विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बौद्धिक, शारीरिक, मानसिक विकासाची जशी गरज असते तशाच सामाजिक जाणीव त्याच्यामध्ये विकसित व्हायला हव्यात यासाठी स्काऊट गाईड, कब बुलबुल, यासारखे शाळा शाळांमध्ये उपक्रम आयोजित केले जातात. श्री शिंदे सरांनी
कै. शंकरराव बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अनगर येथे राष्ट्रीय सेवा योजना मध्ये खूप मोठे काम केले आहे. गेले पंचवीस वर्षे उच्च माध्यमिक विभागात अध्यापनाचे काम करत असताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर श्रमाचे संस्कार करण्याचे काम अखंडपणे सुरू ठेवले आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यामध्ये आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो ही भावना जागृत करुन त्या भावनेतून विद्यार्थी मनोभावे सामाजिक कार्य करताना दिसून येतात.
या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, पाणी आडवा पाणी जिरवा, स्वच्छ भारत अभियान, मुली वाचवा अभियान, प्लास्टिक मुक्त गाव योजना, व्यसनमुक्ती चळवळ, हागणदारीमुक्त गाव योजना, मतदार जागृती अभियान, एक पद एक वृक्ष इत्यादी सामाजिक जनजागृतीचे कार्यक्रम राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत आयोजित केले जातात.
विद्यार्थी मनोभावे यामध्ये सहभागी होतात. विद्यार्थ्याच्या मनावर श्रमाचे संस्कार व्हावेत यासाठी दरवर्षी एक गाव दत्तक घेऊन तेथे सात दिवसाचे श्रमसंस्कार शिबीर आयोजित केले जाते. या काळात गावामध्ये वरील सर्व सामाजिक उपक्रम राबविले जातात. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी विभाग, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शिबिरामध्ये सहभागी झाले आहेत. नुकताच सुनील लोंढे नावाच्या विद्यार्थ्यांला पुणे विभाग स्तरावरील उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून पुरस्कार मिळाला आहे हेच राष्ट्रीय सेवा योजनेचे यश म्हणावे लागेल.
आजपर्यंत शालेय परिसरात दोन हजार पेक्षा जास्त झाडाचे रोपण करून संपूर्ण झाडे जगवली. त्यामुळे शाळेला "हरित शाळा" पुरस्कार मिळाला. दत्तक गावामध्ये संपूर्ण वृक्षारोपण करून तेथील लोकांमध्ये झाडाबद्दल प्रेम निर्माण केले. अंजनगाव (खे.) ता. माढा या ठिकाणी शिबीर कालावधीत चाळीस लाख लिटर क्षमतेचा वनराई बंधारा बांधून गावाची उन्हाळ्यातील पाण्याची समस्या दूर केली. गेल्या वर्षी कुंभेज ता. माढा या ठिकाणी शिबीर काळात "चला जाणून घेऊया नदीला" या मोहिमेअंतर्गत नदी स्वच्छता अभियान राबविण्यात आले व सीना नदीपात्र स्वच्छ करण्यात आले. कोरोना काळात मास्क, सानीटायझर वाटप, संपूर्ण लसीकरण मोहीम राबविण्यात आली. कालच्या दिवाळी सुट्टीला जाण्याअगोदर तीन हजार विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथपत्र भरून दिली. नुकत्याच संपलेल्या नव मतदार नोंदणी अभियानामध्ये उच्च माध्यमिक स्तरावर अठरा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची नवमतदार म्हणून नोंद केली. केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल मोहोळचे तहसीलदार मा. श्री. सचिन मुळीक यांनी सन्मानपत्र देऊन गौरव केला. मुख्यमंत्री-माझी शाळा, सुंदर शाळा हे अभियान संपूर्ण राज्यांमध्ये सुरू आहे. या अभियानात शाळा तालुक्यात पहिल्या क्रमांकाने यशस्वी झाली व तालुकास्तरावरचे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस जिंकले. या सर्व कामांमध्ये शाळेतील प्रत्येक मानवी घटकाचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्षपणे सहभाग असतो तेव्हाच हे शक्य होते. हे सर्व काम विद्यार्थी मनोभावे करतात व कामाचा आनंद लुटतात. मुलांमध्ये प्रचंड ऊर्जा असते. त्या ऊर्जेला योग्य वळण दिले म्हणजे विद्यार्थ्याच्या व्यक्तीत्त्वाचा विकास होण्यास मदत होते. हे सर्व शक्य झाले ते केवळ येथील मुख्याध्यापक तथा प्राचार्य श्री. चंद्रकांत ढोले सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कामामुळेच. शासन स्तरावर केलेल्या कार्याची दखल घेऊन नुकताच शिंदे यांना शिक्षण संचालनालय, पुणे विभाग पुणे यांचे कडून "उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी" हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. कोल्हापूरच्या छत्रपती शाहू इन्स्टिटय़ूट ऑफ बिझनेस अॅडमिनीस्ट्रेशन या संस्थेने "दिनकर मास्तर सर्जनशील शिक्षक पुरस्कार" देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच संस्थेनेही "प्रज्ञावान वर्गशिक्षक" पुरस्कार देऊन गौरव केला. हे सर्व करत असताना विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्त्वामध्ये आमूलाग्र बदल होत आहे,आणि हाच माझ्यासाठी सर्वोत्तम पुरस्कार मी मानतो.असे श्री. शिंदे म्हणतात.
No comments:
Post a Comment