अरण ची दादागिरी ते जिगरबाज अरण कर....
प्रत्येक गावाचं एक खास असं वैशिष्ट्य असतं आणि त्या वैशिष्ट्या नुसारच गावानं आपलं वेगळेपण जपलेलं असतं.
आमच्या लहानपणापासून गावातील प्रत्येकाच्या मनामध्ये ठासून भरलेलं वाक्य म्हणजे 'मी अरण चा आहे'. प्रत्येकाच्या नसानसामध्ये एक वेगळा अभिमान, गर्व, आणि सततचा ओसंडून वाहणारा उत्साह संचारलेला असायचा. का? कुणास ठाऊक? पण सार्या पंचक्रोशीत अरण हे नाव वेगवेगळ्या गोष्टींसाठी गाजलेलं असायचं.
मग ते भांडण असो, दमदाटी , मारामाऱ्या असो छोट्याशा भांडणासाठी सुद्धा संपूर्ण गाव एक व्हायचं. भांडणाला काही कारण असावच असंही नव्हतं. अगदी शुल्लक कारणासाठी सुद्धा लोक हमरीतुमरीवर यायची.शाळा ,बाजार, यात्रा ,जत्रा ही भांडणाची खास मैदानं असायची. कधीकधी तर भांडण सुरु कोणी केलं? आणि शेवट कोणी केला? भांडण का सुरू झालं होतं? हे दोघांनाही कळत नसायचं.. माणसांकडं सगळं होतं, परंतु विचार नव्हता. भांडणं व्हायची मग एकमेकांचा राग पिकांवर निघायचा, रानातली उभी पिकं उपटून टाकली जायची. रस्त्यावर पडलेल्या ट्रका रिकाम्या व्हायच्या. मनोरंजनाची साधनं नव्हती. शिक्षणाचा पत्ता नव्हता. कुटुंबं अज्ञानात आणि अंध:कारात वावरायची. अंधश्रद्धा तर होतीच पण घरात चार-पाच मुलं पाहिजेत अशी भावना प्रत्येक कुटुंबाची असायची कारण बांधावर उभा राहिलं तर आपल्याकडं पाहायची कुणाची टाप नसावी याच विचारांनं सर्वजण पेटलेली. त्यामुळे नुसती लोकसंख्या वाढली. बाकी काही नाही. असं हे सारं इथलं वातावरण.
1972 चा दुष्काळ. त्याकाळी विहिरींना पाणी भरपूर होतं. पण तरीही दुष्काळ होता असं लोकं सांगतात कारण पैसा मिळणार्या पिकांची माहितीच नव्हती.अशा परिस्थितीत हरिभाऊ शिंदे ,(नाना) आणि त्यांचे सर्व सहकारी यांना वाटलं की गावात सातवीपर्यंत शाळा आहे. प्राथमिक शिक्षण झालं की मुलं मुली शाळा सोडतात. पुढचं शिक्षण होत नाही. यासाठी गावात माध्यमिक शिक्षणाची सोय असावी म्हणून संत सावतामाळी विद्यालय या नावानं हायस्कूल सुरू झालं. मुलांचं शिक्षण पूर्ण होऊ लागलं. मुलीसुद्धा मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेऊ लागल्या. विठ्ठलराव शिंदे मालक यांनी ग्रामपंचायतीमध्ये वाचनालय सुरू केलं. मच्छिंद्र घाडगे सर यांनी शेती आणि पशुपालन आधुनिक पद्धतीनं कसं करावं हे स्वतः करून लोकांना दाखवून दिलं. अरणच्या क्षितिजावर एक नवा आशेचा किरण दिसू लागला. मनातला आत्मविश्वास आणि शरीरातली रग, भांडणातली ताकद आणि मेंदूतला विचार यांनी आपली दिशा बदलली. आणि सर्व ताकदीनिशी सर्वांनी शिक्षण प्रवाहात स्वतःला झोकून दिलं.
शिक्षण आणि शिक्षकांच्या अथक परिश्रमातून चांगले विद्यार्थी घडू लागले. अगोदरच ही संतांची भूमी असल्यानं भरकटलेले विचार सावतोबांच्या मंदिरा सोबतच शाळेच्या प्रांगणात एकत्र जमा व्हायला वेळ लागला नाही. दहावीची एक एक बॅच बाहेर पडू लागली. प्रयत्न करेल त्याला नोकरी मिळू लागली मग पोलीस भरती, सैन्य भरती, शिक्षक भरती अशा विविध ठिकाणी मुलं-मुली आपली सेवा चोख बजावू लागले. पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी विविध कंपन्यांमध्ये काही मुलांनी आपलं नशीब अजमावलं अन् हळूहळू तिथंच स्थिर झाली. वाचन संस्कृती विकसित होत गेली. मग संत सावतामाळी विद्यालय वाचनालय, आणि ग्रामपंचायत वाचनालय यातूनच पुढं प्राचार्य हरिदास रणदिवे सर यांनी पुढाकार घेऊन गावात हरिभाऊ शिंदे (नाना) सार्वजनिक वाचनालय सुरू केलं. विविध तरुण मंडळे, सांस्कृतिक मंडळे यांच्या माध्यमातून गावाचा सांस्कृतिक विकास झाला. अशा प्रकारच्या अनेक ठिकाणी ज्ञानाची भांडारं खुली झाली .थांबलेल्या आणि सडलेल्या मेंदूला नवा विचार मिळू लागला.
अंगणवाडी, प्राथमिक शाळा, माध्यमिक विद्यालय वेगानं आपली प्रगती करू लागले. शिष्यवृत्ती परीक्षा , क्रीडा क्षेत्र , सांस्कृतिक क्षेत्र , व्यक्तिमत्व विकास स्पर्धा यामधूनच गावात एक मोठी सांस्कृतिक चळवळ उभी राहिली विविध अंगांनी अष्टपैलू विद्यार्थी घडू लागले. स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी चमकू लागले.प्रत्येक ठिकाणी अरण चं नाव आदरानं घेतलं जाऊ लागलं
राजकारण ,समाजकारण, शिक्षण, नोकरी ,शेती, पशुपालन आणि उद्योगधंदे यामध्ये प्रत्येकांनी मिळेल तिथं स्वतःला झोकून दिलं आणि स्वतःला सिद्ध करून दाखवलं. योग्य नियोजन ,जबाबदारी पेलण्याची तयारी ,धाडशी प्रवृत्ती यामुळं प्रत्येक क्षेत्रात अरण करांचा दबदबा कायम राहीला. जे करायचं ते शंभर टक्के जीव ओतून आणि अचूक करायचं हे प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतून इथली मुलं शिकली. शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग झाले. कमी पाण्यावर, कमी क्षेत्रात, कमी भांडवलावर, प्रचंड उत्पादन काढून येथील शेतकऱ्यांनी पुणे-मुंबईसारख्या बाजारपेठांमध्ये आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवला.
प्रचंड उत्साह, बोलण्यातला गोडवा, मैत्रीपूर्ण व्यवहार, जाईल तिथं आपलं नाव लक्षात राहील ही भावना मनात ठेवून या तरुण पोरांनी छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आणि त्यामध्ये प्रचंड यश मिळवलं.
नोकरदारांनी ज्या ठिकाणी ते सेवा करतात अशा ठिकाणी स्वतःचा नावलौकिक वाढवला. जबाबदारी उचलली. मोठे उद्योग धंदे करणाऱ्यांनी आपलं संपूर्ण लक्ष धंद्यावर केंद्रित केलं. अतोनात कष्ट, व्यवसायावरचं प्रचंड प्रेम, जिद्द चिकाटी आणि सातत्याच्या जोरावर धंदे झपाट्याने वाढवले. दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पशुधन वाढवलं अरण च श्रीक्षेत्र अरण हे नवं नाव रूढ झालं. आजपर्यंत तिरस्कारानं पाहणारे डोळे, फटकून वागणारी माणसं प्रत्येक
अरणकराशी जवळीक निर्माण करण्याची संधी शोधू लागले. अरण हे एक मोठं विद्यापीठ झालं ,इथं प्रत्येकाकडून काहीतरी शिकायला मिळू लागलं ,मैत्री करावी तर
अरणकरांशीच ही भावना संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली .'जुने जाऊ द्या मरणालागुनी जाळूनी किंवा पुरुनी टाका'
असं प्रत्येकाला वाटू लागलं आणि नव्या जोमानं ,नव्या उमेदिंन, नव्या जिद्दीनं येथील तरूण पेटून उठला.मागच्या सार्या गोष्टी तो विसरला. एक नवी दिशा नवी आशा घेऊन जन्मलेल्या पिढीला शिक्षणाचं महत्त्व पटवून द्यायला तो विसरला नाही. भांडण संपली, जाती-जातीतली तेढ संपली. राजकारणातला द्वेष, ईर्षा काळाच्या ओघात नष्ट झाली. प्रत्येकानं स्वतः च एक निश्चित असं ध्येय ठरवलेलं दिसतं. हे ध्येय गाठण्यासाठी इथला प्रत्येक तरुण जिगरबाज अरण कर या नावानं झपाटलेला दिसतो आहे. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हरिभाऊ शिंदे नाना यांनी सुरू केलेलं संत सावतामाळी विद्यालय, तरुण पोरांनी सुरू केलेली सांस्कृतिक मंडळं यांना या बदललेल्या अरण चं सारं श्रेय दिलं तर कुणाला वावगं वाटू नये. माझ्या हायस्कूलच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त थोडसं सिंहावलोकन आणि वर्तमान आणि भविष्यातील
जिगरबाज अरण करां विषयी वाटणारा सततचा आत्मविश्वास...कायम राहील हीच अपेक्षा...
नवनाथ शिंदे, माजी विद्यार्थी
संत सावता माळी विद्यालय अरण
👌👌
ReplyDelete