपूर्ण राज्यात पोहोचवले.

   अरणची बरडावरची शाळा! गावापासून लांब, उजाड आणि ओसाड ठिकाणची. शिक्षण विभाग, आमदार फंड, लोकसहभाग यांच्या माध्यमातून त्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांच्या मदतीने येथे पहिली संगणक लॅब सुरू केली. संगणक शिक्षक  नेमून, स्वतः संगणक शिक्षण घेऊन संगणक शिक्षण सुरू केलं. शाळेत विविध प्रकारची वृक्षलागवड करून स्मशानभूमीतल्या शाळेचं रुपांतर निसर्ग शाळेत केलं. शालेय वस्तू भांडार, परीसर साधन केंद्र, इंग्लिश लॅब, सेमी इंग्लिश शिक्षणाची व्यवस्था सुरु केली. पालक, ग्रामस्थ आणि शाळा यांच्यामध्ये सुसंवाद घडवून, त्यांन शाळेकडं खेचून आणण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली.

      शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, यासाठी  विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन केलं. अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले. इयत्ता सातवीतील एकाच वेळी 15 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड. हा त्यांच्या शैक्षणिक कार्यातला संस्मरणीय क्षण .हुशार, चतुर, सामान्य, असामान्य विद्यार्थ्यांमुळे सुचत गेलेले अनेक नवनवीन उपक्रम या शाळेत त्यांनी सुरू केले. 300 विद्यार्थीसंख्या असणारी शाळा 680 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. आसपासच्या खेड्यातून  विद्यार्थी शाळेत येऊ लागले. तत्कालीन शिक्षणाधिकारी सुमन  शिंदे यांच्या धडपड मंच  मधून त्यांना खूप काही शिकता, करता आलं. असं ते आवर्जून सांगतात.


    शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी माढा तालुका प्रज्ञाशोध परीक्षा सुरू केली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्र सिंह यांनी या याबद्दल त्यांचं कौतुक केलं.

आजी-माजी विद्यार्थी कल्याणकारी विकास योजनेअंतर्गत विद्यार्थी कल्याण निधी योजना या नावाने बँकेत तीन लाख, पन्नास हजार रुपये लोकवर्गणी जमा करून कायम ठेव ठेवली. दरवर्षी मिळालेल्या व्याजातून स्वातंत्र्यदिनी  विद्यार्थी पारितोषिक योजना सुरू केली. शिक्षणाची वारी पुणे आणि नागपूर येथील शैक्षणिक स्टॉलमधून हा लोकसहभागातून शाळा विकास उपक्रम संपूर्ण राज्यभर पोहोचवला.

   त्यांचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात चमकत आहेत . आय.आय.टी मध्ये शिकत असलेला रोहित गायकवाड, एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेत असलेला श्रीनिवास गोरे, संकेत वसेकर, बी ए एम एस च्या स्नेहा केदार ,प्राजक्ता केदार,रुग्णांना सेवा देत असलेले डॉ.धनंजय कुलकर्णी, डॉ. स्नेहल कांबळे डॉ.सोनाली भोसले हे विद्यार्थी, आर. टी. ओ. ऋषिकेश कोरडे ,  मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे आपापल्या ठिकाणी चोख सेवा बजावत आहेत. अनेक विद्यार्थी उद्योजक इंजिनियर, कृषी डिग्री, प्रगतशील शेतकरी, व्यवसायिक म्हणून आपल्या नावाचा आणि गावाचा दबदबा कायम ठेवत आहेत.

            शिंदे यांचा सोलापूर जिल्हा परिषदेनं दोन वेळा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन  गौरव केला आहे.

इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थी दाखल झालेबद्दल अधिवेशनामध्ये नागपूर येथे  शिक्षण सचिव मा. धीरजकुमार यांच्या हस्ते त्यांना  गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. याच बरोबर सोलापूर मीड टाऊन रोटरी क्लब चा गुणवंत शिक्षक पुरस्कार, मुंबई येथील लोकसेवा अकादमीचा प्राइड ऑफ नेशन पुरस्कार, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील शिक्षक रत्न पुरस्कार, माढा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, सर फाउंडेशन सोलापूर यांचा प्रयोगशील शिक्षक पुरस्कार, कविवर्य कुसुमाग्रज राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार,  श्रावण बाळ पुरस्कार, यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.

    आज पर्यंत  अनेक दैनिकासाठी प्रसंग लेखन, पत्रलेखन, काव्यलेखन, व्यक्ती चरित्र याविषयी लेखन केलं आहे.

            पंचवीस वर्षाच्या सेवा काळात त्यांनी स्वतः एम. ए. बी. एड पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असून अजून विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा अभ्यास करण्याची त्यांची इच्छा आहे. आजच्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक ज्ञानाचा झालेला विस्फोट, माहिती स्त्रोताचा महासागर ,मोबाईल, इंटरनेट, टीव्ही, वर्तमानपत्रातून मिळालेली अद्ययावत माहिती यामुळे आजची मुलं अतिशय स्मार्ट बनलेली आहेत. आपल्यापेक्षा त्यांना खूप ज्ञान आहे असं समजून शिक्षकांनी स्वतः परिपूर्ण व्हायला हवं असं त्यांना वाटतं. 

     स्पर्धेच्या युगात केवळ नोकरीचा मार्ग न शोधता विद्यार्थ्यांनी स्वतःच्या उत्पन्नाचा मार्ग शोधायला  हवा. यासाठी संधीच्या नवीन वाटा ..माहिती केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्राची निर्मिती माजी विद्यार्थी व मित्र मंडळाच्या वतीने सुरू करण्याचा त्यांचा संकल्प आहे.

जिल्हा समन्वयक सर फाउंडेशन सोलापूर, बोलवाडी प्रकल्प शेटफळ, आणि प्रिसिजन फाउंडेशन ई-लर्निंग प्रोग्रॅम सोलापूर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सतत नवनवीन योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम चालू कसे ठेवता येतील यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एका जिद्दी आईची आणि यशस्वी उद्योजकाची यशोगाथा

 एका जिद्दी आईची आणि यशस्वी उद्योजकाची यशोगाथा.....

    ज्योती नारायण केदार अचानक झालेलं  पतीचे निधन! अंगणवाडीचा तुटपुंजा पगार! छोट्याशा पत्र्याच्या शेडमध्ये दोन मुली आणि एक मुलगा यांच्यासोबत कुटुंबाची आलेली एकदम जबाबदारी! जमीन असून अडचण नसुन खोळंबा अशी परिस्थिती. घरात करती सवरती एकटीच बाई. मुलींची लग्न जवळ आलेली. मुलाचं शिक्षण. अंगणवाडीची नोकरी सोडावी लागली. अरण हे स्वतःचं गावही सोडलं.मोडनिंब मध्ये येऊन एक छोटसं पत्र्याचं शेड उभारलं  आणि  जिथं राज्यातील वेगवेगळ्या व्यापारासाठी लोक इथं येतात. परिसरातल्या अनेक गावांमधील छोटे-मोठे व्यावसायिक इथं येऊन आपलं नशीब आजमावतात अशा मोडनिंब सारख्या गावात एक छोटासा व्यवसाय सुरू केला.

पाच किलो शेंगदाणे, त्यासाठी लागणारा गुळ, एक मिक्सर आणि इतर काही साहित्य विकत घेतलं. शेंगदाण्याचे लाडू बनवणे आणि ते आपल्या सभोवताली विकणे हा व्यवसाय सुरू केला. पाच वर्षांपूर्वीची ही गोष्ट.  शेंगदाण्याच्या लाडूला हाताची चव आली. तोपर्यंत मुलगा अक्षय केदार कपड्याच्या दुकानात कामाला होता. तोही आईला मदत करू लागला. वयाच्या मानानं लवकरच त्याला तरुणाईचा उन्माद काय असतो,मैत्री कुठपर्यंत करायची, समाजातले चांगलं-वाईट प्रसंग  समजले. दुकानात काम केल्यामुळ  गिर्‍हाईकां सोबत कसं बोलावं? मैत्री कशी वाढवावी? हे लवकरच त्याला समजलं. गोड बोलून बऱ्यापैकी अडचणी, समस्या, आपले प्रश्न सुटतात हे त्याला माहीत झालं. आणि दुसऱ्याच्या दुकानात काम करण्यापेक्षा म्हणजेच नोकर होण्यापेक्षा मालक  झालेलं काय वाईट! हा विचार मनात आला. मोकार फिरनं बंद झालं. दिल दोस्ती दुनियादारी चे रूपांतर व्यवसायामध्ये झालं. आईच्या हाताखाली मदत झाली. मग हळू हळू साईप्रसाद फुड्स या नावानं पत्र्याच्या शेड वर बोर्ड झळकला. लाडूची चव सबंध परिसर आणि जिल्ह्याच्या बाहेर संपूर्ण राज्यभर पसरली. अक्षय चे साईप्रसाद शेंगदाणा लाडू हा एक ब्रँड तयार झाला. मागणी वाढली. खप वाढू लागला. एक - दोन महिला कामाला ठेवल्या. मालवाहतुकीसाठी स्वतःची गाडी घेतली. व्याप वाढत गेला. मग त्याच्यासोबत बर्फी, शेंगदाणा चटणी, आणि यासारखे अनेक फूड प्रोडक्स तयार होऊ लागले. आज परिसरातील  वीस ते पंचवीस महिला  त्यांच्याकडं काम करतात. पंचवीस-तीस कुटुंबाची जबाबदारी आता अक्षय वर आहे. महिन्याला तीस-चाळीस लाखाचा टर्न ओव्हर होतो आहे. ज्या ठिकाणी लाडू तयार केले जातात तिथली स्वच्छता टापटीपपणा खरंच येऊन पाहण्यासारखा आहे.

            स्वतःच्या एका रिटेलर दुकानाचा शुभारंभ नुकताच पार पडला आहे.  मोडनिंब मध्ये एक मोठी जागा  घेतली आहे. त्या ठिकाणी साईप्रसाद फूड्स या नावानं एक मोठी कंपनी उभारण्याचा त्याचा मानस आहे. तरुणाईसाठी हा खूप मोठा संदेश तो देतो. बोलता-बोलता हसत हसत एक खंत मात्र त्यांन बोलून दाखवली. अजूनही समाज मुली च्या लग्नाचा विचार करताना मुलाचं कर्तृत्व, त्याचं व्यक्तिमत्व , चारित्र्य, या सर्व गोष्टींचा विचार करण्यापेक्षा मुलाला नोकरी आणि शेती किती आहे? याचाच अगोदर विचार करतात. त्याची धडपड आणि परिस्थितीशी दिलेली झुंज ते पाहत नाहीत.

       आपल्या सर्वांचे मित्र माधव देशपांडे सर यांचं परवा बोलता-बोलता एक वाक्य खूप आवडलं ....."आव्हानं आपली क्षमता अजमावण्यासाठी येतात. संकट आपली परीक्षा घेतात". हे वाक्य खूप आवडलं आणि समोर अक्षय दिसला... म्हणून थोडं लिहावसं वाटलं एवढच....एक विद्यार्थी म्हणून आम्हाला नेहमीच त्याचा अभिमान वाटतो.

.                

                                नवनाथ शिंदे

                             जिल्हा समन्वयक

                        सर फाउंडेशन सोलापूर

     


आठवण...

           

पंचवीस वर्षांपूर्वीची एक आठवण....


       इथं कांबळे कुठे राहतात हो? "इथं कांबळे कोण नाहीत.... असं समोरून उत्तर यायचं. तर कधी, का रे? काय काम होतं कांबळेकडे? असा प्रश्न यायचा...  मग मात्र बरं वाटायचं. कारण आम्हाला बोलता यायचं काहीतरी..... मग आमचं ठरलेलं उत्तर.... त्यांच्याकडे रूम होती भाड्याने द्यायची.... कोणीतरी म्हणेल आमच्याकडे रूम आहे. एवढ ऐकण्यासाठी  एवढा सारा खटाटोप चाललेला. मग कुणीतरी म्हणेल आमच्याकडे आहे... बघा रूम पसंत पडते का! मनातल्या मनात म्हणायचो," आता इथं पसंत पडण्याचा प्रश्न उरतोच कुठे?"

 विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेऊन फिरणारे आम्ही!एखाद्या गल्लीत शिरून सरळ रूम भाड्याने मिळेल का हे विचारण्याचे धाडस त्यावेळी नव्हतं. कोणीतरी काय म्हणेल! ही मनाला वाटणारी भीती कायमच सोबतीला होती! शंका येण्यासारखी आमची स्थिती होतीच जुन्या सायकलच्या कॅरेजला बांधलेली सुटकेस... काखेत मारलेली शबनम पिशवी.... आणि सार्‍या 

पसाऱ्यासह खोली बघत फिरणारे माझ्यासह दोघेजण मित्र.... एवढं सगळं करण्याचं कारणही तसंच होतं...

           पहिली खोली गडबडीनं सोडली होती... जुळे सोलापूर ची पाण्याची टाकी... त्याला लागलेल्या गळतीमुळे वाहत असलेला सततचा पाण्याचा झरा जवळच... बांधकाम करण्यासाठी एका मित्राच्या मित्राने कच्ची बांधलेली खोली... त्यामध्ये आमचं दोन महिने झालं बस्तान बसलेले. सकाळी उठायचं.. समोरून वाहणाऱ्या झर्‍यातलं बादलीभर पाणी घ्यायचं जवळच्या विजेच्या खांबावरून आकडा टाकून घेतलेल्या लाईटवर लाकडाच्या फळीच्या दोन्ही टोकाला दोन खेळ मारून त्याला बांधलेली हिटर ची तार आणि मग तयार केलेलं हे कृत्रिम हिटर सरळ बादलीत सोडायचा. गरमा गरम पाण्यानं आंघोळ करायची. सकाळी नेहरूनगर  माशाळ वस्ती येथील नामांकित शाळेत शिकवायला जायचं आणि रात्री  शिवछत्रपती रात्रशाळेत शिकायला यायचं.... असा आमचा दिनक्रम ठरलेला...

       काल अचानक हिटर चालू केला आणि पोल पासून हिटलरच्या कॉइल पर्यंत मोठी केबल जळून खाक झाली. आता काय करायचं? कोणाला सांगायचं? मालक माहित नाही? दुसऱ्याच्या भरवशावर  बिन भाड्याच्या खोलीत राहिलेलो आम्ही! काय करायचं सुचत नव्हतं! मग त्यावेळी सुचलेलं हे शहाणपण सरळ सामान घेऊनच नवी खोली शोधायची !असं ठरलेलं!! मग नवीन गल्लीत प्रवेश कसा करायचा? आणि सरळ खोली भाड्याने मिळेल का  असं कसं  विचारायचं ! म्हणून इथं कांबळे कुठे राहतात का? हे सुचलेलं....

    या सुचलेल्या साध्या प्रश्नाचं उत्तर अखेर आम्हाला मिळालं .सभोवताली सारं गवत, अडगळीची खोली ,आत मध्ये कुबट कुबट वास प्रत्येकी पन्नास रुपये प्रमाणे भाडं  ठरलं . सामान ठेवलं चावी घेतली. परंतु संध्याकाळपर्यंत तिथं राहण्याची मानसिकता तयार होईना. पुन्हा दुसऱ्या खोलीच्या शोधात बाहेर पडलो. नेहरूनगर, माशाळ वस्ती ,अशोक नगर परिसरात फिरलो आणि मनासारखी एक खोली मिळाली काही दिवस ठीक चालले परंतु पुन्हा मित्राच्या स्लीपर चप्पलचा पायर्‍या चढताना होणारा टपटप आवाज आणि रात्री दहा नंतर आमच्या  स्टोव्हचा होणारा फररर आवाज मालकाला असह्य झाला आणि लवकरच तिथूनही आम्हाला गाशा गुंडाळावा लागला..... हे सारं पडद्यामागं  चाललेलं

 हसरं दुःख पण मजेत.....

     पण प्रत्यक्षात मात्र इन शर्ट टाय घालून स्वच्छ गणवेशात सकाळी शाळेत येणारे आम्ही सर्व शिक्षक.... वर्गाच्या दरवाज्यापर्यंत मुलांना सोडवायला येणारे त्यांचे आई-वडील महिन्याला साडेतीनशे रुपयात सकाळी सात ते दुपारी दीड वाजेपर्यंत काम करणारे आम्ही  मस्त, मजेत, आनंदात होतोच कसे ?कोणास ठाऊक! पण कधीकधी हा प्रश्न आवर्जून पडतो!!!!! आणि मागच्या या साऱ्या प्रसंगाचं हसू येतं!!!!!


             नवनाथ....

अरण ची दादागिरी ते जिगरबाज अरण कर...

          

अरण ची दादागिरी ते जिगरबाज अरण कर....


          प्रत्येक गावाचं एक खास असं वैशिष्ट्य असतं आणि त्या वैशिष्ट्या नुसारच गावानं आपलं वेगळेपण जपलेलं असतं.

आमच्या लहानपणापासून गावातील प्रत्येकाच्या मनामध्ये ठासून भरलेलं वाक्य म्हणजे 'मी अरण चा आहे'. प्रत्येकाच्या नसानसामध्ये एक वेगळा अभिमान, गर्व, आणि सततचा ओसंडून वाहणारा उत्साह संचारलेला असायचा. का? कुणास ठाऊक? पण सार्‍या पंचक्रोशीत अरण हे नाव वेगवेगळ्या गोष्टींसाठी गाजलेलं असायचं.

मग ते भांडण असो, दमदाटी , मारामाऱ्या असो छोट्याशा भांडणासाठी सुद्धा संपूर्ण गाव एक व्हायचं. भांडणाला काही कारण असावच असंही नव्हतं. अगदी शुल्लक कारणासाठी सुद्धा लोक हमरीतुमरीवर यायची.शाळा ,बाजार, यात्रा ,जत्रा ही भांडणाची खास मैदानं असायची. कधीकधी तर भांडण सुरु कोणी केलं? आणि शेवट कोणी केला? भांडण का सुरू झालं होतं? हे दोघांनाही कळत नसायचं.. माणसांकडं सगळं होतं, परंतु विचार नव्हता. भांडणं व्हायची मग एकमेकांचा राग पिकांवर निघायचा, रानातली उभी पिकं उपटून टाकली जायची. रस्त्यावर पडलेल्या ट्रका रिकाम्या व्हायच्या. मनोरंजनाची साधनं नव्हती. शिक्षणाचा पत्ता नव्हता. कुटुंबं अज्ञानात आणि अंध:कारात वावरायची. अंधश्रद्धा तर होतीच पण घरात चार-पाच मुलं पाहिजेत अशी भावना प्रत्येक कुटुंबाची असायची कारण बांधावर उभा राहिलं तर आपल्याकडं पाहायची कुणाची टाप नसावी याच विचारांनं सर्वजण पेटलेली. त्यामुळे नुसती लोकसंख्या वाढली. बाकी काही नाही. असं हे सारं  इथलं वातावरण.

             1972 चा दुष्काळ. त्याकाळी विहिरींना पाणी भरपूर होतं. पण तरीही दुष्काळ होता  असं लोकं सांगतात कारण पैसा मिळणार्या पिकांची माहितीच नव्हती.अशा परिस्थितीत हरिभाऊ शिंदे ,(नाना) आणि त्यांचे सर्व सहकारी यांना वाटलं की गावात सातवीपर्यंत शाळा  आहे.  प्राथमिक शिक्षण झालं की मुलं मुली शाळा सोडतात. पुढचं शिक्षण होत नाही. यासाठी  गावात माध्यमिक शिक्षणाची सोय असावी म्हणून संत सावतामाळी विद्यालय या नावानं हायस्कूल सुरू झालं. मुलांचं शिक्षण पूर्ण होऊ लागलं. मुलीसुद्धा मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेऊ लागल्या. विठ्ठलराव शिंदे मालक यांनी ग्रामपंचायतीमध्ये वाचनालय सुरू केलं. मच्छिंद्र घाडगे सर यांनी शेती आणि पशुपालन आधुनिक पद्धतीनं कसं करावं  हे स्वतः करून लोकांना दाखवून दिलं. अरणच्या क्षितिजावर एक नवा आशेचा किरण दिसू लागला. मनातला आत्मविश्वास आणि शरीरातली रग, भांडणातली ताकद आणि मेंदूतला विचार यांनी आपली दिशा बदलली. आणि सर्व ताकदीनिशी सर्वांनी शिक्षण प्रवाहात स्वतःला झोकून दिलं.

         शिक्षण आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमातून चांगले विद्यार्थी घडू लागले. अगोदरच ही संतांची भूमी असल्यानं भरकटलेले विचार सावतोबांच्या मंदिरा सोबतच शाळेच्या प्रांगणात एकत्र जमा व्हायला वेळ लागला नाही. दहावीची एक एक बॅच बाहेर पडू लागली. प्रयत्न करेल त्याला नोकरी मिळू लागली मग पोलीस भरती, सैन्य भरती, शिक्षक भरती अशा विविध ठिकाणी मुलं-मुली आपली सेवा चोख बजावू लागले. पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी विविध कंपन्यांमध्ये काही मुलांनी आपलं नशीब अजमावलं अन् हळूहळू तिथंच स्थिर झाली. वाचन संस्कृती विकसित होत गेली. मग संत सावतामाळी विद्यालय वाचनालय, आणि ग्रामपंचायत वाचनालय यातूनच पुढं प्राचार्य हरिदास रणदिवे सर यांनी पुढाकार घेऊन गावात हरिभाऊ शिंदे (नाना) सार्वजनिक वाचनालय सुरू केलं. विविध  तरुण मंडळे, सांस्कृतिक मंडळे यांच्या माध्यमातून गावाचा सांस्कृतिक विकास झाला. अशा प्रकारच्या अनेक ठिकाणी ज्ञानाची भांडारं खुली झाली .थांबलेल्या आणि सडलेल्या मेंदूला नवा विचार मिळू लागला.

अंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय वेगानं आपली प्रगती करू लागले.  शिष्यवृत्ती परीक्षा , क्रीडा क्षेत्र , सांस्कृतिक क्षेत्र , व्यक्तिमत्व विकास स्पर्धा यामधूनच गावात एक मोठी सांस्कृतिक चळवळ उभी राहिली  विविध अंगांनी  अष्टपैलू विद्यार्थी घडू लागले. स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी चमकू लागले.प्रत्येक ठिकाणी अरण चं नाव आदरानं घेतलं जाऊ लागलं

           राजकारण ,समाजकारण, शिक्षण, नोकरी ,शेती, पशुपालन आणि उद्योगधंदे यामध्ये प्रत्येकांनी मिळेल तिथं स्वतःला झोकून दिलं आणि स्वतःला सिद्ध करून दाखवलं. योग्य नियोजन ,जबाबदारी  पेलण्याची तयारी ,धाडशी प्रवृत्ती  यामुळं प्रत्येक क्षेत्रात  अरण करांचा दबदबा कायम राहीला. जे करायचं ते शंभर टक्के जीव ओतून आणि अचूक करायचं हे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतून इथली मुलं शिकली. शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग झाले. कमी पाण्यावर, कमी क्षेत्रात, कमी भांडवलावर, प्रचंड उत्पादन काढून येथील शेतकऱ्यांनी पुणे-मुंबईसारख्या बाजारपेठांमध्ये आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला.

प्रचंड उत्साह, बोलण्यातला गोडवा, मैत्रीपूर्ण व्यवहार, जाईल तिथं आपलं नाव लक्षात राहील ही भावना मनात ठेवून या तरुण पोरांनी छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आणि त्यामध्ये प्रचंड यश मिळवलं.

नोकरदारांनी ज्या ठिकाणी ते सेवा करतात अशा ठिकाणी स्वतःचा नावलौकिक वाढवला. जबाबदारी उचलली. मोठे उद्योग धंदे करणाऱ्यांनी आपलं संपूर्ण लक्ष  धंद्यावर केंद्रित केलं. अतोनात कष्ट, व्यवसायावरचं  प्रचंड प्रेम, जिद्द चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर धंदे झपाट्याने वाढवले. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पशुधन वाढवलं अरण च श्रीक्षेत्र अरण हे नवं नाव रूढ झालं. आजपर्यंत तिरस्कारानं पाहणारे डोळे, फटकून वागणारी माणसं प्रत्येक 

अरणकराशी जवळीक निर्माण करण्याची संधी शोधू लागले. अरण हे एक मोठं विद्यापीठ झालं ,इथं प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला मिळू लागलं ,मैत्री करावी तर 

अरणकरांशीच  ही भावना संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली .'जुने जाऊ द्या मरणालागुनी जाळूनी किंवा पुरुनी टाका'

असं प्रत्येकाला वाटू लागलं आणि नव्या जोमानं ,नव्या उमेदिंन, नव्या जिद्दीनं येथील तरूण पेटून उठला.मागच्या सार्‍या गोष्टी तो विसरला. एक नवी दिशा नवी आशा घेऊन जन्मलेल्या पिढीला शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायला तो विसरला नाही. भांडण संपली, जाती-जातीतली तेढ संपली. राजकारणातला द्वेष, ईर्षा काळाच्या ओघात  नष्ट झाली. प्रत्येकानं स्वतः च एक निश्चित असं ध्येय ठरवलेलं दिसतं. हे ध्येय गाठण्यासाठी इथला प्रत्येक तरुण जिगरबाज अरण कर या नावानं झपाटलेला दिसतो आहे.  येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हरिभाऊ शिंदे नाना यांनी सुरू केलेलं संत सावतामाळी विद्यालय, तरुण पोरांनी सुरू केलेली सांस्कृतिक मंडळं यांना या बदललेल्या अरण चं सारं श्रेय दिलं तर कुणाला वावगं वाटू नये. माझ्या हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त थोडसं सिंहावलोकन आणि वर्तमान आणि भविष्यातील 

जिगरबाज अरण करां  विषयी वाटणारा सततचा आत्मविश्वास...कायम राहील हीच अपेक्षा...

               नवनाथ शिंदे, माजी विद्यार्थी   

       संत सावता माळी विद्यालय अरण





 

Friday, 29 January 2021

खरच आपण नशीबवान आहोत..!

थोडासा आठवणीला उजाळा..


           अचानक पोरगां विचारतो, "बाबा तुम्ही फोरव्हिलर कधी घेणार?तुम्ही ही जुनी गाडी का नाही बदलत?काय बाबा ,कसला फोन वापरताय! त्या आमच्या वर्गातल्या सनीच्या बाबासारखा जरा स्मार्ट फोन घ्या ना!!एक ना दोन असंख्य प्रश्न त्याच्याकडं असतात. मी मात्र हसून !बघूया !!घेऊया !!अशी थोडक्यात उत्तरे देऊन तात्पुरतं त्याला थांबवतो.....थोडं शांत होतो .मग काल, परवा,गेल्या वर्षी असं करत करत बालवयात पोहचतो.मन तिथचं घुटमळतं.या वयात माझे प्रश्न काय होते?मला त्यावेळी किती माहिती होती? आई वडिलांकडं माझ्या काय मागण्या असायच्या?आणि ते काय काय पुरवत होते.याचं  सबंध चित्रणच माझ्या  डोळ्यापुढं उभं राहतं.

           मुला मुलीचं गोड चित्र असलेलं बालभारतीचं पुस्तक, आणि शि.द.फडणीसांची व्यंगचित्र असणारं अंकगणित या दोन पुस्तकांमुळं आमच्या पाठीवरचं ओझं कमी होतं.कारण तेवढंही आई वडिलांना पेलवत नव्हतं.चौकोनी  आकाराची जाड कापडाची पांढरी  पिशवी. त्याला रिबीट मारुन बसवलेलं राॅकेल भरायच्या नळीपासून तयार केलेलं बंद.  निम्म्या भागात  पुस्तकं वह्या आणि निम्मा भागात  खापरी  पाठीचा खापळा म्हणजे लागडी फ्रेम नसलेली पाटी आणि धोतराच्या चिरगुटात भाकरी सोबत तेल चटणी असलेलं भाकरीचं गाठोडं .त्यावर चटणीवरच्या तेलाचे डाग कायम असायचे!  पण काय मज्जा होती राव!!!  मित्रांसोबत एकाच सुट्टीत अख्खा डबा संपायचा. घरी नुसतंच चिरगूट जायचं. आज मुलगा मुलगी शाळेतून  घरी आली की,  डब्बा का शिल्लक राहिला असा प्रश्न आम्ही  विचारतो. असं विचारायला आम्ही कधी घरच्यांना संधी दिलीच नाही.

              एखाद्याकडं सायकल असायची खूप अप्रुप वाटायचं.आम्हाला सायकल नव्हती त्यामुळं आम्ही  शाळेला लवकरच निघायचो. .शनिवार तर आजही आठवतो दप्तर काखेत मारायचं, रात्रीची शिळी भाकरी,  तेल चटणी बरोबर हातावर घ्यायची आणि खात खात शाळेत यायचं. शाळेत आल्यावरच हापश्याचं पाणी प्यायचं . शाळेत लवकर का नाही गेला तर गुरुजी झाडायला लावतात अशी तक्रार आम्ही कधी केलीच नाही. केली तरी ऎकतो कोण?  शाळा सारवायला शेण आणण्यासाठी सर्वात पुढं आम्ही असायचो. आणि आपला आपला वर्ग सारवण्यासाठी गडबड करणाऱ्या मुली सुद्धा पुढं पुढं करायच्या ! हे सारं आठवलं की 

  आजची पिढी सुधारली की बिघडली कळेनासं होतं!!!

        वर्षातून दोनच वेळा  म्हणजे १५ आॅगस्ट आणि २६जानेवारीला शर्ट आणि रफू केलेल्या चड्डीला पितळेच्या तांब्यात इस्तू टाकून केलेली कडक इस्त्री दिवसभर खूप आनंद देऊन जायची.या सगळ्या आनंदी वातावरणात वडिलांकडं काय काय मागावं हे कधी सुचलच नाही.

           असं करु नको, तसं करु नको,गुरूजींना सांगेन असं वाक्य सारखं सारखं ऎकायला लागायचं. हळूहळू ते कालबाह्य होत चाललंय.   रात्री चिमणीच्या उजेडात घरचा अभ्यास करुन सकाळी सर्व नाकात काजळी जमा व्हायची. तरीही कुणाकडं तक्रार नसायची. घरात लाईट घ्यावी असा विचार का नाही मनात आला कुणास ठाऊक?  गुरुजी ,आज मात्र

 मुलांला खूप टेन्शन येतयं.त्याचा अपमान करु नका.एकुलता एकच आहे.त्याचा पहिलाच नंबर आला पाहिजे.असा पालकांचा नेहमीच सूर असतो.  आम्ही मात्र स्वतःला  फारच नशिबवान समजतो कारण त्या काळी  नापास झालं काय!आणि पहिला नंबर आला काय! दोन्हीतला फरक कधी घरच्यांना कळलाच नाही.

          आम्ही पत्र ,तार,अंतर्देशीय पत्र पाहिली.टेलिफोन, मोबाईल,इ.मेल पाहिले.मोट,नाडा, इंजिन, इलेक्ट्रिक मोटार,बोअरवेल हे ही पाहिलं.दिवसभर वेगवेगळे मैदानी खेळ खेळणारा फिजिकल इंडिया ही पाहिला आणि वर्गावर्गातला डिजिटल इंडिया ही पाहिला.पहाटेपासून सुरु असणारी जात्यांची  घरघर ही ऎकली आणि   दिवस उगवल्यावर सुरु झालेली मिक्सरची खरखर ही ऎकली.म्हणून वाटतं आपली पिढी सर्वांचीच साक्षीदार ठरते आहे.।

            पूर्वी पैसे मिळवण्यासाठी साठी किती काम करावं लागतं हे माहीत होतं.आता मला वाटतं पैसे खर्चायचं माहिती आहे परंतु ते कष्टानं कसं मिळवायचं हे जाणून घ्यायची कुणाची इच्छा दिसत नाही...

काही का असेना श्रमशक्ती बरोबर श्रमाची प्रतिष्ठा कमी झाली,कमी श्रमात जास्त पैसे मिळवायची सवय लागली,  रूबाब वाढला, चैन वाढली,गरजा वाढल्या, पैशाचं मोल कमी झालं. म्हणूनच मुलांची मागणीची भूक  वाढली.

         त्यांची स्वप्नं मोठी झाली चांगली गोष्ट आहे,ती साध्य करण्याचे योग्य मार्ग आपण दाखवायला हवेत. आणि स्वतःच्या ईच्छा स्वतः पूर्ण करण्यातला खरा आनंद त्यांना घेऊ द्यावा.थोडक्यात त्यांना आयतं जास्त मिळू नये असं मला वाटतं.

                   नवनाथ शिंदे,अरण.