व्हाटसअप, आय.एस.ओ. आणि ज्ञानरचनावाद....
जिल्हा परिषद शाळेतील शैक्षणिक क्रांतीच्या नव्या वाटा....!
--------------------------------------
समाजातील प्रत्येक घटकाच हक्काचं व्यासपीठ म्हणून ओळखली जाणारी गावातील जिल्हा परिषदेची शाळा. ज्यावेळी गावात कोणताच विषय बोलण्यासाठी नसतो त्यावेळी हक्कान कुणी चांगलं तर कुणी वाईट बोलावं ते शाळेविषयी... मग ते शाळेतील शिक्षकांविषयी असेल, पोषण आहाराविषयी असेल अथवा चांगल्या वाईट उपक्रमाबद्दल . शाळेतअनेक विषय. दिवस भर जरी गप्पा मारत बसलं तरी विषय शिल्लक राहतील, आणि का बोलता? म्हणून तुम्हाला कोणीही विचारणार नाही असं हे गावकऱ्यांसाठी गप्पांच मैदान.
परंतु अगदी अलीकडच्या काळात हे सारं बदलत चाललेलं दिसतयं. नवं सरकार, नवी शैक्षणिक धोरणं, नवा अभ्यासक्रम त्याचबरोबर आधुनिकतेची जोड देत केलं जाणारं अध्यापन आणि अध्यापनात होत असलेला ई-लर्निंग चा वापर हे अलीकडच्या जि.प.शाळांचं वॆशिष्ट्य .हे सारं करत असताना शिक्षकांनी सुद्धा आपल्यामध्ये बदल करून घेतलेला दिसून येतोय. त्याच त्याच रटाळ अध्यापन पद्धती, पाठांतरावर दिला जाणारा जोर आणि शिकवलेले कळले नाही म्हणून दिला जाणारा मार कालबाह्य झालेला दिसून येतोय. नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी आणि खाजगी शैक्षणिक संस्थाबरोबर चाललेली स्पर्धा या विषयी शिक्षक आता विचार करू लागल्याचे दिसून येत आहे.
दहा-बारा वर्षाच्या कालावधीत सर्व शिक्षा अभियानातून शाळेच्या भौतिक गरजा भागल्या या कालावधीत विविध अभियानं राबविली गेली. परंतु माणूस जेव्हा आतूनच पेटून उठतो तेव्हा क्रांती घडून येते असा आपला इतिहास सांगतो. असाच कामाच्या ध्यासाने पेटून उठलेला शिक्षक आता ख-या अर्थानं फेसबुक, व्हाटसअप, ई-लर्निंग, डिजिटल क्लासरूम च्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात क्रांती करतोय.
सोलापूर जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी मा.वैशाली जामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेला ए.टी.एम. ग्रुप. जिल्ह्यातील धडपड करणारे शिक्षक अधिकारी, संगणक तज्ञ या ग्रुपला जोडले गेले, शाळेत केले जाणारे उपक्रम, अडचणी, उल्लेखनीय बाबींची देवाण घेवाण या ग्रुपच्या माध्यमातून चर्चा घडवून आणली जावू लागली. प्रत्येक मुद्द्यावरून चर्चा करण्यासाठी मा. शिक्षणाधिकारी वेळ देऊ लागल्या . अधिकारी आणि शिक्षक एकमेकांच्या जवळ येऊ लागले माहितीची देवाण घेवाण झाली. ध्यास फक्त गुणवत्तेचाच...
ई-लर्निंग म्हणजे काय? डिजिटल स्कूलची संकल्पना काय? मोबाईल वरून अध्यापन कसे करावे? हे आणि यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरे देणारा फार मोठा ग्रुप या जिल्ह्यात काम करतोय. यामध्ये अग्रक्रमाने रणजीत डीसले, लक्ष्मण काटेकर, विजागत सर, नदाफ सर हे आणि यांसारखे अनेकजण तंत्रस्नेही या व्हाटसअप ग्रुपद्वारे जिल्ह्यातील इतर शिक्षकांना माहितीची देवाण घेवाण करताहेत. विषय फक्त आणि फक्त ई-लर्निंग. संगणकाचा अध्यापनात कसा वापर करावा?. शैक्षणिक व्हीडीओ निर्मिती कशी करावी?. शैक्षणिक अॅप्स, ब्लॉग, गुगल फॉर्म वर माहिती जमा कशी करावी या बद्दल सखोल ज्ञान या ग्रुपवर मिळू लागलं.
रणजीत डीसले यांनी बालक पालक ग्रुप तयार करून पालकांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण केली. थेट तक्रार न करणारे पालक ग्रुपवर चर्चा करू लागले. समस्या समजल्या कि ईलाज निघतो. शाळा आणि समाज यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली.
मंगळवेढ्याचे अमित भोरकडे हे उत्तम चित्रकार, सुंदर हस्ताक्षर, रांगोळी, मेहंदी आणि फलकलेखन याविषयी जिल्ह्याला परिचित आहेत. माझी शाळा माझा फळा हा ग्रुप त्यांनी तयार केला. जिल्ह्यातील सर्व कलाकार मंडळी जोडली गेली. शाळामधील फळे रंगू लागले अनेक अक्षरांचे नमुने सर्वांना पहायला मिळू लागले.
माढा तालुक्यातील अरणचे केंद्रप्रमुख विलास काळे यांनी ज्ञानरचनावाद सुरु केला.. विद्यार्थ्यांनी स्वत: ज्ञानाची रचना करावी. स्वत: शिकावं, स्वत: अनुभव घ्यावेत चुका सुधारण्यात शिक्षकांनी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी अशी हि ज्ञानरचनावादाची संकल्पना अनेक शिक्षक, नामवंत शिक्षणतज्ञ अधिकारी या ग्रुपच्या माध्यमातून एकत्र आले. उपक्रमांची देवाणघेवाण झाली. अडचणींवर चर्चा घडू लागली.शाळा रंगू लागल्या आणि विद्यार्थी स्वतः काय तरी करताहेत हे दिसू लागलं .ग्रुप प्रश्न सुरू झाले .सर्व शाळेच्या वेळे व्यतिरिक्त...
हे सर्व करत असताना आपल्या शाळा आय.एस.ओ. असायला पाहिजेत असा एक विचार पुढे आला. करमाळा तालुक्यातील एक शाळा आय.एस.ओ. झाली आणि संपूर्ण जिल्ह्यानं शाळा आय एस ओ करण्याचा ध्यासच घेतला. शाळा आणि समाज एकत्र आला कि काय घडू शकत ते कळून आलं. लाखोंच्या घरात रोख आणि वस्तूंच्या स्वरूपात शाळेला देणग्या मिळू लागल्या. शाळा रंगू लागल्या. शाळेच दप्तर यामुळे व्यवस्थित झालं. शाळेकडे पाहण्याचा पालकांचा दृष्टीकोन बदलला. जिल्हा परिषद शाळा आणि खाजगी शाळा स्पर्धा निर्माण झाली. त्यामुळे सर्वांना वाटू लागलं आपली शाळा आय.एस.ओ. व्हायला पाहिजे. दहा बारा वर्षाच्या काळात सर्व शिक्षा अभियानातून जेवढं काम झालं नव्हतं किंबहुना त्याही पेक्षा कितीतरी पटीनं जास्त काम अाय एस ओ मधून झालं.तालुक्यात तालुक्यात स्पर्धा निर्माण झाली यामध्ये माढ्याचे गटशिक्षणाधिकारी सोमनाथ वॆद्यसाहेब, पंढरपूरच्या वठारे मॅडम ,मोहोळचे फडके सर कायमच चर्चेत राहिले.
याचबरोबर शाळेत काहितरी नवीन उपक्रम चालू करावा .त्याचं एका साचेबद्ध पद्धतीत शिक्षकांनी लिखाण करावं आणि इतर शाळांना मार्गदर्शक म्हणून त्याचा वापर व्हावा यासाठी सिद्धाराम माशाळे,बाळासाहेब वाघ ,हेमा शिंदे शरणप्पा फुलारी आणि त्यांची सर्व टीम राज्य स्तरावर काम करतेय .
आवाज नसणाऱ्यांचा आवाज म्हणून संपूर्ण राज्याला परिचित असणारे शेटफळ ता.मोहोळ चे योगेश भांगे यांचही असच अफलातून कार्य ‘व्हाईस ऑफ द व्हाईसलेस’ च्या माध्यमातून जिल्ह्यातील कर्णबधीर बालकांना बोलकं करणं. ‘कानाने बहिरा मुका परी नाही’ हे ब्रीद घेऊन त्यांचं कार्य संपूर्ण राज्यभर चालू आहे.ताट-वाटी सारखा उपक्रम त्यांनी सुरू केला आणि कर्णबधीर शोध मोहिमेला एक दिशा मिळाली हे आणि यासारखे कित्येक शिक्षक या शैक्षणिक क्रांतीमध्ये सामील आहेत. हे सर्व पाहून अस वाटतयं येणारं २०१६-१७ हे शैक्षणिक वर्ष ‘शैक्षणिक क्रांतीच’ वर्ष असणार आहे.
शब्दांकन – श्री.नवनाथ शिंदे
अरण, ता.माढा.
Mob. : 97 66 88 25 98
shindenh9@gmail
शिक्षणक्षेत्रातील बदलांचा अचूक वेध.शब्दांकनहि छान.
ReplyDeletefab sir.......
ReplyDelete