पंचवीस वर्षांपूर्वीची एक आठवण....
इथं कांबळे कुठे राहतात हो? "इथं कांबळे कोण नाहीत.... असं समोरून उत्तर यायचं. तर कधी, का रे? काय काम होतं कांबळेकडे? असा प्रश्न यायचा... मग मात्र बरं वाटायचं. कारण आम्हाला बोलता यायचं काहीतरी..... मग आमचं ठरलेलं उत्तर.... त्यांच्याकडे रूम होती भाड्याने द्यायची.... कोणीतरी म्हणेल आमच्याकडे रूम आहे. एवढ ऐकण्यासाठी एवढा सारा खटाटोप चाललेला. मग कुणीतरी म्हणेल आमच्याकडे आहे... बघा रूम पसंत पडते का! मनातल्या मनात म्हणायचो," आता इथं पसंत पडण्याचा प्रश्न उरतोच कुठे?"
विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेऊन फिरणारे आम्ही!एखाद्या गल्लीत शिरून सरळ रूम भाड्याने मिळेल का हे विचारण्याचे धाडस त्यावेळी नव्हतं. कोणीतरी काय म्हणेल! ही मनाला वाटणारी भीती कायमच सोबतीला होती! शंका येण्यासारखी आमची स्थिती होतीच जुन्या सायकलच्या कॅरेजला बांधलेली सुटकेस... काखेत मारलेली शबनम पिशवी.... आणि सार्या
पसाऱ्यासह खोली बघत फिरणारे माझ्यासह दोघेजण मित्र.... एवढं सगळं करण्याचं कारणही तसंच होतं...
पहिली खोली गडबडीनं सोडली होती... जुळे सोलापूर ची पाण्याची टाकी... त्याला लागलेल्या गळतीमुळे वाहत असलेला सततचा पाण्याचा झरा जवळच... बांधकाम करण्यासाठी एका मित्राच्या मित्राने कच्ची बांधलेली खोली... त्यामध्ये आमचं दोन महिने झालं बस्तान बसलेले. सकाळी उठायचं.. समोरून वाहणाऱ्या झर्यातलं बादलीभर पाणी घ्यायचं जवळच्या विजेच्या खांबावरून आकडा टाकून घेतलेल्या लाईटवर लाकडाच्या फळीच्या दोन्ही टोकाला दोन खेळ मारून त्याला बांधलेली हिटर ची तार आणि मग तयार केलेलं हे कृत्रिम हिटर सरळ बादलीत सोडायचा. गरमा गरम पाण्यानं आंघोळ करायची. सकाळी नेहरूनगर माशाळ वस्ती येथील नामांकित शाळेत शिकवायला जायचं आणि रात्री शिवछत्रपती रात्रशाळेत शिकायला यायचं.... असा आमचा दिनक्रम ठरलेला...
काल अचानक हिटर चालू केला आणि पोल पासून हिटलरच्या कॉइल पर्यंत मोठी केबल जळून खाक झाली. आता काय करायचं? कोणाला सांगायचं? मालक माहित नाही? दुसऱ्याच्या भरवशावर बिन भाड्याच्या खोलीत राहिलेलो आम्ही! काय करायचं सुचत नव्हतं! मग त्यावेळी सुचलेलं हे शहाणपण सरळ सामान घेऊनच नवी खोली शोधायची !असं ठरलेलं!! मग नवीन गल्लीत प्रवेश कसा करायचा? आणि सरळ खोली भाड्याने मिळेल का असं कसं विचारायचं ! म्हणून इथं कांबळे कुठे राहतात का? हे सुचलेलं....
या सुचलेल्या साध्या प्रश्नाचं उत्तर अखेर आम्हाला मिळालं .सभोवताली सारं गवत, अडगळीची खोली ,आत मध्ये कुबट कुबट वास प्रत्येकी पन्नास रुपये प्रमाणे भाडं ठरलं . सामान ठेवलं चावी घेतली. परंतु संध्याकाळपर्यंत तिथं राहण्याची मानसिकता तयार होईना. पुन्हा दुसऱ्या खोलीच्या शोधात बाहेर पडलो. नेहरूनगर, माशाळ वस्ती ,अशोक नगर परिसरात फिरलो आणि मनासारखी एक खोली मिळाली काही दिवस ठीक चालले परंतु पुन्हा मित्राच्या स्लीपर चप्पलचा पायर्या चढताना होणारा टपटप आवाज आणि रात्री दहा नंतर आमच्या स्टोव्हचा होणारा फररर आवाज मालकाला असह्य झाला आणि लवकरच तिथूनही आम्हाला गाशा गुंडाळावा लागला..... हे सारं पडद्यामागं चाललेलं
हसरं दुःख पण मजेत.....
पण प्रत्यक्षात मात्र इन शर्ट टाय घालून स्वच्छ गणवेशात सकाळी शाळेत येणारे आम्ही सर्व शिक्षक.... वर्गाच्या दरवाज्यापर्यंत मुलांना सोडवायला येणारे त्यांचे आई-वडील महिन्याला साडेतीनशे रुपयात सकाळी सात ते दुपारी दीड वाजेपर्यंत काम करणारे आम्ही मस्त, मजेत, आनंदात होतोच कसे ?कोणास ठाऊक! पण कधीकधी हा प्रश्न आवर्जून पडतो!!!!! आणि मागच्या या साऱ्या प्रसंगाचं हसू येतं!!!!!
नवनाथ....
No comments:
Post a Comment