विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Wednesday, 25 October 2023

7.साता समुद्रापार पोहोचलेल्या अक्षरमित्र गुरुजींची कहाणी


         शब्दांचं सौंदर्य आपल्या लेखणीतून साकारणारे ,मनाचे सौंदर्य शब्दातून कागदावर उतरवणारे ,अक्षरमित्र, अक्षरांचे जादूगार, अक्षरांचा बादशाह म्हणून सबंध जगभरात परिचित असणारे मंगळवेढा तालुक्यातील आसबेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अमित भोरकडे गुरुजी . 

       अगदी बालवयातच प्राथमिक शाळेतील गुरुजींनी  अक्षरलेखनाचे धडे द्यायला सुरुवात केली. सुंदर अक्षरांचे धडे गिरवता गिरवता त्यांनी आज भारतातच नव्हे तर जगभरात आपली कला पोहोचवली. लहानपणापासून गुरुजी फळ्यावर सुविचार लिहायचे सुंदर अक्षर हाच खरा दागिना. व्यक्तीच्या हस्तलेखनात त्यांचा स्वभाव दडलेला असतो. अक्षराला वळण लावत लावत स्वभावाला वळण लागलं. अतिशय नम्र ,शांत , सर्वांना मदतीचा हात देण्याची भावना. त्यांच्या या स्वभावाला कलेची जोड मिळाली जगभरातील अनेक माणसांशी त्यांची नाती जोडली गेली .  "कलेची गोडी अन् माणसं  जोडी " याप्रमाणं अगदी ग्रामीण भागातील लहान मुलांपासून ते वयोवृद्ध आजोबांपर्यंत सर्वांशीच अगदी तितक्याच निर्मळपणानं बोलणार हे व्यक्तिमत्व.  त्यांचे विद्यार्थी पाहतात. त्यांचं अनुकरण करतात. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की गुरुजींसारखं अक्षर मला कधी काढायला जमेल. दरवर्षी शाळेच्या सुरुवातीलाच गुरुजी तीस दिवसाचा अक्षर सुधारणा प्रकल्प विद्यार्थ्यांसाठी घेतात. अक्षरांच्या उभ्या, आडव्या, तिरप्या रेषा, गोल, अर्धगोल इथपासून संपूर्ण बाराखडी कशा पद्धतीनं लिहायची याचा सराव ते घेतात. गुरुजींकडून अक्षराची वळणं  शिकायला मिळाल्यावर तासंतास अशीच अक्षरं गिरवावीत असं मुलांना वाटतं. हस्ताक्षर, रांगोळी, चित्रकला, कॅलिग्राफी ,फोटोग्राफी, क्राफ्ट ,गायन, वादन यासारख्या अनेक कलाकृती नि:स्वार्थपणे ते विद्यार्थ्यांना शिकवतात . विद्यार्थ्यांसोबतच राज्यातील हजारो शिक्षकांना वरील सर्व कलाकृतींचं प्रशिक्षण त्यांनी यूट्यूब च्या माध्यमातून दिलं आहे. दीडशे हून अधिक व्हिडिओची निर्मिती त्यांनी केली असून  जगभरात हस्ताक्षर लेखन ही कला त्यांनी लोकांपर्यंत पोहोचवली आहे. व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अनेक अक्षर प्रेमींना एकत्र करून ते मार्गदर्शन करतात. माझी शाळा माझा फळा या माध्यमातून राज्यातील शिक्षकांना फलक लेखन करण्याची दिशा त्यांनीच दिलेली आहे असं अनेक शिक्षक आवर्जून सांगतात.

       शिक्षण परिषद, बाल मेळावे, चर्चासत्रे, परिसंवाद अशा प्रत्येक ठिकाणी रांगोळी आणि हस्ताक्षर प्रशिक्षणासाठी त्यांना बोलावलं जातं. त्यांची समजून सांगण्याची पद्धत, हातचं न राखता भरभरून देणं  हे त्यांचे गुण अनेकांना भावतात.

 अक्षरांच्या दुनियेतील मितभाषी तपस्वी म्हणून गुरुजी सर्वांना परिचित आहेत.

      गुरुजींची आत्तापर्यंत तीन पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. अक्षरलेखन या हस्तलिखित पुस्तकाच्या आजवर दहा हजाराहून अधिक प्रति विकल्या गेलेल्या आहेत .याशिवाय शिक्षकांसाठी फलकलेखन व बालकांसाठी हस्तलिखित गीतसंग्रह ही पुस्तके अतिशय दर्जेदार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी अक्षरांचा प्रचार व प्रसार करण्याचं ध्येय उराशी बाळगलं आहे. 

      असेन मी ....नसेन मी.... माझ्या अक्षरातून दिसेन मी ...हे त्यांच्या जीवनाचं जणू ब्रीदवाक्यच बनलं आहे. 

     मंगळवेढा ही जशी संतांची भूमी म्हणून ओळखली जाते तशी ती आता कलाकारांची भूमी म्हणून देखील ओळखली जाऊ लागली आहे. मंगळवेढात स्वच्छंद आर्ट अकॅडमी ची स्थापना करून गणेश मंदिरातील रांगोळी पासून ते प्रत्येक शासकीय कार्यक्रम, लग्न समारंभ अशा प्रसंगी सुंदर राखोळी रेखाटनं हे त्यांचं आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचं आवडीचं काम. तंत्रज्ञानाच्या आणि संगणकावरील विविध प्रकारच्या लेखन शैलीच्या युगात सुद्धा विद्यार्थ्यांचं हस्ताक्षरावरचं प्रेम कमी झालेलं दिसून येत नाही याचं सर्व श्रेय  गुरुजींनाच जातं.

     ज्ञानदानाबरोबरच आनंदी जीवन जगण्यासाठी एखादी तरी कला आपल्याजवळ असावी या उद्देशानं त्यांनी मुलांसाठी अनेक  कलाकौशल्य शिकवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे .त्यांच्या शाळेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले सुंदर कलाकृतींचे कलादालन तयार केले आहे .  त्यांना सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक म्हणून गौरविण्यात आलेले आहे . याशिवाय पंचायत समिती मंगळवेढा, सर फाउंडेशन महाराष्ट्र, अजंठा आर्ट अकॅडमी, नक्षत्रांचं देणं अशा विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं आहे.अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा आम्हा सर्व शिक्षकांना अभिमान वाटतो .पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.