विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Wednesday, 10 January 2024

14.सृजनशील शिक्षक : राजकिरण चव्हाण

 सृजनशील शिक्षक : राजकिरण चव्हाण


   शिक्षणात नाविन्य राखायचं असेल तर सतत नवनवीन प्रयोग करावेच लागतात. विद्यार्थ्यांना भविष्यवेधी शिक्षणाची जोड द्यावी लागते. यासाठी स्वतःपासूनच पुढाकार घेणं आवश्यक आहे. या विचारानं गेली सतरा वर्षे सातत्यानं धडपडणारे सोलापूरच्या श्री समर्थ विद्यामंदिरचे शिक्षक राजकिरण चव्हाण हे नाव 'सृजनशील शिक्षक' म्हणून सर्वपरिचित आहेत.

    २१ व्या शतकातील सक्षम विद्यार्थी घडण्यासाठी विविध शैक्षणिक प्रयोगांबरोबरच त्यांना नवनवीन आव्हानं द्यायला हवीत. यासाठी ते सातत्यानं प्रयत्न करतात. डिजिटल कन्स्ट्रक्टिव्हिजम, आविष्कार, सर्वंकष लैंगिकता शिक्षण, बाप्पा-अध्यात्म आणि अभ्यासही!, आम्ही किती भयंकर?, चुप्पी तोडो, वारली पेंटिंग, डॉ. विजय भटकर कॉम्प्युटर लिटरसी प्रोग्राम, कॅलिग्राफी, बैठक ॲट स्कूल, फलकलेखन स्पर्धा, लाठीकाठी, छंदवर्ग व क्षेत्रभेट यासारखे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असे नाविन्यपूर्ण उपक्रम ते राबवत असतात.

     उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांच्या 'आयकॉनिक क्लब' उपक्रमाला शरद पवारांच्या हस्ते एक लाख रुपयाची इन्स्पायर फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. विविध क्षेत्रातील उद्याचं नेतृत्व शालेयस्तरापासूनच विकसित करण्यासाठी या क्लबच्या माध्यमातून प्रयत्न केले जातात. यामुळे आज शाळेतील विद्यार्थी इन्स्पायर अवॉर्ड, इसरो ऑनलाईन कोर्स, इग्नायटेड माईंड, टॅलेंट हंट अशा विविध स्पर्धांमध्ये यशस्वी होताना दिसत आहेत.

   राजकिरण चव्हाण ‘शिक्षणात तंत्रज्ञान’ या विषयावर विशेष काम करत आहेत. आजवर सोळा हजारपेक्षा जास्त शिक्षकांना ऑनलाईन-ऑफलाईन प्रशिक्षणांद्वारे तसेच यूट्यूब चॅनल व ब्लॉगच्या माध्यमातून शिक्षणात तंत्रज्ञान प्रभावीपणे वापरासंदर्भात मार्गदर्शन केले आहे. दैनिक सकाळमध्ये ‘शिक्षणात तंत्रज्ञान’ या सदरासाठी विपुल लेखन त्यांनी केले आहे. दीक्षा ॲप, ई-बालभारती व्हर्च्युअल क्लास, आठवी स्कॉलरशिपसाठी ई-कंटेंट निर्मिती, शाळेतील शिक्षकांची तंत्रज्ञान वापरासंदर्भातील भीती कमी करण्यासाठी ‘फरगेट द टेक्नोफोबिया’ या अभिनय कार्यशाळेचे आयोजन, सोलापूर मनपा शिक्षण मंडळाच्या ‘ज्ञान की बात’ उपक्रमाचे टीम प्रमुख म्हणून काम याशिवाय शाळेत विविध कंपन्याच्या सीएसआर फंडांच्या माध्यमातून शाळेला 'डिजिटल स्मार्ट सोलर स्कूल' करण्यात महत्त्वाचे योगदान त्यांनी दिले आहे.

    सर्व कार्याची दखल घेत त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आय.आय.एम. अहमदाबादचा टीचर इनोव्हेशन अवॉर्ड, एसएसआयडी पुणे इनोव्हेटिव्ह टीचर एक्सलन्स अवॉर्ड, सारथी उपक्रमशील शिक्षक, मनपा उपक्रमशील शिक्षक, लोकमंगल शिक्षकरत्न, लायन्स व रोटरी क्लबच्या पुरस्कारांचा प्रामुख्यानं समावेश करता येईल.

       एससीईआरटीच्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा ड्राफ्ट तयार करण्यासाठीही काम केले आहे. याशिवाय सर फाऊंडेशनचे आयटी विभागप्रमुख म्हणून काम पाहतात. सर फाउंडेशन मार्फत चालवला जाणारा अविष्कार प्रोजेक्ट त्यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवला असून समस्या शोधणं आणि त्यावर उपाययोजना करणं, विद्यार्थ्यांमधली संशोधक वृत्ती जागृत करणं हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी अविष्कार कार्यशाळा त्यांनी घेतल्या. कृतिशील विद्यार्थी शोधले. त्यांच्यामध्ये नवोपक्रमाची आवड निर्माण केली. यासाठी श्री चव्हाण यांचं कार्य कौतुकास्पद आहे.


कोरोना काळातही शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण

कोरोनात काळात शिक्षकांना तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी ‘ट्रेनिंग फ्रॉम होम’ या ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन, शिक्षकांना वारंवार पडणाऱ्या प्रश्नांना एकत्रित करून एफ.ए.क्यू. कॅम्पेन ही ४० व्हिडिओंची मालिका तयार केली. द बेटर इंडिया ने याची ‘कोरोना हिरोज’ म्हणून दखल घेतली होती.

No comments:

Post a Comment