मूल जेव्हा शाळेतून शिकून बाहेर पडतं त्यावेळी त्याचा सर्वांगीण विकास झालेला असला पाहिजे. कौशल्यदिष्टीत अभ्यासक्रमाचं हेच तर खरं वैशिष्ट्य आहे. हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवत सुप्रिया ताकभाते या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माढा मुले नं.१ येथे दहा वर्षे तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विठ्ठलवाडी येथे पाच वर्षांपासून सेवा करत आहेत . नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा यासाठी त्या सातत्यानं झटत आहे. वक्तृत्व, कथाकथन, नृत्य, चित्रकला, बुद्धिबळ, एकपात्री नाटक, क्रीडा, पोस्टर इत्यादी स्पर्धेत त्यांच्या विद्यार्थ्यांनी तालुका, जिल्हा स्तरापर्यंत क्रमांक पटकाविले आहेत.
कोरोना काळात राबविलेले सामान्य ज्ञानावर आधारित 'प्रश्नांचा गुरुवार' आणि सहज, सोपे प्रयोग असणारा 'रविवारचा प्रयोग' हे उपक्रम पूर्ण महाराष्ट्र राज्यासोबत गोवा राज्यातही जाऊन पोहोचले होते. कोरोना काळात ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांचा ऑनलाइन अभ्यास घेत शैक्षणिक प्रवाहात त्यांना ठेवण्याचं मोठं काम श्रीमती ताकभाते मॅडम केलं होतं.
क्षितिज फाउंडेशनच्या मदतीनं त्या मुलांच्या आरोग्य सुधारण्यासाठी गेल्या पाच वर्षापासून पोषण आहार सप्ताह शाळेत राबवितात. हात धुवादिनानिमित्त राबवलेल्या उपक्रमाची दखल UNICEF या संस्थेनं घेतली आहे. युनिसेफने जागतिक जल दिना निमित्त शाळेतील त्यांच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या उपक्रमांचे व्हिडिओही मागवून घेतले.
किशोरवयीन मुलींना मासिक पाळी विषयी मार्गदर्शक,या वयात आई आणि मुलींचं नातं , दृढ करण्यासाठी विविध स्पर्धा, चर्चासत्र, उद्बोधन वर्ग त्या आयोजित करतात.
विठ्ठलवाडी हे गाव स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचं गाव म्हणून ओळखलं जातं. यासाठी प्राथमिक शाळेपासूनच विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लावली जाते. 'माझा वाढदिवस पुस्तकांसोबत' या उपक्रमाअंतर्गत शाळेसाठी पंचवीस हजाराची पुस्तके वाचनालयासाठी संग्रहित केली आहेत. तसेच इतर सामाजिक संस्थांकडून कडून पंचवीस हजाराची पुस्तके प्राप्त करून घेतली आहेत. त्यांचे विद्यार्थी सकाळचा एनआयइ हा अंक नियमित वाचतात.
पर्यावरण हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. परंपरा जपूया, पर्यावरण राखूया! माझे पुस्तकाचे वाण, प्लास्टिक मुक्ती इत्यादी अनेक उपक्रम पर्यावरण संरक्षणासाठी त्या राबवतात.
सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थी टिकण्यासाठी स्पर्धा परीक्षा जोरदार तयारी करून घेतात. त्यामुळेच शिष्यवृत्ती आणि इतर स्पर्धा परीक्षेत त्यांचे विद्यार्थी गुणवत्ता यादीतही दरवर्षी चमकतात. कलागुणांना वाव देण्यासाठी बालसभा, नवरात्रीच्या नवदुर्गा, रांगोळी ,निबंध लेखन अशा स्पर्धा आवर्जून घेतात. इंग्रजी वाचन, लेखन, संभाषण यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रमही त्या शाळेमध्ये राबवतात.
शैक्षणिक आणि इतर विषयावरील त्यांचे लेखन जीवन शिक्षण, जीवन गौरव, सकाळ वर्तमानपत्रात प्रकाशित झाले आहे. सर फाउंडेशन आयोजित नवोपक्रम स्पर्धेतही त्यांच्या उपक्रमाची निवड झाली आहे.
मतदान जनजागृती, घर घर तिरंगा, लेट्स चेंज, केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेला विविध विषयावर मार्गदर्शन, तंबाखूमुक्त शाळा, जागर योजनांचा उपक्रमामध्ये सक्रिय सहभाग. सेल्फी विथ सक्सेस, गोष्टीचा शनिवार, आनंददायी शनिवार, विद्यार्थी बचत बँक, आरोग्याकडून अभ्यासाकडे, सामान्य ज्ञान प्रश्न आणि परीक्षा, ई लर्निंग , लर्न विथ फन, गप्पांचा तास यासारखे अनेक उपक्रम त्या शाळेत राबवितात. त्यामुळेच त्यांना उपक्रमशील शिक्षिका हा बहुमान मिळत आहे.
पुरस्कार
जिल्हा परिषद सोलापूर मार्फत शिष्यवृत्ती विभागातून जिल्हास्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार, सर फाउंडेशन मार्फत जिल्हास्तरीय नारीशक्ती पुरस्कार, रोटरी क्लब कडून नेशन बिल्डर अवार्ड, क्षितिज फाउंडेशन कडून एस्पायरिंग वुमेन अवार्ड, अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलना मार्फत सावित्रीबाई फुले पुरस्कार, कृतिशील शिक्षिका पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment