विद्यार्थ्यांची प्रगती, त्यांनी मिळविलेले यश, आत्मविश्वासानं प्रत्येक क्षेत्रात त्यांनी टाकलेलं पाऊल हाच विद्यार्थ्यांच्या शिक्षकांचा आरसा असतो. अशा यशस्वी मुलांमध्येच शिक्षकांचं प्रतिबिंब दिसत असतं. रात्रंदिवस विद्यार्थ्यांच्या सर्वांगिन विकासासाठी झटणारे कित्येक शिक्षक या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत म्हणूनच शिक्षणाचा हा रथ अविरत चालतो आहे. शैक्षणिक क्षेत्रात नवनाथ शिंदे या अशाच एका अष्टपैलू प्राथमिक शिक्षकाचं योगदान खरंच कौतुकास्पद आहे.
इयत्ता दहावी मध्ये केंद्रात प्रथम येऊन सुद्धा शिक्षण क्षेत्राची आवड म्हणून त्यांनी डी.एड. ला प्रवेश घेण्याचं ठरवलं. डी.एड.ची पदवी घेऊन शिक्षण क्षेत्राची वाट स्वीकारली. सोलापूरातल्या नूतन प्रशाले मधून शिक्षण सेवेची सुरुवात झाली. मग लमाणतांडा, एक शिक्षकी शाळा, मुलींची शाळा अशा विविध ठिकाणचा अनुभव घेतला. राज्यातील काही नामांकित शाळांपैकी अरण जिल्हा परिषदेची शाळा एक मॉडेल शाळा उभारणीमध्ये त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. सलग 15 वर्ष याठिकाणी विविध उपक्रम कार्यान्वित करून त्यांनी शाळेचे आणि गावाचे नाव संपूर्ण राज्यात पोहोचवले.
अरणची बरडावरची शाळा! गावापासून लांब, उजाड आणि ओसाड ठिकाणची. शिक्षण विभाग, आमदार फंड, लोकसहभाग यांच्या माध्यमातून त्यांनी शाळेतील सर्व शिक्षकांच्या मदतीने येथे पहिली संगणक लॅब सुरू केली. संगणक शिक्षक नेमून, स्वतः संगणक शिक्षण घेऊन संगणक शिक्षण सुरू केलं. शाळेत विविध प्रकारची वृक्षलागवड करून स्मशानभूमीतल्या शाळेचं रुपांतर निसर्ग शाळेत केलं. शालेय वस्तू भांडार, परीसर साधन केंद्र, इंग्लिश लॅब, सेमी इंग्लिश शिक्षणाची व्यवस्था सुरु केली. पालक, ग्रामस्थ आणि शाळा यांच्यामध्ये सुसंवाद घडवून, त्यांन शाळेकडं खेचून आणण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी पार पाडली.
शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय परीक्षा, यासाठी विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन केलं. अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले. इयत्ता सातवीतील एकाच वेळी 15 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड. हा त्यांच्या शैक्षणिक कार्यातला संस्मरणीय क्षण .हुशार, चतुर, सामान्य, असामान्य विद्यार्थ्यांमुळे सुचत गेलेले अनेक नवनवीन उपक्रम या शाळेत त्यांनी सुरू केले. 300 विद्यार्थीसंख्या असणारी शाळा 680 विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली. आसपासच्या खेड्यातून विद्यार्थी शाळेत येऊ लागले. तत्कालीन शिक्षणाधिकारी सुमन शिंदे यांच्या धडपड मंच मधून त्यांना खूप काही शिकता, करता आलं. असं ते आवर्जून सांगतात.
शालेय जीवनापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी माढा तालुका प्रज्ञाशोध परीक्षा सुरू केली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी वीरेंद्र सिंह यांनी या याबद्दल त्यांचं कौतुक केलं.
आजी-माजी विद्यार्थी कल्याणकारी विकास योजनेअंतर्गत विद्यार्थी कल्याण निधी योजना या नावाने बँकेत तीन लाख, पन्नास हजार रुपये लोकवर्गणी जमा करून कायम ठेव ठेवली. दरवर्षी मिळालेल्या व्याजातून स्वातंत्र्यदिनी विद्यार्थी पारितोषिक योजना सुरू केली. शिक्षणाची वारी पुणे आणि नागपूर येथील शैक्षणिक स्टॉलमधून हा लोकसहभागातून शाळा विकास उपक्रम संपूर्ण राज्यभर पोहोचवला.
त्यांचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात चमकत आहेत . आय.आय.टी मध्ये शिकत असलेला रोहित गायकवाड, एम.बी.बी.एस.चे शिक्षण घेत असलेला श्रीनिवास गोरे, संकेत वसेकर, बी ए एम एस च्या स्नेहा केदार ,प्राजक्ता केदार,रुग्णांना सेवा देत असलेले डॉ.धनंजय कुलकर्णी, डॉ. स्नेहल कांबळे डॉ.सोनाली भोसले हे विद्यार्थी, आर. टी. ओ. ऋषिकेश कोरडे , मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे आपापल्या ठिकाणी चोख सेवा बजावत आहेत. अनेक विद्यार्थी उद्योजक इंजिनियर, कृषी डिग्री, प्रगतशील शेतकरी, व्यवसायिक म्हणून आपल्या नावाचा आणि गावाचा दबदबा कायम ठेवत आहेत.
शिंदे यांचा सोलापूर जिल्हा परिषदेनं दोन वेळा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरव केला आहे.
इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत जास्तीत जास्त विद्यार्थी दाखल झालेबद्दल अधिवेशनामध्ये नागपूर येथे शिक्षण सचिव मा. धीरजकुमार यांच्या हस्ते त्यांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. याच बरोबर सोलापूर मीड टाऊन रोटरी क्लब चा गुणवंत शिक्षक पुरस्कार, मुंबई येथील लोकसेवा अकादमीचा प्राइड ऑफ नेशन पुरस्कार, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील शिक्षक रत्न पुरस्कार, माढा तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार, सर फाउंडेशन सोलापूर यांचा प्रयोगशील शिक्षक पुरस्कार, कविवर्य कुसुमाग्रज राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार, श्रावण बाळ पुरस्कार, यासारख्या अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे.
आज पर्यंत अनेक दैनिकासाठी प्रसंग लेखन, पत्रलेखन, काव्यलेखन, व्यक्ती चरित्र याविषयी लेखन केलं आहे.
पंचवीस वर्षाच्या सेवा काळात त्यांनी स्वतः एम. ए. बी. एड पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असून अजून विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा अभ्यास करण्याची त्यांची इच्छा आहे. आजच्या विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक ज्ञानाचा झालेला विस्फोट, माहिती स्त्रोताचा महासागर ,मोबाईल, इंटरनेट, टीव्ही, वर्तमानपत्रातून मिळालेली अद्ययावत माहिती यामुळे आजची मुलं अतिशय स्मार्ट बनलेली आहेत. आपल्यापेक्षा त्यांना खूप ज्ञान आहे असं समजून शिक्षकांनी स्वतः परिपूर्ण व्हायला हवं असं त्यांना वाटतं.
स्पर्धेच्या युगात केवळ नोकरीचा मार्ग न शोधता विद्यार्थ्यांनी स्वतःच्या उत्पन्नाचा मार्ग शोधायला हवा. यासाठी संधीच्या नवीन वाटा ..माहिती केंद्र, स्पर्धा परीक्षा केंद्राची निर्मिती माजी विद्यार्थी व मित्र मंडळाच्या वतीने सुरू करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
जिल्हा समन्वयक सर फाउंडेशन सोलापूर, बोलवाडी प्रकल्प शेटफळ, आणि प्रिसिजन फाउंडेशन ई-लर्निंग प्रोग्रॅम सोलापूर यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी सतत नवनवीन योजना, नाविन्यपूर्ण उपक्रम चालू कसे ठेवता येतील यासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Great work sir
ReplyDelete