गावाला शाळेचा अभिमान आणि शाळेला गावाचा आधार असं म्हणत ललिता मोरे मॅडम यांची शाळा राज्यात तिसरी
प्रति महाबळेश्वर म्हणून ज्या गावाचा उल्लेख केला जातो असे निसर्गाच्या कुशीत वसलेले , अध्यात्माच्या वाटेवरील कृषी पर्यटन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूर तालुक्यात असणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचणी. सातारा जिल्ह्यातून विस्थापित होऊन पुनर्वसन झालेल्या चिंचणी या छोट्याशा गावातील जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आज राज्याच्या नकाशावर मोठया दिमाखानं झळकत आहे. ही शाळा पाहण्यासाठी राज्यभरातून लोक इथं येतात. तेव्हा त्याच्या तोंडी रविंद्रनाथ टागोर यांच्या "शांतीनिकेतन" शाळेची आठवण झाल्याचे सहज उद्गार बाहेर पडतात. गावच्या विकासाबरोबरच शाळेचा विकासही व्हावा या ध्येयानं झपाटून गावकर्यांच्या मदतीनं शाळेमध्ये अमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती ललिता सौदागर मोरे.
शाळेची पटसंख्या वाढवणं आणि ती टिकवून ठेवणं हे पहिलं काम त्यांनी हाती घेतलं. आसपास पसरलेलं खाजगी शाळांचं जाळं पालकांचा इंग्रजी शाळेकडं असणारा ओढा ही मोठी संकट पार करत त्यांनी आपल्या सहकारी शिक्षकांच्या मदतीनं काम सुरू केलं. यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रमांचं आयोजन केलं . शाळा प्रवेशोत्सव, आषाढी वारी उपक्रम, विविध सण थोर व्यक्तींची जयंती, विविध स्पर्धा स्नेहसंमेलन इत्यादी कार्यक्रमाचं आयोजन करून पालकांना शाळेत आणलं. विद्यार्थ्यांसोबतच पालकांना आपल्याच मराठी शाळेची गोडी लावली. व्यवहार ज्ञान वाढवण्यासाठी बाजार डे, बँक भेट, परिसर भेट हे उपक्रम दरवर्षी सुरु केले. तसेच विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागावी म्हणून गेल्या चार वर्षापासून विद्यार्थी' बचत बँक' हा उपक्रम हाती घेतला. बचत बँकेचं कामकाज शाळेतील विद्यार्थ्याकडेच दिलं जातं. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागावी व त्यांच्यावर संस्कार व्हावे यासाठी दर 'वर्षी स्मार्ट गर्ल व स्मार्ट बॉय' निवडून त्याला योग्य ते बक्षीस दिलं जातं. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी स्पर्धा परीक्षेची तयारी घेतली जाते. शाळा जरी द्विशिक्षकी असली तरी सर्व भौतिक सुविधांनी परिपूर्ण आहे. शाळेतील शिक्षकांनी शैक्षणिक उठावातून दोन संगणकसंच, दोन एलईडी संच, प्रोजेक्टर मिळवले आहेत. लोकसहभागातून जवळपास पाच लाखांचं काम शाळेमध्ये केलं आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी टॅब उपलब्ध असून पहिलीची मुले सुद्धा टॅबवर अभ्यास करतात. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा आव्हाळे मॅडम यांनी सुद्धा या गोष्टीची दखल घेतली. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा कौशल्याधिष्ठित अभ्यास पूरक असणाऱ्या विविध प्रकारच्या लघु उद्योगांना भेटी देण्याचं आयोजन केलं जातं.
शाळेला भेट देणाऱ्या मोठमोठ्या पाहुण्यांना सुद्धा अगदी पहिलीतील मुलं सुद्धा बिनधास्तपणे संवाद साधतात. राष्ट्रीय सणांच्या दिवशी शाळेतील सर्वच मुले धीटपणे भाषण करतात. शाळेतील विद्यार्थी चित्रकला, कथाकथन, व वक्तृत्व स्पर्धेत चमकत आहेत. विद्यार्थ्यांचा वाढदिवस शाळेतच साजरा केला जातो. व याप्रसंगी शाळेला लागणारं साहित्य विद्यार्थ्यांच्या पालकाकडून विद्यार्थ्यांना वाटप केलं जातं. अशा प्रकारे लोकसहभागातून शैक्षणिक उठावातून शाळेमध्ये , भौतिक सुविधात वाढ करून एखाद्या खाजगी शाळेप्रमाणं ही जिल्हा परिषदेची शाळा उभी केली. कोरोना काळा सुद्धा "पारावरची शाळा" या उपक्रमाद्वारे मॅडम सह इतर शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांना अध्यापन केलं. गावकऱ्यांच्या सहकार्यानं शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीनं शाळेसमोर लाल मातीचं मैदान तयार करणं, पेवर ब्लॉक टाकणं, डिजिटल वर्ग खोल्या तयार करणं, ही सर्व कामं शाळेतील शिक्षक श्री जालिंदर गोरख गायकवाड गुरुजी व गावातील शिक्षण प्रेमी श्री. मोहन दादा अनपट,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर सावंत व त्यांचे सर्व सहकारी ग्रामस्थांनी मोलाची मदत केली.
शाळेमध्ये आकर्षक रंगरंगोटी केली. शाळेनं दोन वर्षापूर्वी घेतलेल्या स्वच्छ शाळा सुंदर शाळा अभियानात द्विशिक्षकी गटात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवला. असून राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार व तत्कालीन पालकमंत्री मा. दत्तात्रय भरणेमामा यांच्या हस्ते शाळेचा मंत्रालयात सत्कार झाला.
तसेच वर्षी राज्यस्तरावर आयोजित करण्यात आलेल्या *"मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" स्पर्धेत पुणे विभागात तृतीय क्रमांक प्राप्त झालेला असून अकरा लाखाचे बक्षीस प्राप्त झाले आहे*. 'गाव करी ते राव काय करी' या उक्तीप्रमाणं शिक्षक व गावकरी यांनी एकत्र येऊन काम केलं तर शाळेची व गावाची प्रगती कशी होऊ शकते याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचणी . जसा मुख्याध्यापक तशी शाळा हे श्रीमती लता मोरे मॅडम यांनी सर्व गावकरी आणि शिक्षकांच्या मदतीनं सिद्ध करून दाखवलं.
No comments:
Post a Comment