प्राथमिक शाळेपासूनच खेळाची आवड. संपूर्ण राज्याला परिचित असणारं आर्चरी खेळाचं ऊर्जा स्रोत असणाऱ्या संत सावतामाळी विद्यालयात माध्यमिक शिक्षण आणि तिथूनच क्रीडा क्षेत्रात प्राविण्य दाखवून पुढं स्पर्धा परीक्षेची तयारी करायची असं स्वप्न मनी बाळगत अपार कष्ट करणारा विद्यार्थी विठ्ठल भालेराव. धनुर्विद्या खेळातला सराव चालू ठेवत, पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण करत बीए बी पी एड पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं आणि शांतिनिकेतन माध्यमिक विद्यालयात क्रीडा शिक्षक म्हणून भालेराव यांनी नोकरी स्वीकारली. आता स्पर्धा परीक्षेतलं स्वप्न विद्यार्थ्यांच्या रूपानं पूर्ण करायचं ठरलं आणि धनुर्विद्या याच खेळावर लक्ष केंद्रित करत अरण मध्ये पहिल्यांदा ज्यांनी धनुर्विद्या हा खेळ आणला ते हरिदास रणदिवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायला भालेराव यांनी सुरुवात केली.
भालेराव राज्यस्तरीय स्पर्धेत चार वेळा खेळले , राष्ट्रीय स्पर्धेत खेळले पण यश प्राप्त करता आले नाही. महाराष्ट्र संघाचा ब्लेजर मिळावा हे स्वप्न अपूरं राहिलं मग 2011 पासून विद्यार्थ्यांना धनुर्विद्या प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. एका विद्यार्थ्यावर सुरू केलेलं प्रशिक्षण पुढं शंभर विद्यार्थ्यांपर्यंत जाऊन पोहोचलं.
त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनी नव नवीन रेकॉर्ड तयार केलं. 2018 साली त्यांनी निवासी गुरुकुल सुरू केलं.फक्त आपल्याच विद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलं नाही तर राज्यातील अनेक विद्यार्थी त्यांच्या धनुर्विद्या प्रशिक्षण गुरुकुलात सामील झाले.
त्यांचा मुलगा विश्व रत्नने तर दहा वर्षाखालील गटात महाराष्ट्रात पाच गोल्ड मेडल प्राप्त करून प्रथम क्रमांक पटकावला . नेताजी सुभाष नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट पतीयाला आर्चरी कोलकत्ता येथून त्यांनी प्रशिक्षण कोर्स पूर्ण केला आणि भालेराव यांची महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षक पदी निवड झाली. खेळाडू म्हणून महाराष्ट्र संघाचा ट्रॅक सूट मिळावा अशी त्यांची इच्छा होती पण धनुर्विद्या प्रशिक्षण प्रशिक्षक म्हणून आंध्र प्रदेशात झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांना ट्रॅक सूट मिळाला हा त्यांच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण .
आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विकास मोरे या खेळाडूने सुवर्णपदक प्राप्त केले. एक खेळाडू खेलो इंडीयासाठी पात्र झाला ,एक खेळाडू दोन वेळा राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र झाला, 17 खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत विजेते आहेत तर 25 खेळाडूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत पदक प्राप्त केलं आहे. त्यांचे दोन खेळाडू सध्या खेळामधूनच प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत.
एक चांगला खेळाडू एक चांगला प्रशिक्षक होऊ शकत नाही आणि चांगला प्रशिक्षित एक चांगला खेळाडू होऊ शकत नाही हे एका पुस्तकात वाचलं होतं. ते इथं तंतोतंत जुळलेलं दिसून येत होतं. गरीब कुटुंबातून निर्माण झालेला खेळाडू, पुढं तुटपुंज्या पगारावर नोकरी करत असलेला शिक्षक आणि त्यांची धनुर्विद्या प्रशिक्षणासाठी चाललेली धडपड पाहून अनेक मित्रांनी त्यांना मदत केली. डॉ. प्रवीण पाटील , सुदीपची शहा आणि आकाश माने
यांनी आर्थिक रुपानं तर कायमस्वरूपी खिलाडूवृत्ती जागृत रहावी यासाठी संजय शिंदे सर, रणजीत चामले सर हे भालेराव सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
धनुर्विद्या हा खेळ खरंतर खूप खर्चिक आहे. ज्या विद्यार्थ्यांना खेळाची आवड आहे आणि बौद्धिक क्षमता ही चांगली आहे. अशा विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेकडे बऱ्यापैकी कल दिसून येतो. भविष्यात अशा विद्यार्थ्यांसाठी आपण मार्गदर्शन करणार आहोत असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment