विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Thursday, 23 May 2024

32.शैक्षणिक क्षेत्रातलं अष्टपैलू व्यक्तिमत्व काटेगावचे रवींद्र देशमुख गुरुजी

 



    नि:स्वार्थ सेवा, लाघवी आणि मृदू भाषा शैली, कला आणि मातृभाषेवरचं प्रेम, शिक्षक, विद्यार्थी ,पालक ,अधिकारी, पदाधिकारी या सर्वांचा समन्वय घडवण्याची अंगी असणारी कला, प्रत्येक विद्यार्थ्याला आपल्याकडं  प्रेमानं खेचून घेणारं अष्टपैलू व्यक्तिमत्व, म्हणजे काटेगावचे रवींद्र देशमुख गुरुजी! सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील बाळगी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत ते कार्यरत आहेत.

       गुरुजींना नाटक,संगीताची विलक्षण आवड. कौठाळी शाळा आणि गुरुजींचं नातं शब्दांत नाही सांगता येणार.विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी अनेक हालअपेष्ठांना तोंड देत सहका-यां च्या मदतीनं केवळ एक वर्षाचा अपवाद वगळता अखंड वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम, कथा कथन, वक्तृत्व, समूहगायन, लोकनृत्य, बालनाट्य अशा विविध व्यक्तिमत्त्वविकास स्पर्धांमधून शाळेनं  तालुका ,जिल्हा स्तरावरील पारितोषिकं पटकावली. गुरुजीलिखित "गुरूदक्षिणा" या बालनाट्यानं तर जिल्ह्य़ात प्रथम क्रमांक पटकावला. 

     त्यांनी हौशी रंगमंच गाजवलं, कथा कविता बालनाट्य, वृत्तपत्रीय लेखन तसेच नाट्य लेखन ते करत आहेत. त्यांच्या " काटेरी सासर " या नाटकास मराठी रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ मुंबईकडून प्रमाणित केले आहे.या सर्व कला विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला .त्यांच्या विद्यार्थ्यांचे  लेखन संकलन वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले. त्यांच्या विद्यार्थ्यांचा मराठी इंग्रजी सुंदर हस्ताक्षर प्रकल्प संपूर्ण जिल्ह्य़ासाठी मार्गदर्शक ठरला. सर्व मुलांची अक्षरे सुंदर आणि एक सारखी असू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं.  लोक सहभागातून शाळाविकासाची अनेक भरीव कामं त्यांनी केली आहेत.सोलापूर आकाशवाणीवर शालेय कार्यक्रमाचं प्रसारण करण्यात आलं.

     कवठे ता. उत्तर सोलापूर  या शाळेत असताना तत्कालीन सीईओ साहेब राजेंद्र भारूड सरांच्या  फेसबुक लाईव्ह कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थ्यांसह जिल्हा परिषद सोलापूर येथे भारूड साहेबांच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचा योग आला. विद्यार्थ्यांची गायन कला आणि प्रश्न विचारण्याचं धाडस पाहून गुरुजींचा त्यांनी गौरव केला. या शाळेत लोकवर्गणीतून सुमारे साडेतीन लाख रुपये जमवून ग्रामस्थांच्या मदतीनं कवठे शाळा आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाली. 

     गुरुजींची बदली बाळगी.ता दक्षिण सोलापूर इथं झाली. गाव संपूर्ण कन्नड भाषिक, विद्यार्थ्यांवर कन्नड भाषेचा प्रभाव व गुरुजीना कन्नड बोलता येत नाही व कळतही नाही अशी आव्हानात्मक स्थिती होती. पण शिक्षण मराठीतून असल्यानं त्यांनी मराठीचा वापर आग्रहपूर्वक केला.  अशाही परिस्थितीत अविरत प्रयत्न करत गुणवत्ता वाढीचा प्रयत्न करत शिष्यवृत्ती परिक्षेस बहुसंख्य मुलांना बसवले.

   गुरुजी समर्पित भावनेनं सर्व अधिकारी वर्ग, मुख्याध्यापक व सहकारी शिक्षकासोबत सेवा कार्य  करत आहेत .

        गुणवंत शिक्षक, प्रेरणा पुरस्कार, जिजाऊ सावित्री पुरस्कार, अक्षरग्रंथ पुरस्कार,आदर्श शिक्षक पुरस्कार,गाव, तालुका,जिल्हा पातळीवरचे अनेक पुरस्कार मिळाले. कथाकथन, वक्तृत्व, नृत्य, लेखना बद्दलही अनेक पुरस्कार मिळाले  प्रत्येक पुरस्कार विद्यार्थ्याना अर्पण करित आपली सेवा अत्यंत नम्रपणे सुरु ठेवली.

त्यांनी अनेक प्रशिक्षण वर्गासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रभावीपणे काम केले.तसेच सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळेतील मुला-मुलींना मुंबई दर्शन सहल ,तसेच  कर्नाटक राज्यात सुद्धा   शिक्षणाधिकारी मा. कादर शेख साहेब व उपशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या जबाबदारीनं त्यांनी सहल यशस्वी केली.

      गुरुजींनी फेसबुकच्या माध्यमातून " देशमुख गुरुजींचा धडा " हे सदर दिसामाजी काहितरी लिहावे या उक्तीप्रमाणं सलग 365 दिवस दररोज तीन साडेतीनशे शब्दांचं विविध विषयांवर लेखन करुन मराठी साहित्यात एक वेगळा विक्रम स्थापित केला. त्यांचे देशमुख गुरुजींचा धडा भाग :1 आणि वक्ता महाराष्ट्राचा ही दोन पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. 

     

No comments:

Post a Comment