छोटे उद्योजक
.... अविनाश पाटील ची गगन भरारी..
'कामालाच देव मानणारे'आमच्या अरणचे सर्व गावकरी .सावता महाराजांचीच शिकवण दुसरं काय!गाव नेहमीच दुष्काळाच्या छायेत वाढलेलं.त्यामुळं नोकरी, धंदा,आणि पावसाच्या पाण्यावरची शेती यावरच लोकांचं जगणं. येथील लोकांना शिक्षणाची मात्र फार आवड. शिक्षणासाठी कुठून पैसा येतो हे मात्र मला न उलगडलेलं कोडं!खूप शिकायचं कुठतरी नोकरी शोधायची नाहीतर आहेच छोटा मोठा धंदा .
अविनाश पाटील असाच आमच्या गावचा विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेला विज्ञानाचा पदवीधर तरूण.वडील रावण पाटील माजी सैनिक धाकटा भाऊ संपत शिक्षकाची नोकरी करतो. अविनाशला मात्र शेतीचा चांगलाच नाद लागला.न लाजता खत घालणं,बाग चाळणं,बाग छाटणं ही काम तो आनंदानं करायचा. आधुनिक पद्धतीनं थोड्याशा पाण्यावर ड्रीपच्या सहाय्याने त्यानं डाळींबाची शेती करायला सुरूवात केली .शेती व्यवसायात चांगला जम बसला .अचानक डाळिंबाच्या बागांवर तेल्या ,कुजव्या यासारख्या रोगानं डाळींबाची शेती धोक्यात आणली.तोपर्यंत अविनाशचं लग्न झालं खर्च वाढला. वडिलांच्या पेन्शनवर आणि भावाच्या पगारीवर आपण किती दिवस अवलंबून रहायचं! काहीतरी धंदा करावा मनात विचार आला.
इच्छा असली की नक्कीच मार्ग सापडतो.अविनाशला सुद्धा सापडला.या कामी अतुल चौधरी सारखे गुरु त्याला मिळाले.मंगल सिद्धी ग्रुपचे ते संकलन अधिकारी. 'दुधाचा धंदा करतोस का?मी तुला पाहिजे ती मदत करतो.घाई नाही एक दिवस विचार कर आणि मग निर्णय घे'असा सल्ला त्यांनी मला दिला आणि मी कामाला लागलो असं अविनाश अानंदानं सांगतो.
तो सांगतो, दुध डेअरी सुरु केली वर्ष होतं २०११ .सुरूवातीला ६० ते ७०लिटर दूध संकलन झालं.हळूहळू शेतक-यांना विश्वासात घेत दुधाचा व्यवसाय करणा-यांना एकत्र केलं. त्यांना दुधाच्या योग्यतेनुसार भाव दिला.ना नफा ना तोटा असा माझा व्यवसाय सुरु झाला.रोजच्या रोज भाव कळू लागल्यानं दूध वाढू लागलं.मग मंगलसिद्धीच्या मशिनरी घेऊन दुध साठवायला सुरू झालं.कधी कधी दूध खराब व्हायचं. अख्ख्या टँकरचा तोटा वरचं काही सांगून जायचा.दरम्यानच्या काळात धंद्याची चांगली माहिती धेतली.प्रशिक्षण घेतलं.अनेकांच्या ओळखी झाल्या .धंद्यातली चांगली वाईट माणसं समजली आणि ठरवलं आता मागं वळून पहायचं नाही.
माझे मेहुणे दत्तात्रय गाजरे, बहीण सुनिता यांनी मानसिक आधार देत माझ्यामधील आत्मविश्वास जागा केला.बँक आॅफ इंडियाने आर्थिक आधार दिला आणि पंचवीस लाखाची दूध संकलनासाठीची मशीन खरेदी केली.व्याप वाढला संगणकीकृत कामकाज सुरू झालं .पत्नी विद्या आणि वडिल यांच्यावर काम सोपवून मी बाहेरची कामं पाहू लागलो.हे सर्व सांगताना त्याच्या चेहऱ्यावर चा उत्साह ओसंडून वाहत होता.
आज त्याच्याकडं पाच साडे पाच हजार लिटर दूध संकलन होतं.आई विमल,वडील, पत्नी,यांच्या सह चार कामगार दिवसभर हा सर्व कारभार पाहतात. महिन्याला त्याला या मधून सर्व खर्च वजा जाता ८० ते ९०हजार रूपये मिळतात.
यापुढे दुग्धजन्य पदार्थ स्वतः तयार करुन बाजारात आणण्याचा त्याचा विचार आहे. या कार्यासाठी त्याला शुभेच्छा देऊयात.
°°°°°°°°°°°°°°°°°° नवनाथ शिंदे.
No comments:
Post a Comment