विचार... संवाद... कट्टा...!

विचार... संवाद... कट्टा...!

Wednesday, 6 March 2024

22. दोनशेहून अधिक व्यक्तिमत्त्वांचा ऑटोग्राफ घेणारा छंदवेडा शिक्षक रवींद्र देबडवार

 दोनशेहून अधिक व्यक्तिमत्त्वांचा ऑटोग्राफ घेणारा छंदवेडा शिक्षक रवींद्र देबडवार


       'हा छंद जीवाला लावी पिसे' प्रसिद्ध गीतकार वंदना विटणकर यांचं हे सुंदर गीत! ऐकलं की वाटतं, खरंच माणसाला छंद वेड लावतो. आपलं वय विसरायला लावतो आणि अशा विविध छंदातच माणसाला आनंदी जगण्याचा मार्ग गवसतो. काव्य लेखन, काव्यवाचन, योगाभ्यास, कला आणि नाट्याभिनय यासोबतच नामवंत व्यक्तिमत्त्वाचा ऑटोग्राफ घेणं हा छंद जडलाय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेटफळ येथील रवींद्र देबडवार गुरुजी यांना!

          हेमा मालिनी,जॅकी श्रॉफ, मोहन जोशी, जब्बार पटेल, वर्षा उसगावकर, जयश्री गडकर, मच्छिंद्र कांबळी, विक्रम गोखले, द.मा मिरासदार, गणपतराव देशमुख, प्रशांत दामले, मकरंद अनासपुरे, गजेंद्र अहिरे, चंद्रकांत कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, आसावरी देशपांडे, सुशांत शेलार, मयूर वैद्य, अशोक शिंदे, अशोक सराफ, राहुल देशपांडे, अशी भली मोठी यादी दोनशेच्या पार जाते. यामध्ये मराठी व हिंदी,चित्रपट कलावंत,गायक,वादक,

किर्तनकार,नाटक कलावंत,लेखक कवी,राजकीय,सामाजिक व्यक्तीमत्वांचा समावेश आहे.अशी प्रत्येक व्यक्तिमत्वं जाणून घ्यावीत, यातून प्रत्येकाकडूनच काहीतरी शिकत जावं हा संदेश ते आपल्या विद्यार्थ्यांना देत असतात. याशिवाय जाणता राजा या महानाट्यात,संत नामदेव या मालिकेत तसेच अनेक पथनाट्यांमधून त्यांनी आपली कला जोपासली आहे.

             ते उत्तम योग शिक्षक आहेत. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच योग आणि प्राणायाम यांचं महत्त्व कळावं यासाठी दर शनिवारी योगाचा तास घेतात. व्यायाम,ध्यानधारणा,प्राणायाम,बैठे,खडे,दंड स्थितीतील योगप्रकार,झुम्बा, अँरोबिक्स,हास्य योग,टाळीयोग, सूर्यनमस्कार असे पन्नास पेक्षा जास्त योगासने त्यांचे विद्यार्थी करतात.अशा विविध कौशल्यपूर्ण व मनोरंजक पद्धतीमुळं मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास साधण्याचा ते प्रयत्न करतात.

           याशिवाय लेखक आपल्या भेटीला,शैक्षणिक मार्गदर्शन शिबिरे,शैक्षणिक साहित्य निर्मिती,ओरीगामी कला,स्पर्धा परीक्षा,ऐतिहासिक कथाकथन,कथावाचन,कविता वाचन,संस्कृत पठन - वाचन,पत्रलेखन,विरांना सलाम अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांना वाचते,बोलते,लिहिते करत कृतीशील बनवत आहेत.उत्कृष्ट सुत्रसंचलन,फलकलेखन,चित्रकला ,हिरव्या पालेभाज्या खाणे,प्लास्टीक डबामुक्ती,पैसे बचत,हरवले-सापडले,माझा वाढदिवस,तथास्तु,अशा छोट्या छोट्या उपक्रमांतुन जीवन कौशल्य ,संस्कार,नितीमुल्ये देण्याचा प्रयत्न ते करत आहेत. इंग्रजी माध्यमाकडचा विद्यार्थ्यांचा ओढा कमी होऊन जि.प.शाळेत मुले दाखल झाली पाहिजेत यासाठी ते सतत प्रयत्नशील असल्याचे दिसून येते.यासाठी शाळेतील सर्व शिक्षक सहकार्यांची मदत मिळत आसल्याचेही ते सांगतात.

        

त्यांच्या या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना

कोळेगावचा आदर्श शिक्षक पुरस्कार,दिपकआबा साळुंखे शिक्षक सहकारी पतसंस्थेचा उपक्रमशिल शिक्षक पुरस्कार,शिक्षक ध्येयचा कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार इ. पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

No comments:

Post a Comment